अजूनकाही
दिवाळी म्हटले की, साहित्यरसिकांना ‘दिवाळी अंकांची’ आवर्जून आठवण होणारच. शंभरी पार करून गेलेल्या या उपक्रमाची वाटचाल आजही सुरू आहे. वास्तविक, एका सणाला जोडून येणाऱ्या या अंकाचे महत्त्व ‘साहित्य आणि संस्कृतीत’ एवढे खोल रुतले आहे की, या अंकातील साहित्याच्या निर्मितीला वगळून आपल्या साहित्याची चर्चाही करता येऊ नये. हे अंक म्हणजे लेखकांसाठी पर्वणीच असते! साधारण उन्हाळ्याच्या दिवसांपासूनच अंकाच्या जुळणीला सुरुवात होते आणि पुढील सहा महिन्यांमध्ये अंक छापून येतो. पडद्याआडून संपादकाने हलवलेली सूत्रे सहा-सहा महिने कार्यरत ठेवल्याने लेखक-संपादक सहसूत्रातून निर्माण होणारे साहित्य वाचनीय, संस्मरणीय ठरते.
अलीकडच्या दिवाळी अंकांच्या परंपरेची मुळे आपल्याला ‘मौज-हंस-अक्षर-दीपावली’ अशा चार अंकांच्या वाटचालीत शोधता येतील. हे चारही अंक आपापल्या धाटणीने प्रसिद्ध होणारे आणि एकेक विशिष्ट परंपरा पुढे नेणारे प्रातिनिधिक अंक आहेत. आता या अंकांच्या चालीवर आणि ही चाल सोडून उपयोजित विषयांवरही अक्षरशः शेकड्याने दिवाळी अंक निघत आहेत.
संपादकाने वर्षभर खपून लेखक आणि विषयांची जुळणी करणे आणि त्यास चिरंतन रूप प्राप्त होणे, या सुरुवातीच्या काळात अभिनंदनीय बाबी ठरल्या, परंतु जसजसा काळ बदलत गेला, तसतशा दिवाळी अंक छापण्यामागच्या प्रेरणाही बदलत गेल्या. बाजारदृष्ट्या मूल्य असलेल्या या प्रक्रियेत अनेक घटक सक्रिय झाले. लेखक, संपादक, चित्रकार, मुद्रक, जाहिरातदार यांच्यातल्या विशेषतः ‘जाहिरातदार’ या घटकाने या प्रक्रियेवर सर्वांत मोठा प्रभाव टाकायला सुरुवात केल्यानंतर दिवाळी अंकांची वाटचाल खडतर झाली. सन्माननीय अपवाद वगळता ‘संपादक’ नावाचा प्राणी दिवाळी अंकातून हटवला जाऊन तिथे जाहिरातदार आणून बसवला गेला असल्याचे अलीकडच्या दिवाळी अंकांवरून दिसते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दिवाळी अंकाच्या निर्मितीचे तेच ते साचे अंककर्ते आणि लेखकांनी तयार करून ठेवले आहेत. आजच्या नव्वद टक्के अंकांचा उद्देश ‘पैसा कमावणे’ हाच झाला आहे. अंकात भरमसाठ जाहिराती छापल्याने अंकातील ‘साहित्य’ अंग आक्रसून बसले आहे. शिवाय संपादक-लेखक-चित्रकार हे नातेदेखील या नव्या अंकांनी मोडीत काढले आहे. त्या जागी प्रचंड व्यावसायिक धोरण अंगिकारले जाऊन ‘जाहिरातींसाठी अंक’ हे समीकरण आकाराला आले आहे.
