बंडखोरीकडून वेगानं आत्मशोधाकडे जाणारी कविता
ग्रंथनामा - झलक
अश्विनी दासेगौडा - देशपांडे
  • वेदिका कुमारस्वामीच्या ‘गावनवरी’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 June 2018
  • ग्रंथनामा आगामी वेदिका कुमारस्वामी Vedika Kumarswami गावनवरी Gavnavari कविता महाजन Kavita Mahajan

फेसबुकवर सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या वेदिका कुमारस्वामीच्या कविता ‘गावनवरी’ या संग्रहाच्या रूपानं नुकत्याच पॉप्युलर प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाल्या आहेत. या संग्रहाचे संपादन कवयित्री-कादंबरीकार कविता महाजन यांनी केलं असून समीक्षक अश्विनी दासेगौडा-देशपांडे यांनी त्याला दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

गेल्या दोनेकशे वर्षांपासून आपलं मूळ स्थान परत मिळवण्यासाठी व मोकळेपणानं व्यक्त होण्यासाठी भारतीय स्त्रिया संघर्ष करताहेत. अनुकरण, बंडखोरी / विद्रोह व आत्मशोध हे तीन टप्पे मानले, तर यातल्या अनेकजणी अजूनही अनुकरण व बंडखोरी या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यांवरच खिळलेल्या आहेत. आत्मशोधाच्या टप्प्यापर्यंत खूपच कमी लेखिका पोहोचल्या आहेत. वेदिका कुमारस्वामीच्या कवितांची सुरुवातच बंडखोरीनं होते आणि वेगानं ती आत्मशोधाच्या टप्प्यावर येऊन पोहोचते. अनुभवांकडे पाहण्याचा अलिप्तभाव आणि संतसाहित्याचा अभ्यास या दोहोंच्या संगमानं हे तिला साध्य झालं असावं. वेदिकाच्या काव्याचा विषय म्हटलं तर जुना आहे; पण एखादी समस्या जोवर पूर्ण नष्ट होत नाही, तोवर तिला जुनी झाली असं म्हणता येणार नाही. देवदासी प्रश्‍नासारख्या धर्म व जात केंद्रित सामाजिक समस्या इतक्या चिवट असतात की, त्या प्रसंगी रूप बदलतात, पण सहजी नष्ट होत नाहीत.

आख्यानकाव्य, खंडकाव्य, लोककथागीत या तिन्ही पारंपरिक प्रकारांहून वेदिकाच्या कविता निराळ्या आहेत. त्यात सुबोध कथा सलग सांगितली जात नाही आणि ती दीर्घकविताही नाही. तिची वैशिष्ट्यं पाहिली तर ती कादंबरीच्या जवळ जाणारी दिसतात.

त्यामुळे या प्रकाराला ‘काव्यांबरी’ म्हणता येऊ शकेल. ती अर्थातच महाकाव्याइतकी विशाल व व्यापक मुळीच नाही; पण अनेककेंद्री कथानक असलेली, सखोल विचार मांडणारी, एक अत्यंत गुंतागुंतीची रचना म्हणून ती कादंबरीच्या जवळ जाणारी आहे. तिच्यात अनेकांचे आवाज आहेत. एरवी कवितेत एकच एक प्रमुख आवाज असतो, प्रसंगी तो खूप तीव्रही होतो; पण त्याला छेद देणारा दुसरा आवाज कादंबरी, कथा, नाटक यांच्याप्रमाणे कवितेत नसतो. इथं वेदिका या पात्राचा आवाज प्रमुख असला तरीही त्या आवाजाला आणि एकमेकांच्या आवाजांनाही छेद देणारे आजी, अम्मा, लतामॅडम, सदाशिवप्पा, भीमक्का, कुमारस्वामी अशा अनेक पात्रांचे स्पष्ट आवाज यात आहेत. त्यांच्या वैचारिकतेत अनेकदा मतभिन्नताही स्पष्ट दिसते. ठळक व्यक्तिरेखा, त्यांचे विचार व वर्तन, विविध घटना-प्रसंग यांतून हे कथानक उलगडत जातं. निवेदन प्रथमपुरुषी असलं तरीही कादंबरीप्रमाणेच त्यात इतर अनेक पात्रांची मनोगतं संवादामधून येतात; त्यातून नायिकेच्या समक्ष न घडलेले प्रसंगदेखील वाचकासमोर उभे ठाकतात.

यातील निवेदक वेदिका आहे आणि कवयित्रीचं टोपणनावही वेदिका आहे. त्यामुळे हे आत्मचरित्रपर काव्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो. ते दुसऱ्या एका व्यक्तीचं अनुभवकथन असेल तर चरित्रपर काव्य असू शकतं आणि ती अमुक एकाच व्यक्तीची प्रत्यक्ष कथा नसेल, तर त्याला कथा वा कादंबरी काव्य म्हणता येऊ शकतं. मजकूर आत्मपर असेल तर तो पहिल्या श्रेणीतला अनुभव असतो, चरित्रपर असेल तर दुय्यम आणि कथा वळणाचा असेल तर त्यात काल्पनिकता प्रवेश करते व ते अनेक वास्तवांचं संकलनही असू शकतं. टोपणनावामुळे हे उलगडत नाही, त्यामुळे चरित्रपर समीक्षेच्या वाटा बंद होतात. अर्थात त्यामुळे काही विशेष अडणार नाही, कारण भारतीय भाषांत अजून चरित्रपर समीक्षा नीट विकसितच झालेली नाही. टोपणनावाचे काही फायदेही दिसतील. लिहिणाऱ्या व्यक्तीची जात, धर्म, लिंग, वर्ग, शिक्षण इत्यादी माहिती दृश्य नसल्यानं विविध लेबलं लावून पुस्तक वाचण्याची व समीक्षा करण्याची सोपी क्लृप्ती व्यर्थ ठरेल.

या काव्यात वेदिका नावाच्या मुलीची एक कथा येते. ही देवदासीची मुलगी. आजी व आई यांच्यासोबत राहतेय. नवऱ्याचं दुर्लक्ष, सवतीचा जाच व मुलीची काळजी या तिन्ही कारणांनी मुलीसोबत वेदिकाची आजी मंदिर परिसरात राहण्यास गेली. नृत्य-गायनाची परंपरा आजीनं टिकवली नव्हती, रूढीनुसार धार्मिक कार्यात जुजबी सादरीकरण व्हायचं. लोकांच्या या गोष्टींकडे बघण्याच्या भावनाही आता बदलल्या होत्या. एखाद्या श्रीमंत माणसाला रूपगुण आवडले, तर त्याची रखेली बनून राहणं किंवा मग वेश्याव्यवसाय करणं हे दोनच पर्याय शिल्लक होते. त्यानुसार वेदिकाची अम्मा काही वर्षांतच रखेली बनली. अम्माच्या आजारपणामुळे अल्पवयातच वेदिकाच्या वाट्यालाही रखेली बनणंच आलं. अभ्यास, वाचन, लेखन यांची गोडी असल्यानं तिचं आयुष्य पुढे अनेक वळणं घेत बदलत गेलं. वेदिकाला मिळालेलं नाव ‘ब्राह्मणी’ असलं, तरी त्यामुळे तिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडलेला दिसत नाही. ना शाळेत प्रवेश मिळाला, ना समाजात प्रतिष्ठा! आजीच्या प्रभावात वेदिकाही आधी भौतिक लाभांचाच विचार करत राहते. एका टप्प्यानंतर लैंगिक हिंसा नाकारण्याचं धाडस तिच्यात येतं; पण कृतीसाठी तिला शारीरिक बळ, आर्थिक स्वावलंबन, शिक्षण असं कुठलंच पाठबळ नाहीये. त्याचवेळी गणिकेच्या चातुर्यानं प्रौढ, वासनांध हेगडेला लैंगिक खेळातच अतिरेकी वर्तन करायला लावून ती मृत्यूच्या दारात नेऊन ठेवते. त्याचा मुलगा आपल्याकडे आकर्षित झाला आहे हे ध्यानात येताच तिच्या भौतिक चिंता मिटतात. त्याच्याबाबत ती पझेसिव्ह होत नाही, त्याच्याशी लग्न करावं असा विचारही तिच्या मनात येत नाही. तिची आंतरिक ओढ आहे ती शिक्षणाची; आणि तिच्या बालिश, अप्रगल्भ वागण्यातूनही ती ओढ निराळी व स्पष्ट उठून दिसेल इतकी ठसठशीत आहे. बुद्धिमान, प्रामाणिक व संवेदनशील सदाशिवप्पाला ती ओढ चटकन कळते आणि त्याच दिशेनं गेल्यास तिचं भविष्य सुरक्षित होईल अशी वडिलकीची भूमिकाही तो तरुण, कोवळ्या वयात घेतो; जी हेगडेला कधीच घेता आली नसती. तरीही आयुष्यातल्या गरजा लैंगिक सुखाच्या बदल्यात भागवणारा अनेकांपैकी एक पुरुष याच मर्यादित दृष्टीनं वेदिका त्याच्याकडे पाहते.

वेदिकाचं घरातलं सुरक्षित भासणारं जगणं संपून चार भिंतींबाहेरचं भय थेट अंगावर घेत प्रवास करण्याचा दुसरा टप्पा सुरू होतो; संग्रहातील दुसऱ्या भागातल्या कविता या प्रवासाच्या आहेत. दुसरा टप्पा केवळ शरीरानं प्रवास करण्याचाच नाही, तर वैचारिक प्रवासाचं सूचन करणारादेखील आहे. या प्रवासात अनेक घटना घडतात. तिचं सामान चोरीला जातं, चोराच्या हल्ल्यात ती जखमी होते. देवदासी असून आपल्याला मंदिरात प्रवेश का नाही, इथपासून अनेक प्रश्न तिला पडू लागतात. जंगलातून जाताना एक पुरुष तिच्यावर बळजबरी करतो, तेव्हा त्याला विरोध करायचा की नाही, असाही पेच तिच्या मनात निर्माण होतो आणि तो बलात्कार ती निमूट सहन करते. एक गृहस्थ तिला आसरा देतो, मात्र त्याचे नातलग तिला तिथून हुसकावून लावतात. परडी घेऊन जोगवा मागणारी एक जोगतीण तिला आपल्यासोबत येऊन राहण्यास आणि आपल्यासारखं आयुष्य जगण्यास सुचवते; पण तो पर्यायही वेदिकाला मान्य होत नाही. एक बाई तिला खाऊ घालते, अंघोळ घालून चांगले कपडे देते; पण आसरा देऊ शकत नाही, ही तिची अगतिकता असते. वेदिकाचं वाट फुटेल तिकडे जाणं आणि मिळतील ती कामं करणं सुरू राहतं. देवाचा राग करणारी, भक्तीचा तिरस्कार करणारी आणि आपल्या अस्तित्वाचा, सृष्टीशी असलेल्या आपल्या नात्याचा विचार करणारी एक वेगळी स्त्री तिच्यात आकार घेऊ लागते. तिचं आध्यात्मिक साहित्याचं वाचन वाढतं. वचनसाहित्य, संतसाहित्य तिला भुरळ घालतं.

या टप्प्यावर पुन्हा लतामॅडम भेटतात आणि मागे टाकलेला भूतकाळ समोर येतो. तिनं गाव सोडल्यानंतर त्यांचं घर जाळल्याची आणि आजीवर सामूहिक बलात्कार झाल्याची हकिकत समजते. सदाशिवप्पानं वेदिका घरातच आहे असं समजून तिचा जीव वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली आणि तिच्याच नावाचा जप करत तो मरण पावला हेही समजतं, तेव्हा कुठे तिला त्याच्या अस्सल प्रेमाची जाणीव स्पष्टपणे होते. मात्र ज्या परिस्थितीत ही जाणीव होते, तो टप्पा इतका विदारक आहे की यातून तिला स्मशानवैराग्यच येतं. कुटुंबातल्या, प्रेमाच्या अनेक माणसांचे शेवट काय झाले ही माहिती भूतकाळ उपसून वर आणते आणि सगळं निरर्थक वाटायला लागतं. त्यातून भक्ती साहित्याचं बोट धरून ती कदलीवनात प्रवेश करते. इथं नाथपंथीय साधू भेटतात. त्यांच्याशी झालेल्या चर्चांमधून वैचारिक स्पष्टता येत जाते. तीन वर्षं ती श्रीशैल्यम्, कदलीवन, पाताळगंगेचा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट या परिसरात वास्तव्य करते.

तिसऱ्या टप्प्यावर पाताळगंगेच्या परिसरातच परिक्रमेसाठी आलेले कुमारस्वामी तिला भेटतात. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि भविष्याच्या चित्राची एकही कल्पना मनात नाहीये. त्यावेळी ते तिला हात देतात. कोणतंही बंधन, कोणत्याही अटीशिवायचं प्रेम इथं तिला लाभतं. जगण्यात स्थैर्य आलंय असं वाटू लागतं. ती स्वावलंबी बनली आहे, अर्थार्जन करू शकते आहे; पण या कशातच तिचं मन रमत नाही. चूल, मूल, लग्न, पातिव्रत्य या चौकटीचे विचारही स्वत:हून तिच्या मनात येत नाही. या बाबतचे प्रश्न पडतात ते इतर कुणी विचारल्यावर किंवा इतर कुणाच्या संदर्भातच. आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी झाला आहे, आपलं या विश्वाच्या पसाऱ्यात काय काम आहे, असे प्रश्न वाढत जातात. स्त्री-पुरुषाचं नातं नेमकं काय असतं, याही प्रश्नाचं उत्तर ती कुमारस्वामींशी असलेल्या आपल्या नात्याच्या निमित्तानं शोधू पाहते.

ऐकलेल्या पुराणकथा, मिथकं आणि लोककथांचा प्रभाव तिच्या मनावर प्रचंड आहे. विचार विकसित होत जाताना या गोष्टी सतत त्यांना छेद देतात. त्यामुळे ‘भक्तीनं मळमळ होते’ म्हणणारी नायिका शक्तिपीठं बघायची ठरवते, अशा वरवर विसंगत वाटणाऱ्या गोष्टी या कथानकात अनेकदा दिसतात. वाचून, अभ्यासून आवडलेले, पटलेले विचार प्रत्यक्ष आयुष्यात कृतीत आणायचे तर असं उलटसुलट विचार करत, संगत-विसंगत कृती करतच आयुष्याचा प्रवास वेग घेतो आणि असं तिचं स्वत:ला दुरुस्त करत नेणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे. यातून जे प्रश्न निर्माण होतात, ते अनेक पातळ्यांवरचे आहेत.

सतीची कथा ऐकताना शैव तत्त्वज्ञानाकडे नव्यानं पाहण्याची दृष्टी तिला लाभते. शक्तिपीठांची परिक्रमा एकटीनं करावी असं तिच्या मनात येतं. यातही भक्ती नाही. आजवर तिनं कधीच मंदिरात प्रवेशही केलेला नाही; पण आता ती सारी बंधनं ओलांडून मंदिरप्रवेश करते. तिला स्त्री शक्तीचा शोध घ्यायचा आहे. काव्यसंग्रहातील पहिल्या तीन भागांहून चौथा भाग काहीसा निराळा आहे. तिसऱ्या भागात येणारा सतीकथेचा संदर्भ आणि शक्तिपीठं पाहण्याची वेदिकाची इच्छा, मंदिरप्रवेशाची बंडखोरी त्याची पूर्वसूचना देतात. पुराकथा अनेक समस्यांचा उलगडा करतात, सतीची कथा इथं हेच काम करते.

ज्याच्याशी लग्न लागलं तो देव आणि ज्यांच्या आधारानं उदरनिर्वाह चालतो ते ‘ठेवणारे’ पुरुष ख या दोन्ही नात्यांची बंधनं तोडून, नाती नाकारून ती जगाकडे आणि स्वत:कडेही पाहू लागते, तेव्हाच तिच्या आत्मशोधाची सुरुवात होते. आसक्ती आणि भय यांना ओलांडून जाण्याचा हा आध्यात्मिक टप्पा आहे. काहीएक मोठा अपघाती धक्का बसतो, तेव्हाच साधारणपणे स्त्रिया संन्यासमार्गाकडे वळतात असं आजवरच्या भारतीय साहित्यातलं चित्रण आहे. इथं मात्र वेदिका तो अंतिम मार्ग मानत नाही; हा पर्याय पूर्वसुरींनी का निवडला असेल याचा शोध ती वचनसाहित्याचा अभ्यास करत घेते आणि त्या मार्गावरून परत फिरते. भक्तिमार्ग हा आपला मार्ग नसून ज्ञानमार्ग हा आपला मार्ग आहे, याची जाणीव तिचा भविष्यकाळ लख्ख करते.

त्यात तिच्या मनात ज्या शंका आहेत, जे आंतरिक विरोधाभास तिच्यात आहेत ते कुमारस्वामींसारख्या अभ्यासू, शांत वृत्तीच्या व्यक्तिमत्त्वासोबत राहताना दूर होऊ लागतात. मात्र त्याचवेळी समांतररीतीनं नात्याचा नवा पेचही निर्माण होतो. आपल्याला आयुष्यात करायचंय काय, याचा संभ्रम तिच्या मनात आहेच. पुनर्वसनाच्या कल्पनेत शिक्षण, अर्थार्जन व लग्न हे तीन मार्ग सुधारकांनी सुचवलेत... ते तिन्हीही तिला अपुरे वाटतात. ते मार्ग आहेत, पण ते ध्येय असू शकत नाही हे जाणवतं. तिथूनच स्त्रीत्वाचा, स्त्रीशक्तीचा शोध घ्यावा अशी कल्पना सुचते. लग्न, सहजीवन या शब्दांच्या पुनर्व्याख्याच जणू ती करू पाहते आहे.

ती फक्त लैंगिक हिंसाचाराबाबत बोलत नाही, तर लैंगिक गरजांविषयीही बोलते, यात तिचं वेगळेपण आहे. अन्यथा बलात्कार, हिंसा यांना सामोरं गेलेल्या स्त्रियांच्या मनात लैंगिक सुखाचे विचारही येत नाहीत, लैंगिकतेबाबत त्यांना केवळ घृणा वाटते, सरसकट पुरुषांविषयी त्यांच्या मनात केवळ तिरस्काराची भावना असते, अशी काही पारंपरिक गृहितं आपल्या मनात असतातच; या तमाम गृहितकांना वेदिकाची कविता छेद देते.

लोभ, मोह, हताशा, अगतिकता, मत्सर, संताप, हिंस्रता, गोंधळलेपण, परावलंबन, नियतीशरणता, आपुलकी, सखीभाव, नैराश्य, त्याग, विरक्ती असा प्रवास करत नायिका पुन्हा समंजस आसक्ती, वैचारिक स्पष्टता, भावनिक कल्लोळाचं शमन, विचारी विद्रोह, प्रगल्भ प्रेमजाणीव अशा पायऱ्या चढून आत्मशोधापर्यंत येऊन थांबते.

अनुवाद : कविता महाजन

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4427

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......