अजूनकाही
मराठीतील श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनाला नुकतीच, म्हणजे १९ मे रोजी १० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं ‘विजय तेंडुलकर यांना एका संपादकाचे अनावृत पत्र’ हा लेख २८ मे रोजी प्रकाशित केला होता. आता हा दुसरा लेख. हे पत्र तेंडुलकरांनी १९९८ साली ‘साधना’ साप्ताहिकाच्या तत्कालिन संपादकद्वयांपैकी श्री. जयदेव डोळे यांना लिहिलं होतं. त्यामुळे अर्थातच हे पत्र म्हणजे २८ मेच्या पत्राला प्रत्युत्तर नाही. तर या पत्रातून तेंडुलकरांच्या स्वभावाचा - तरुण पत्रकारांप्रती आणि एकंदर सामाजिक चळवळींतील कार्यकर्त्यांप्रती असलेल्या ममत्वाचा - पैलू उजागर होतो.
.............................................................................................................................................
२७ ऑगस्ट १९९८, मुंबई
प्रिय जयदेव,
तुम्ही पाठवलेला ‘साधना’चा १५ ऑगस्टचा अंक वाचतो आहे. कार्यकर्त्यांचे अनुभव आणि लेख वाचून झाले आहेत. अनुभवातून आलेले यातले बरेचसे लेखन असल्याने त्यात दम आहे.
सूचना एकच की, अशा लेखनावर, त्याचा अधिक विस्तार, संपादन असे काही काम छापण्यापूर्वी व्हायला हवे. कधी थोडे संपादकीय, प्रास्ताविकही आवश्यक होते. अनुभवाचे वाचन कसे करावे हे सुचवावे लागते. त्याअभावी तो ‘कच्चा माल’ राहतो आणि दृष्टी नसलेल्या वाचकाला त्यातून काही मिळू शकत नाही.
कुणाचाही अनुभव - जगण्याची किंमत देऊन घेतलेला - असा वाया जाऊ नये. त्याने वाचकाला काही दिले पाहिजे.
साधनेच्या पानांची मांडणी अधिक आकर्षक (म्हणजे सजावट नव्हे;) व्हायला हवी. टाइपांचा विचार व्हायला हवा. मुख्यत: नेहमीच्या अंकाची पाने वाढली पाहिजेत. असलेल्या पानांत विषय गुदमरतात. आणि विषय तर पुष्कळ आहेत.
काही विषय Topical असले तरी Predictable असतात. यावर सवड ठेवून आधीच लिहून घ्यावे. विषय संग्रही ठेवून योग्य वेळी छापावेत. याने लिहिणाराला आणि संपादन करणाराला सुधारण्याला अवसर मिळतो. एरवी लेख असेल तसा छापावा लागतो.
हे पत्र छापण्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे.
- विजय तेंडुलकर
….….….….….….….….….….….….….….
शक्य तेवढे टंकाचे, आकर्षकतेचे, लेआऊटचे, मुखपृष्ठाचे, कागदाचे बदल मिलिंद जोशी या आर्टिस्टच्या मदतीने केलेले होते. ते अर्थातच अपुरे होते म्हणून विजयकाकांनी कार्ड पाठवले होते. मी तेव्हा ४०चा व नरेंद्र बहुधा ५२चा होता. तरुण (म्हणजे प्रधान-बापट यांच्या मानाने) संपादकांना अशा आपुलकीने, सदभावाने सूचना करण्याचे मन त्या पत्राने उघड केले होते. जसे त्यांनी संतोष कोल्हे, सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी यांच्यावर छत्र धरले होते, तसेच हे ‘साधने’च्या संपादकांवर त्यांनी धरले होते. पत्रकारितेत राहिलो असतो तर कदाचित मलाही या छत्राखाली राहायला आवडले असते. २००७ की २००८ मध्ये ‘अनुभव’मध्ये मराठी भाषेवर मी लिहिलेल्या लेखाला त्यांनी त्यांचे पत्र छापायला लावून जाहीर शाबासकी दिली, तेव्हा फार फार आनंद झाला. परंतु तेव्हाही ते कौतुक मी ना मिरले, ना चमकावले. तेंडुलकरांना त्याबद्दल पत्र पाठवायचा प्रश्नच नव्हता. खरे तर ‘तें’ व मी एकदाच भेटलो होतो. तेही पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात. नंतरच्या साऱ्या भेटी अशा लेखी- टपालीच!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment