‘काला’ : दणकेबाज रजनीकांत
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘काला’ची एक पोस्टर्स
  • Sat , 09 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie काला Kaala रजनीकांत Rajinikanth नाना पाटेकर Nana Patekar

कालाच्या एका चाहत्याचा खून केलेला. करणारे त्याच्या धारावीतल्या जागेवर टोलेजंग सोसायटी बांधणार असतात. त्याचा एक मुलगा धरणं, आंदोलन, जनजागृती अशा लोकशाही मार्गाद्वारे तिथं होणाऱ्या अन्यायी बदलांना विरोध करत असतो. मात्र सत्तरच्या दशकापासून धारावीत राहणाऱ्या कालाला अशा लोकांशी कसं वागायचं हे माहिती असतं. तो त्या माणसाला मारण्यासाठी पावसात एका पुलावर त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. दिग्दर्शक पा. रंजीथ हा प्रसंग अतिशय स्टायलिशपणे चित्रित करतात. रजनीकांतच्या पडद्यावरच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा हा प्रसंग उत्तम दर्जाच्या पार्श्वभूमीला वाजणाऱ्या संगीतानं परिपूर्ण ठरतो. तसंच पुढे सिनेमात अशा पद्धतीचे काही प्रसंगही दाखवण्यात दिग्दर्शक हात आखडता घेत नाही.

कथेनुसार धारावीत राहणारा काला करीकालन (रजनीकांत) त्याच्या मुलाच्या लेनिनच्या (मणीकंदन) विरोधाला न जुमानता विष्णू भाऊला (संपत राज) त्याच्या भाषेत उत्तर देतो. विष्णू भाऊला पर्यायानं हरिदेव अभ्यंकर उर्फ हरीदादाला (नाना पाटेकर) त्या जागेवर टोलेजंग सोसायटी उभी करायची असते. हरिदेव व कालामध्ये सत्तरच्या दशकापासून भांडणं आहेत. हरिदेवची राजकीय कारकीर्दच धारावीत दंगे, मारामाऱ्या घडवून आणणं यातनं सुरू झालेली. त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या न्यायानं ते बळकावायचंच इतकाच त्याचा उद्देश असतो. त्याच्या मार्गात मात्र काला एव्हरेस्टसारखा उभा असतो. त्याचा निप्पात कसा करायचा याचाच विचार हरिदादा नेहमी करत असतो.

‘मुथ्यू’ सिनेमापासून रजनीकांतची ‘सुपरस्टार रजनीकांत’ ही प्रतिमा तयार झालीय. त्यांची आशियातला सर्वांत जास्त मानधन घेणारा अभिनेता ते जमिनीवर पाय असणारा अभिनेता, अशी प्रतिमा जनमानसात लोकप्रिय आहे. त्यांच्या याच प्रतिमेचा वापर दिग्दर्शक-पटकथाकार आजपर्यंत करत आलेले आहेत. फार कमी सिनेमे असतील ज्यात रजनीकांतनी ही प्रतिमा बाजूला ठेवून वास्तव पात्र रंगवलेलं आहे. चटकन डोळ्यांसमोर येणारं उदाहरण म्हणजे मणीरत्नमच्या ‘दलपती’चं. किंवा ‘चालबाज’मधला खट्याळ टॅक्सी ड्रायव्हरचं.

अलीकडच्या काळातला रजनीकांतचा कुठलाही सिनेमा ‘सुपरस्टार रजनीकांत’ आणि ‘पद्मविभूषण रजनीकांत’ असं श्रेयनामावलीत लिहिलेलं घेऊन येतो. त्यांची प्रतिमा किती मोठी असावी याचं हे उत्तम उदाहरण. त्यामुळे वास्तव व्यक्तिमत्त्व व पडद्यावरील व्यक्तिमत्त्व यातला फरक कधीचाच पुसला गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हे भाग्य बॉलीवुड अभिनेत्यांनासुद्धा मिळालेलं नाही.

पा. रंजीथनी दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘कबाली’मध्ये एका गँगस्टरचं पात्र रजनीसाठी लिहिलं होतं. त्याचा सर्वांत मोठा दोष होता खलनायकाचं व्यक्तिमत्त्व; ते पुरेसं फुललेलं नव्हतं. तसंच कथा भारताऐवजी परदेशात घडणारी. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ते दुरून डोंगर साजरे असणारी. ‘काला’ची कथा घडतेच मुंबईत. हरिदेव अभ्यंकर हा खलनायक स्वरूप नेता कालाला तुल्यबळ ठरतो. तसंच कथा एकाच ठिकाणी घडत असल्यामुळे त्याला चढता आलेखही मिळालाय. कालाच्या भूतकाळाचा संदर्भ एका अॅनिमेशनद्वारे दाखवून ‘कबाली’सारखं रजनीला मेकअपमध्ये तरुण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तिथं ते खूपच अप्रभावी होतं. तसेच ‘काला’ साठीला आल्यामुळे त्याच्या हालचाली या नियंत्रित व वयाला शोभेच्या असतील याची काळजी ते पदोपदी घेतात. रजनीचे ट्रेडमार्क असणारे हातवारे, देहबोलीला सुद्धा गाण्यात तश्याच कमीत कमी स्टेप्स देऊन त्यांच्या व पात्राच्या वयाची काळजी घेतात. त्यामुळे पात्रांच्या प्रचंड भाऊगर्दीतसुद्धा रजनीकांत उठून दिसतात.

यातला खलनायक हे विशेष असण्याचं कारण नाना पाटेकरांनी ते निभावणं. नानाचा हरिदेव अभ्यंकर हा नानांमुळेच प्रभावी ठरतो. नानाच्या जागी अजून एखादा दक्षिणात्य किंवा मराठी अभिनेता असता तर प्रभाव थोडा कमी झाला असता. नानांनी अशा भूमिका केल्याचं स्मरत नाही, पण ते निर्दयी राजकारणी उत्तम वठवतात. मुळात अशा व्यक्तिरेखा असंख्य वेळा पडद्यावर आल्यात. या भूमिकेत किंवा एकूणच सतत खलनायकी भूमिका साकारणाऱ्या बऱ्याच अभिनेत्यांनी त्या उत्तमपणे वठवलेल्या आहेत. इथं नानाचं महत्त्व जास्त आहे, कारण त्यांची भूमिका कमी वेळ घेणारी आहे. पण तिचा वावर सुरुवातीपासून आहे. सुरुवातीच्याच प्रसंगात जेव्हा काला विष्णू भाऊ व पोलिसांना हाकलून लावतात, तेव्हा दिग्दर्शक रंजीथ कॅमेरा मुंबईच्या स्कायलाईनकडे फिरवतात व प्रेक्षकांना दूरवर हरीदादाचं एक होर्डिंग दिसतं. पुढे घडणाऱ्या प्रसंगाची सूतोवाच यातून होतेच, तसेच हरीदादा काय पद्धतीचा माणूस असेल याची चुणूकही दिसून येते. त्याचं सतत पांढऱ्या कपड्यात वावरणं व कालाचं सतत काळ्या कपड्यात वावरणं यातला फरक दिग्दर्शक स्पष्ट ठेवून त्यांचा संघर्ष धगधगता ठेवतात. नाना-रजनीमधला हरिदादाच्या घरी घडणारा प्रसंग हा यातील इतर महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक. शाब्दिक जुगलबंदीसाठी तो लक्षात रहावा.

रजनीचा काला काला का आहे व त्याचं व्यक्तिमत्त्व असं का आहे, हे जरीना (हुमा कुरेशी) या पूर्वाश्रमीच्या त्याच्या प्रेयसीसोबतच्या काही छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचा भूतकाळ व प्रेम खूप छान दाखवतात. जरीना, काला व त्याचा जीवलग मित्र वलीयप्पा (पी. समूथीरकणी) अगदी सहजपणे त्याच्या घरच्यांना, मित्रांना सांगतात. कालाच्या व्यक्तिमत्त्वाची बाजू तर यातनं दिसतेच, तसंच हरवलेलं प्रेमही दिसून येतं. परिस्थितीनं दुरावलेले दोघे वर्तमानकाळात भेटत असले तरी त्याचं ओझं घेऊन वागत नाहीत किंवा तिचं सिंगल मदर असणं व त्याचं मोठं कुटुंब असणं दोघेही बाजूला सारत नाहीत. तसंच एका प्रसंगात वैचारिक भेद झाले तरी काला तिच्याविषयी असणारी काळजी आपल्या लोकांच्या भल्याच्या आड येऊ देत नाही. पटकथाकार पा. रंजीथ कालाच्या व्यक्तिमत्त्वाला असणारा हा हळवा कोपरा थोडक्यात, पण नेमक्या प्रसंगातून उभा करतात. तसंच कालाची बायको सेल्वी त्यांच्या अचानक भेटण्यामुळे अस्वस्थ होते ही बाजूही दाखवतात. एकूण सिनेमाचा गंभीर पोत पाहता त्यात इतर व्यक्तिरेखांची गुंफणं दिग्दर्शकाने चांगली साधली आहे. ‘कबाली’मध्ये या बाजूची कमतरता होती.

सिनेमाचं पार्श्वसंगीत खासकरून लक्षात राहणारं. कालाची व्यक्तिरेखा जेव्हा जेव्हा खलनायकांसमोर उभी राहते, तेव्हाच संगीत त्याला उठाव देणारं. इतर गोष्टीत अंजली पाटील, पंकज त्रिपाठी, संपथ राज, ईश्वरी राव, सयाजी शिंदे, हुमा कुरेशी यांचा अभिनय लक्षात राहणारा. या सर्वांच्याच भूमिका छोट्या आहेत, खासकरून अंजली पाटीलचं पात्र पडद्यावर कमी वेळा दिसणारं. अंजली ज्या कुठल्या व्यक्तिरेखा करतात त्याचं सोनं करतात. त्यांना मुख्य नायिकेच्या भूमिका मिळायला हव्यात. बाकी तांत्रिक बाजू उत्तम. सिनेमॅटोग्राफीचा शेवटच्या रंगाच्या प्रसंगातला वापर छानच.

ज्याच्यासाठी ही व्यक्तिरेखा लिहिलीय ते रजनीकांत सुरुवातीच्या पात्र परिचयाच्या प्रसंगापासून ते शेवटच्या मारामारीच्या प्रसंगापर्यंत अक्षरशः भूमिका जगतायत असं वाटतं. पहिल्या अर्ध्या भागात त्यांना संवाद कमी आहेत, पण देहबोली व निव्वळ मुद्राभिनयातून ते कालाची व्यक्तिरेखा मस्तपैकी उभी करतात. काला हे पात्र काय असावं याचे दोन खास प्रसंग बघण्यासारखे आहेत. पहिला पोलीस स्टेशनमध्ये दारूच्या नशेत एका मिनिस्टरची रेवडी उडवणारा व दुसरा हरिदादाच्या घरी घडणारा. संवादासहित चेहऱ्यावरील भाव कालाची प्रसंगानुसार होणारी तगमग ते अप्रतिमपणे दाखवतात. खासकरून हरीदादाच्या घरी काला जातो, तेव्हा त्याच्यावर आभाळ कोसळलेलं असतं. संवादापासून ते प्रसंगानुरूप हसण्यापर्यंत रजनीकांत अभिनयाचे इतके पैलू दाखवतात की, बघत राहावं वाटतं. ‘कबाली’मधली व्यक्तिरेखा तितकी फुलणारी नव्हती. इथं मात्र पात्राच्या फुलण्याला बराच वाव असल्यामुळे रजनी त्यात छान रंग भरतात.

रजनीकांतच्या व्यक्तिमत्त्वाला ‘लार्जर दॅन लाईफ’ भूमिका जोपर्यंत मिळत राहतील, तोपर्यंत त्यांची पडद्यावरील प्रतिमा तशीच राहील. याची तजवीज मात्र त्यांनीच एकामागून एक सिनेमे करून आजपर्यंत जपली आहे. काला हा सुद्धा त्याच लांबलचक सिनेमांच्या यादीत अजून एकाची भर म्हणून बघता येईल. तरीही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असणारा, त्यांच्या गळ्यातला ताईत असणारा हा अभिनेता एखादं वास्तव, खरंखुरं पात्र साकारून वैविध्यपूर्ण भूमिका करेल, अशी आशा करायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख