‘वीरे दि वेडिंग’ : किमान मनोरंजक, मात्र कथानकाच्या पातळीवर अधिक उजवा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘वीरे दी वेडिंग’चं पोस्टर
  • Sat , 02 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie वीरे दी वेडिंग Veere Di Wedding करीना कपूर Kareena Kapoor सोनम कपूर Sonam Kapoor स्वरा भास्कर Swara Bhaskar शशांक घोष Shashanka Ghosh

ट्रेलर आणि प्रमोशनमधून ‘वीरे दि वेडिंग’ दुर्लक्ष करता येण्यासारखा, चिक फ्लिक प्रकारचा, थोडाफार मनोरंजक असला तरी बरं अशा धर्तीचा चित्रपट भासत असला तरी आश्चर्याची बाब म्हणजे तो त्याहून अधिक चांगला आणि प्रभावी ठरतो. ज्यामुळे त्याच्या प्रमोशनल तंत्रांना विशेष दाद द्यावीशी वाटते. कारण कुशल हाताळणी करत जाहिरात करून मेनस्ट्रीम प्रेक्षकांना आपल्याकडे खेचत केवळ टाकाऊ ठरेल असा चित्रपट त्यांच्या माथी न मारता भावनिकरित्या मॅच्युअर आणि त्याच वेळी रंजक ठरणारी गोष्ट तो सांगतो. ज्याला सामाजिक स्वरूपाचे अंडरकरंट्सही आहेत. 

जवळपास दहा वर्षांनी एका मैत्रिणीच्या लग्नानिमित्त एकत्र आलेल्या चार जिवलग मैत्रिणी आणि त्या लग्नाच्या दरम्यान आणि नंतरची त्यांची गोष्ट असं साधारण वन लायनर कथानक आहे. चित्रपटात ठळकपणे पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि बरंच काम केलेल्या पटकथेचे (बहुतांशी वेळा यशस्वी) परिणाम प्रतिबिंबित होतात. 

पूर्वार्ध पूर्णतः कालिंदी पुरी (करीना कपूर) आणि रिषभ मल्होत्रा (सुमित व्यास) यांचं लग्न, त्याची खरेदी, रीतीरिवाज आणि चारही मैत्रिणींचे त्यावरील विचार, तसेच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातील उपकथानकं असा बराच व्याप सांभाळून ट्रेलरमधून परिवर्तित झालेल्या प्रकारांनी मेनस्ट्रीम प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तर उत्तरार्ध आधी परिचित झालेल्या पात्रांना आणखी विकसित करत, त्यांच्या कथा, समस्या उलगडत त्यांना अजून भावनिक छटा बहाल करत त्यांना अधिक मॅच्युअररीत्या समोर आणतो. 

कालिंदी ही ऑस्ट्रेलियामध्ये असताना रिषभ तिला प्रपोज करतो. ज्यामुळे पुढे त्यांचं लग्न ठरून त्या अनुषंगानं इतर घटना घडतात. अवनी शर्मा (सोनम कपूर) ही सध्या वकील आहे. आणि कुठल्याही आईप्रमाणे तिला तिच्या लग्नाची चिंता आहे. ज्यासाठी स्थळं पाहणं किंवा खरं तर पाहायला लावणं सुरू आहे. मीरा सूड (शिखा तल्सानिया) ही अमेरिकास्थित, जॉन या एका अमेरिकन नागरिकाशी लग्न केलेली गृहिणी आहे. तर साक्षी सोनी (स्वरा भास्कर) ही डिव्होर्स झालेली, काही प्रमाणात व्यसनी मुलगी आहे. 

एकूणच बऱ्याच वर्षांनी आयुष्यात अनेक चढउतार येऊन गेल्यावर या चौघी एकत्र आल्या आहेत. मुळातच या सगळ्या स्वतंत्र, पुढारलेल्या विचारांच्या आहेत. ओघानं त्यांचं लैंगिक जीवन, शिव्या वगैरे गोष्टी समोर येत राहतात. ज्या खरं तर काही वेळा अनपेक्षित ठिकाणी आलेल्या किंवा घडलेल्या अनपेक्षित घटना वगळता, मोठा अडथळा ठरत नाहीत. पूर्वार्धाच्या शेवटी घडलेल्या घटनेमुळे मुख्यतः कालिंदीच्या लग्नावर असलेलं आपलं आणि सर्व पात्रांचं लक्ष या चारही व्यक्तींवर आणि त्यांच्या भेटीचं स्वरूप केवळ ‘आणखी एक लग्न’ अशा प्रकारचं न राहता एकूणच लग्नव्यवस्था, प्रेम, वैवाहिक आणि लैंगिक जीवन, तसेच बॉडी, फॅट व स्लट शेमिंग अशा बऱ्याच मुद्द्यांना हात घातला जातो. जो वरवर पाहता केवळ वादग्रस्त विधानं करत चर्चेत राहण्याचा मार्ग वाटत असला तरी मुळात एक पात्र म्हणून त्यांच्या आयुष्याचा भाग असलेल्या गोष्टींचं चित्रण करणारा आहे. 

करीना ते सोनम व्हाया नीना गुप्ता आणि सुमित व्यास ते मनोज पाहवा व्हाया विश्वास किन्नी असे सर्वांचेच परफॉर्मन्स चांगले आहेत. तरीही स्वरा भास्कर आणि सुमित व्यास (नेहमीप्रमाणेच) अधिक उजवे ठरतात. दिग्दर्शक शशांक घोष निधी मेहरा आणि नेहुल सुरी यांची पटकथा तितक्याच सहजतेनं पडद्यावर आणतो. 

पूर्वार्धात मुख्यतः पंजाबी कुटुंबातील लग्नाच्या पार्श्वभूमीवर त्याच लहेजाची गाणी आणि अरजित दत्ताचं पार्श्वसंगीत त्या वातावरणाला पूरक ठरतं. अर्थात ते काही वेळा लाऊड वाटतं. मात्र उत्तरार्धात आणि खासकरून थर्ड अॅक्ट दरम्यान ते अधिक सटल (subtle) आणि भावनिक आवाहन करणारं ठरतं. आणि चित्रपटाच्या एकूण परिणामात भर घालतं. ‘आ जाओ ना’ हे गाणं चांगल्या बोलांसोबत तितक्याच चांगल्या पद्धतीनं चित्रितही झालं आहे. 

सुरुवातीला बहुतांशी प्रत्येक पात्र करिकेचर किंवा स्टेरियोटाईप्स म्हणून दिसतात. मात्र नंतर ती अधिक वैयक्तिक आणि स्वतःची मतं असलेली, निर्णय घेणारी अशा रूपात व्यक्त होतात. महत्त्वाची बाब अशी की, समलैंगिक जोडप्याला पाहून भुवया उंचावल्या जात नाहीत की, मुलीकडून तिचं लग्न मोडणारा ‘व्हायब्रेटर’चा किस्सा ऐकून पालक ऑकवर्ड होत नाहीत. इथं प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा, मतांचा आणि निर्णयांचा आदर केला जातो. 

याखेरीज इथं महत्त्वाची बाब ही की, यातील मध्यवर्ती पात्रं फेमिनिझमच्या बाजूनं झुकणारी असली तरी ती ‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव्ह रंजनच्या निव्वळ स्त्री-विरोधी पुरुष पात्रांप्रमाणे पुरुषांचा द्वेष करणारी न ठरता आपलं स्वातंत्र्य उपभोगत, मात्र त्याच वेळी ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवून, भलेही व्यसनं करत, शिव्या देत व्यक्त होत असली तरी ती मॅनिप्युलेटिव्ह नाहीत. त्यामुळे ती स्युडो किंवा अँटी फेमिनिस्ट ठरत नाहीत. (हे उदधृत करण्याचं कारण हेच की, चित्रपटाबाबत अशा प्रकारच्या वाद निर्माण झाला होता.) 

एकूणच ‘वीरे दि वेडिंग’ अपेक्षितपणे किमान मनोरंजन तर करतोच. मात्र कथानकाच्या पातळीवर त्याहून अधिक उजवा ठरत पात्रांमध्ये भावनिक नातं निर्माण करत त्यांना एक पात्र म्हणून अधिक भक्कम बनवतो. आणि त्यामुळेच तो एकदा पाहण्यालायक तर नक्कीच बनतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख