अजूनकाही
यंदाचा २१वा फिफा वर्ल्ड कप रशियामध्ये होत असून त्याला सुरुवात होऊन एव्हाना दोन दिवस उलटून गेले आहेत. त्यानिमित्तानं हा विशेष लेख. हा मूळ लेख www.indiejournal.in या पोर्टलवर १३ जून २०१८ रोजी प्रकाशित झाला असून तो लेखक व संपादक यांच्या पूर्वसंमतीनं इथं पुनर्मुद्रित केला आहे.
.............................................................................................................................................
खेळ हा मनुष्य स्वभावाचा मूलभूत भाग आहे. खेळात आपण एकत्र येतो, स्पर्धा करतो, भांडण करतो. सहभागाची आकांक्षा, काहीतरी साध्य करण्याची मनीषा आणि जिंकण्याची जिगीषा असं सगळं काही त्यात येतं. शारीरिक, मानसिक दोन्ही प्रकारचं विरेचन इथे होतं. तो एक प्रकारचा कॅथार्सिस असतो. म्हणूनच काही मानसशास्त्रज्ञ खेळाकडे ‘हिंसेमधून बाहेर पाडणारा कालवा’ या अर्थानेही पाहतात.
बहुतांशी स्पोर्ट्स फिल्म्समध्ये जिंकणं आणि त्यामागचा संघर्ष हा महत्त्वाचा धागा असतो. ज्यात काहीही वाईट नाही. पण त्यामुळे होतं काय की, हे बहुतांशी सिनेमे प्रचंड एकरेषीय होऊन जातात. कारण जिंकणं ही भावनाच मूलभूत आहे आणि हिरो (हा वापर जेंडरलेस समजावा) शेवटी जिंकतो, हे माहिती असेल तर मग त्यात अजून काय गुंतागुंत आणायची हा प्रश्न उरतो. अर्थात कथनकार उत्तम असेल तर तो अशा कथाही किती उत्तम प्रकारे फुलवू शकतो याची अगणित उदाहरणं आहेत (उदा. ‘चक दे इंडिया’, ‘रॉकी’).
यानंतर काही सिनेमे येतात, जे मूळ खेळासोबतच त्या भोवती कथानक गुंफत जातात. ते खेळापलीकडे जात अधिक गुंतागुंतीच्या भावनांना, संघर्षांना हात घालतात. म्हणून ते अधिक व्यामिश्र अनुभव देऊ शकतात (किंवा कुठलाही सिनेमा जेव्हा त्याचे जॉन्र कन्व्हेन्शन्स ओलांडून पलीकडे जातो, ते पाहणं वेगळा अनुभव देणारं असतं). आता हेच बघा ना, सर्वांत चांगली भारतीय स्पोर्ट फिल्म म्हटलं की, ‘लगान’ डोळ्यापुढे येते आणि ती फिल्म मूळ क्रिकेट वगळता बऱ्याच इतर गोष्टींबद्दलही आहे. आणि या इतर गोष्टीच तिला सामान्य स्पोर्ट फिल्मपासून वेगळ्या करतात. जिंकणं तिथंही महत्त्वाचं आहेच, पण त्या मागची परिस्थिती जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा ते जिंकणं अधिक महत्त्वाचं होऊन जातं.
यात इतर उदाहारण द्यायची तर ‘रश’ (२०१३) हा रॉन हॉवर्डचा सिनेमा. तो केवळ F1 रेसबद्दल न राहता दोन भिन्न प्रकारच्या मानसिकतांचं रूपक होऊन जातो. इन्व्हीक्टसमध्ये दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कपचं यजमानपद मिळणं हे नेल्सन मंडेलांच्या अपार्थाइड-विरोधी लढ्याचं यश दाखवून देतं. शिवाय त्यात वर्णसंघर्षाची दुसरी बाजूही दिग्दर्शक आपल्या समोर आणतो. मनीबॉल खेळामागचं राजकारण पुढे आणतो, तर बॅटल ऑफ द सेक्सेस त्या राजकारणापलीकडे जाऊन त्यामागच्या व्यक्तींकडे पाहू इच्छितो. बॉक्सिंगवरचे सिनेमे आणि त्यातल्या पात्रांचा संघर्ष यावर तर इतके सिनेमे आलेत की, तो एक वेगळा जॉन्र ठरावा. अशा विविध प्रकारे या फिल्म्स स्पोर्ट्स ड्रामाच्या मर्यादेपलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात.
फुटबॉल
आपण परत सिनेमाकडे वळूयात, पण त्याआधी फुटबॉलबद्दल काही महत्त्वाचं. जगात आज कुठल्याच खेळाला नसेल इतकी प्रसिद्धी फुटबॉलला मिळाली आहे. ऑलिंपिकहूनही अधिक गर्दी फुटबॉल वर्ल्डकपसाठी जमते. फिफा वर्ल्ड कप हा सोहळा केवळ बत्तीस देशांचा नसतो, तर त्या देशांशी काडीमात्रही ओळख नसणारेही कित्येक समर्थक, फॅन्स या सोहळ्याचा भाग असतात.
आता हे असं का? फुटबॉलच का? तर याचं उत्तर या खेळाच्या स्वरूपातच लपलं आहे. फुटबॉल हा जवळपास क्लासलेस खेळ आहे. एक बॉल आणि जमेल तेवढी जागा या गोष्टी वगळता त्याला दुसरं कसलंही साधन लागत नाही. त्यामुळे लॅटिन अमेरिकेसारख्या गरीब खंडातही हा खेळ चांगलाच बहरू शकला. किंवा अनेक आफ्रिकन देशात आज तो वाढतो आहे. अगदी कोणीही, कुठेही, कधीही फुटबॉल खेळायला सुरू करू शकतो.
फुटबॉल कोणीही खेळू शकतं, पण ‘कोणासोबत खेळणार’ या प्रश्नात खरी मेख आहे. म्हणून तर फुटबॉल वर्गसंघर्षाचं चालतंबोलतं प्रतीक ठरतो. मग पुढे चालून त्यात वर्णसंघर्ष येतो. एक लॅटिन अमेरिकेन देश जेव्हा एका युरोपियन देशाला हरवतो, तेव्हा होणाऱ्या जल्लोषाला वसाहतवादाची किनार असते. कित्येक देशांसाठी ते स्वतःला सिद्ध करण्याचं एक माध्यम आहे. अर्जेन्टिना-ब्राझील किंवा बोस्निया-हर्झेगोव्हेनिया यांच्यातले सामने त्या प्रेक्षकांसाठी भारत-पाकिस्तान इतकेच नाजूक असतात.
आता हे इतकं सगळं मटेरिअल, इतका सगळा सामजिक लढा म्हटल्यावर यावर चांगले सिनेमे बनणार नाहीत असं कसं होईल. (असं घडायला ते थोडीच बॉलिवुड आहे!) एकूणच काय तर फुटबॉल अनेक सिनेमांना उत्तम बॅकड्रॉप ठरू शकतो. आणि त्याच तसा भरपूर वापर केलाही गेलाय.
फुटबॉलवरचे दोन वेगळे सिनेमे
आतापर्यंत झाले ते खेळ किंवा त्याच्याशी संबंधित राजकीय, सामजिक, वैयक्तिक पातळीवर चिंतन करणारे सिनेमे. पण या सर्वांत दोन अत्यंत वेगळे सिनेमे माझ्या पाहण्यात आले. हे दोन्ही सिनेमे फिफा वर्ल्ड कप १९९८ आणि २००२ या दोन वर्ल्ड कपच्या काळात घडतात. हे दोन्ही सिनेमे म्हणजे इंडिजीनस कल्चरचा एका जागतिक घटनेला दिला जाणारा प्रतिसाद आहेत. आणि मी जड शब्दात सांगत असेन, पण हे सर्व ते खूप हलक्या फुलक्या पद्धतीनं करतात.
यातला पहिला आहे ‘द कप’. हा घडतो हिमाचल प्रदेशच्या एका तिबेटन मॉनेस्ट्रीमध्ये. दोन नुकतेच दीक्षा घेतलेले लामा (म्हणजे अगदी छोटी मुलं) आहेत आणि त्यांना १९९८चा वर्ल्ड कप पाहायचा आहे. तो पाहण्यासाठी आधी ते बाहेर जातात, नंतर प्रत्यक्ष मॉनेस्ट्रीमध्येच टीव्ही आणला जातो. या सर्वांत मॉनेस्ट्रीच्या मूळ लामाची होणारी घुसमट. तिबेटन बुद्धिझम, जो मुळातच संचय, उपभोग यांना जीवनात स्थान देत नाही. आणि अशा शिकवणीत वाढलेल्या मुख्य लामाला या नव्या जागतिक ताकदीला कसं सामोरं जायचं ते लक्षात येत नाही. हे सर्व अगदी हलक्याफुलक्या पद्धतीनं सिनेमा समोर आणत जातो. मी आजही जेव्हा केव्हा कुठल्या मॉनेस्ट्रीमध्ये कोक किंवा टीव्ही ठेवलेला पाहतो, तेव्हा तेव्हा मला हा सिनेमा एकदा तरी डोळ्यासमोर येऊन जातोच.
एक लामा, जो स्वतः न्यूयॉर्कहून सिनेमाचं शिक्षण घेऊन आला आहे, तो अशी फिल्म दिग्दर्शित करतो आणि भूतानकडून तो ऑस्करसाठी पाठवला जातो. या चारही शक्यता अचंबित करणाऱ्या आहेत. youtube वरती हा सिनेमा अगदी कमी रिझोल्युशनमध्ये उपलब्ध आहे. बाकी शोधणाऱ्याला चांगला मार्ग सापडतोच. छोटे लामा फुटबॉल खेळत असलेले अनेक गोड फोटो आपण सर्वांनी पाहिलेत. तसाच हा सिनेमाही अगदी सर्वांनी पाहावा असा आहे.
दुसरा सिनेमा आहे जेरार्डो ऑलीव्हारेसचा ‘ल ग्रान फिनाल’ (‘La gran final’ किंवा ‘The Great Match’). २००२ चा वर्ल्ड कप हा मी पाहिलेला पहिलाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे तो माझ्या कायमचा लक्षात राहिला. आणि २००८ मध्ये हा सिनेमा पाहिल्यावर त्याच्या आठवणी अजूनच छान झाल्या.
दिग्दर्शक स्पॅनिश असला तरी हा सिनेमा तीन अत्यंत रिमोट ठिकाणांवर घडतो. एक आहे अमॅझॉनचं उंच झाडांचं जंगल, दुसरं आहे नायजेरियामधलं वाळवंट आणि तिसरं आहे मंगोलियामधला रशियन सीमेजवळचा कुरणांचा प्रदेश. या इतक्या रिमोट ठिकाणची तीन पात्रं ठरवतात की, त्यांना २००२ ची जर्मनी विरुद्ध ब्राझीलची वर्ल्ड कप फायनल पाहायची आहे. आणि त्यासाठी ते जे प्रयत्न करतात, ते म्हणजे हा सिनेमा आहे. यात फार मजेशीर पात्रं येत राहतात. ब्राझीलच्या जंगलात जर्मनीचा सपोर्टर सापडतो. नायजेरियातील कथेत एका श्रीमंत माणसाला भर वाळवंटात बसायला खुर्ची हवी असते. ती दर मिनिटाला रेतीत धसत असते. मंगोलियातल्या कुटुंबाला तर हेच माहिती नसतं की, आता ते नक्की कुठल्या देशात आहेत. त्यामुळे समोर ज्या देशाचे सैनिक बसलेत त्यावरून ते ठरवतात की, सपोर्ट कोणाला करायचा आहे. बरं, सैनिक असतात रशियन. त्यामुळे त्यांनाही माहिती नाहीये की, आता त्यांचा देश कोणाच्या बाजूनं आहे. जंगलात रेंज येत नाही म्हणून ताटाचा डिश अन्टेना केला जातो आणि एक पात्र नव्वद मिनिटं ते ताट एका विशिष्ट पोझिशनमध्ये धरून शंभर एक फुट उंच झाडावर बसून राहातं. अशी सर्व अतरंगी पात्रं सिनेमा आपल्याला दाखवत जातो आणि आपण हसत राहतो. आणि अशा प्रकारे कधीही न अनुभवलेल्या, अत्यंत वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून आपल्याला २००२ ची ही ग्रेट मॅच पाहायला मिळते.
स्पोर्ट्स फिल्मचा इतक्या वेगळ्यानं विचार केला जाऊ शकतो, हे मला या दोन सिनेमांमुळे कळलं. ज्या जागांचा विचार ट्रीपशिवाय इतर कुठल्या गोष्टींसाठी केला नव्हता, त्या ‘एक्झॉटिक’ जागा इथं कथानकाचा भाग होताना पाहायला मिळाल्या. खेळ जगाच्या कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यात पोहोचतो हे कळलं. असंच सगळ्यापर्यंत पोहोचलेलं दुसरं मध्यम म्हणजे सिनेमा.
जागतिक सिनेमा आणि फिफा वर्ल्ड कपसारखे खेळ जगात निरक्षरांपासून उच्चविद्याविभूषित अशा सर्वांपर्यंत पोहोचू शकतात, सर्वांना समजू शकतात. अशाच या दोन ताकदीच्या माध्यमांचा रोमान्स म्हणजे स्पोर्ट्स फिल्म्स. आणि या दोघांच्या रोमान्समधलं माझं हे एक लव्ह लेटर.
.............................................................................................................................................
लेखक सुदर्शन चव्हाण पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment