अजूनकाही
आज अनेकांना ‘माओ’ नेमका कोण, हे माहीतही नसेल. तो जिवंत आहे का मृत याचाही पत्ता नसेल. तो भारतीय की अभारतीय हेही माहीत करून घ्यायचं कारण नाही. साधारण नावावरून तो चिनी असावा असं काही जण ठोकून देतील. नवी पिढी गुगलवरून आवश्यक डेटा जमवेल.
माओ माहीत झाला तरी माओवाद म्हणजे काय, हा प्रश्न उरतो. ‘नक्षलवादी’ हा हल्ली ‘दहशतवादी’सारखा वारंवार ऐकू येणारा शब्द. नक्षलवाद म्हणजे काय, हेही गुगलवर शोधावे लागेल. पण प्रसारमाध्यमं, सरकार (कुठलेही) यांनी नक्षलवादी म्हणजे देशद्रोही, आर्मीचे कपडे घालून खरी आर्मी व पोलिस मारणारे लोक अशी प्रतिमा रुजवलीय.
त्यामुळे इसिस, लष्कर-ए-तोयबा, तालिबानी, सिमी वगैरे लोकांनी हात न घातलेल्या भारतीय प्रधानसेवक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याचा कट करणारे हे माओवादी कम नक्षलवादी आहेत तरी कोण? आजच्या सत्ताधाऱ्यांचा आणि त्याला संलग्न संघटनांचा मुख्य शत्रू मुसलमान आणि पाकिस्तान. त्यांच्यात जी धमक अथवा राग दिसला नाही, ती यांच्यात कुठून आली? माओवादी कम नक्षलवादी हिंदूविरोधी आहेत? ते लाल सलाम करतात, कॉम्रेड म्हणतात. मग ते कम्युनिस्ट आहेत का? पण ज्यांना पकडलेय ते दलित चळवळीशी संबंधित आहेत.
भीमा कोरेगावच्या २००व्या शौर्य स्मृतीदिनानिमित्त पुण्यात एल्गार परिषद झाली. दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगावला दंगल झाली. ज्यात शौर्य स्मरण दिनाला आलेल्या दलित, प्राय: आंबेडकरी अनुयायांवर हल्ला झाला. या हल्ल्याआधी काही हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांची समाधी व त्या समाधीचा कर्ता गणपत महार यांच्या समाधीवरून ‘इतिहासा’ची पाने मागे-पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि आजवर वादात नसलेला विषय वादात आणला. अयोध्येप्रमाणे.
त्यामुळे दंगलीनंतर सरकारनं जी पहिली कृती केली, ती हिंदू नेते मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. दोघांवर गुन्हा एकच. पण फरक असा की, एकबोटे जामिनासाठी (अटकपूर्व) धडपडत फरार होते, तर संभाजी भिडे मुक्तपणे फिरत, मराठी वृत्तवाहिन्यांची आदरार्थी वर्तणूक स्वीकारत, खुलासे करत फिरत होते. मूळ संभाजी महाराजांपेक्षा संभाजी भिडेच चर्चेत राहिले. दरम्यान एल्गार परिषदवाल्यांवर खापर फोडण्यात आलं. मात्र अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक पवित्रा घेऊन - माध्यमांनी सुरुवातीला बेदखल केलेला - ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करून दाखवला आणि विषयानं वेगळं वळण घेतलं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4417
.............................................................................................................................................
पुढे एकबोटेंना अटक झाली आणि कालांतरानं जामिनावर सुटकाही. संभाजी भिंडेवरचा एफआयआर तसाच होता, पुढे भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनीच भिडे गुरुजींना निर्दोषत्व बहाल केलं. इथं प्रश्न असा येतो, स्वत: गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचं गृहखातं संभाजी भिडेंवर एफआयआर नोंदवतं. नंतर तेच निर्दोषही ठरवतं. हे प्रेम एकबोटेंना लाभलं नाही. कसे हिंदू एकत्र येणार? असो. इथं हे प्रकरण थांबलं.
आणि आता जवळपास सहा महिन्यांनी एल्गार परिषद, माओवादी, नक्षलवाद्यांनी हायजॅक केली होती, त्यांनीच दंगल भडकवली, असा आरोप करत पाच जणांना ताब्यात घेतलं. त्यांची माओवादी-नक्षलवादी लिंक उघड करत. यापैकीच काहींनी पंतप्रधानांना राजीव गांधींप्रमाणे पब्लिक रॅलीत लक्ष्य करायचं असा कट रचून त्यासाठी आवश्यक तो पैसा व शस्त्रास्त्र जमा केली होती. मुख्यमंत्र्यांनाही कुटुंबासह लक्ष्य करायचं असंही त्यात होतं. तसं धमकीपत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यातही आलं होतं. जे नंतर मुख्यमंत्र्यांनीच उघड केलं.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा समाजातील विचारवंत, लेखक, कलाकार यांची कट करून हत्या करणं म्हणजे देशद्रोहच. त्यातही संविधानिक पदावरील लोकनियुक्त, लोकप्रिय नेतृत्व अशा प्रकारे संपवण्याचा कट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका. महात्मा गांधींना कुठलंही संरक्षण नव्हतं. त्यामुळे नथुराम गोडसेनं सरळ समोर जाऊन ‘ठरवल्याप्रमाणे’ त्यांचा वध केला. ती हत्या का वध हे शरद पोंक्षे अधिक चांगलं समजावतील.
इंदिरा गांधींना स्पेशल प्रोटेक्शन होतं. पण त्या सुरक्षा व्यवस्थेतीलच एकानं त्यांना गोळ्या घालून सुवर्ण मंदिरावरच्या कारवाईचा बदला घेतला. तो हुतात्मा ठरवला गेला. त्यावरही वाद होत राहतात. राजीव गांधी निवडणूक प्रचारात होते, सत्तेत नव्हते. तरीही संरक्षण होतंच. पण सुरक्षा कवच निवडणूक प्रचारात त्यांना जाचक वाटल्यानं त्यांनी यंत्रणांचा सभा घेण्याचा, लोकात थेट न जाण्याचा सल्ला धुडकावला आणि कट रचणारे यशस्वी झाले. श्रीलंकेतील तमिळ ईलमच्या लढ्यात पंतप्रधान असताना श्रीलंकेची बाजू घेतली म्हणून त्यांना धडा शिकवण्यात आला. लोक पकडले, खटले भरले, शिक्षा झाल्या, पण राजीव गांधी कुटुबियांनी सर्वांना माफ केलं. काही अजून तुरुंगातच आहेत. एका महिला आरोपीची मुलगी तुरुंगातच जन्मली, वाढली, शिकली, आता परदेशात असते.
मधल्या काळात काँग्रेस नेतृत्वाची एक फळीच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी मारली. नक्षलवाद्यांनी आजवर केलेली ही सर्वांत मोठी राजकीय हत्येची कृती असावी. अन्यथा त्यांच्या रडारवर स्पेशल टास्क फोर्स, पोलिस व खबरी आदिवासी असतात. काँग्रेसचं सरकार असताना बंगालमधली नक्षलवादी चळवळ ठेचून काढण्यात आली. त्यावर तेव्हा काँग्रेसवर टीकाही झाली. पण नक्षल्यांनी ना मुख्यमंत्री टार्गेट केले, ना पंतप्रधान.
नक्षलवाद्यांच्या या अचानक आक्रमक पद्धतीचं आश्चर्य, विशेषत: त्यातली कार्यपद्धती पाहता, एक स्मिता गायकवाड नावाच्या अत्यंत विद्वान, नक्षलवादी चळवळीच्या अभ्यासक वगळता इतर सगळ्यानांच पडलंय. यात प्रत्यक्ष चळवळीतले कार्यकर्ते, पक्षांचे नेते, वर्षानुवर्षं नक्षलवाद\ गडचिरोली कव्हर करणारे देवेंद्र गावंडेसारखे पत्रकार ते थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, असे अनेक आहेत.
‘माझा विशेष’ चर्चेत स्मिता गायकवाड ‘नक्षलवादाच्या अभ्यासक’ अशी ओळख घेऊन बसल्या होत्या. त्यांच्याकडे अभ्यासक तटस्थता शून्य होती. कारण चर्चेत त्या म्हणाल्या, ‘संभाजी भिडे भीमा कोरेगाव भागात २०१५पासून फिरकलेच नव्हते! आम्ही जे फॅक्ट फाइंडिंग केलं त्यात हे आहे’. ‘नक्षलवाद अभ्यासक’ अचानक ‘भिडे बचावक’ का झाल्या हे नंतर गुगलवर तपासलं तेव्हा कळलं.
या स्मिता गायकवाड ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ या संस्थेसाठी काम करतात. ही संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या समन्वयानं काम करते. गुगलवर संस्थेशी संबंधित लोक, नावं, कार्यक्रम, फॅक्ट फाइंडिंगचे विषय पाहिले\वाचले की, गायकवाड बाईंची अभ्यासक प्रतिमा चटकन कळेल. ‘माध्यम अभ्यासक’ अशी त्रोटक ओळख करून देतात. त्या कुणासाठी काय काम करतात हे सांगत नाहीत. चर्चेत गायकवाड बाईंकडे तपास अधिकाऱ्यापेक्षा अधिक माहिती होती.
पत्रकार परिषदेत इन्स्पेक्टर कदम म्हणाले, ‘जे काही मटेरिअल सापडलं आहे, ते आत्ताच तुम्हाला देता येणार नाही’. पण थोड्याच वेळात भाजप प्रवक्ते संबित पात्रा एक पत्र नाचवत होते, तर गायकवाड बाईंकडे २०१५पासूनच माहिती होती! पंतप्रधान व मुख्यमंत्री हत्येचा कट दीड दिवसातच बातम्यातून अंतर्धान का व कसा पावला, हे नि:पक्ष माध्यमं व पारदर्शी सरकारचं सांगू शकेल.
‘टाइम्स नाऊ’ आणि ‘रिपब्लिक’ टीव्हीवर इंग्रजी बाराखडी नीट उच्चारत चिमखडे बोल ऐकवणारांची एकापेक्षा एक अशी मंदबुद्धी गर्दी आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या अँकरनं आपण मिलियन डॉलर प्रश्न विचारल्याच्या थाटात अॅड. प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला की, ‘या पत्रात (कदमांनी पत्राचं वितरण केलं होतं?) तुम्हाला कॉम्रेड म्हटलंय, तर तुम्ही माओवादी आहात का?’ हे म्हणजे ‘या पत्रात तुम्हाला आदरणीय म्हटलंय, तर तुम्ही खरंच आदरणीय आहात का?’ असा प्रश्न विचारण्यासारखं होतं! कॉम्रेडची व्युत्पत्ती व व्यापक अर्थ माहीत असण्याची सुतराम शक्यता नसलेल्या त्या अँकरवर अॅड. प्रकाश आंबेडकर भडकले यात काहीच नवल नाही. पण नंतर ‘आंबेडकर भडकले’ हेच टीव्ही कम प्रीस्कूल वर्गात घोकत राहिले.
बंगालमध्ये उगम पावलेली कम्युनिस्ट चळवळ, त्यातल्या मार्क्सवादी, लेनिन-माओवादी, माओवादी, नक्षलवादी या विभाजनांचा आजही नंबर एकचा शत्रू आहे काँग्रेस! अणुकरारावर सरकारचा पाठिंबा काढून घेणारे कम्युनिस्ट, मुंबईसारख्या शहरात किंवा रेल्वे, बँका, महापालिका यात युनियनच्या माध्यमातून धडका देणारे विविध घटकातील कम्युनिस्ट यांचा शत्रू काँग्रेस. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतील कम्युनिस्टांचं राजकारण संपवण्यासाठी कॉ. कृष्णा देसाई हत्या व नंतर शिवसेनेचं पालनपोषण केलं काँग्रेसनं. प. बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर रे यांच्या सरकारनं नक्षलवाद चळवळीचं काय केलं हे महादेवी वर्माच्या कादंबरीतून वाचता येतं. अशी काँग्रेस दलित चळवळीला, माओवाद्यांना हाताशी धरून हत्येचा कट रचेल?
या सनसनाटी बातमीचा अत्यंत जबाबादारीनं शरद पवारांनी जाहीर सभेत, माजी पोलिस अधिकाऱ्याचाच हवाला देत जो पर्दाफाश केला, त्याला फडणवीस, राऊत यांनी ‘दुर्दैवी’ वगैरे प्रतिक्रिया दिल्या तरी त्यात दम नव्हता. कुठलीही व्यवस्था विरोधकांना पिसाळलेला कुत्रा ठरवते आणि मग पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालण्याच्या संविधानिक अथवा कायदेशीर किंवा बेकायदेशीर नियमाची अमलबजावणी करते. याच सभेत पवारांनी ‘पगडी’चा फेरबदल करून राजकीय हवेचा रोख बदलला. थोडक्यात अत्यंत योजनाबद्ध हत्येच्या कटाच्या बातम्यांवर पवारांनी सहज ‘पगडी’ ठेवून विषय निकालात काढला!
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘संपर्क फॉर समर्थन’ हे दसऱ्याला सोनं द्यायच्या खेळासारखं समाजातल्या विविध गुणवंतांना भेटण्याची मोहीम पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांनीही सुरू केलीय. आता माधुरी दीक्षित, सलीम खानवर फ्री सलमान खान अशा भेटीतून चार वर्षांची कामगिरी मांडायची की, संसदेत चर्चा घडवून आणायची, तपशील द्यायचा? आमचे बोलके आणि जुमलेबाज प्रधानसेवक मौनात राहणार आणि सरदार दारोदारी सार्वजनिक गणेश उत्सव अहवालासारखा कारकिर्दीचा लेखाजोखा वाटत समर्थनाचा जोगवा मागणार?
जे लोक मतपेटीतून हद्दपार होऊ शकतात, त्यांच्या जीवावर उठण्याचा जाहीर वेडेपणा माओवादी, नक्षलवादी करणार असतील, तर मग माओ आणि आंबेवाले भिडे एकच म्हणावे लागतील!
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
anirudh shete
Thu , 21 June 2018
संजय पवार यानी हिंदुत्ववादी, नक्षलवादी, माओवादी, भंपक पुरोगामी, अभिजनवादी, बहुजनवादी , मनुवादी या सगळ्या भूमिकाच्या पलीकडे एक मानवतावादी भूमिका समग्र मानवजातीच्या भल्याकरता घेतली तर वरील वाद्यांपेक्षा सामान्य माणूस त्यांचा आभारी राहील
anirudh shete
Thu , 21 June 2018
नकारात्मक विचारांची नकारात्मक मांडणी
vishal pawar
Thu , 14 June 2018
✔
Gamma Pailvan
Thu , 14 June 2018
'लावून' लिवलेला लेख. एकही मुद्दा धड नाही. -गामा पैलवान