अजूनकाही
उगाच नाही प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर गेले. बंगाली असूनही त्यांनी ना मार्क्सवाद स्वीकारला, ना चोखाळला. प्राध्यापक राहूनही ते ना डावे झाले, ना पुरोगामी. आयुष्य काँग्रेसमध्ये घालवून ‘पोस्ट प्रेसिडेंट’ दिवस ते भाजप-संघ यांच्यासोबत घालवत आहेत. सध्या सारी हुशारी, चातुर्य हिंदुत्ववाद्यांकडे जमा होऊ लागल्याचे हे चिन्ह. आता ते पाच जण माओवादी का नक्षलवादी पाहा! किती बावळट!! असे लॅपटॉपवर, ई-मेलवर कटकारस्थान रचायचे असते का? इतके सबळ पुरावे ठेवून कोणी कावा आखतो का? त्या पत्रात नावे लिहिणे, ‘कॉम्रेड’ म्हणून संबोधणे, तारीख वगैरे सारी पद्धतशीर नोंद ठेवणे…किती बावळट म्हणावे त्यांना! ते दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचे मारेकरी बघा म्हणावे. किती चलाख, हुशार अन अट्टल! एकही पुरावा मागे न ठेवता कार्यभाग आटोपून हवेत सहज मिसळून गेलेसुद्धा. माणसाने सनातनी अन कर्मठ किती असावे, याचे हे मारेकरी उत्तम नमुनेच! ना ई-मेल, ना मोबाईल, ना कुठले पत्र, ना कसला पत्ता. फार हुशारीने त्यांनी तीन खून पाडले. अवघे पोलिस सुन्न पडले.
हे माओवादी का नक्षलवादी (स्मिता गायकवाड यांनी फरक समजावून सांगावा.) उगाचच आधुनिक संपर्कयंत्रणेच्या प्रेमात पडले. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचे मारेकरी कसे जुन्याच वळणाचे राहिले. काही म्हणजे काही यंत्रे न वापरता, ते यशस्वी झाले. ते खरे पुराणमतवादी! गौरी लंकेशचे मारेकरी सापडले म्हणतात. त्यातल्या एका वेड्याने म्हणे मोबाईलचा खूप वापर केला म्हणून तो पकडला गेला. परंतु ते सारे संशयित मारेकरी आहेत. पुराव्याअभावी ते सुटतीलच. हे माओवादी किती प्रस्थापित झाले बुवा! त्यांच्या हाती म्हणे क्रांतीसाठी बंदुका असतात. इथे तर त्यांचे हात संगणक व त्याच्या माऊसवर खिळलेले दिसतात. केवढा हा मूर्खपणा!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4421
.............................................................................................................................................
पोलिस खाते आता सायबर क्राईममध्ये पारंगत झालेले आहे. पुरावे, आधार, संदर्भ जिथे आयतेच असतात, त्यात ते प्रवीण झाले, ते दिसलेच. ‘पोलिस टाइम्स’ नावाच्या वर्तमानपत्रात आम्ही जुन्या वळणाचेच गुन्हे चिवडत राहतो. किती कौतुक असते गुन्हे शोधून, आरोपी पकडून आणणाऱ्यांचे. पण अजून दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची गोष्ट छापायची सारखी राहून जातेय. इतके हुशार ते मारेकरी की, अवघे पोलिस खाते खजिल झालेले. असे ते निराश झाले की, बळकट पुरावे देणाऱ्यांची धरपकड करत राहतात आणि आपले यश त्यांच्या आहारी गेलेल्या माध्यमांच्या आधारे गाजवून सोडतात. ‘साहेब, ते दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचे मारेकरी का सापडत नाहीत अजून?’ असा सवाल एकालाही पोलिसांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुचू नये का?
तेव्हा डाव्यांनो, पुरोगाम्यांनो, मार्क्स-लेनिन यांना जखडून राहणे आता सोडा. मार्क्सवाद्यांना हुशार, चलाख म्हणण्याचे दिवस उलटले. आता सारी हुशारी सनातनी अन धर्मराष्ट्रवादी मंडळींकडे लोटलेली आहे. ‘माणून मारून टाकून कोणी आपला राजकीय विचार फैलावू शकत नाही’ असे सांगितले जायचे, ते खरे नाही. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांना मारून त्यांचे कार्य थोडेफार का होईना खचले आहे. सनातनी, कर्मट व धर्मवाद जिंकला आहे. अहिंसेच्या सर्वांत मोठ्या प्रचाराला ज्यांनी ठार केले, त्यांच्या समविचारी लोकांच्या राज्यात तुम्ही बॅकफुटवर जाणारच. तरीही ‘हिंसेला हिंसा हे उत्तर योग्य नाही’, यावर विश्वास मात्र अढळ हवा. जय मोहनदास!!
बाकी, इकडे माओवादी मोदींमागे अन तिकडे मोदी चीनमागे अशी गंमतीशीर घडामोड चालू आहे. चीनचे सरकार आपल्या विरोधकांना अशाच आरोपाखाली अडकवते म्हणे…!
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Tue , 12 June 2018