अजूनकाही
परिवर्तन, क्रांती, आमूलाग्र बदल या संकल्पनांबद्दल गैरसमज निर्माण व्हावा इतपत वैचारिक दारिद्र्य भासणाऱ्या प्रवाहात जे काही विधायक म्हणून समोर येते, ते किती भ्रामक असते, हे सशक्त जनलोकपाल विधेयकासाठी झालेल्या जनआंदोलनाने सिद्ध केलेले आहे. या भ्रामक आदर्शवादाचा फुगा फुटल्यानंतरही त्यातील कर्तेधर्ते आपला दांभिक साधनशुचितेचा आभास सोडायला तयार नाहीत. आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताज्या विधानाने या भाबड्या आशावादाचे पोकळ बुडबुडे अस्तित्वात असल्याची पुन:प्रचीती येत आहे.
महाराष्ट्रापुरतेच सीमित अण्णा हजारेंच्या प्रतिमेचे रजनीकांत स्टाईल फिल्मी उदात्तीकरण करून सत्तेप्रत जाण्याचा मार्ग साध्य केलेल्या सर्वांनाच या भ्रामकतेचे श्रेय देता येत असले तरी पारदर्शक व स्वच्छ कारभार या काल्पनिक स्वप्नांद्वारे आशावाद निर्माण करण्याचे तंत्र अवगत असलेले अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार अधिक महत्त्वाचा होता. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर निशाणा साधताना केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भलामन करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला आहे, तो अधिक हास्यास्पद ठरत आहे. कारण मुळात अर्थशास्त्राचे जाणकार असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना ही भलामन संस्कृती फारशी रुचणारी नाही अन् केजरीवाल यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अशिक्षित’ म्हटल्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेईल, याची सुतराम शक्यता नाही.
आपली आजवरील उथळ राजकीय वाटचाल यापुढेही निरंतर सुरू राहील, असा संदेश केजरीवाल यांना आपल्या घटत चाललेल्या अनुयायांना द्यायचा असेल तरच त्यांच्या या विधानाचे समर्थन करता येणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे, राजकीय प्रवासाकडे कोणी गांभीर्याने पाहू नये, हा त्यांचा अट्टाहास निश्चितपणे पूर्ण होणार आहे. वादग्रस्त, स्फोटक विधाने करून केवळ तात्पुरती खळबळ माजवता येते, हे त्यांना वारंवार अनुभवास आलेले आहे. या खळबळजनक विधानांमुळे निर्माण झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी द्याव्या लागलेल्या माफीनाम्यांमुळे तेवढीच खळबळ माजेल, हा आडाखा मात्र साफ चुकला आहे. उलट आपण केजरीवाल यांची साधनशुचिता ओळखण्यात कसलीच चूक केलेली नाही, या सर्वसामान्य जनतेच्या नकारात्मक प्रतिमेवर या माफीनाम्यांमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
आता यानंतर तरी केजरीवाल आपला ट्रॅक बदलतील, अशी अपेक्षा असणाऱ्यांना निराश करत त्यांची गाडी त्याच मार्गाने तुफान दौडत चालली आहे. ना कसले धोरणसातत्य ना डोळ्यात भरेल असे विधायक काम, राजकारणातील वास्तववाद स्वीकारण्यातील उमदेपणाचा अभाव आणि या तिन्हींमुळे निर्माण झालेली हास्यास्पद प्रतिमा या चारच मुद्यांच्या आधारे 'आप' आणखी किती काळ सर्वसामान्य जनतेचे मनोरंजन करणार आहे? प्रारंभीच्या काळात भाबड्या स्वप्नांद्वारे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर आपणही केवळ सत्ताकांक्षीच असल्याचा संदेश देऊन मोकळे झालेल्या केजरीवाल यांनी धोरणात सातत्य राखायला हवे होते. सत्ताकांक्षापूर्तीनंतर विकासवादाचा मुखवटा चढवतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी एकाचवेळी सत्ता व साधनशुचितेचा टेंभा या दोन्ही डगरींवर हात ठेवल्यामुळे त्यांना ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ या वास्तवाला सामोरे जावे लागलेले आहे.
आजवर अनेक प्रसंगी निश्चित अशी भूमिका घेण्याची संधी मिळूनही ती न साधता आलेल्या आम आदमी पक्षाचे वर्तन देशभरात विनोदाचा विषय बनला. विकासाच्या ज्या काही संकल्पना हा पक्ष सांगत राहिला, त्या विकासाची फळे दिल्लीकरांनाही चाखायला मिळालेली नाहीत. धरसोड वृत्तीमुळे राष्ट्रीय राजकारणात कोणी गांभीर्याने पहात नाही आणि दिल्लीकरांच्या किमान अपेक्षा पूर्ण न करता आलेल्या केजरीवाल यांना आपले स्वत:चे असे प्रभावक्षेत्रही अस्तित्वात राहिलेले नाही, हे वास्तव कधीतरी ध्यानात घ्यायलाच लागेल.
मनमोहन यांची स्तुती करताना केजरीवाल, मनमोहन सिंग सत्तेवर असताना आपण केलेल्या टीकेकडे, दोषारोपांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत. दिल्लीत काँग्रेसची सत्ता असताना, आपल्याला काम करू दिले जात नाही, हे रडगाणे केजरीवाल यांनी मोदी आल्यावरही कायम ठेवलेले आहे. मग आता अचानक त्यांना राजकीय नेतृत्वाच्या शैक्षणिक अर्हतेचा उमाळा कशासाठी आला असावा?
जनतेबद्दलचा कळवळा हा निकष त्यांना महत्त्वाचा वाटत नसावा. प्रचंड अभ्यासू, विद्वान मुख्यमंत्री लाभूनही पिण्याचे पाणी, सुरळीत विद्युत पुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य या किमान सुविधांपासून वंचित दिल्लीकरांचा टाहो त्यांना का ऐकू येत नाही?
एकाच वेळी सर्वांशी वैर घेण्याची हौस भागवताना हातचा राखून ठेवावा लागतो, ही गोष्टही ‘आप’कडून पाळली गेलेली नाही. जनतेचा अपेक्षाभंग, अपयशाचे खापर इतरांवर फोडणे, आपण सोडून इतर सारे भ्रष्ट हा अहंभाव, मित्र व प्रतिस्पर्धी यांची निश्चिती न करणे असे दोष त्यांनी सोडून द्यायला हवेत तरच ‘आम आदमी’ त्यांच्याकडे गांभीर्याने पहायला लागेल, अन्यथा त्यांच्या आजवरील प्रवासाप्रमाणेच हे वाऱ्यावरचे बुडबुडे राजकीय प्रक्रियेत धुसर होत जातील.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment