अजूनकाही
२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा तेविसावा लेख. (मे २०१८मध्ये काही कारणास्तव या सदरातला लेख प्रकाशित होऊ शकला नाही. म्हणून यावेळी दोन लेख प्रकाशित करतो आहोत.)
.............................................................................................................................................
१. गांधीवाद किंवा गांधीमार्ग असे ज्याला संबोधिले जाते त्याचा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनमानसावर खरोखरीच काही प्रभाव पडला होता काय? स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये त्या प्रभावाचा भाग किती होता?
- स्वातंत्र्यापूर्वी गांधीवादाचा प्रभाव लोकांवर पडला होता; पण पूर्णतया नाही, तर १९१७ मध्ये मार्क्सवादाचा रशियातील जनतेवर वा १९४९ मध्ये मार्क्सवादाचा चीनी लोकांवर जितका होता तेवढाच. जो असंतोष लोकमान्यांनी १९१६ पर्यंत भारतात निर्माण केला, त्याला वाट सापडण्याची आवश्यकता होती. धोपट मार्ग दोन होते. एक असंतोषाची धग कमी होता होता अॅनी बेझंट यांच्या किंवा गोखल्यांच्या मार्गावर येणे किंवा शस्त्राचारी क्रांतीची वाट धरणे. यांपैकी कोणत्याही मार्गाने राष्ट्रीय चळवळ पुढे गेली असती तर गांधीजींच्या नेतृत्वामुळे ज्या व्यापक प्रमाणावर जनता तिच्यात गोवली गेली ते झाले नसते. केवळ बुद्धिवादी वा केवळ हिंसावादी लढ्यांत बहुजन खर्या अर्थाने भाग घेऊ शकत नाहीत. गांधीजींनी जो तिसरा मार्ग दाखवला, त्यामुळे मागासलेले वर्ग, कष्टकरी वर्ग, संस्थानिक प्रजाजन, स्त्रीवर्ग यांच्यापर्यंत चळवळ पोहोचली. नि:शस्त्र जनतेला एक नवा मार्ग गांधीजींनी दाखवला व त्यामुळे भारतात लोकशाहीला पोषक भूमी तयार झाली.
भारताला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ गांधीजींच्या ‘छोडो भारत’च्या लढ्याने मिळाले नाही. अनेक विचारप्रवाह व कृतिप्रवाह स्वातंत्र्याला कारणीभूत झाले. सुभाषबाबूंच्या कार्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांचा सेनेवरील विेशास डळमळला. ब्रिटनमध्ये भारताविषयी जरा अधिक आस्था असलेला मजूर पक्ष अधिकारावर रूढ झाला इत्यादी, तथापि गांधीजींच्या आंदोलनाचा प्रभाव मान्य केलाच पाहिजे.
२. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची काय स्थिती आहे? ती तशी का आहे?
- स्वातंत्र्यानंतर म्हणजे सत्ताप्राप्तीनंतर भारतासमोर जे प्रश्न निर्माण झाले, त्यांचे स्वरूप स्वातंत्र्यासाठी जी चळवळ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली होती, तिने हाताळलेल्या प्रश्नांहून फार वेगळे होते. त्याबद्दलचा फारसा खोलवर विचार राष्ट्रीय चळवळीने केलेला नव्हता. उदाहरणार्थ, संघराज्याची घडण, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, देशाचे औद्योगिकीकरण व रक्षण. गांधीवादाने त्याबाबत काही नेमके म्हटलेले नव्हते. गांधीवादाचा नव्या प्रश्नानुसार विकास करण्याचे शहाणपण वा सामर्थ्यही कोणी दाखवले नाही. परिणामत: गांधीवाद म्हणजे खादी वापरणे, या समीकरणापर्यंत त्याची अधोगती झाली.
३. गांधी-तत्त्वज्ञानामध्ये अशी कोणती तत्त्वे होती, ज्यांना आपण चिरकाल टिकणारी अशी अमर तत्त्वे म्हणू शकतो? त्या तत्त्वांचे दर्शन भारतामध्ये सध्या आपल्याला घडते काय? नसल्यास त्यांची कारणे कोणती?
- असत्याशी अथवा अनैतिकतेशी असहकार, अन्यायाला अहिंसात्मक विरोध, उपभोगलालसेवर मर्यादा ही गांधीजींच्या शिकवणुकीतील अमर तत्त्वे आहेत, असे माझे मत आहे. देशाच्या रक्षणाची समस्या गांधी दर्शनानुसार सोडवता येईल असे मला वाटत नाही. पण शस्त्रांची संहारशक्ती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंसात्यागावाचून पुढे पाऊल उचलता येईल असे मला वाटत नाही. ही परिस्थिती कशी निर्माण करता येईल त्याचे स्पष्ट दर्शन मला या घडीला झालेले नाही. सामर्थ्यसंपन्न देशाकडूनच प्रारंभ व्हावयास हवा असे मात्र वाटते.
वर नमूद केलेल्या तत्त्वांचे दर्शन भारतात सध्या होत नाही, याचे कारण सत्ता व संपत्ती याबाबत आपली दीर्घकाळपर्यंत उपासमार झालेली होती. विषमातून मुक्त झालेला रोगी खा खा करतो, तसे आपले झाले आहे. लोकसत्तेुळे दडपलेल्यांना, क्षुधितांना (भुकेलेल्यांना) सत्तेवर येण्याची संधी मिळाली. त्यांचे पोट भरेपर्यंत थांबावे लागले. यात अस्वाभाविक काही नाही. याचा असाही अर्थ होतो की, जे स्वत:ला गांधींचे अनुयायी म्हणवत, त्यांपैकी बहुतांश क्षुधितच होते व त्यांनी गांधीमार्गाचा केवळ एक सत्ताप्राप्तीचे साधन म्हणून स्वीकार व वापर केला होता.
४. जागतिक राजकारण आणि समाजकारण यांच्या संदर्भात गांधीवादाचे स्थान काय? गांधीवादापासून जगाला काही स्फूर्ती प्रेरणा मिळू शकेल काय?
- गांधीवादाचा प्रचार व आचार यानंतर भौतिकदृष्ट्या तृप्त व समृद्ध राष्ट्रांमधील मागास गटातून, त्याचप्रमाणे सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या गटातून भारतापेक्षा अधिक प्रमाणात होण्याचा संभव आहे. तेथे माणूस उपभोगांचा भोक्ता होण्याऐवजी तो भोगांचे भक्ष्य बनत आहे. शत्रुसंहारक शस्त्रे सगळ्यांचाच संहार करतील अशी भीती तेथे निर्माण झालेली आहे. म्हणून राष्ट्रीय सार्वभौमत्व, सत्ता व उपभोग यांबद्दलची ज्यांची सुरसुरी संपलेली नाही, अशा भारतासारख्या नवमुक्त राष्ट्रांपैकी त्या राष्ट्राची भूमिका गांधीवादाला पोषक ठरण्याचा संभव अधिक.
५. आधुनिक काळाच्या संदर्भात गांधीजींचे विचार व आचार कितपत ग्राह्य ठरतील? त्यांच्या विचारातील कोणता भाग कालबाह्य आहे व कोणता अजूनही स्वीकारार्ह आहे?
६. आज भारतासमोर व जगासमोर ज्या गंभीर समस्या उभ्या आहेत त्यांची उकल करण्याचे सामर्थ्य गांधीमार्गात आहे काय? असल्यास कोणत्या प्रकारे तो ती उकल करू शकेल?
- या प्रश्नांचे उत्तर आधीच्या प्रश्नांच्या उत्तरात येऊन गेलेले आहे असे वाटते. तथापि मी एवढे म्हणेन की, गांधीवादाचे आपण कोणी राखणदार अथवा मुखत्यार आहोत असे मानून भारताने चालू नये. इतर राष्ट्रांच्या समवेत सुखी, शोषणरहित व भयमुक्त समाजाकडे चालणारे आपण पथिक आहोत, या विनम्र भावनेने भारताने चालावे. त्याचप्रमाणे गांधीजींचे विचार ज्यावेळी बनले, त्यावेळी मानवाच्या हाती जी उत्पादनसाधने होती त्यांच्यात अभूतपूर्व बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन खादी, स्वावलंबी ग्रामव्यवस्था इत्यादींमध्ये काय बदल करावा लागेल त्याचाही भारताने विचार करावा. तसेच राजकारण व राजकीय सत्ता ही समाजाची नित्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन त्याला अपवित्र मानण्याची कल्पना सोडून द्यावी.
(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातून साभार.)
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 03 June 2018
लेखाशी बऱ्यापैकी सहमत. गांधीवाद म्हणजे खादी वापरणे इतपतच लोकांचं आकलन राहिलं. याला कारण खुद्द गांधीच आहेत. जेव्हा नवजात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं तेव्हा हेच गांधी शत्रूला ५५ कोटी रुपये द्यायचा हेका धरून बसले. एकतर फाळणीच्या जखमा होत्या, वर गांधींनी टेररिस्ट फायनान्सिंगचं मीठ चोळलं. मग भडका उडेल नाही तर काय! साहजिकंच गांधीवाद म्हणजे आतंकवादास खतपाणी अशी समजूत झाली. गांधीवादामुळे भारताचं आणि हिंदूंचं भयानक नुकसान झालं आहे. तो त्यागणं इष्टं. -गामा पैलवान