अजूनकाही
मंग्या आणि गजा हे अट्टल चोर गावात येतात आणि सोने, देवाच्या मूर्त्या आणि पैसे चोरून पळतात. पण मध्यरात्री कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे जीव वाचवण्यासाठी ज्योतिषी केशव यांची सायकल चोरून घेऊन जातात. आणि सुरू होतो भन्नाट प्रवास... हे चोर आणि सदगृहस्थ हे चित्रपटातील मुख्य कलाकार जरी असले तरी आकर्षक, इंग्रजांच्या काळातील आणि चपळ सायकलच निर्विवादपणे या चित्रपटातील मुख्य पात्र आहे. प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम, हृषिकेश जोशी आणि चिमुकली मैथिली पटवर्धन यांच्या सुंदर अभिनयानं सजलेली ही चित्रकृती म्हणजे ‘सायकल’.
कुणी म्हणतं, हा चित्रपट म्हणजे केशव या ज्योतिषाच्या मनमिळावू आणि लोकांना मदत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी आहे. कुणी म्हणतं, चोरांना सायकल चोरी झाल्यावर आणि केशवच्या लोकांना सढळ हातानं मदत करणाऱ्या स्वभावाबद्दल कळल्यावर पश्चातबुद्धीनं सायकल एका ठिकाणी परत करताना घडलेल्या आत्मपरीक्षणाबद्दल आहे. तर कुणी म्हणतं की, हा चित्रपट सायकल चालवणाऱ्या केशवबद्दलचा कृतज्ञता सोहळा आहे. या सर्व भावना योग्य आहेत. त्याही पलीकडे केशवची मुलगी या चित्रपटामध्ये काही प्रश्न विचारते- ते सायकलच्या पात्राइतकेच प्रागतिक आहेत. सायकल चोरीला गेल्यावर लहानगी मुलगी ज्योतिषी बाबांना म्हणते, “तुम्ही जसे लोकांना सांगता ना त्यांच्या आयुष्यात उद्या काय घडेल ते, तसेच तुम्ही सांगा ना की तुमची सायकल कुठे गेली आहे?” ज्योतिषावर जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा त्याला त्याची ज्योतिषविद्या कशी उपयोगाला येत नाही, हे या चाणाक्ष निरीक्षणावरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आता वळूया ‘सायकल’च्या मुख्य कथानकाकडे. आजोबा त्यांच्या नातवाला म्हणजेच केशवला ब्रिटिशकालीन सायकल भेट देतात. तेव्हा सायकल ही ऐतिहासिक आठवणींची प्रतीक झाली आहे. याबद्दल त्यांच्या मनात व गावात एक अप्रूपच बनून राहिलेलं असतं. सायकल खरंच कालबाह्य झाली आहे का? केशवच्या आयुष्याकडे पाहिलं असता हे जाणवतं की—हे खरं नाही. जरी चित्रपटात भूतकाळातील कोकणात ही घटना घडत असेल, तरी आपल्या आसपास बऱ्याच वेळेस केशवसारख्या लोकांना आपण पाहत असतो. ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सायकलच्या आधारे आपली जीवनकथा हळूहळू पुढे रेटत असतात... प्रामाणिक कष्टाच्या सहाऱ्यानं...
काही वर्षांपूर्वी सायकल भाड्यानं मिळायची सोय होती. तासाला एक रुपये याप्रमाणे ती मिळायची. गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी आणि अगदी मोठ्या शहरांमध्येसुद्धा सायकल भाड्यानं देणारी दुकानं दिसायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये शहरांचा, तालुक्यांचा वाढत चाललेला आकार आणि दुचाकीवर वाढत चाललेलं अवलंबित्व यामुळे सायकलींमध्ये मोठी घट झाली. जुन्या काळात कामासाठी, शिक्षणासाठी आणि दैनंदिन कामासाठी जाण्याची ठिकाणं मर्यादित अंतरावर आणि जवळची होती. त्यामुळे सायकल एक गतिमान पर्याय मानला जात असे. आता मात्र सायकल हे रस्त्यावर एक हळू जाणारं आणि कोणत्याही सुविधा व सुरक्षितता नसणारं एक वाहन झालं आहे. त्याला जोड मिळाली लहान-मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या पीछेहाटीची आणि रस्ते-सुरक्षेअभावी दरवर्षी मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची.
ही परिस्थिती बदलण्यासाठी बरेचसे अनुकूल बदल आजकाल घडत आहेत. इंधनाचे वाढते दर हा त्यातील एक महत्त्वाचा धक्का. जो अप्रत्यक्षपणे सायकलबद्दल जुने प्रेम परत उफाळून यायला अंशतः कारणीभूत आहे. स्पर्धात्मक-धकाधकीच्या जीवनामध्ये डायबिटीस-हृदयरोग-लठ्ठपणा या रोगांचा संसर्गजन्य रोगांसारखा होणारा प्रसार, हा अनेकांना भंडावून सोडत आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेल्या आणि त्याप्रमाणे नवनवीन सुविधांसह नवीन सायकली आज बाजारात येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था सामाजिक विषयावर किंवा एका विषयावर मानवी संवेदना जागवण्यासाठी सायकल रॅलीचा प्रयोग करत आहेत. त्याद्वारे या विषयावर लोकांना एक प्रकारे अधिकाधिक सायकल चालवण्यासाठी उद्युक्त केलं जात आहे. नव-मध्यमवर्ग असेल किंवा आधुनिक सेवा-संगणक-संवाद माध्यमं या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलांना (व मुलींनासुद्धा) व्यस्त अशा कार्यालयीन वेळातून बाहेर पडल्यावर जिम व सायकल हा एक योग्य पर्याय वाटतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रोफेशनल्सला तर सायकल ही विशेष करून आकर्षित करते. कारण संगणकीय व्यवस्थेवर सलग तासनतास काम करणं आरोग्यास हानीकारक आहे, याची बऱ्यापैकी जाणीव व्यावसायिकांना झाली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील लोक आरोग्याच्या बाबतीत ‘देर आये पर दुरुस्त आये’ या भावनेनं आता सायकलकडे वळत आहेत. यात काही आश्चर्य नाही.
अलीकडे देशभरामध्ये केंद्र सरकारनं काही शहरांसाठी ‘स्मार्ट सिटी मिशन’ची घोषणा केली. त्याअंतर्गत काही निवडक शहरांमध्ये सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवा सुरू केल्या गेल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरानं आघाडी घेतली आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटी या दोन्ही संस्थांच्या आता स्वत:च्या सायकल योजना आहेत. त्यामध्ये महापालिका व स्मार्ट सिटी यांनी खाजगी सेवा-पुरवठादाराकडून आधुनिक सायकल्स घेऊन ही सेवा नागरिकांना अल्प दरामध्ये देण्याची सुरुवात केली आहे. या प्रकारच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या आयुष्यातील भूतकाळामध्ये आठवणींमध्ये लपून बसलेली सायकल आता या प्रकारच्या योजनांमुळे पुन्हा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
पुणे शहरामध्ये झालेल्या विविध प्रयोगांचा आणि आगामी काळात होऊ घातलेल्या नवीन घडामोडींचा अंदाज घेतला तर असं दिसून येतं की, आता ‘सार्वजनिक वाहतूक सेवांतील सुधार’ या महत्त्वाच्या विषयाबरोबर सायकल सेवांचा विस्तार हा पुढील काळात महत्त्वाचा मुद्दा बनेल आणि नागरी व विशेषता: सार्वजनिक वाहतूक सेवा माफक दरामध्ये पुरवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल पडण्याची शक्यता आहे.
१२ जून १८१७ रोजी म्हणजे २०० वर्षांपूर्वीच्या काळामध्ये कार्ल ड्रेस सॉवरब्रॉन या जर्मन वनअधिकाऱ्यानं पहिल्यांदा सायकलच्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर तिच्यामध्ये डिझाईन व तंत्रज्ञानाच्या पातळीवर असंख्य बदल होत होत आज आपल्यासमोर आधुनिक सायकलचा अवतार उभा आहे. लहान मुलांसाठी विरंगुळा, कामगारांसाठी-कष्टकऱ्यांसाठी अल्पदरातील वाहतुकीचं साधन, शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी खेळकर सोबती, भटक्यांसाठी जिवलग साथीदार, ताकदपूर्ण आरोग्य कमावणाऱ्या महत्त्वाकांक्षी लोकांसाठी एक आरामदायक मार्ग, अशी सायकलीची अनेक रूपं सांगता येतील.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सायकलचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण-वातावरण बदल आणि वाहतुकीची कोंडी, तसंच मधुमेह-हृदयरोग यांच्या भस्मासुरानं सर्वच देशांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. निरंतर-शाश्वत विकास या मार्गावरील गाठायचे लांब पल्ल्याचे ध्येय आणि त्या दृष्टीनं दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनत चाललेली परिस्थिती, यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय सायकलकडे आशेनं पाहत आहे.
एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं याविषयी एक प्रस्ताव पारित केला. याचाच भाग म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जगातील ‘पहिला जागतिक सायकल दिन’ साजरा करण्याचं ठरवलं. या वर्षीपासून दरवर्षी ३ जून रोजी हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. काय आहे यामागचा धोरणात्मक आणि दूरदृष्टीचा विचार? संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलेली काही कारणं-
- सायकल हे अतिशय सोपं, स्वस्त, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असं वाहतुकीचं शाश्वत माध्यम आहे.
- सायकल हे फक्त वाहतुकीचं एक साधन नाही, तर विकासाचं एक माध्यम बनू शकतं. त्यामुळे आरोग्य, शिक्षण तसंच खेळाला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका सायकलतर्फे अदा केली जाऊ शकते.
- सायकल वापरकर्ता आणि सायकल यांच्या सामूहिक कल्पकशक्तीमुळे नवसर्जनाला प्रोत्साहन मिळतं. सायकलस्वाराला स्थानिक परिसर, वातावरणाचं व भवतालाचं भान वाढतं.
- सायकल हे शाश्वत वाहतुकीचं प्रतीक आहे. त्यातून पुढील पिढीला एक सकारात्मक संदेश मिळतो. सायकलीमुळे उत्पादन, उपभोगवादी संस्कृती, तसंच पर्यावरणासाठी हानिकारक व्यवस्थांचं नियंत्रण होतं.
- हा विचार फक्त सायकलमुळे मिळणाऱ्या काही स्वाभाविक फायद्यांमुळे केला गेलेला नाही तर देशाच्या, समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या दूरगामी नियोजनामध्ये सायकलचा सहभाग असायला हवा असे संयुक्त राष्ट्रसंघाचे आग्रही प्रतिपादन आहे. त्यांच्या याच धोरणाच्या मसुद्यात पुढे म्हणले आहे की:
- या दिनामुळे सदस्य देशांना त्यांच्या विकास धोरणामध्ये याचा अंगीकार करता येईल आणि त्यांच्या प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकास-सहकार्य कार्यक्रमांमध्ये याला अग्रक्रम देता येईल.
- या दिनामुळे सदस्य देशांना त्यांच्या अंतर्भागातील रस्ते-सुरक्षा, तसंच पादचारी व सायकलस्वार सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांना महत्त्व देऊन सार्वजनिक आरोग्याला अग्रक्रम देण्यासाठी प्रोत्साहन देता येईल.
- या दिनाद्वारे सदस्य देशांना त्यांच्या भावी पिढ्यांसाठी शारीरिक शिक्षण, तसंच सहिष्णुता-परस्पर सदभाव-सर्वसमावेशकता या मूल्यांची पेरणी करण्याच्या दृष्टीनं भविष्याची आखणी करणं सुलभ होईल.
सायकलचा विषय फक्त प्रदूषणापासून मुक्त करणारं एक स्वस्त वाहन एवढा मर्यादित नाही. सायकल आपल्याला एक जीवनदृष्टी देते. त्याचा एक नमुना म्हणून तरुण कथाकार प्रणव सखदेव यांनी अलीकडेच लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टचं उदाहरण देता येईल. ते म्हणतात, “…सायकल हे जरी वैयक्तिक वाहन असलं, तरी तिच्याबाबतीत दुचाकीसारखं होत नाही. कारण मुळात सायकलचा वेग मर्यादित असतो, अगदी गिअरची अत्याधुनिक सायकल असली तरी. आणि या मर्यादित वेगामुळे आजूबाजूच्या जगाचा व आपला संपर्क तुटून जात नाही. येणारी-जाणारी माणसं, त्यांचे चेहरे, लकबी दिसतात. दुकानांच्या पाट्या वाचता येतात. एवढंच नाही, तर सायकल चालवताना गप्पा मारतही जाता येतं. सायकल चालवताना व्यायाम होऊन घाम येत असल्यामं छानही वाटतं. दुचाकीच्या बाबतीत मात्र तसं घडत नाही, उलट वेगाची धुंदी मेंदूला बधिर करते. दुचाकी काय किंवा चारचाकी काय - वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या वाहनांना टाळता येणार नाही. पण शक्य असेल तेव्हा सायकल वापरल्यास पर्यावरणाच्या दृष्टीनं, आणि आपल्या मानसिक-शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकतं.”
एकविसाव्या शतकातील सायकलच्या पुनरागमनाचं स्वागत करू या. कालच, ३ जूनला, पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा झाला आणि उद्या आहे, ५ जून, जागतिक पर्यावरण दिन. सामूहिक जाणिवेची आणि जबाबदार विकासाची नवी दृष्टी देण्याचं भान सायकलच्या माध्यमातून तुम्हीआम्हीआपणसगळ्यांनाच येवो.
............................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Tue , 05 June 2018