फिडेलला नैसर्गिक मरण आले!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • फिडेल कॅस्ट्रो (१३ ऑगस्ट १९२६ ते २५ नोव्हेंबर २०१६)
  • Sun , 27 November 2016
  • संपादकीय editorial फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro चे गव्हेरा Che Guevara क्युबा Cuba

महाराष्ट्रातील मुस्लीम विचारवंत हमीद दलवाई यांचे ३ मे १९७७ रोजी निधन झाले. १९७८मध्ये त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने लोकविलक्षण विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी दलवाई यांच्याविषयी लिहिताना म्हटले होते की, “दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेत. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मे व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!”

फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबतीतही या दोन्ही आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत. खरेतर यापेक्षाही कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी फिडेलच्या उण्यापुऱ्या ९० वर्षांच्या आयुष्यात घडल्या आहेत. जिवंतपणीच एक दंतकथा झालेला फिडेल आणि त्याचा अल्पायुषी साथीदार चे गव्हेरा हे जगभरच्या तरुणांच्या आदर्श होते, आहेत आणि यापुढेही राहतील.

फिडेलचे क्युबा हे साखरेचे आगर. हे उसाच्या शेताने सळसळणारे छोटेसे बेट १४९३मध्ये स्पेनने जिंकले. पुढची ४०० वर्षे स्पेनची क्युबावर सत्ता होती. १८६८पासून स्पॅनिश सरकारविरुद्ध चळवळी व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला स्पेनला फूस देणाऱ्या अमेरिकेने १८९८मध्ये स्पेनच्या पराभवाचे नाटक करून आपला क्युबावर अमल प्रस्थापित केला. त्यानंतर क्युबामध्ये निवडणुका होत, पण सत्तेवर येत ते अमेरिकेच्या तालावर नाचणारे हुकूमशहा. क्युबाचे सर्व बाजूंनी शोषण करायचे एवढे एकच धोरण अमेरिकेचे होते.

लहानपणापासूनच बंडखोर असलेल्या फिडेलने २६ जुलै १९५३ रोजी क्युबाचा हुकूमशहा फुल्जेन्शो बाटिस्टा याच्या लष्करी राजवटीविरुद्ध पहिले बंड पुकारले. पण ते अपयशी ठरले. फिडेल आणि त्याचे साथीदार पकडले गेले. पण या घटनेने क्युबातील जनतेचा मनात आशा पल्लवित झाल्या, तसेच दक्षिण अमेरिकेतील जुलमी राजवटींना उलथून टाकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक क्रांतिकारकांना बळ मिळाले. क्युबामध्ये आणि लॅटिन अमेरिकेत फिडेलच्या या अयशस्वी बंडाचेही मोठ्या प्रमाणावर गौरवीकरण झाले. त्यानंतर फिडेलचे अजून दोन प्रयत्न अपयशी ठरले. पण हार मानणे त्याच्या रक्तातच नव्हते.

विलक्षण व्यक्तिमत्त्व, कल्पनातीत धैर्य, मजबूत बांधा, यांचे एक अदभुत म्हणावे असे रसायन फिडेलकडे होते. तरुण त्याच्याकडे लगेच आकर्षित होत. फिडेल होताही तसाच. अत्यंत निराशेच्या काळातही आपल्या आदर्शावरील त्याची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. अपयशनानंतरही आपल्या सहकाऱ्यांचे तो विलक्षण वेगाने मनोबल वाढवत असे. त्यामुळे त्याचे सुरुवातीपासूनचे अनुयायी कायम त्याच्याबरोबर राहिले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर फिडेलचा भाऊ, राउलने त्याची चे गव्हेराशी ओळख करून दिली. नंतरचा संघर्ष त्या दोघांनी केला. पाच वर्षं, सहा महिने आणि सात दिवसांच्या गनिमी काव्याने केलेल्या संघर्षानंतर फिडेलला अखेर यश मिळाले.

जानेवारी १९५९मध्ये फिडेलकडे क्युबाची सत्ता आली. फिडेलने क्युबाचा लष्करी हुकूमशहा बाटिस्टाला अमेरिकेत पळवून लावले. त्याची हुकूमशाही नष्ट केली. मात्र अमेरिकी भांडवलदारांचे क्युबामध्ये हितसंबंध दडलेले होते. फिडेल कम्युनिस्ट नसला तरी विचाराने जहाल होता. ते अमेरिकेला परवडणारे नव्हते. त्यामुळे अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये परस्पर संशय आणि अविश्वास निर्माण होत गेला. फिडेलच्या विजयानंतर तर परिस्थिती आणखीणच बिघडत गेली. फिडेलने क्रांती केली तेव्हा तो वा त्याचे सहकारी कम्युनिस्ट नव्हते. क्युबात तेव्हाही कम्युनिस्ट पक्ष होता. पण त्याने फिडेलपासून सुरुवातीला चार हात लांब राहणेच पसंत केले होते. नंतर त्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. फिडेलनेही अमेरिकेशी संघर्ष करता यावा म्हणून चाणाक्षपणे स्वत:ला मार्क्सवादी म्हणून घेतले. १९६१मध्ये फिडेलने ‘मी मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आहे आणि मरेपर्यंत तसाच राहील’ असे जाहीर केले. रशियाची मदत मिळवली. (नंतर स्वत:च्या संघटनेचे मार्क्सवादी पक्षात रूपांतर केले.) तो शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिका आणि रशिया एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात अमेरिकेच्या नाकाखाली असलेल्या क्युबावर फिडेलने आपला अमल बसवला. आपण माक्सर्ववादी असल्याचे जाहीर केले, तेव्हा रशियानेही ती संधी दवडली नाही. तिला अमेरिकेला शह देण्यासाठी एक तगडे कारण आणि तगडा साथीदार मिळाला. अमेरिकेने फिडेला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. अमेरिकेची गुप्तचर संस्था आणि फिडेलच्या विरोधकांनी त्याला मारण्याचे तब्बल ६००हून अधिक प्रयत्न केले. तरीही त्यातल्या कुठल्याही प्रयत्नाला कधीही यश आले नाही. फिडेल शेवटपर्यंत अमेरिकेला पुरून उरला. क्युबाची जनता कायम फिडेलच्या पाठीशी राहिली. ४५ वर्षांच्या कारकीर्दीत फिडेलने ११ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांशी संघर्ष केला. त्यांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा सामना केला.

फिडेल १९५९ साली सत्ता हाती घेतली, ती २००८ साली स्वत:हून भाऊ, राउलकडे सोपवली. याच वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाला भेट देऊन त्यावरील निर्बंध काढून टाकले. आता फिडेलच्या क्युबाचा प्रवासही इतर देशांसारखाच भांडवलशाही मार्गाने होणे क्रमप्राप्त आहे. खरे म्हणजे नव्वदच्या दशकानंतरच संबंध जग जागतिकीकरणाच्या लाटेत खेचले गेले. त्यात क्युबाही होताच. त्यामुळे आजचा क्युबा आणि फिडेलचा क्युबा यांत फरक असणारच. पण आजचा, उद्याचा, परवाचा क्युबा फिडेलचा वारसा सांगत राहील. फिडेल केवळ क्युबामध्ये क्रांती करून, सत्ता हस्तगत करून शांत बसला नाही. त्याने क्युबाला स्वयंपूर्ण केले. त्याचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करत नेले. साखर, वैद्यकीय सेवा या क्षेत्रात आज फिडेलचा क्युबा जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. दूध उत्पादनातही क्युबाने मोठी मजल मारली आहे.

फिडेल तरुणांच्या दृष्टीने तसा कधीच म्हातारा झाला नाही. मार्क्सवादाबद्दल काहीही माहीत नसताना जगभरच्या तरुणांच्या टीशर्टवर तो आणि चे गव्हेरा झळकत असतात. आता जगात मार्क्सवादाला फारसे भविष्य राहिलेले नाही. तसे हुकूमशाहीलाही नाही. पण अजूनही उत्तर कोरियासारख्या देशांमध्ये जुलमी राजवटी शिल्लक आहेत. त्या आहेत तोवर फिडेल तेथील तरुणांचे प्रेरणास्थान राहील. त्याचे विलक्षण व्यक्तिमत्त्व तरुणांवर प्रभाव पाडत राहिल. फिडेलला आलेले नैसर्गिक मरण आणि त्याला मिळालेले जिवाभावाचे अनुयायी, हे त्याचे सर्वांत मोठे बलस्थान होते. ते ज्यांना या पुढच्या काळात मिळेल, त्यांना फिडेलसारखी चिरस्मरणीय कामगिरी नक्की करता येईल!

editor@aksharnama.com 

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sun , 27 November 2016

उत्कृष्ट व अत्यंत माहितीपूर्ण!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......