“कुठलाही महाराज हा चांगला मनोविश्लेषक असतो. तो मोठमोठ्या मानसशास्त्रज्ञांनाही मागे टाकतो.” – भय्यू महाराज
संकीर्ण - मुलाखत
राम जगताप
  • भय्यू महाराज (२९ एप्रिल १९६८ - १२ जून २०१८)
  • Wed , 13 June 2018
  • संकीर्ण मुलाखत भय्यू महाराज Bhaiyyu Maharaj आध्यात्मिक गुरू Spiritual Guru

काल इंदूरमध्ये भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राजकीय वर्तुळात चांगली उठबस असलेले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षांत बऱ्यापैकी प्रस्थ असलेले भय्यू महाराज हे अलीकडच्या काळातलं बहुधा एकमेव उदाहरण असावं. त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या निमित्तानं त्यांच्या तब्बल बारा वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीचं हे पुनर्प्रकाशन. खामगाव (जि. अकोला) इथं  त्यांच्या आश्रमात जाऊन ही मुलाखत घेतली होती. आस्मादिकांची अशा प्रकारच्या महाराजांची मुलाखत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सरळसोट प्रश्न विचारले होते. पण तरीही त्यातल्या ‘बिटविन द लाइन्स’ आणि महाराजांनी त्या प्रश्नांना दिलेली उत्तरं पुरेशी बोलकी आहेत. 

ही मुलाखत पहिल्यांदा ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या फेब्रुवारी २००६च्या अंकात प्रकाशित झाली होती. तिचा हा संपादित भाग.

.............................................................................................................................................

प्रश्न - तुमचे वेगळेपण सांगताना तुम्ही भगवी वस्त्रे वापरत नाहीत, असे अनेकांनी सांगितले होते. प्रत्यक्षात खरोखरच तुमच्या अंगावर एकही भगवे वस्त्रच काय साधे उपरणेही नाही...

भय्यू महाराज - मी वेशभूषेवर विश्वास ठेवत नाही. रामायण घडले कशामुळे? रावणाने साधूचा वेष घेतला नसता तर सीतेचे अपहरणच झाले नसते.

प्रश्न - तुमच्या पूर्वायुष्याविषयी थोडक्यात सांगाल?

भय्यू महाराज - आपण जसे एका सामान्य पद्धतीचे जीवन जगतो, त्याच पद्धतीचे माझे जीवन राहिले आहे. फारसे विशेष काही नाही. एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. मूळ गाव अकोला जिल्ह्यातील तामसी. पुढे स्थलांतर झाले. मग तिथून सुजालपूरजवळ अखत्यारपूर म्हणून एक गाव आहे, पूर्वीचे ग्वाल्हेर संस्थान, तिथे स्थायिक झालो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुजालपूरलाच झाले. त्यानंतर हायर सेकंडरी केले. त्यानंतर बी.एस्सी अॅग्री (बायो) केले.

प्रश्न - म्हणून तुमचा शेतीकडे ओढा आहे?

भय्यू महाराज - नाही, तसे काही नाही. ते तुमच्या पारिवारिक पृष्ठभूमीवर अवलंबून असते. दुसरे कसे असते, तुमचे दायित्व, उत्तरदायित्व आणि कर्तव्यबोध या दोघांची तुमच्यामध्ये किती संकल्पबद्धता आहे, त्यावरही बरेच काही अवलंबून असते. तरुणांचे कसे असते की, वाटत खूप असते, पण उद्देश एक असायला पाहिजे. माझा उद्देश एक होता. एक स्वावलंबी युवक होण्याचे मी फार आधीच ठरवले होते. युवक तयार झाल्याशिवाय राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. माझे फार स्पष्ट मत आहे की, कुठल्याही बाबतीत स्वावलंबता हा फार महत्त्वाचा भाग असतो. हे स्वावलंबन तीन तत्त्वांनी प्राप्त होते. कुठले राष्ट्र कधी स्वावलंबी होणार? जेव्हा स्वास्थ्य, शिक्षा आणि धर्म शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचणार. कुठलाही समाज कधी स्वावलंबी होणार? जेव्हा सेवा, समर्पण आणि आचरण शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचणार. आणि कुठलाही माणूस केव्हा स्वावलंबी होणार? त्या युगातली ज्ञानाची प्रक्रिया – मग परिस्थिती अनुकूल असेल वा प्रतिकूल – ओळखून सातत्याने अनुकूल कर्म केल्यानंतर. सत्य, ज्ञान निरुपित केल्याशिवाय बदल होऊ शकत नाही.

प्रश्न - बी.एस्सी. केल्यानंतर स्वावलंबी युवक होण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम तुम्ही काय केले?

भय्यू महाराज - दहा वर्षे शेती केली…

प्रश्न - मग अध्यात्माकडे कधी वळलात?

भय्यू महाराज - अध्यात्माकडे वळावे लागत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला आईचे दूध कसे प्यावे हे सांगावे लागत नाही… इतकेच काय पण वासरू…प्राण्याची पिल्ले जन्मल्याबरोबर आईकडे जातात की नाही? तसेच आहे हे. शेवटी अध्यात्म म्हणजे काय, तर जो भाव तुमच्या अंतर्मनात जिज्ञासा प्रकट करतो, तुमच्यात तर्क निर्माण करण्याची ताकद पैदा करतो, त्या तर्काला चिंतनाच्या आधारावर सैद्धांतिक जोड देत असताना तुम्ही परिपूर्ण अवस्थेला पोचता, नाहीतर परिपूर्ण अवस्थेची परिभाषा तुम्हाला अवगत होते, त्याला अध्यात्म म्हणतात. थोडक्या शब्दांत सांगायचे म्हटले तर अध्यात्म तो भाव आहे, जो अंतर्मनाच्या जिज्ञासेला तर्काच्या आधारावर, सिद्धांताच्या परिपूर्णतेने प्राप्त केला जातो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4417

.............................................................................................................................................

प्रश्न - मग तुम्ही धर्माची व्याख्या कशी कराल?

भय्यू महाराज - खूप सोपे आहे. एक आदर्श जीवन जगण्याची जी आचारसंहिता आहे, तिला धर्म असे म्हटले जाते. मग त्यात सगळे संप्रदाय आले. आचरणमय सत्याच्या माध्यमातून आपण नीतिमूल्यांची निर्मिती करतो. त्या नीतिमूल्यांना समाज आणि मानवतेसाठी क्रियात्मक स्थितीमध्ये आणतो, त्याला धर्म म्हणतात. थोडक्यात म्हटले तर असुरक्षिततेकडून सुरक्षिततेकडे नेणारी, अज्ञानाकडून ज्ञानाकडे वळवणारी प्रक्रिया म्हणजे धर्म. असे भावतत्त्व निर्माण होत असताना परिवारामध्ये, समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये मूल्ये स्थापित होतात. प्रत्येक परिस्थितीचे कर्म तुम्हाला कर्तव्य आणि उत्तरदायित्वाचा बोध देते. तुमची संकल्पबद्धता तुमच्या जीवनातल्या संकल्पाला लक्ष्याकडे केंद्रित करते आणि त्यातून तुम्हाला आत्मिक स्वतंत्रता मिळवून देते. तुमची परावलंबता संपवते, त्या तत्त्वाला धर्म म्हणतात.

प्रश्न - तुम्हाला ‘कुराण’ मुखोदगत आहे?

भय्यू महाराज - हो, आहे ना! पण एवढेच नाही, तर तुम्ही मला ‘विचित्र नाटक संग्रहा’विषयी विचारा. ‘गुरुग्रंथसाहिब’विषयी विचारा, संगीताविषयी विचारा, कॉम्प्युटरविषयी विचारा, अॅटोमोबाईलविषयी विचारा…

प्रश्न - पण मुस्लिम धर्माबद्दल काय वाटते?

भय्यू महाराज - मुस्लीम धर्मामध्ये एक लाख चोवीस हजार प्रॉफेट झाले. प्रत्येकाने आपले विचार मांडले. प्रश्न नेतृत्वाचा असतो. एवढे प्रॉफेट होऊन गेल्यानंतर विचारधारांच्या अनुरूप विभक्तीकरण व्हायला लागले आणि इस्लाम वाटला जायला लागला. स्टॅनीलाईज संस्कृतीमध्ये बदल झाला. मग महंमद पैगंबरांचे नेतृत्व आले. त्यांनी ‘व्हाइस ऑफ गॉड कुराणा’च्या माध्यमातून मी लिहिले ते ईश्वराचे\अल्लाताल्लाचे बोल आहेत, असे सांगितले. एकापरीने त्यांनी त्या युगाचा विचार लिहिला. पण कोणत्याही गोष्टीची एक इन्टेनसिटी असते. आपल्या शरीराची एक मर्यादा असते, तशी आपल्या विचारांचीही एक मर्यादा असते. प्रत्येक युगामध्ये अवडंबर राहिलेले आहे हे मान्य करायला पाहिजे.

प्रश्न - एकीकडे तुम्ही असे म्हणता की, राष्ट्र मानवतेशिवाय चालू शकत नाही आणि त्यावर तुम्ही जरा जास्तच जोरही देता. तुमच्या प्रवचनातही ‘देशप्रेम’, ‘स्वावलंबन’, ‘देशभक्ती’, ‘राष्ट्रनिष्ठा’, ‘मानवता’ असे शब्द हमखास येतात. अर्थात त्यातून तुमचे देशप्रेम प्रकट होते, हेही तितकेच खरे. मग तुम्हाला काय म्हटलेले आवडेल? संत, अध्यात्म गुरू की राजनैतिक गुरू? तुमच्या नावापुढे ‘प.पू. युवा राष्ट्र संत’ अशी लांबलचक पदवी लावली जाते.

भय्यू महाराज - खरे सांगायचे तर मला कुठलीच पदवी पसंत नाही. आपण एखाद्या बोटॅनिकल गार्डनमध्ये गेलो तर तिथे ‘सुंदरी’च्या झाडाला वेगळे नाव राहणार, रोडवर त्यालाच ‘खाकऱ्या’ म्हणणार…तर शेतकरी त्याला ‘सुंदरी’ म्हणणार…तसेच हे आहे. पण तुम्ही माझ्या साहित्यामध्ये बघाल तर त्यात कुठेही तुम्हाला ‘राष्ट्रसंत’ हे नाव दिसणार नाही. दोन वर्षांपूर्वी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मी स्पष्टपणे सांगितले होते की, मला कुठलीही पदवी नको. मी एक स्वार्थी व्यक्ती आहे…रिगार्डिंग माय मदरलँड…रिगार्डिंग ह्युमॅनिटी अँड रिगार्डिंग सेल्प रिस्पेक्टॅबिलिटी ऑफ एव्हरी गुड ह्यूमन बिइंग…

प्रश्न - तुम्ही लवकरच संविधान यात्रा काढणार आहात…

भय्यू महाराज - आज नागरिकाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे- त्यांना आपल्या कर्तव्याची व उत्तरदायित्वाची जाणीव कशी करून द्यायची आणि त्यातून नवविचारांचे राष्ट्र कसे घडवायचे? आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी स्वावलंबी युवक तयार केले पाहिजेत आणि डॉलर व रुपया यातले अंतर कमी केले पाहिजे. आज काय होते आहे की, मागच्या ३०० वर्षांच्या ज्ञानाच्या जोरावर पुढच्या २०० वर्षांची पोथी तयार करून स्थितीभ्रम निर्माण केला जात आहे. पण दुर्दैवाने त्याविषयी कुणी बोलत नाही. माझे असे स्पष्ट मत आहे की, या देशात अग्रज आपल्या उत्तरदायित्वाचे पालन करत नाहीत आणि अनुज आपले कर्तव्य विसरले आहेत. आपण मानतो की शास्त्रांनीच आपली बुद्धी घडवली आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की, बुद्धीनेच शास्त्रे घडवली आहेत. यासाठी आंतरिक नागरिकत्वाचा बोध व्हायला हवा. कारण कुठल्याही राष्ट्राचे संविधान हा त्याचा स्वाभिमान असतो. म्हणूनच भारतीय संविधानाबद्दल सामान्य जनतेत आदरभाव निर्माण व्हावा, यासाठी ही संविधान यात्रा काढण्यात येणार आहे.

प्रश्न - सध्या वेगवेगळे महाराज वेगेवगळ्या देवदेवतांची उपासना करायला सांगत असताना तुम्ही मात्र भारतमातेलाच सर्व देवदेवतांच्या रूपात पाहून तिचीच पूजा करावी असे सांगत आहात. एकापरीने ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करणारीही. तेव्हा जरा यामागची तुमची संकल्पना स्पष्ट करा ना…

भय्यू महाराज - ही संकल्पना खूपच स्पष्ट आहे. देवत्व नेमके कशाला म्हणावे? द मॅन हू मॅक्झिमम क्वॉलिटी ऑफ ह्यूमॅनिटी इज गॉड. आपण म्हणतो ना राम मर्यादा पुरुषोत्तम. एकशेआठ गुण असलेला. दुसरे असे की, घनदाट अरण्यातून जाताना आपल्याला नेमका मारुतीच आठवतो. विनम्रतेच्या माध्यमातून विद्वता प्राप्त आनंदित जीवन जगण्याचा संकल्प करताना सरस्वती आठवते. पारिवारिक दायित्वांना नीतिमूल्यांची जोड देण्याची वेळ येते तेव्हा लक्ष्मी आठवते. आनंदासाठी आणि माधुर्याचा आनंद प्राप्त करण्यासाठी कृष्ण आठवतो. त्याची भक्ती आठवते. चिंतनासाठी शिव आठवतो. म्हणजेच काय तर देव म्हणजे ज्याच्यापासून ज्ञान प्राप्त होत असताना आनंदाची निर्मिती होते आणि भयमुक्तता संपते. जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तित्वापासून जे गुण प्राप्त होतात, त्याला देवत्व म्हणतात. म्हणून भारतमाता ही देवत्वाप्रत पोचते. तिच्यामध्येही जर एवढे सदगुण आहेत तर तीही एक देव आहेच ना!  येथील समाजाला, विचाराला या राष्ट्राने हजारो वर्षांपासून जिवंत ठेवले. संस्कृती वाचवली. ते राष्ट्र निर्जीव कसे असेल? आणि जे राष्ट्र निर्जीव नाही, ते देवत्वाप्रत पोहचतेच.

प्रश्न - तुमच्याविषयी जे काही ऐकायला मिळाले, त्यात एक प्रतिक्रिया अशी होती की, सुरुवातीला तुम्हाला मॉडेल व्हावेसे वाटायचे. त्यासाठी तुम्ही प्रयत्नही केले म्हणतात.

भय्यू महाराज - (फक्त मंद स्मितहास्य)

प्रश्न - ही अफवा आहे का?

भय्यू महाराज - हो, मला जे वाटते ते मी खूप कमी बोलतो आणि खूप कमी वेळा प्रतिक्रिया देतो. म्हणून ज्याला जसे समजायचे, त्याने तसे समजावे. माझ्या दृष्टीने कोण कसा विचार करतो यापेक्षा मी कसा विचार करतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. आय डू वर्क फॉर माय हॅपिनेस…माय मदरलँड अँड ह्यूमॅनिटी अँड नॉट फार पॉप्युलॅरिटी.

प्रश्न - तुम्ही जमीनदार होतात म्हणे!

भय्यू महाराज - असे लोक म्हणतात. मी नाही!

प्रश्न - तुमची कपड्यांची फॅक्टरी आहे?

भय्यू महाराज - माझी एक जरी फॅक्टरी निघाली तरी मी ती या देशातील युवकांना समर्पित करीन.

प्रश्न - तुमच्याबद्दल बरेच काही बोलले जाते असे म्हणायला वाव आहे म्हणायचा!

भय्यू महाराज - आकर्षण असावे.

प्रश्न - मी तर असे ऐकले होते की, तुमची कपड्यांची फॅक्टरी आहे आणि ती नॉन एम्प्लॉई आहे.

भय्यू महाराज - नाही. पण आमच्याकडे एक स्वयंरोजगाराची योजना आहे. त्याच्यामध्ये मी कुडता, पायजमा तयार करतो. आता त्यात दिवसाला ४०० ते ५०० कुडते-पायजमे तयार केले जातात.

प्रश्न - तुमच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी शरद पवार आहेत असं म्हणतात

भय्यू महाराज - आपले कृषीमंत्री नाहीत, एवढे निश्चित. नावात काही नसते. व्यक्तित्वावर खूप काही असते.

प्रश्न - सुशीलकुमार शिंदे यांनी तुम्हाला ‘मी मुख्यमंत्री कधी होणार आणि किती दिवस राहणार?’, असे विचारले होते म्हणतात. आणि तुम्ही त्यांच्याबाबतीत वर्तवलेले भविष्य अचूक निघाले…

भय्यू महाराज - वाणीची सत्यता हीच सत्य असते. एक मात्र आहे, एक आई आपल्या मुलाला भारावून जाऊन आशीर्वाद देते. एक मित्र आपल्या मित्राला विश करतो. आपण त्याकडे कशाला लक्ष द्यावे? दुसरे म्हणजे मला समाजाला त्या दिशेकडे न्यायचे नाही. कुठलाही महाराज हा चांगला मनोविश्लेषक असतो. तो मोठमोठ्या मानसशास्त्रज्ञांनाही मागे टाकतो. पण डेप्थ नसली की, उत्साहाच्या भरात तो असे काही बोलून जातो की, समाजावर त्याचा दूरगामी परिणाम होतो.

एक व्यवस्था असते. व्यवस्थेच्या माध्यमातून स्वतंत्रता टिकवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून, मी धर्माच्या माध्यमातून स्वतंत्रता टिकवण्याचाच प्रयत्न करत आहोत. थोडक्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आय अॅम नॉट हार्मिंग सोसायटी. मी कधी सुशीलकुमार शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद प्रेडिक्ट केले नाही आणि त्याची गाथा तयार केली नाही. पण कसे असते, कॉसमॅटिझम हा खूप मोठा फॅक्टर आहे. प्रसिद्धी त्यातलाच भाग आहे. मला जेव्हा लग्न करण्याची वेळ येईल तेव्हा मी लोकप्रियतेशी लग्न करीन, प्रसिद्धीशी करणार नाही.

प्रश्न - हल्ली म्हणे विलासराव देशमुख तुम्हाला अधूनमधून विचारतात की, ‘मी किती दिवस सत्तेवर राहणार?’

भय्यू महाराज - तुम्ही मघापासून माझ्यासमोर बसला आहात, तुम्हाला वाटते का, की मी महाराज आहे म्हणून? मी तुम्हाला खरे सांगतो. मी खूपच स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. मला कुणी काहीच विचारत नाही. पण सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर करतो. आय अॅम कॉमन फॅक्टर विदिन एव्हरी बडी!

प्रश्न - विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली जाऊ शकते, असे बोलले जाते. तुम्हाला काय वाटते?

भय्यू महाराज - सांगड घालायची गरजच नाही. जिज्ञासा म्हणजे ‘मानव’, तर्क म्हणजे ‘विज्ञान’ आणि त्याची परिपूर्ण सैद्धांतिक अवस्था म्हणजे ‘अध्यात्म’. आपल्या दोघाला एखादे खेळणे दिले तर ते आपण तोडून पाहू की, त्यात काय आहे. आपण ते शोधण्यात यशस्वी झालो तर त्यालाच ‘विज्ञान’ म्हटले जाते. विज्ञानाच्या आत्मिक संतुष्ट अवस्थेला ‘अध्यात्म’ म्हटले जाते. अध्यात्म म्हणते की, सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होते. सर्वांचा तोच कर्ता करविता आहे. तर दुसरीकडे विज्ञान म्हणते की, सहाशे अरब अणूरेणूपासून मानवाचे शरीर बनले आहे. वर पुन्हा असेही म्हणते की, आम्ही ह्यूमन क्लोन तयार केला आहे. व्हॉट इज दॅट न्यू? सिंगल सेल ब्रेक करून पहा ना, क्लोन तयार होणार नाही का? स्वत:ला सतत अपडेट करत राहणे, विकसित करत राहणे आणि सकारात्मक परिवर्तनाच्या माध्यमातून स्वस्थ मानसिकता टिकवणे यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. जेनेटिकल डिफिशिअन्सी क्युअर करून चिंतनाच्या माध्यमातून आपण आपली केमिस्ट्री सुधारावी यासाठी अध्यात्म आहे. थोडक्यात विज्ञान हे शरीर आहे, तर अध्यात्म हा आत्मा. त्यांना एकमेकांशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही.

प्रश्न - तुम्ही विश्व हिंदू परिषदेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यासपीठावर जाता…

भय्यू महाराज - मी सगळ्या व्यासपीठांवर जातो आणि जाणार. या देशातील युवकांबद्दल, समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल मला जे बोलायचे ते बोलणार. ते जशी आपली मते मांडतात, तसा मलाही माझी मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यापासून मी स्वत:ला कधी वंचित करून घेणार नाही.

प्रश्न - पण त्यांच्या कर्मठपणाबद्दल निषेध नोंदवावासा वाटत नाही का?

भय्यू महाराज - कसे असते, लाईन धरावी लागते. माझी जी लाईन आहे, ती खूप सरळ आहे. ती अंतरात्म्यापासून निघते अन युवकांच्या हृदयापर्यंत जाते. त्यांना जे करायचे ते करू देत. ते काय करतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही काय करतो, हे पण पाहायला पाहिजे. तीन रुपये शेकडा व्याज कमावणारे लोक आरत्या उतरवणार आणि जे देणारे आहेत ते खाली बसणार. मग समाज कसा सुधारणार? हे चालू आहे ते काय आहे? तर हा एक प्रपंच आहे. शो मस्ट गो ऑन. शो चालत राहिला पाहिजे. शो चालत राहतो अन शो चालत आलेला आहे. शो चालवणारे वेगळे असतात. त्याची पटकथा लिहिणारे वेगळे असतात. रिगार्डिंग कल्चर शो मस्ट गो ऑन.

प्रश्न - तुमच्या ट्रस्टमार्फत जे विविध उपक्रम राबवले जातात, त्याचे फंडिंग कसे होते?

भय्यू महाराज - कोणत्याही महाराजाच्या शिष्य परिवारात एक-दोन तरी कॉन्ट्रॅक्टर असतातच. मीही माझ्या अशा शिष्यांना सरळ सांगतो, तुझा जेसीबी मला दहा दिवस दे. आपले डिझेल टाकायचे, जेसीबी हक्काने वापरायचा आणि गरिबांसाठी काम करायचे. कॉर्पोरेट क्षेत्रात पंधरा टक्के सामाजिक क्षेत्रासाठी अनुदान असते. सरकारकडून मिळणारे अनुदान मी समाजासाठी वापरतो. पूर्वी माझी पाद्यपूजा केली जायची, मी ती बंद करून टाकली. लाखो रुपये वाचवले. त्यातून १७ लाख झाडे लावली. पर्यावरण राहिले तरच अध्यात्म टिकेल. भारतीय नागरिक तयार करण्याच्या फॅक्टऱ्या चालू करण्याची गरज आहे आणि समजा ते जमत नसेल तर त्यांना तयार करण्यासाठी एक सर्व्हिस सेंटर चालू करण्याची गरज आहे. म्हणून मी काँस्टिट्यूशन चालू केले. एक लाख रुपयांच्या स्कॉलरशिप्स दिल्या.

प्रश्न - तुम्ही तरुणाईवर बरीच भिस्त ठेवून आहात…

भय्यू महाराज - भारतातल्या तरुणांची पन्नास टक्केही कार्यक्षमता आपण उपयोगात आणत नाही. भारतातल्या युवकांचे भावनेच्या आधारावर शोषण केले जाते. पन्नास टक्के संसाधने व पन्नास टक्के ऊर्जा असणारी तरुणाई जगातल्या कोणत्याही ऊर्जेपेक्षा अधिक आहे. पण तिचा योग्य विनियोग केला जात नाही. यालाच मी शोषण म्हणतो.

युवक हीही एक जात आहे आणि तिला जात म्हणूनच ओळखायला पाहिजे. जोपर्यंत ही नवीन जात निर्माण होत नाही आणि ती इतर जातींना धोका निर्माण करत नाही, तोपर्यंत हे राष्ट्र सुधारणार नाही. ज्या दिवशी युवक ही स्वतंत्र जात म्हणून ओळखली जाईल, त्या दिवशी इतर जाती संपून जातील.

आपल्यामध्ये संवेदनांचा अभाव आहे. तो दूर करण्यासाठी प्रेरणेची गरज आहे. प्रेरणेसाठी सत्य सांगण्याची गरज आहे आणि समाजातले सत्य समोर आल्यानंतर पुढच्या दहा वर्षांत युवापिढीची पायाभरणी करता येण्यासारखी आहे.

प्रश्न - तुम्ही युवकांना कोणता संदेश द्याल?

भय्यू महाराज - नागरिकतेचा बोध मिळवण्यासाठी, स्वाभिमान सांभाळण्यासाठी, स्वाभिमानाचा सिद्धांत सांभाळण्यासाठी, संवेदनशील नात्यांना जपण्यासाठी आणि मानवतेसाठी तरुणांनी प्रत्येक क्षेत्रातले ज्ञान – मग ते उपयोगाचे असो वा नसो – मिळवावे. संघर्षमय स्थितीत आणि संस्कारांच्या समन्वयासोबत चिंतनाच्या आधारावर स्वत:चे व्यक्तित्व निर्माण करावे. प्रतिकूल परिस्थितीचा फारसा विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कारण असा दृष्टिकोन ठेवणारे युवकच यशस्वी होतात. युवकांनी आपली बुद्धी व मनगट आपल्या नजरेत ठेवावे आणि प्रत्येक विचारावर चिंतन करत निर्भय व्हावे. जेणेकरून त्यांना कुणी भ्रमित करू शकणार नाही.

प्रश्न - तुमच्या कौटुंबिक माहितीविषयी काही सांगाल?

भय्यू महाराज -- आई, बाबा, दोन बहिणी, एक मुलगी, पत्नी. ९१ साली लग्न झाले.

प्रश्न - (या गप्पा चालू असताना त्यांचे सारखे च्युईंगम खाणे चालू होते.) तुम्हाला च्युईंगम आवडते?

भय्यू महाराज - मी आजवर खाल्ले नव्हते. पण दोन-तीन दिवसांपासून खातोय. डॉक्टरांनी सांगितले आहे.

........

इथे मुलाखत संपली. दोन-सव्वा दोन तासांच्या चर्चेत महाराजांनी सर्व प्रश्नांना मनमोकळेपणाने व सहजतेने उत्तरे दिली. ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत अस्खलित बोलतात. इंदूरमध्ये राहण्याचा परिणाम असेल, पण त्यांचे मराठी उच्चार हिंदी वळणाचे वाटतात. लोकापवादासारखे प्रश्न विचारल्यावरही त्यांनी त्यांना काय महत्त्वाचे वाटते ते सांगितले. त्यांच्या वाणीतून राष्ट्रप्रेम आणि तरुणाईविषयीचा जो ठाम विश्वास प्रतीत होतो, तोच कदाचित त्यांच्या लोकप्रियतेचा विशेष असावा.

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 14 June 2018

सुंदर विचार आहेत. अगदी माझं मनंच माझ्याशी बोलतंय जणू. पण भय्यूजींचं वर्तन विचारांना साजेसं नव्हतं, हे सर्वांचं दुर्दैव. भक्तांचा पैसा लुबाडणे, सुंदर स्त्रियांचा उपभोग घेणे, दलाली करणे, विनाकारण दीक्षा देणे इत्यादि नको त्या गोष्टी केल्याने जे घडू नये ते घडलं. बारा वर्षं झाली मुलाखतीस. म्हणजे या घसरणीने मागच्या बारा वर्षांत जोर धरलेला दिसतोय. -गामा पैलवान


ADITYA KORDE

Wed , 13 June 2018

"मुस्लीम धर्मामध्ये एक लाख चोवीस हजार प्रॉफेट झाले. प्रत्येकाने आपले विचार मांडले. प्रश्न नेतृत्वाचा असतो. एवढे प्रॉफेट होऊन गेल्यानंतर विचारधारांच्या अनुरूप विभक्तीकरण व्हायला लागले आणि इस्लाम वाटला जायला लागला. " ह्यावरूनच कळते कि त्यांचा अभ्यास वगैरे काही नव्हता मुखोद्गत असेल ही कुराण त्याना ( ती काय शाळेत असताना आम्हा मुलाना गीतेचा १२वा,१५वा अध्याय, मनाचे श्लोक , तुकारामाचे काही अभंग पाठ येत म्हणजे काही आमचा त्यांचा अभ्यास नव्हता.) "प्रश्न - तुमच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी शरद पवार आहेत असं म्हणतात भय्यू महाराज - आपले कृषीमंत्री नाहीत, एवढे निश्चित. नावात काही नसते. व्यक्तित्वावर खूप काही असते. ... भय्यू महाराज -...मी तुम्हाला खरे सांगतो. मी खूपच स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. ..." काय स्पष्ट वक्तेपणा ! असो ते गेलेच असल्याने आता काही म्हणणे नाही पण तुकारामाचे अभंग ही मुलाखत वाचून आठवले ...ऐसे कैसे झाले भोँदु। कर्म करुनि म्हणति साधू। अंगा लावुन राख। डोळे झाकुनि करिति पाप। दावि वैराग्याचि कळा। भोगि विषयाचा(वासनेचा)सोहळा। तुका म्हणे सांगो किति। जळो तयांचि संगति।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......