तुष्टीकरणाची नीती खरंच अपरिहार्य आहे का? 
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 11 June 2018
  • पडघम देशकारण हिंदू Hindu मुस्लिम Muslim ख्रिश्चन Christian काँग्रेस Congress भाजप BJP संघ RSS प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee

एकसंघ, एकरूप अशा उदारमतवादी समाजरचेनबाबत भारत तसा पिछाडीवर­च मानावा लागेल. संकुचिततेची मानसिकता भेदून व्यापक अर्थाने एका किमान पातळीवर समरस झालेली उदारमतवादी समाजव्यवस्था ज्या वेगाने विकसित व्हायला हवी होती, ती होऊ शकलेली नाही. असा समंजस एकरूप समाज ही आदर्श कल्पना प्रत्यक्षात असणे सहजशक्य नसते, पण तरीही त्यातील किमान लक्षणे असलेला समूह भारतात निश्चितपणे होता व आहे. शांततापूर्वक सह-अस्तित्वाचा बोलबाला न करता ते प्रत्यक्षात जपणारी ग्रामव्यवस्था भारतात अनेक ठिकाणी पहायला मिळतेच. मात्र त्याचे व्यापक स्वरूप का पाहावयास मिळत नाही, या प्रश्नाचे उत्तर मात्र या समूहात विविध अस्मिता जागवणाऱ्या शक्तीच्या, वर्गाच्या कार्यपद्धतीतून मिळू शकते. आजही असे ग्रामीण भागात कुठल्याही खेड्यात विविध जातीधर्माचे लोक अगदीच शांततेत नाही, पण समाधानाने वास्तव्य करतात. मग हे समाधान, शांतता हिंसेत का परावर्तीत होते? त्यामागे या समाजधारणेवर परिणाम करणारे घटक कारणीभूत असतात.

व्यक्ती अथवा व्यक्तीसमूहात स्वत:च्या वेगळेपणाची, आपण या समूहाचा भाग असलो तरी आपण विशेष आहोत, अशी एक नैसर्गिक जाणीव असते. सामूहिक पातळीवर सक्रीय गोष्टी वरचढ ठरायला हव्या असतात. सामूहिक प्रक्रियेतील, सहभागातील उद्दिष्टे या व्यक्तीगत जाणीवांपेक्षा वरचढ ठरावीत अशी अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात तसे होत नसेलही. भारताच्या इतिहासातील वा आजवरच्या  वाटचालीतील उपजत वैविध्य असलेला मानवी समूह त्या स्वतंत्र अस्मिता सोडून अन्य अस्मितेसाठी एकत्र आलेला दिसत नाही. या मूळ अस्मिता संपूर्णपणे नाहीशी होणे अशक्य असते, हे मान्य करूनही काही उदात्त, विधायक सर्वजन कल्याणाच्या उद्दिष्टांसाठी हा एकजिनसीपणा प्रस्थापित झालेला दिसत नाही. अगदी राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एका समान पातळीवर येतानाही ही सर्व समूह त्यासाठी बाधक संकुचित अस्मितांसह आलेले आहेत, याचे भान असलेल्या राजकीय धोरणानिर्धारकांनी अशा वरकरणी एक, पण आतून विविध संकुचित अस्मितांनी छिन्नविछिन्न तुकड्यांत विखुरलेल्या तुकड्यांना जोडण्यापेक्षा ते आहेत त्याच स्थितीत राहू देण्यात धन्यता मानलेली आहे.

सत्तेत येण्यासाठी अथवा आहे ती सत्ता किमान निर्धोकपणे चालवण्यासाठी या अशाच तुकड्या तुकड्यात वाटल्या गेलेल्या मतदारांची गरज असते, तिथे प्रगल्भ समाजरचनेतील कृतिशील नागरिक कुचकामी ठरतो. या पार्श्वभूमीवर भारतीय राजकीय प्रक्रियेत सहभागी घटकांनी सत्तासंघर्षासाठी राबवलेली तुष्टीकरण, ध्रुवीकरण किंवा अगदीच साध्या भाषेत लांगूलचालनाची नीती अभ्यासावी लागते. 

राजकीय प्रक्रियेतील घटकांची गरज म्हणून, अशा समूहांमधील विविध प्रकारच्या अस्मिता पेटवल्या जातात़, अस्तित्वात नसतील तर त्या निर्माण करून त्यांना चेतवण्याचे काम केले जात असते. मोठ्या उद्दिष्टपूर्तीसाठी तात्कालिक हितसंबंधांचा बळी द्यावा लागतो, हे तत्त्व व्यापक अर्थाने एका उन्नत उदारमतवादी व प्रगल्भ समाज विकसित होण्याच्या प्रक्रियेसही लागू होते. त्यामुळे समान पातळीवर येण्यासाठी वा एका समंजस समाजप्रवाहाचा घटक होताना, ज्या काही अडसर ठरणाऱ्या गोष्टी असतात, त्यात या अस्मितांचा समावेश असतो. या अस्मिता जातीय, धार्मिक, पंथविषयक असू शकतात. त्यात पुन्हा प्रांत, भाषा, परंपरा अशा वायफळ घटकांची भर घातली जाते. त्यामुळे समाज प्रगल्भतेची प्रक्रिया सुरू असतानाच त्यात अडसर आणण्याची प्रक्रिया करणारे घटक सक्रीय असतात. या मानवी समूहाचे एका सजग समाजात रूपांतरण होणे राजकीय प्रक्रियेच्या विकासाचा, परिपक्वतेचा पूर्वटप्पा असतो, पण भारतात हे घडलेले नाही. उलट असे होण्यापेक्षा या अस्मितांचे परस्परविरोधातील संर्घषच सत्ताकारण करणाऱ्यांना लाभाचे असतात. 

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

गत चार वर्षांत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकिर्दीत झालेले अस्मिता पेटवण्याचे प्रकार असोत वा अगदी स्वातंत्र्योत्तर काळाच्या प्रारंभी एकहाती सत्ता गाजवण्याची संधी मिळालेल्या काँग्रेसच्या कार्यकाळातील प्रकार असोत, या अस्मितांना खतपाणी घालण्याच्या प्रक्रियेतूनच हे ध्रुवीकरण, तुष्टीकरणाचे प्रकार घडतात़. भाजप, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष प्रामुख्याने चर्चेत असतात म्हणून त्यांचा प्रयत्नांबद्दत अधिक बोलले, लिहिले जाते. अन्यथा मतदारांची बांधणी, उभारणी वा हक्काची मतपेढी उभारण्यासाठी भारतातील सर्वच राजकीय पक्षांना या अस्मितांवर फुंकर मारावी लागलेली आहे. प्रादेशिक अस्मितांच्या आगीवर सत्तेत गेलेले दाक्षिणात्य पक्ष असोत, वा महाराष्ट्रातील शिवसेना असो अथवा तेलगु देशम किंवा तेलंगणा राष्ट्र समिती असो, समाजवादी तत्त्वांची चेष्टा करणारा यादवांचा समाजवादी पक्ष, धर्मनिरपेक्षतेचा उपहास करणारे जनता दलाचे खंडीभर गट, तृणमूल इत्यादी सर्वच राजकीय पक्षांनी हाच कित्ता गिरवलेला आहे. राजकीय स्वायत्तता, स्वातंत्र्य मिळाले की सर्वकाही आलबेल होईल, असा गैरसमज करून न घेणाऱ्या समाजधुरिणांना कदाचित हे चित्र त्या काळातच स्पष्ट दिसले असावे. कारण स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षं उलटल्यानंतरही राजकीय पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी समाज, राष्ट्रराज्य संकल्पनेस बाधक आणि विघातक कार्यपद्धतीत बदल करावासा वाटत नसेल, तर ते राजकीय प्रक्रियेचे अपयश तर आहेच, पण शांततापूर्वक सहजीवन या अनिवार्य तत्त्वाला हरताळ फासणारी बाब आहे. 

अलिकडेच दिल्लीतील ख्रिश्चनधर्मीयांच्या प्रमुखांनी केलेले वक्तव्य याच तुष्टीकरणाची नीती कायम असल्याचे द्योतक मानावे लागेल. भाजप या हिंदुत्ववादाची झूल पांघरलेल्या अथवा तसे असल्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षाने केलेले हिंदू मतांचे ध्रुवीकरण ही प्रक्रिया अचानकपणे घडलेली नाही. त्यापूर्वी काँग्रेसने स्वत:ची सर्वसमावेशक प्रतिमा बिंबवण्यासाठी अथवा स्वत:चा  धोरणहीन चेहरा सबगोलंकारी वाटावा म्हणून ही नीती राबवलेली आहे. गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या समूहातील एखाद्या घटकाला तुम्ही वेगळे आहात, अल्पसंख्य आहात, अशी सर्वप्रथम जाणीव करून देण्यात आली. तुम्ही ज्यांच्यासोबत शांततेने जगत आहात ते तुमचे विरोधक आहेत, असा थेट समाजविभागणीचा सिद्धान्त काँग्रेसने आणलेला आहे. या क्रियेचे प्रतिक्रिया म्हणून भाजपने हिंदूहिताची भाषा सुरू केलेली आहे. राजकीय प्रक्रियेतील सत्तास्थापनेची पहिली संधी साधलेल्या काँग्रेसवर या प्रक्रियेच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याचे दायित्व जाते़. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एका उदारमतवादी समाजबांधणीला प्राधान्य न देता समूहांच्या अस्मितांना खतपाणी घालण्याचे काम काँग्रेसने प्रभुत्वाच्या कालात केलेले आहे. मुस्लिम तुष्टीकरणाचे दुष्परिणाम म्हणून नंतरच्या काळात ‘इस्लाम खतरे में ’ अशा घोषणा व मानसिकता प्रबळ झालेली आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपने सत्ताप्राप्तीसाठी ‘मंदिर वही बनायेंगे’ची हाळी दिलेली आहे. समाजव्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया या दोन्हींमध्ये या उलट्या प्रवासाच्या परिणामकारकतेचे प्रतिबिंब उमटताना दिसते. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी यांनी अचानकपणे मंदिरांना भेटी देण्याचा जो हास्यास्पद प्रकार केला, ती काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाची अस्पष्ट कबुली होती.

कदाचित राहुल यांना पक्षाच्या यापूर्वीच्या कर्त्यांनी राबवलेल्या नीतीचे दुष्परिणाम जाणवत असावेत. प्रचारतंत्रात काँग्रेसपेक्षा वरचढ भाजपने या मुद्याचे भांडवल एवढ्या प्रभावीपणे केले आहे की, आज बहुतांशी हिंदुसमूहात काँग्रेस हा हिंदूविरोधी असल्याची भावना निर्माण झालेली आहे. ती जेवढ्या प्रकर्षाने वाढत राहील, तेवढा अधिक लाभ भाजपला होत राहील. दुर्दैवाने या चुकांची जाणीव होऊनही राहुल गांधी त्यातून बोध घेत नाहीत, हे वास्तव समोर आलेले आहे. सर्वसामावेशक असल्याचा दावा साध्य करण्यासाठी खरे तर त्यांनी ही संधी यापुढील काळात तरी साधायला हवी. सामाजिक सौहार्द बिघडल्याची हाकाटी, मुस्लिमांचा, ख्रिश्चनांच्या मनात बहुसंख्य हिंदूंपासून भय निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपला अनुकूल ठरताहेत, हे वास्तव काँग्रेस कधी लक्षात घेणार आहे?

राजकीय पक्ष सत्ताप्राप्तीसाठी आपल्याला गोंजारण्याचे प्रयत्न करत असतात, याचे भान आलेल्या हिंदू, मुस्लिमांसह निरर्थक अस्मिता कवटाळून बसलेल्या सर्वधर्मियांनी आता एका मोठ्या उद्दिष्टासाठी समान पातळीवर यायला हवे आहे. एका सुजाण, सजग आणि सह-अस्तित्व मान्य करणाऱ्या समाजासाठी ही बाब अनिवार्य आहे. हीच या मातीची खरी परंपरा आहे आणि शांततापूर्वक सहजीवन हा तिचा पाया आहे. विविधतेतील एकात्मता या मूलतत्त्वात अंतर्भूत सर्वसमावेशक संवाद प्रक्रियेची परंपरा म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर पाहुणे म्हणून हजेरी लावत असतील, त्यावरून गदारोळ न माजवता या परस्पर देवाणघेवाणीचे स्वागत करायला हवे. आजवरील चुकीच्या धोरणामुळे दोन प्रमुख समाजघटकांमधील दरी सांधली जाणार असेल तर दोन विरुद्ध टोकाच्या दृष्टीकोनांची एका व्यासपीठावरील अभिव्यक्ती सकारात्मक मानायला काय हरकत आहे? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Manoj Jagatkar

Mon , 11 June 2018

ह्या लेखातील विवेचन आवडले. आद्य पुरोगामी कॉंग्रेस , मध्य पुरोगामी समाजवादी आणि नव पुरोगामी सेक्युलार्स यांची चांगली शाळा घेतली आहे. ओवेसी चे हिंदू विरोधी मत , उमर खालिद चे भारत के तुकडे , फारूक अब्दुल्ला चे काश्मीरचे पांडित्य जे उदार आणि लोकशाहीभिमुख पत्रकार आहेत त्यांनी हाणून पाडले पाहिजे , एकही क्षण न घालवता आणि स्पष्ट शब्दात एकमुखाने ज्यावेळी मुठभर कट्टर मुस्लिमांचा पुरोगामी विरोध करतील त्यावेळी हिंदुत्व वादी निष्प्रभ होतील.तीन ताकाल ला पूर्ण सहकार्य करा. डॉ. दाभोलकर सुद्धा येथे कमी पडले. चुकीच्या गोष्टी मग त्या कोणत्याही धर्मातील असोत त्याचा निषेध तर हवाच. सुधारणा ही पुढची पायरी आहे. येते डॉ साहेब , हिंदू धर्म सुधारत होते ( ते गरजेचेच होते आणि जे सनातन्यांना झोंबत मस्त होते ) पण मुस्लीम धर्मातील प्रथांचा निषेध करत नव्हते. हे जुने जाणते - मान्यवर पत्रकार तर मोदी -मोदी करत त्यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत. तो थांबवा , आत्मपरीक्षण करा. विजय पुरोगामी शक्तींचाच आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......