अजूनकाही
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे अवघड कार्य पार पाडताना त्यांना अनेक विश्वासू मर्द मावळ्यांची साथ मिळाली. इतिहासात त्यासंबंधीच्या अनेक रोचक कथा प्रसिद्ध आहेत. अशा काही कथांना मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचं मोठं काम यापूर्वी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या काळात केलं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मराठ्यांच्या जाज्वल इतिहासाचं आकलन झालं. भालजी पेंढारकर यांच्यानंतर मात्र मराठ्यांच्या इतिहासाला चित्ररूप देण्याचे फार कमी प्रयत्न झाले.
परंतु अलीकडेच दिगपाल लांजेकर या तरुण लेखक-दिग्दर्शकानं एका ऐतिहासिक घटनेच्या आधारे मराठ्यांच्या इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. लांजेकर यांचा चित्रपटसृष्टीच्या पदार्पणातीलच हा उपक्रम त्यातील काही त्रुटी मान्य करूनही चांगला म्हणावा लागेल. ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एका ऐतिहासिक घटनेचं जिवंत चित्रण मोठ्या पडद्यावर केलं आहे. हा चित्रपट प्रामुख्यानं ‘युद्धपट’ आहे आणि त्याचं सादरीकरण प्राधान्यानं फिल्मी स्टाईल पद्धतीनं झालं असलं तरीही ते स्फूर्तिदायी झालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील निष्ठेपोटी कोंडाजी फर्जंद या मर्द मावळ्यानं आपल्या अवघ्या साठ सहकाऱ्यांच्या मदतीनं आदिलशहाच्या ताब्यात असलेला पन्हाळा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. याच कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारित आहे. वास्तविक पन्हाळा किल्ला हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आधीपासून होता. मात्र औरंगजेबाचे सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि नंतर विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात. पन्हाळ्यासारखा किल्ला परकीयांच्या ताब्यात आहे, ही सल शिवाजी महाराजांना बरेच वर्षं होती. तो ताब्यात असल्याशिवाय राज्याभिषेक कसा करून घ्यावयाचा असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यातूनच कोंडाजी फर्जंदनं पन्हाळा किल्ला पुन्हा जिंकून घेण्याचा विडा उचलला आणि तो जिंकून शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं, अशी या चित्रपटाची कथा आहे.
कोंडाजी फर्जंद हा नरवीर तानाजी मालुसरे यांचा शागीर्द. त्यासाठी चित्रपटाची सुरुवातच तानाजी मालुसरे यांच्या ‘सिंहगड विजया’नं दाखवली आहे. इतिहासात सर्वसामान्यांना फारसा परिचित नसलेला कोंडाजी फर्जंदची ओळख होण्याच्या दृष्टीनं सुरुवातीचा हा ‘सिंहगड विजय’ समर्पक वाटतो. सिंहगड तसंच शेवटी पन्हाळा जिंकण्यासाठी केलेल्या युद्धाची दृश्यंही उत्तम चित्रित झाली आहेत.
अर्थात कोंडाजी फर्जंदबाबत इतिहासात फारशी माहिती नसल्यानं लेखक-दिग्दर्शक लांजेकर यांना ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेण्याची चांगली संधी मिळाली आणि तिचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतल्याचं दिसून येतं. विशेषतः बहिर्जी नाईकांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या करामती दाखवताना हे प्रकर्षानं जाणवतं. शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडची सध्याची दृश्यं लाँगशॉट मधून दोन-तीनदा दाखवण्याचं प्रयोजन मात्र कळून येत नाही. तसंच विनोदनिर्मितीसाठी घुसडलेले काही प्रसंग वगळले असते तर या चित्रपटाची लांबी कमी होऊन तो अधिक आखीव-रेखीव आणि आणखी प्रभावशाली झाला असता.
हा चित्रपट ऐतिहासिक असल्यानं त्यामध्ये बरीच पात्रं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बहिर्जी नाईक, बहिर्जींचे प्रमुख सहकारी किसना आणि केशर, स्वतः कोंडाजी फर्जंद, त्याची पत्नी कमळी, मानाजी मामा, अण्णाजी पंत आणि पन्हाळ्याचा प्रमुख किल्लेदार बेशक खान ही त्यातील काही प्रमुख पात्रं. या सर्व पात्रांच्या योग्य त्या भूमिका अनुक्रमे चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, निखिल राऊत, मृण्मयी देशपांडे, अनिकेत मोहन, नेहा जोशी, अजय पुरकर, राहुल मेहेंदळे आणि समीर धर्माधिकारी यांनी उत्तम प्रकारे वठवल्या आहेत. प्रवीण तरडे यांनीही फरशा रामोशीच्या भूमिकेत मजा आणली आहे. कोंडाजी फर्जंदची भूमिका करणारे अनिकेत मोहन हे अमराठी कलाकार असले तरी त्यांनी आपली निवड सार्थ केली आहे.
या चित्रपटाचे संवाद तसंच केदार दिवेकर यांचं पार्श्वसंगीत ही खूप जमेची बाजू आहे. संगीतकार अमित राज यांनी स्वरबद्ध केलेली गाणी, विशेषतः ‘शिवाजी माझा मल्हारी’ आणि ‘जगदंबेचा गोंधळ’ ऐतिहासिक वातावरणाला अधिक पोषक ठरली आहेत. या दोन्ही गाण्यांचं टेकिंगही उत्तम झालं आहे. थोडक्यात, मराठ्यांच्या इतिहासातील एक गौरवास्पद घटना मोठ्या पडद्यावर पाहायची असेल तर हा ‘फर्जंद’ जरूर पाहायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sourabh suryawanshi
Tue , 05 June 2018
अजून चांगला करता आला असता. अतिरंजितपणा टाळला असता तर बरे झाले असते. प्रसाद ओक अजिबात बहिर्जी वाटत नाहीत. महाराष्ट्रातील कलाकार मुख्यपात्रासाठी खरच मिळत नसेल? अंकित मोहन शरीरसौष्ठव दृष्टीने उजवा पण एक मराठी पात्र म्हणून अयोग्य वाटत राहतो. प्रवीण तरडे खूप छान! संभाजी राजांचे पात्र नसतेच तर बरं झालं असत. त्यांची तिथे आवश्यकता नव्हतीच. किसना (अंशुमन विचारे) बाहेर उडी मारून बेशुद्ध पडलेला कसा नेमका वर येतो समजत नाही. समीर धर्माधिकारी उगीचच नजरेचा खेळ करत राहतात. चिन्मय मंडलेकरणा शिवाजी महाराजांचा रुबाबदार पणा साकारता आला नाही. उदयभान ला तानाजी मारतो अस दाखवलंय मग शेलारमामा च काय? आशा बऱ्याच उणिवा मराठी सिनेमा ला प्रेक्षक नाही तर समीक्षक आणि निर्माते खराब करतायत आणि लोकांच्या माथी काहीही मारतात. तरीही अजून अपेक्षा वाटतायत मराठी चित्रपटाकडून. धन्यवाद!