‘भावेश जोशी - सुपरहिरो’ : चांगला, प्रामाणिक हेतू असलेला माणूस आणि चित्रपट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘भावेश जोशी - सुपरहिरो’ची पोस्टर्स
  • Sat , 02 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie भावेश जोशी - सुपरहिरो Bhavesh Joshi Superhero हर्षवर्धन कपूर Harshvardhan Kapoor विक्रमादित्य मोटवाने Vikramaditya Motwane

‘सुपरहिरो पैदा नहीं होते. सुपरहिरो बनते है’ असं म्हणत समोर आलेला भावेश जोशी नक्कीच ‘सुपरहिरो’ची व्याख्या योग्यरित्या सांगणारा आणि तिला खरा उतरणारा आहे. ही व्याख्या केवळ त्यालाच लागू पडते असं नाही. कारण तो ज्या डीसी आणि मार्व्हलच्या चित्रपटांचा आणि सुपरहिरोंचा उल्लेख करतो, ते प्रामुख्यानं याच व्याख्येशी साधर्म्य सांगणारे आहेत. मग ‘बॅटमॅन’ आणि ‘स्पायडर मॅन’ (होमकमिंग) कडून आपला आत्मा घेणारा भावेश जोशीही त्याच धर्तीचा नसता तर नवल. 

हा तसं पाहता कुठल्याही रीतीनं पाथब्रेकिंग चित्रपट नाही. कारण तो बऱ्याच चित्रपट आणि सुपरहिरोंकडून वेगवेगळ्या बाबी उसन्या घेतो. आणि त्याला भारतीय स्वरूप देऊन समोर मांडतो. तो वेळोवेळी आपली भाकितंही खरी ठरवतो. पण म्हणून तो अगदी टाकाऊ ठरत नाही. कारण मुळात त्याचा गाभा आणि उद्देश चांगला आहे. अगदी त्याच्या नायकांसारखाच. आणि त्याच्या या खऱ्या, प्रामाणिक ‘स्पिरीट’मध्येच त्याची विशेषता आहे. 

मार्व्हलच्या ‘स्पायडर मॅन’ची ‘स्पायडर मॅन, स्पायडर मॅन; फ्रेंडली नेबरहूड स्पायडर मॅन’ ही ट्यून बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. भावेश जोशीबाबतही त्यातील नाव ‘इन्साफ मॅन’ या संज्ञेनं बदलून हीच गोष्ट लागू पडते. 

प्रियांशु पेन्युली आणि हर्षवर्धन कपूर यां दोघांची पात्रं (नावं स्पॉयलर ठरण्याच्या शक्यतेमुळे सांगता येणार नाहीत) २०११च्या लोकपाल आंदोलनापासून प्रभावित झालेले तरुण आहेत. त्यांनी त्यावेळी त्यात भागही घेतलेला आहे. आणि त्यांना देशाविषयी, येथील परिस्थितीविषयी खरोखर तळमळ आहे. यातूनच ते ‘इन्साफ टीव्ही’ नामक चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढण्याचा एक छोटेखानी उपक्रम सुरू करतात. आणि यातूनच एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याला त्यांनी दिलेला लढा म्हणजे याचं साधारण कथानक. 

जे नक्कीच रंजक आणि एखाद्या इंडी फिल्मला शोभावं असं आहे. जे चित्रपटाच्या पूर्वार्धाच्या रूपातून त्या प्रकारे मांडलंही जातं. मात्र उत्तरार्धात चित्रपट जरा अधिक रूढ मार्गांनी जाऊ लागतो. आणि अपेक्षित वळणं घेऊ लागतो. जे एक सुपरहिरो चित्रपट म्हणून अपेक्षा पूर्ण करणारं असलं तरी त्याचा सुरुवातीचा वास्तववादी आणि छोटेखानी अॅप्रोच अधिक सिनेमॅटिक होत जातो (जे एका अर्थी चांगलंही आहे). ज्यामुळे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांत लेखन आणि मांडणी अशा दोन्ही पातळ्यांवर फरक जाणवतो. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे याचा आत्मा त्याचा एक प्लस पॉइंट आहे. जो ‘डोंबिवली फास्ट’मधील माधव आपटेशी साधर्म्य सांगणारा आहे. भ्रष्टाचार, अनैतिक गोष्टी यांच्याविरुद्ध असणारे दोन लोक एकत्र येऊन त्याविरुद्ध देत असलेला लढा हा त्याचा मुख्य गाभा म्हणता येईल. जो नंतर उत्तरार्धात ‘स्पायडर मॅन : होमकमिंग’मधील एका सुपरहिरोचा लहान, काहीशा स्थानिक पातळीवरील लढा, ‘द कराटे किड’मधील ट्रेनिंग आणि खलनायकाचा पाडाव अशा मार्गांनी जातो. 

मधल्या काळात दोन्ही नायकांमध्ये झालेले मतभेद, हे सामान्य लोकांची भ्रष्टाचाराच्या बाजूनं असलेली विचारशैली आणि एखाद्या व्यक्तीचा याला नैतिक, वैचारिक पातळीवर असलेला विरोध यांना चित्रित करतो. 

चित्रपट काहीसा स्लो पेस्ड आहे. जो उत्तरार्धात एका चेस सीनदरम्यान काही काळापुरता पकड घेतो. आणि हीच खरं तर याची उणीव म्हणता येईल. कारण दरवेळी तो एखाद्या दृश्यातून त्याची कथानकावरील पकड घट्ट करत अपेक्षा वाढवत नेतो. नंतर पुन्हा पुन्हा ती पकड ढिली होत राहते. 

प्रियांशु हा हर्षवर्धन कपूरपेक्षा अधिक कन्विन्सिंग आहे. तर प्रताप फड, निशिकांत कामत यांची खलनायकी स्वरूपाची पात्रंही अधिक सरस आहेत. चिन्मय मांडलेकर ग्रे शेडच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रभावी ठरतो. तर आशिष वर्मा आणि हृषिकेश जोशीदेखील तितकीच चांगली साथ देतात. 

अमित त्रिवेदीचं पार्श्वसंगीत आणि ‘कसम खा ली मैंने’ हे गाणं चित्रपटात अडथळा न ठरता त्याला पूरक पद्धतीनं काम करतात. विक्रमादित्य मोटवाने, अभय कोरान्ने आणि अनुराग कश्यप यांची पटकथा अधिक बांधेसूद आणि प्रभावी होऊ शकली असती. कारण ती दरवेळी आणखी अधिक आणि वेगळं काहीतरी सांगू पाहते, मात्र पुन्हा रूढ मार्गानं जात राहते, असं वाटतं. सिद्धार्थ दिवाणच्या छायाचित्रणात आणि चित्रपटाच्या प्रकाशयोजनेत पिवळसर आणि काहीसे गडद रंगपटल व वातावरण चित्रपटाच्या कथेला पूरक ठरतात. ओपनिंग आणि एंड क्रेडिट्स चित्रपटाच्या टोनला समांतर असल्यानं चित्रपटाच्या प्रभावात भर घालतात. 

अनुराग कश्यपनं निर्मिती केलेल्या चित्रपटांची किंवा ‘फँटम’च्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची एक खास बाब अशी असते की, ते तत्कालीन व्यवस्था आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. त्याच्या ‘मुक्काबाज’मध्ये समावेश केलेल्या अतिरेकी राष्ट्रवाद आणि देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती यांवर उपहासात्मक मत व्यक्त केलेल्या काही दृश्यांचा वापर जसा महत्त्वाचा ठरतो, तसंच इथंही असे काही अंडरकरंट्स आहेत. जे चित्रपटाच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीला पूरक ठरत समकालीन घटनांवर एक प्रकारे टीका करतात. 

चित्रपट भलेही काही वेळा रूढ मार्गांनी जाणारा असला तरी त्याच्या स्पष्ट हेतूमुळे तो अधिक भिडतो. शिवाय तो नैतिक-अनैतिक गोष्टी, भ्रष्टाचार आणि एकूणच आर्थिक तसेच सामाजिक शोषण सहन करण्याची सामान्य माणसांची प्रवृत्ती यांवर ताशेरे ओढत मूलभूत कर्तव्यांची जाणीवही करून देतोच. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख