अजूनकाही
१. टाटा स्टील कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींनी शनिवारी शनी शिंगणापूरला जाऊन शनीला अभिषेक करून पूजा केली. त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शनदेखील घेतले.
अ मॅन इज नोन बाय हिज कंपनी म्हणजे माणूस त्याच्या सोबतीला कोणता मित्रपरिवार आहे, त्यावरून ओळखला जातो, म्हणतात. त्याचप्रमाणे तो कोणत्या दैवतांची जाहीरपणे पूजाअर्चा करतो, कोणत्या देवस्थानांना भेटी देतो, त्यावरूनही ओळखता येतो, सायरसभाऊ!
……………………………………
२. अमेरिकेची पॉर्न इंडस्ट्री 'गाजवून' बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री अशी ओळख कमावलेल्या सनी लिओनीने चाहत्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी अॅप काढण्याचा निर्णय केला आहे.
सनीताई सनीताई (प्रस्तुत टपल्याकाराची पत्नी हा कॉलम वाचते, हे विचक्षण वाचकांच्या लक्षात आलं असणार), आता तुम्ही कसा सर्व्हे घेणार ते आम्हाला माहिती आहे… तुम्ही प्रश्न विचारणार, सनी लिओनी किती हॉट आहे?
उत्तराचे पर्याय - अ) हॉटेस्ट, ब) सुपरहॉट, क) खूपच हॉट, ड) अतिशय हॉट
……………………………………
३. केंद्र आणि राज्याच्या तिजोरीला कमळाचे कुलूप आहे. त्यामुळे त्या कुलुपाला अन्य पक्षाची चावी लागल्याने ते उघडणार नाही; पालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष व उमेदवार निवडून न दिल्यास विकास रोखू अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गर्भित धमकी.
तात्या, तिजोरीच्या मालकापुढे कुलूपाने टणाटणा उड्या मारणं विनोदी आहे. मालकाने चावी बदलली आणि कुलुपाने हुशाऱ्या केल्या तर मालक कुलूप उचकटून फेकून देतो आणि नवं कुलूप बसवतो, हे लक्षात ठेवलंत तर पाकळी पाकळीने गळण्यापासून वाचाल.
……………………………………
४. तुमच्याकडे असणाऱ्या चलनाला काहीही किंमत उरलेली नाही, हे जनतेला अचानकपणे सांगणे, हे हुकूमशाहीचे अधिक जटील स्वरूप आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, या एका कृतीमुळे सर्व भारतीय जनतेला किंवा भारतीय चलन असणाऱ्या प्रत्येकाकडे संशयितपणे बघितले जात आहे. आपल्याकडे काळा पैसा नसल्याचे किंवा आपण लबाड नसल्याचे त्यांना सिद्ध करावे लागत आहे. : नोबेल पुरस्कारविजेते भारतरत्न अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन.
कोण आहेत हे सेन? सुष्मिता किंवा कोंकोणा सेनचे कोणी नातेवाईक आहेत का? इतकी बडबड करायला ते राजीव दीक्षित किंवा सुब्रम्हण्यम स्वामी किंवा गेलाबाजार अरुण जेटली किंवा ऊर्जित पटेलांपेक्षा हुशार आहेत का? खांग्रेसच्या राजवटीतच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय ना? तो त्यांनी अजून परत कसा केला नाही? काय कळतं त्यांना अर्थशास्त्रातलं? गेली ६० वर्षं ते का गप्प होते?
……………………………………
५. नोटाबंदीमुळे अंडरवर्ल्डचा बाजार उठला, मटका, शस्त्रतस्करी, खुनाची सुपारी, अंमली पदार्थांची तस्करी, हवाला व्यापार, वगैरे सगळ्या गुन्ह्यांना पायबंद बसला : आघाडीच्या वर्तमानपत्रातली बातमी.
एवढा मोठा फटका बसल्यानंतर आपण तपशीलवार माहितीच्या, आकड्यांच्या, तुलनात्मक तक्त्यांच्या अपेक्षेने बातमी वाचत पुढे जावं तर तिसऱ्या परिच्छेदात मुंबईतल्या 'एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर' ही माहिती दिल्याचं समजतं… यापुढे लोकलमधून प्रवास करताना कोणाशी नोटाबंदीचे लाभ या विषयावर चर्चा केल्यावर आपलं अर्थशास्त्राची जुनी गाइडं विकण्याचा धंदा आहे, हे सांगू नका… नेमका तोच बातमीदार निघायचा आणि 'एका अर्थतज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर' माहिती दिली, म्हणून तुमचं म्हणणं परिच्छेदात तोडून बातमी म्हणून छापून आणायचा.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment