दि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक!
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • मामासाहेब घुमरे यांचा सन्मान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डावीकडे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे
  • Sat , 02 June 2018
  • पडघम माध्यमनामा दि. भा. घुमरे Di. Bha. Ghumare

नागपूर-विदर्भाबाहेरच्या बहुसंख्य मराठी वाचक तर सोडाच मराठी पत्रकारांनाही आज वयाच्या नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या एक विद्वान आणि भिडस्त मामासाहेब घुमरे यांच्याबद्दल फार कमी ज्ञात आहे. नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांचा नुकताच मुंबईच्या सरोजिनी अकादमीच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानिमित्ताने दहा वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या मामासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा सुधारीत मजकूर...

.............................................................................................................................................

रात्री उशिरा पडवीत बाजेवर लोळत वाचत असताना दूरवर मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनातल्या टाळ-मृदंगाच्या आवाजाच्या तालावर झोपला गावी आणि सकाळी जाग यावी ती त्याच मंदिरातल्या काकड आरती आणि घंटांच्या आवाजानं. त्याचवेळी घरातला कुणीतरी ज्येष्ठ मोठमोठ्यानं मंत्र म्हणत असावा. अंगणातल्या पारिजातकाचा सुवास पडवीभर पसरलेला असताना दिवसाची सुरुवात व्हावी, असं गावाकडे अनेकदा घडायचं. सकाळ अशी सात्विक झाली की, उरलेला दिवस मग मंदिराच्या गाभाऱ्यात संध्याकाळी पसरलेल्या समईच्या आश्वासक प्रकाशासारखा सरायचा. माझ्या पत्रकारितेची सकाळ प्रसन्न करणारे जे लोक भेटले, त्यात अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, निशिकांत जोशी, बाबा दळवी आणि दि.भा. उपाख्य मामासाहेब घुमरेही आहेत.

मामासाहेबांशी झालेल्या ओळखीचं वय आता प्रौढ वयात पोहोचलं आहे. म्हणजे पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या  काळातच मामा भेटले गुरु आणि शिक्षक याअर्थानं विचार करायचा झाला तर, मामांनी थेट मुळाक्षरं कधी गिरवून घेतली नाहीत किंवा वर्गात पत्रकारिताही शिकवली नाही, पण सहवास सुरू झाल्यावर त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं, हेही तेवढंच खरं. ते त्यांनी जाणीवपूर्वक दिलं आणि ते जाणीवपूर्वकच स्वीकारलं गेलं, असंही घडलं नाही. त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या कामाच्या शैलीचा, वर्तनाचा कळत-नकळत संस्कार होत गेला. खरं तर सर्वच ज्येष्ठांनी भरभरून दिलं, पण आम्हालाच ते  पूर्ण घेता आलं नाही. जेवढं काही घेता आलं त्यामुळेच जाणिवा समृद्ध, विकसित आणि संवेदनशीलही झाल्या. जर त्यांनी शिकवलेलं सगळंच आकलनाच्या कवेत घेता आलं असतं तर, कुठल्या कुठं पोहोचता आलं असतं याची रुखरुख कायम आहे.

एक माणूस आणि पत्रकार म्हणून मामा ज्या विचारांचे म्हणून ओळखले जातात त्यापासून करोडो मैलाचं अंतर असणाऱ्यांपैकी मी एक. मीच एकटा कशाला? रिपब्लिकन विचाराचे ज्ञानेश्वर वाघमारे, कम्युनिस्ट प्र.शं. देशमुख अशी ‘तरुण भारत’मध्ये नोकरी करणाऱ्यांचीही बरीच नावं सांगता येतील, पण एक ज्येष्ठ सहकारी आणि माणूस म्हणूनही मामा त्यांच्या त्या एका विचारामुळे विरोधी कधी वाटलेच नाहीत. उलट अनेकांना अमान्य असणारा हिंदुत्ववाद स्वीकारणारे आणि त्याचबरोबर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्यावर अव्यभिचारी निष्ठा ठेवणारे मामा आमच्यासारख्यांना माणूस म्हणून कायमच वेगळं रसायन असणारे म्हणून अनुकरणीय राहिले.

हिंदुत्ववादी दैनिकाचे संपादक असल्यानं गांधीवादी तसंच समाजवाद्यांकडून आणि गांधी-विनोबावर श्रद्धा असल्यानं हिंदुत्ववाद्यांकडून मामासाहेब घुमरे बरेच दुर्लक्षित राहिले, याबद्दल प्रख्यात विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे आणि माझ्यात एकमत होतं. मामांच्या त्या हिंदुत्ववादाच्या विरोधाला, विचारांचं अधिष्ठान कमी असलेला आणि आक्रमकता तसंच कुणाचं ना कुणाचं विचार ऐकून–वाचून केलेला आमचा तरुण वयातला कथित धारदार प्रतिवाद असे. तेव्हाही मामा अतिशय सौम्यपणे त्यांच्या विचारांचं समर्थन करत असत आणि आता इतकी वर्षं त्यांना ओळखत असल्यावरही त्यांचा तो सौम्यपणा कणभरही कमी-जास्त झालेला नाही. प्रत्येक माणसाला आयुष्यभर असं एकाच मापानं आणि उंचीनं जगता येईल का? विरोधी विचारालाही प्रतिवादाचा हक्क असतो, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असतं, हे तरुण वयात लक्षात यायचं नाही. पण ते नंतर स्वीकारलं गेलं आणि अजूनही पाळलं जात आहे, ते मामांच्या संस्कारामुळंच. मामा माझे संपादक नव्हते, तेव्हा ते संपादक झाल्यावरही त्यांच्यासोबत अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळत असे.

आठवड्यातून एक-दोनदा तरी दुपारी चारच्या सुमारास मामा न्यूजरुममध्ये येऊन सगळ्यांसोबत चहा घेत, हास्यविनोदात सहभागी होत. शरद मोडक, प्रकाश देशपांडे, ज्ञानेश्वर वाघमारे, प्र.शं. देशमुख, वामन तेलंग, लक्ष्मणराव जोशी असे ज्येष्ठ सहकारी त्या गप्पांच्या मैफिलीत असत. अशा मैफिलीत मामा नंतर जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलेल्या जगण्याच्या छोट्याछोट्या अतिशय छान त्या क्षणी टिप्स देत. उदाहरणार्थ, एकदा एका सौंदर्यवती अभिनेत्रीविषयी गप्पा सुरू असताना अचानक मामा समोर आले आणि आम्ही तरुण मंडळी गडबडलो. लपवाछपवी व्यर्थ ठरल्यावर त्या अभिनेत्रीवर सुरू असलेली चर्चा सांगितल्यावर मामा म्हणाले, ‘कोणत्याही सौंदर्यावर बोलण्यात पाप कसलं? सौंदर्याला दाद न देणारा माणूस नपुंसकच असला पाहिजे.’ इतकी महत्त्वाची बाब तोपर्यंत कोणीच आम्हाला इतक्या साध्या शब्दात सांगितलेली नव्हती.

कायम लुनावर फिरणारे फुलपँट, अर्ध्या बाह्यांचा बुशशर्ट आणि डोक्यावर काळे केस असे पाहिलेले मामासाहेब घुमरे आता नव्वदीच्या घरात आणि जाणीव-नेणीवेच्या पल्याड पोहोचलेले आहेत. तेव्हा एक अतिशय साधं टेबल आणि साधीच खुर्ची. टेबलवर एक काच आणि त्या काचेवर कागद ठेवून मामा आकंठ लेखनमग्न असत. मग्नता कसली ती तर लेखनसाधनाच. मात्र त्या साधनेला गर्वाचा लवलेशही नसे. किंबहुना आक्रमकता, मोठ्या आवाजात- तावातावानं प्रतिपादन, ज्ञानताठा वगैरे मामांच्या आजूबाजूलाही फिरकत नसे. मराठीसोबतच इंग्रजी, हिंदी, संस्कृत भाषांवर हुकमत होती. त्यांची विद्वत्ता थक्क करणारी, पण भिडस्त होती. बहुदा या भिडस्तपणामुळेच विद्वत्ता मिरवावी, संपादकीय भूमिकेतून व्यासपीठावर मिरवावं, असं त्यानं कधी वाटलं नाही. त्यामुळेच अनेक सन्मान त्यांच्याकडे चालून आले नाहीत आणि जे अनेक आले त्यातले बहुसंख्य मामासाहेबांनी नम्रपणे नाकारले.

याचा अर्थ मामासाहेब ठाम नव्हते असं नव्हे, पण ते दुराग्रही नव्हते; त्यांना राग-लोभ नव्हते,  असं  नव्हे. बातमीत एखादी चूक झाली तर कार्यालयात आल्याबरोबर मामांचा निरोप  चपराशी कानावर घालत असे. मामांच्या केबिनचा दरवाजा साधारणपणे बंद असल्याचा अनुभव क्वचितच कुणाला आला असेल. अशा वेळेस ‘आत येऊ का?’ असं म्हणत आपण समोरच्या खुर्चीत जाऊन बसलं की, मामा डोळ्यावरचा चष्मा काढून टेबलवर ठेवत आणि  खुर्चीवर मागे रेलत चूक काय झाली, तिथे नेमका शब्द कोणता हवा होता आणि शब्दशास्त्र समजावून सांगत असत. हे शिकवणं नसे आणि त्यांच्या कथनात पांडित्याचा आवही नसे, पण ते  जे काही सांगत असत त्यात तळतळ अशा तन्मयतेनं येत असे की, त्यांचं ते म्हणणं मेंदूच्या मेमरीत एकदम फिट्ट बसत असे. उदाहरणार्थ ‘तज्ज्ञ’ हा शब्द त्यांचा संस्कार स्वीकारलेल्यांपैकीच कुणीही ‘तज्ञ’ असा लिहिणारच नाही! कठीण समय आला तर, सहकाऱ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहत. (याची एक हकिकत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात ‘धडा’, पृष्ठ क्रमांक  ७२ वर आहे.).

मामांसाहेबांच्या सौम्यपणात वरवर कधीच न दिसणारा एक आक्रमक बाणेदारपणा  आहे. हा बाणेदारपणा दाखवताना तो इतक्या खुबीने मामा शब्दात पकडतात की, भल्याभल्यांच्याही तो लक्षात येत नाही. उदाहरणार्थ आणीबाणीनंतर लिहिलेल्या एका अग्रलेखात (आणि तेही ‘तरुण भारत’मध्ये आलेल्या!) आणीबाणीचं सर्वखापर एकट्या इंदिरा गांधींवर फोडण्याची भूमिका मामांनी संपादक म्हणून स्वीकारलेली नाही; यावर आज कुणाचा चटकन विश्वास बसणार नाही. मामांच्या अग्रलेखांचा संग्रह असलेले ‘अन्हिक’ हे पुस्तक वाचताना हे पुन्हा लक्षात आलं की, आणीबाणीला प्रखर विरोध केल्यावर आणि त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागल्यावरही मामांनी आणीबाणी लादल्याचा दोष इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटला दिलेला आहे. त्या काळात अग्रलेखातून अशी भूमिका घेणं किती मोठं आव्हान आणि जोखीम असेल याची कल्पना आज करता येणार नाही, पण मामांनी ते केलंय हेही तेवढंच खरं.

मामासाहेब घुमरे, अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, निशिकांत जोशी, बाबा दळवी, ही मंडळी जेव्हा संपादक झाली, तेव्हा पत्रकारितेत एक मोठं स्थित्यंतर होण्यास सुरुवात झालेली होती. तोपर्यंत ‘मिशन’ असणाऱ्या पत्रकारितेनं, ‘प्रोफेशन’च्या रस्त्यावर चालल्याशिवाय तरुणोपाय नाही हे कटू असलेलं वास्तव स्वीकारलेलं होतं. कारण अस्तित्वाचा प्रश्न होता. या संपादकांचेच समकालीन गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी आदींनी व्यवस्थापनाची ही भूमिका जाहीरपणे, तर बाबा दळवी यांसारख्यांनी जाहीर न करता स्वीकारलेली होती. घुमरे काय, वैद्य काय किंवा अनंतराव भालेराव काय यांना ‘मिशन टू प्रोफेशन’ हा प्रवास पूर्णपणे अमान्य होता. कारण पत्रकारिता त्यांच्यासाठी केवळ मिशनच नव्हती, तर ती एक जीवनसाधनाही होती. त्यामुळे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याबाबत संपादकांच्या त्या पिढीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या मनातही संभ्रम होता. त्यामुळे त्या स्पर्धेतही ही मंडळी काहीशी मागेच राहिली, हा खरं तर इतका मोठा अपरिहार्य मानसिक कोंडमारा होता की, तो सहन करण्यासाठी विलक्षण दृढता आणि घडणही मामासाहेब घुमरे आणि त्यांच्या पिढीच्या संपादकांच्या मनाची होती, हे आता जाणवतं. या विपरीत अशा वैचारिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर लिखाणाशी कोणतीही तडजोड न करण्याची या मंडळींनी दाखवलेली सहनशीलता आपल्याला नम्र करणारी आहे. म्हणून मग मामा आपल्या मनावर अधिकाधिक अमीट  होत जातात, हेही तेवढंच खरं.

संपादक म्हणून निवृत्त झाल्यावर ज्या पद्धतीनं मामांनी अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेच्या संदर्भात सुरू असलेल्या कामात स्वतःला झोकून दिलं ते टोकदार सामाजिक जाणीवेचा एक जिताजागता अनुभव होता; कारण काही तरी भयावह घडणार या संकेतानं अस्वस्थ असलेले मामासाहेब घुमरे तेव्हा बघायला मिळालेले आहेत. बाबरी मशिदीच्या संदर्भात रामाच्या नावानं ती जी काही घटना घडली त्याच्या किती तरी दिवस आधी या देशात काही तरी विलक्षण अशी उलथापालथ घडणार आहे आणि जनजीवनात महाभयंकर लाटा उसळणार आहेत, असं अधेमधे भेट झाली की, मामासाहेब कातर होऊन सांगत असत. तेव्हा मामा द्रष्टेपणानं काय सांगत आहेत हे लक्षात येत नसे, नंतर हे लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झालेला होता. शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कामातही मामांनी स्वतःला असंच झोकून दिलं, मात्र हे करताना त्यांची भूमिका त्यांनी कार्यकर्त्याचीच ठेवली. वयाच्या साठीनंतर इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त झाल्यावरही मामा सदैव एक साधा माणूस म्हणून कार्यरत असतात हे लक्षात येतं आणि मामांचं माणूसपण अधिक भावतच जातं.

मोठ्या पदावरून निवृत्त झाल्यावर आणि वय वाढत गेल्यावर हेकट आणि हट्टी न होता अधिक समंजस होत जाणंही सहज घडणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी हवी असते सात्विकता, तीही जन्मजात आणि ती नेमकी तशीच मामासाहेबांजवळ आहे. मामांशी अनेकदा बोलताना त्यांच्याकडून जे काही शिकता आलं त्याबद्दल बोलून दाखवलं तर मामांना विलक्षण संकोच वाटतो. मग त्या काळात सहवासात आलेले तुमच्या सोबतचे सगळेच हे का शिकले नाहीत, असा प्रश्न अतिशय भोळेपणानं मामा आपल्याला विचारतात आणि निरुत्तर करतात. त्यांचा रोख लक्षात आल्यावर तो प्रश्न विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले मिश्किल हसू ‘कीकारणंम’ हेही लक्षात येतं. मामांसारखी सात्त्विक आणि सोज्वळ माणसं पत्रकारितेच्या निर्णायक टप्प्यावर भेटल्यानं लेखनात तडजोड आली नाही आणि त्यांच्यासारखे सिनियर्स भेटलेच नसते तर काय झालं असतं या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही, पण मामांचं भेटणं काय किमतीचं आहे, हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यायला हवा-

आपुलिया मनी बरवी असमाहि गोठी जीवी।

ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले।

(चांगली वाटते, जीवात मावत नाही, कुणाला तरी सांगाविशी वाटते अशी गोष्ट)

एक माणूस आणि संपादक म्हणून मामासाहेब घुमरे यांची भेट होणं आयुष्यात इतकं महत्त्वाचं आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......