अंकाच्या बाह्य दर्जात कमालीची खर्चिकता आली आहे. ३०० जीएसएम जाडीची कव्हर्स, त्याच जाडीची जाकिटे किंवा आर्ट पेपर यांची खैरात झाली आहे. रंगीबेरंगी ऑफसेटी ‘कमाल’ पानापानांवर निर्माण झाली आहे, पण दिवाळी अंकांमधल्या साहित्याचा दर्जा मात्र खालावला आहे. लेखक पाट्या टाकू लागले आहेत, संपादक साधे मुद्रितशोधनही करावयाच्या पात्रतेचे राहिलेले नाहीत हे या सगळ्या प्रकारात खेदजनक म्हणावे लागेल.
सहज चालता-बोलता लिहिलेल्या उथळ लेखनामुळे कथा, कादंबरी, कविता यांच्या सहजोस्फूर्त निर्मितीवर दगड ठेवला गेला आहे. पुन्हा अलीकडच्या काळात अंकांची संख्या वाढल्याने सर्वच अंकांसाठी चांगले लेखक कोठून मिळणार? त्यामुळे अशा लेखकांच्या शोधाचे मार्गही खुंटले आहेत. संपादक महाशय केवळ पत्र-संपर्कापेक्षा मोबाईलच्या लघुसंदेशावर साहित्य मागवू लागले आहेत. ही सर्व दर्जाची घसरण सर्व घटकमान्य होते आहे. त्यास कुणीही आक्षेप घेत नाही.
परंपरेप्रमाणे अंक निघतो, म्हणून त्या पत्त्यावर साहित्य पाठवून देऊन तो प्रसिद्ध होण्याची वाट पाहणाऱ्या हौशी कवी-लेखकांनी या क्षेत्राचे मोठे नुकसान केले. निमंत्रणावाचून मान्यवर अंकांकडे प्रचंड लेखनसाहित्य येऊन पडू लागले. त्यास संपादकीय कात्री लावण्याची कुवत असणारे समाजात उणावले आणि सर्व सावळागोंधळ सुरू झाला. निमंत्रणावाचूनचे साहित्य मानधनमुक्त ठरवले गेलेच, परंतु बहुतांश अंकांनी लेखकांचे साहित्य फुकटच छापावयास घेतले आहे. सरकारी अधिकारी असणाऱ्या लेखकांनी अंकांचे गठ्ठेच्या गठ्ठे खरेदी करण्याच्या बदल्यात स्वतःचे लेखन छापावयास देण्याची टूम काढली. त्यातून त्यांनी स्वतःची जणू जाहिरातच केली.
दिवाळी अंकांच्या नावाखाली काही राजकारणी मंडळींनी भाडोत्री माणसे नेमून स्वतःचे काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग आरंभला असल्याचे दिसून येते. त्यांच्या दिवाळी अंकांमधील लेखांचे स्वरूपही त्याच-त्याच व्यक्तींच्या जीवनाभोवती फिरणारे, स्मृतिरमणीय पठडीतील असते. अशा अंकांचे संपादकदेखील राजकीय लोकांच्या कुटुंबातील लोकांना ‘लेखक’ ठरवण्याचा घाट घालतात आणि ‘शब्दांकन’ या नावाखाली भरताड छापले जाते.
कथालेखकांनीदेखील स्वतःच्या वर्षभरात लिहिलेल्या कथा या निमित्ताने विविध दिवाळी अंकांमध्ये छापवून आणण्याची क्लृप्ती साधल्याचे दिसते. एकदा दिवाळी अंकांमधून कथा प्रकाशित झाल्यानंतर हे लेखक सर्व अंकांतील कथांची कात्रणे गोळा करून एखाद्या प्रकाशकाकडे धाडून देतात आणि पुढच्या सहा महिन्यांमध्ये त्याचे पुस्तक होते. अशा प्रकारे पुस्तके छापण्याचे हे ‘पाडे उद्योग’ दिवाळी अंकांच्या सद्दीतूनच आकाराला आले आहेत. हीच बाब कादंबरीबाबतही सर्रास घडताना आढळते! संपूर्ण कादंबऱ्या छापणारे अंक दिवाळीच्या भाऊगर्दीत अस्तंगत झाले आहेत. त्यामुळे कादंबरीकार एकाच कादंबरीची ‘कथारूप आवृत्ती’ विविध अंकांमधून छापवून त्याचे पुस्तक करण्याच्या मागे लागतात. आणि हे कोणालाही वेदनादायी वाटत नाही!
दिवाळी अंकांसाठी उपलब्ध होणाऱ्या हौशी-मोफत कवी-लेखक-चित्रकार यांचा वापर संपादकांनी सुरूच ठेवल्याने आणि बाकी सर्व भर जाहिरात-वसुलीवर टाकल्याने ही अवनती झाली आहे. याला अपवाद म्हणून येथे ‘साधना’च्या दिवाळी अंकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘साधना’ साप्ताहिकाच्या दिवाळी अंकातील (आणि नेहमीच्या अंकातीलदेखील) मानधनाचे आकडे पाहून बाजारकरू दिवाळी अंक काढणाऱ्यांना घेरी येईल (तीन हजार रुपये ते पंधरा हजार रुपये असे मानधनाचे आकडे आहेत). ‘साधना’चे नूतन संपादक विनोद शिरसाठ यांनी लेखकांना खास आमंत्रित करून त्याच्यांकडून लेख तयार करवून घेतल्याचे गेल्या दहा वर्षांतील अंकांवरून दिसून येते. शिवाय राजाभाऊ शिरगुप्पेंसारख्या प्रवासी लेखकाला संपूर्ण उत्तर भारतातील भ्रमंतीचा खर्च देऊन त्यांच्याकडून लेख लिहवून घेण्यासारखा आता दुर्मीळ झालेला प्रयोगही केलेला दिसतो.
नव्वद टक्के दिवाळी अंकांमधून लेखक-चित्रकारांचे शोषण चालू असल्याचे दिसते. बऱ्याचदा संपादकांचे उपद्रवमूल्य पाहून त्यांना जाहिराती मिळणे, ही बाब मराठी साहित्यासाठी निश्चितच भूषणावह नाही. नीतिमूल्ये विक्रीस काढून छापले जाणारे दिवाळी अंक साहित्य-संस्कृतीची काय भरभराट करणार! शिवाय दिवाळी अंकांमधील ‘भरताड लेख’ गोळा करून संपादनाच्या नावाखाली वाचकांच्या माथी मारण्याचे प्रयोगही सुरू असतात. त्यामागील अर्थकारण असे – पुस्तकासाठी मजकूर तयार केल्यावर तो दिवाळी अंकांच्या मांडवाखालून काढायचा, जेणेकरून पुस्तकासाठी होणारा अक्षरजुळणीचा खर्च आपोआपच वाचतो. शिवाय चित्रेही तिथूनच फुकट उपलब्ध होतात. मग कागद घेऊन तो प्रिंटरखालून लाटून काढायचेच बाकी राहते. ते झाले की पुस्तक तयार! अशा पुस्तकांच्या प्रती हातोहात विकून आठवड्यात पाच आवृत्त्या काढणारे प्रकाशकही अशा पुस्तकांसाठी टपूनच बसलेले असतात.
निखळ साहित्यिक दिवाळी अंकांच्या जोडीने वर्तमानपत्रांनी काढलेले अंक पूर्वी काही प्रमाणात बरे असत. अलीकडे त्यातही बाजारू आणि उथळ माहितीचे रकाने तेवढे भरलेले आढळतात. मटा, लोकसत्ता, सकाळ, लोकमत या अंकांचा पूर्वीएवढा प्रभाव जाणवत नाही. लोकमतच्या दिवाळी अंकात काही प्रमाणात दर्जा राखलेला आहे. विविध पाहणी करून लेख देण्याची वेगळी परंपरा ते जतन करताहेत, हे त्यातल्या त्यात बरे म्हणावे लागेल. वाचकाभिमुख, लोकानुरंजनी भूमिका घेण्याच्या नादात दिवाळी अंक चटपटीत होतात, हेच या वर्तमानपत्राच्या अंकांवरून दिसते. या सर्व ठिकाणी (अपवाद वगळता) मराठी प्रमाणलेखनाचे बारा वाजवल्याचे आढळते.
विनोदी दिवाळी अंकांमध्ये तर विनोद शोधण्याची वेळ अलीकडच्या वीस वर्षांत आली आहे. ‘खिडक्या चित्रे’ ही बरीचशी अश्लील, बीभत्स झाली आहेत, तर विनोदी कथेच्या नावाखाली काहीतरी पाणचट विनोद सांगितलेले असतात. ते किस्सेवजाच साहित्य ठरते आहे. विनोदी रेषेचे जादूगार शि.द.फडणीस, वसंत सरवटे यांच्यासारखे चित्रकार तर आता हद्दपार झाले आहेत. नव्या लोकांना विनोदाचेच वावडे असावे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दिवाळी अंकांतील नावीन्य हरवून त्या त्या दिवाळी अंकात एकाच धाटणीचे साहित्य प्रकाशित करण्याकडे कल दिसतो. इथे नावे घेण्यात अर्थ नाही; पण दिवाळी अंक आणि त्यांचे लेखक ही घडीही कधी बदलली जात नाही. म्हणजेच नव्या लिहिणाऱ्यांची वानवा आहे, असेही म्हणता येईल का, हाही प्रश्न आहेच. दिवाळी अंकांचे विषय जगातील विविध समस्यांना भिडण्याऐवजी अधिक आत्मकेंद्री होत चालले आहेत. महाराष्ट्रीय वाचकांचे जीवनमान बदलले आहे, त्यांची रुची वेगळी झाली आहे, त्यांची मनोरंजनाची परिमाणे बदलली आहेत. हा सगळा आवाका ध्यानात न घेता अधिकाधिक बालिश होण्याकडेच या अंकांचा कल आहे.
या अंकांचे निर्माते बहुतांश पन्नाशी ओलांडलेले किंबहुना जास्तच असलेले लोक आहेत. त्यांच्या धाटणीत बदल होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा नव्या लोकांनी अनेक उपयोजित विषयांवर संशोधनात्मक, नावीन्य असलेले लेखन मांडावे, हीच खरी दीपावलीची - दिवाळी अंकांची खरी नवी वाट असेल. कवी-लेखक-चित्रकार यांना दिवाळी अंकांसाठी बहुतांश वेळा फुकटात राबवून घेणारे संपादक त्याच अंकात एका पानासाठी पाच हजारांपासून दोन-दोन लाख रुपयांपर्यंतच्या शुभेच्छांच्या जाहिराती मिळवतात, तेव्हा त्यांच्या या व्यापारी वृत्तीची चीड येते. काही ठिकाणी तर लेख-कवी-चित्रकारांना दिली जाणारी मानधनाची रक्कम अत्यंत हास्यास्पद असते. पन्नास-शंभर रुपयांपासून फारतर दोन-अडीचशे रुपयांपर्यंत हे आकडे जातात. हे काही नवनिर्मितीसाठी उपकारक नाही.
अलीकडे मराठीत वाड्मयीन नियतकालिकांचे दिवाळी अंक त्यातल्या त्यात दर्जेदार असतात, ‘मुक्त शब्द’चा दिवाळी अंक हा त्यातलाच एक होय. ‘उद्याचा मराठवाडा’, ‘मैत्र’ असे अंक व्यक्ती वर्षभर वाचत राहते. अशा कायम वाचनमूल्य टिकवणाऱ्या अंकांनाच ‘दिवाळी अंक’ म्हटले पाहिजे; बाकीचे सर्व साहित्याचे दिवाळे वाजवणारेच ठरतात!
.................................................................................................................................................................
लेखक संतोष पद्माकर पवार मान्यवर कवी आहेत.
santoshpawar365@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment