अजूनकाही
कृषीसंशोधक दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू असे तांदळाचे नऊ वाण शोधले. १९८५ ते १९९० या पाच वर्षांच्या काळात त्यांनी या नऊ वाणांचा शोध लावला. या काळात प्रसिद्ध असणाऱ्या एचएमटी कंपनीच्या घड्याळ्यांमुळे त्यांनी शोधलेल्या एका प्रसिद्ध वाणाला ‘एचएमटी’ हे नाव दिलं. या अमुल्य शोधकार्यासाठी त्यांना चार विविध पुरस्कारांसह राज्य शासनाकडून कृषीभूषण पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ या मासिकानंही त्यांची दखल घेतली होती.
.............................................................................................................................................
सोमवारी, ४ जून रोजी दुपारी २ वाजता दादाजी खोब्रागडे यांच्या देहाला शोधग्राममधील कार्यकर्त्यांनी अंतिम निरोप दिला. प्रार्थना म्हणण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं शव त्यांच्या मूळ गावी नागभिड तालुक्यातील नांदेडला पाठवण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी नागपूरवरून त्यांना शोधग्राममधील दवाखान्यात बेशुद्धावस्थेत आणण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा आणि नातू हेदेखील त्यांच्यासोबत होते. महिनाभरात त्यांना लकव्याचे तीन झटके येऊन गेले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील बातमीनंतर त्यांना नागपूरला चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण पुढे उपचार शक्य नाही हे कळून चुकल्यावर त्यांचा अंतिम काळ काढण्यासाठी त्यांच्या घरचे दादाजींना शोधग्राममध्ये घेऊन आले. इथं त्यांना दखल करून घेतलं. पण ते उपचाराच्या पलीकडे गेले होते. उपचाराला शरीर साथ देत नव्हतं. त्यामुळेच नागपूरच्या डॉक्टरांनी त्यांना घेऊन जाण्यास सांगितलं होतं. शोधग्राममध्ये त्यांना दाखल केल्यावर येथील डॉक्टरांच्या संपूर्ण टीमनं शेवटचा क्षण येईपर्यंत अतिशय मनोभावे त्यांची सेवा केली.
ते उपचाराच्या पलीकडे गेले होते, तरीही शोधग्राममध्ये त्यांना दाखल करून घेण्यात आलं. याचं कारण होतं, अंतिम मानवाधिकार. ‘डेथ विथ डिग्निटी’. सन्मानानं माणसाला मरता आलं पाहिजे. मृत्यूच्या वेळी तरी शरीराची विटंबना होऊ नये. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत त्याची सेवा करायची आणि त्याला सन्मानानं अखेरच्या श्वासापर्यंत जगू द्यायचं, म्हणूनच शोधग्राममध्ये दाखल करून घेतलं.
दादाजींनी धानाच्या संशोधनात भरपूर काम केलं आहे आणि सर्वांना आता ते माहीत आहे. पण आमचं आणि दादाजींचं एक नातं होतं. हे म्हणजे संशोधकाचं. ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नावर गेली तीस वर्षं आम्ही गडचिरोलीमध्ये संशोधन करत आहोत. ग्रामीण जनतेचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. दादाजींनी स्वतःच्या प्रतिभेनं आणि निरीक्षणानं धानाचे नवनवे वाण शोधून काढले. हे एक अद्वितीय संशोधन होतं. आज लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. आपण आज जो उच्च प्रतीचा तांदूळ खातो, यात दादाजींचं खूप मोठं योगदान आहे. पण संशोधनाच्या बाबतीत ते आमचेही गुरू होते. वयानं १२ वर्ष ज्येष्ठ होते. आमच्या संशोधनाला विज्ञानाच्या उच्च शिक्षणाचं, तंत्रज्ञानाचं पाठबळ आहे. पण दादाजींना असं कुठलंच पाठबळ नव्हतं. ते हाडाचे शेतकरी होते. शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. पण केवळ आपली निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर दादाजींनी तांदळाचे नऊ वेगवेगळे वाण (एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू) विकसित केले. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आम्ही सलाम करतो.
एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो. प्रकाशझोतात आणि प्रतिष्ठेचं वलय असलेल्या समाजसेवकांना ही अडचण येणार नाही, पण जे निर्धन आहेत, साधनहीन आहेत, खेड्यात राहून निरपेक्ष सेवा करतात, अशा समाजसेवकांची मोठी पिढी आता वृद्ध झाली आहे. ज्या काळात त्यांनी समाजसेवा सुरू केली, तेव्हा या क्षेत्रात ‘प्रतिष्ठा’ असा शब्द प्रचलित नव्हता. त्यांनी कधीही धन गोळा केलं नाही. कधी समाजसेवेचा प्रचारही केला नाही. दादाजी खोब्रागडे यांनी तर धानाच्या वाणाचं कधी पेटंटदेखील घेतलं नाही.
असे अनेक समाजसेवक आज वृद्ध झाले आहेत. त्यांच्या अंतिम पर्वाची सोय आपला समाज कशी करणार आहे? त्यांच्या अन्नपाण्याची सोय हा प्रश्न तर आहेच, पण आजारपणाची सोय हा कळीचा मुद्दा ठरतो. कधीतरी वर्तमानपत्राद्वारे एखाद्याची शोकांतिका प्रगट होते आणि समाजाचं लक्ष अचानक वेधलं जातं. पण अशी शोकांतिका प्रगट होणं किंवा एखाद्या समाजसेवकाला तशी मागणी करावी लागणं, हे आपल्या समाजाला शोभत नाही. त्यामुळे एक प्रगत राज्य आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रानं, अशा प्रकारच्या साधनहीन समाजसेवकांचं अंतिम पर्व समाधानानं जावं, त्यांना योग्य ती सेवा मिळावी यासाठी एक व्यापक व्यवस्था उभी केली पाहिजे. समाज आणि शासन दोघांची ही जबाबदारी आहे. दादाजी खोब्रागडे यांच्या अंतिम पर्वाच्या निमित्तानं हा प्रश्न आपल्या दारी आज दत्त म्हणून उभा आहे. जो सोडवणं आपली जबाबदारी आहे.
.............................................................................................................................................
लेखक डॉ. अभय बंग प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत.
search.gad@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 06 June 2018
लेखाशी सहमत. आज (अगदी माझ्यासकट) जो तो एकतर पैशामागे तरी धावतोय किंवा उदास तरी झालाय. आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावनाच लुप्त होत चाललीये. अभय बंगांसारखे सेवाभावी लोकं हेच आशेचे किरण आहेत. -गामा पैलवान