प्रणव मुखर्जींनी संघाला भेटावे, हिंदू असणे म्हणजे काय त्याचे धडे द्यावे! 
पडघम - देशकारण
आकार पटेल
  • प्रणव मुखर्जी आणि संघ स्वयंसेवक
  • Tue , 05 June 2018
  • पडघम देशकारण प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee काँग्रेस Congress राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh आरएसएस RSS भाजप ‌BJP पी. चिदंबरम P. Chidambaram

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं निमंत्रण स्वीकारण्यावरून गेले काही दिवस बरीच चर्चा होते आहे. परवा नागपुरात मुखर्जी संघ स्वयंसेवकांना काय उपदेश देतील माहीत नाही. पण त्यांनी काय करायला हवं अशी अपेक्षा करणारा हा प्रसिद्ध स्तंभलेखक व संपादक आकार पटेल यांचा लेख. हा लेख ‘Times of India’मध्ये ३ जून २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ इंग्रजी लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

हिंदू (Hinduism) असणं म्हणजे लवचीक असणं. त्यातच आपले सामर्थ्य आहे. या लवचीकतेमुळेच हजारो वर्षांपासून हिंदू संस्कृती तगली. यापेक्षा अधिक शक्तिशाली, पण ताठर संस्कृत्या – उदा. रोम, ग्रीक, इजिप्त - लयाला गेल्या, असं अल्लमा इकबाल (मृत्यू १९३८) यांनी नमूद करून ठेवलं आहे. 

एक विलक्षण साक्षात्कार झाल्यावर सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध झाला. त्यांनी आपल्या भोवतीचं दुःख पाहिलं आणि त्यांना कळलं की दुःख मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यावर चिंतन करून त्यांनी एक अचूक निष्कर्ष काढला - या जगात ईश्वर नाही. त्यांच्या पूर्वजांच्या ईश्वरसंबंधीच्या सर्व मान्यतांना नाकारल्याबद्दल ते फक्त स्वीकारलेच गेले असं नाही, तर पूजलेदेखील गेले. 

आज कोणताही हिंदू पूर्वीच्या वैदिक देवतांना पूजत नाही. तुम्ही इतक्यात कुठे इंद्राचं देऊळ पाहिलंय का? आपण आता इतर पौराणिक देवांकडे वळलो आहोत. तेही एक दिवस वैदिक देवांप्रमाणेच कालबाह्य होतील. अमेरिकन विभूती अभ्यासक एच. एल. मेंकेन यांनी विसरल्या गेलेल्या देवांवर – उदा. झिअस, ज्युपिटर, ओरिसिस आणि अमन यांच्यावर - एक खळबळजनक  निबंध लिहिला आहे. त्या देवतांपैकी कुणीही आज पूजलं जात नाही. कारण सर्व धर्मांचा अंत होतो आणि आपल्याही धर्माचा होईल. पण आपली मूल्यं राहतील, आपली मजबूत लवचीकता टिकेल. 

काहींना ही सहिष्णुता आपली कमजोरी वाटते, पण ते चुकतात. आपण सर्व समावेशक आहोत म्हणूनच टिकतो. आपण बहु-सांस्कृतिक आहोत, कारण आपण खुले आहोत, जिवंत आहोत, बदल स्वीकारणारे आहोत.

माझी लेवा पाटीदार ही कुणब्यांमधलीच एक जात आहे, जी कृष्णाला ‘रणछोडदास’च्या स्वरूपात पूजते. रणछोडदास म्हणजे जो युद्धभूमी सोडून पळाला तो. जरासंधाच्या शक्तीशाली सरदाराला कालयवनला (जो काळा ग्रीक होता) गुंगारा देऊन कृष्ण पळाला आणि त्यानं स्वतःचा जीव वाचवला. हिंदुत्ववाद्यांचे लाडके वल्लभभाई धरून चोरातोरचे सर्व पटेल रणछोडदासाचा उत्सव साजरा करतात. पण त्रिशूल ललकारणाऱ्यांना ही गोष्ट समजणार नाही. त्यांच्यासाठी प्राणांची आहुती देणं महत्त्वाचं आहे, तेही दुसऱ्याच्या. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मराठी ब्राह्मणांना त्यांची राष्ट्रीयत्वाची प्रेरणा हिंदूंमध्ये नाही, तर इटलीत सापडली. सावरकरांच्या लिखाणावर मॅझिनी आणि गॅरिबाल्डीचा प्रभाव आहे, पाटीदारांचा नाही. म्हणून खाकी चड्डी आणि काळी टोपी त्यांनी पेहराव म्हणून स्वीकारला, भारतीय सेनेचा ‘नसलेला’ सॅल्युट ते मारतात. 

शिवाय हिंदूंच्या अन्य आणखी सहिष्णुतेसारख्या थोर परंपरांना ते (संघ) तुच्छ लेखत नसले तरी त्याकडे डोळेझाक करतात. खरं तर यासारख्याच अद्वितीय परंपरांनी हिंदूंना टिकाऊ, मजबूत केलं आहे. 

संघाला बजावून सांगण्यासारखी जी एक गोष्ट आहे ती ही! नागपूरला संघाच्या शिबिराला संबोधित करण्यासाठी प्रणव मुखर्जी येत्या गुरुवारी जातातच आहेत, तर हे त्यांनी जरूर करावं. 

त्यांनी संघाचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल अनेक जण दुखावले आहेत. त्यांच्या मते त्यामुळे संघाला मान्यता देण्यासारखं होतं. (आज देशावर संघाचंच राज्य आहे म्हटल्यावर त्याला पुन्हा वेगळी मान्यता कशाला हवी?) माजी केंद्रीय मंत्री आणि आजी स्तंभलेखक पी. चिदंबरम लिहितात, ‘साहेब, आता त्यांचं निमंत्रण तुम्ही स्वीकारलंच आहे तर जा, आणि त्यांना सांगा की त्यांच्या विचारधारेत कुठं काय चूक आहे ते!’ 

कदाचित इतकंच काय ते मुखर्जी करू शकतात. हिंदुत्वाची विचारधारा एक तिरस्करणीय विचारधारा आहे. त्यांच्या प्रमुख तीन मागण्या तर अतिशय नकारात्मक आहेत – रामजन्मभूमी (मुस्लिमांनी मस्जिदीची जागा सोडून द्यावी), समान नागरी कायदा (मुस्लिमांनी त्यांचा वैयक्तिक कायदा सोडावा), आणि ३७०वं कलम (काश्मीरच्या मुस्लिमांनी त्यांच्या संवैधानिक हक्कांवर पाणी सोडावं).

हिंदुत्वाकडे हिंदूंना देण्यासारखं सकारात्मक काहीही नाही, ही वास्तविकता आहे. काही असेल तर तुम्ही सांगा! इतक्या बहुसंख्येनं सत्तेत येऊनही त्यांनी काय केलं? तर गोहत्याबंदी आणि मुस्लिमांना त्याचं खाद्य बदलायला भाग पाडलं. देण्यासारखं त्यांच्याकडे आहेच काय? शून्य! 

पण समस्या ही आहे की, त्यांचं काय चुकतं, ते त्यांना सांगणं म्हणजे त्यांना हवं तिथंच म्हणजे अल्पसंख्याकांकडेच अंगुली निर्देश करणं होईल. ज्या एका भूमिकेवर संघ पाय रोवून उभा आहे, ती म्हणजे अल्पसंख्याकांकडून हिंदूंना धोका आहे आणि फक्त संघच त्यांना वाचवू शकतो ही. विद्यमान पंतप्रधानांनी त्यांच्या आत्मचरित्रात याच संघशिक्षा वर्गाचा उल्लेख केला आहे, ज्यात मुखर्जी जाताहेत, तो उल्लेख आहे एम. एस. गोळवलकरांच्या बाबतीत. पंतप्रधान लिहितात, “डॉ. हेडगेवार काही रात्र रात्र गुरुजींना देशाच्या स्थितीबद्दल सांगत बसले नाहीत, की हजारो वर्षांच्या गुलामीनंतर हिंदू संस्कृतीत काय वाईट शिरलं ते सांगितलं नाही... मी कधी कधी विचार करतो की डॉक्टरजींनी गुरुजींना एका रात्रीत हिंदुत्व शिकवलं असेल का? हिंदू समाजाच्या अवनतीच्या बारीक सारीक गोष्टींबद्दल सांगितलं असेल का?” 

हेच ते, हिंदूंच्या गुलामी आणि अवनतीचं कथन संघाचं अढळ कथन आहे. हिंदुत्वात अनेक गोष्टी येतात, ते जगण्या आणि तगण्याबद्दल आहे, हे जर मुखर्जी संघ आणि आपल्यालाही सांगू शकले तर बरं होईल. त्यातल्या अनेक गोष्टी स्वयंसेवकांना कधीच सांगितल्या गेल्या नसतील. 

संघासोबत संवाद साधण्यात वाईट काही नाही. खरं तर हे आहे की, पुरेसे लोक त्यांच्याशी संवादच करत नाहीत. मुखर्जींसारख्या अनेकांना त्यांनी बोलवावं आणि त्यांनी जावं, ही माझी इच्छा आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या माहितीचं वर्तुळ भेदून काही नवीन माहिती तरी त्यांच्यापर्यंत पोहचेल. त्यांना कळेल की, ते कोण आहेत आणि या देशात काय बिघडलं आहे.

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - प्रज्वला तट्टे. लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 06 June 2018

हे असलं काही वाचलं की जाम आनंद होतो. मोदींची २०१९ ची निश्चिती झाली म्हणून खात्री पटते. एकेक मुद्दे चर्चेला घेतो. १. >> यावर चिंतन करून त्यांनी एक अचूक निष्कर्ष काढला - या जगात ईश्वर नाही. >> काहीबाही बरळ आहे. बुद्धाने ईश्वरावर कसलंही भाष्य केलं नाही. त्याने स्वत:कडे बघून दु:खनिवारण कसं करायचं याचा मार्ग दाखवून दिला. २. >> त्यांच्या पूर्वजांच्या ईश्वरसंबंधीच्या सर्व मान्यतांना नाकारल्याबद्दल ते फक्त स्वीकारलेच गेले असं नाही, तर पूजलेदेखील गेले. >> परस्परविरोधी विधान आहे. जर ईश्वर नाही तर बुद्धांची पूजा करायची कशाला? बुद्धाची भगवान समजून पूजा करणे हे त्याच्या शिकवणुकीच्या विरुद्ध नव्हे काय? उगीच काहीतरी भोंगळ विधानं करून वाहवा मिळवायचा प्रयत्न आहे. ३. >> जरासंधाच्या शक्तीशाली सरदाराला कल्यावणला (जो काळा ग्रीक होता) गुंगारा देऊन कृष्ण पळाला >> हे प्रज्ज्वला तट्टे यांच्यासाठी. जरा भाषांतर करतांना महाभारताची पार्श्वभूमी समजावून घेत चला. कल्यावण नावाचं कोणीही पात्र महाभारतात नाही. हा जो राजा आहे तो कालयवन आहे. यवन म्हणजे आयोनियन ग्रीक ( Ionian Greek) असला तरी काल हा उपसर्ग काळेपणा दर्शवीत नाही. ४. >> त्रिशूल ललकारणाऱ्यांना ही गोष्ट समजणार नाही. त्यांच्यासाठी प्राणांची आहुती देणं महत्त्वाचं आहे, तेही दुसऱ्याच्या. >> अगदी बरोबर. शिवाजी महाराजांनी हेच शिकवलं. ५. >> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मराठी ब्राह्मणांना त्यांची राष्ट्रीयत्वाची प्रेरणा हिंदूंमध्ये नाही, तर इटलीत सापडली. सावरकरांच्या लिखाणावर मॅझिनी आणि गॅरिबाल्डीचा प्रभाव आहे, पाटीदारांचा नाही. >> विखुरलेल्या इटलीस एकसंध राष्ट्र बनवणं ज्यांना जमलं त्यांचाच आदर्श ठेवायचा असतो ना समोर ? राष्ट्र-राज्य संकल्पना युरोपीय प्रबोधानातला महत्त्वाचा टप्पा आहे. 'आम्ही एक राष्ट्र आहोत म्हणून आम्हांस आमचं स्वत:चं राज्य स्वत: चालवायला हवंय', हे तत्त्व सगळ्या युरोपीय लोकांनी अंमलात आणायचं. मग भारतानेच काय घोडं मारलंय? वर लेखक लवचिकपणाच्या बाता मारतो, तर मग हा लवचिकपणा भारताच्या बाबतीत का लागू करीत नाही लेखक? याला वैचारिक छचोरपणा (intellectual flirt) म्हणतात. ६. >> म्हणून खाकी चड्डी आणि काळी टोपी त्यांनी पेहराव म्हणून स्वीकारला, भारतीय सेनेचा ‘नसलेला’ सॅल्युट ते मारतात. >> हे विधान म्हणजे बावळटपणाचा कहर आहे. या गोष्टींचा भारताच्या राष्ट्रीयत्वाशी काडीमात्र संबंध नाही. ७. >> हिंदुत्वाची विचारधारा एक तिरस्करणीय विचारधारा आहे. >> लेखकासाठी हिंदू हा शब्दंच मुळातनं तिरस्करणीय आहे. ८. >> त्यांच्या प्रमुख तीन मागण्या तर अतिशय नकारात्मक आहेत – रामजन्मभूमी (मुस्लिमांनी मस्जिदीची जागा सोडून द्यावी), समान नागरी कायदा (मुस्लिमांनी त्यांचा वैयक्तिक कायदा सोडावा), आणि ३७०वं कलम (काश्मीरच्या मुस्लिमांनी त्यांच्या संवैधानिक हक्कांवर पाणी सोडावं). >> काय चुकीचं या तिन्हींत? रामजन्मभूमीवर उत्खनन होऊन तिथे जुन्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तिथं मशीद बांधणं हा इस्लामचा घोर अवमान नाही का? समान नागरी कायदा मुस्लिम भगिनींच्या हिताचा नाही का? आणि ३७० कलमाच्या नावाने नाचणाऱ्यांनो, काश्मीर भारताचा भाग आहे की नाही? लेखकाने थोडा लवचिकपणा दाखवायला हरकत नसावी या बाबतींत, नाहीका ? ९. >> हिंदुत्वाकडे हिंदूंना देण्यासारखं सकारात्मक काहीही नाही, ही वास्तविकता आहे. काही असेल तर तुम्ही सांगा! इतक्या बहुसंख्येनं सत्तेत येऊनही त्यांनी काय केलं? तर गोहत्याबंदी आणि मुस्लिमांना त्याचं खाद्य बदलायला भाग पाडलं. देण्यासारखं त्यांच्याकडे आहेच काय? शून्य! >> सदैव हिंदूंचा द्वेष करणारे आम्हांस शिकवतात की हिंदुत्वाकडे देण्यासारखं काहीच नाही. मग हिंदुनेस हा शब्द कशाला वापरता? गोळवलकर गुरुजींनी हिंदुत्वाचा अर्थ हिंदुइझम नसून हिंदुनेस आहे असं स्पष्ट प्रतिपादन केलं आहे. लेखकाने गोळवलकरांचं साहित्य वाचून यावं. नाहीतर असं तोंडघशी पडायला होईल. पण नेमक्या अशाच विधानांमुळे मोदींची २०१९ ची मोहीम फत्ते होणार आहे. तेव्हा लगे रहो. १०. >> ज्या एका भूमिकेवर संघ पाय रोवून उभा आहे, ती म्हणजे अल्पसंख्याकांकडून हिंदूंना धोका आहे आणि फक्त संघच त्यांना वाचवू शकतो ही. >> हे लेखकास कोणी सांगितलं ? लेखक मद्य ढोसून तर बसला नाही लिहायला ? ११. >> मी कधी कधी विचार करतो की डॉक्टरजींनी गुरुजींना एका रात्रीत हिंदुत्व शिकवलं असेल का? हिंदू समाजाच्या अवनतीच्या बारीक सारीक गोष्टींबद्दल सांगितलं असेल का?” >> लेखक काय बरळतोय याचं त्यालाच भान नाही. राष्ट्रविचारांच्या बाबतीत डॉक्टरजी (=हेडगेवार) हे गुरुजींना (= गोळवलकरांना) प्रमाण मानायचे. हिंदुराष्ट्राची गंगा उलटी वाहते आहे. लेखकाने कसलीही माहिती न करून घेता नुसत्या तोंडच्या वाफा दवडल्या आहेत. १२. >> हेच ते, हिंदूंच्या गुलामी आणि अवनतीचं कथन संघाचं अढळ कथन आहे. >> झिम्मीला सगळं जग त्याच्यासारखंच दिसतं. लेखक स्वत: झिम्मी आहे. म्हणून त्याने मुकाट्याने जिझिया भरावा हेच उत्तम. हिंदूंच्या गुलामीशी लुडबूड करू नये. ते धर्माभिमानी हिंदू बघून घेतील. १३. >> खरं तर हे आहे की, पुरेसे लोक त्यांच्याशी संवादच करत नाहीत. >> बोंबला तिच्यायला. एक संघाचा स्वयंसेवक दहाबारा वर्षं मुख्यमंत्रीपदी राहून सतत बदनामीचे दगड झेलतो व तरीही पंतप्रधान होतो. आणि म्हणे संघाशी पुरेसे लोकं संवाद साधीत नाहीत. जे कळायला पाहिजे ते छानपैकी कळतं नाहीका यातून ! -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......