अजूनकाही
‘Cobrapost’ हे वेब पोर्टल काही ना काही सनसनाटी प्रयोग करत असतं. या बेव पोर्टलचा पत्रकार पुष्प शर्मा यानं ‘आचार्य अटल’ हे टोपणनाव घेऊन सपेद कुर्ता, धोतर नेसलं. ‘राधे राधे’ अशी नावं छापलेलं उपरणं गळ्यात घातलं. हा अवतार म्हणजे आजच्या काळातला खास माणूस. संस्कृतीरक्षक. सत्ताधारी वर्गाचा समर्थक. धर्म वाचवायचा मक्ता घेतलेला अनुयायी. या माणसावर कुणीही भरोसा ठेवावा. कारण तो सत्ताधारी वर्गाचा माणूस. सत्ता ही गोष्ट सर्वांत जास्त भरोसा देणारी.
पुष्प शर्मा उर्फ आचार्य अटलनं ‘ऑपरेशन १३६’ हा प्रयोग केला. तो भारतातील बड्या, नावाजलेल्या माध्यमसमूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि मालक लोकांना भेटला. संपादक, पत्रकार यांनाही भेटला. या लोकांना पुष्प शर्मा सांगत असे की, मी हिंदुत्ववादी गटाचा माणूस आहे. एका आश्रमाशी संबंधित आहे. देशात हिंदू राष्ट्र यावं, भाजप-संघ परिवाराला बळ मिळावं म्हणून आमचा अजेंडा तुम्ही तुमच्या वृत्तपत्रात, वृत्तवाहिनीवर, रेडिओवर चालवाल काय? त्यासाठी भरपूर पैसे मोजायला आम्ही तयार आहोत.
आमचा अजेंडा राबवण्यासाठी काय किंमत घ्याल ती देतो. आहात का तयार? अशी लालूच दाखवत तो देशभर फिरला. दिल्ली, कोलकाता, पटना अशा मोठमोठ्या शहरांत प्रसारमाध्यमांच्या पत्रकार-मालक-अधिकाऱ्यांना भेटून तो वेगवेगळी प्रपोजल्स द्यायचा. पैसे मिळत असतील तर हे प्रसारमाध्यमांचे मालक-संपादक-अधिकारी सारं काही करायला तयार होत होते. हिंदुत्व विरोधकांना नेस्तनाबूत करायला जसे ते तयार होते, तसेच भाजपमधील काहींना बदनाम करण्याची सुपारी घ्यायलाही तयार होते, हे बघून आचार्य चाट पडला.
प्रसारमाध्यमांचे मालक-संपादक-अधिकारी-पत्रकार यांच्या घेतलेल्या मुलाखती पुष्प शर्मानं छुप्या कॅमेऱ्यात कैद केल्या. हे व्हिडिओ ‘Cobrapost’नं त्यांच्या पोर्टलवर टाकले. ते सर्वांना पाहता येऊ शकतात.
या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन १३६’ का ठेवलं? पत्रकारांच्या एका जागतिक संघटनेनं एक सर्वोक्षण केलं. त्यात लेखनस्वातंत्र्याच्या बाबतीत भारत १३६ व्या स्थानावर आहे. २०१७चं हे सर्वेक्षण आहे. १३६ हा आपल्याला मान खाली घालायला लावणारा आकडा आहे. तो वापरून ‘Cobrapost’नं आणखी उघडंनागडं वास्तव भारतासमोर आणलं आहे.
पुष्प शर्मा प्रसारमाध्यमांतल्या संबंधितांना भेटला. आपल्या प्रचाराचा, मोहिमेचा अजेंडा, आराखडा स्पष्ट केला. त्याविषयी तपशीलावर चर्चा केली. हिंदुत्वाचा अजेंडा राबवायचं कंत्राट घ्यायला प्रसारमाध्यमं तत्काळ होकार देत. त्या बदल्यात पैसे किती काय ते सांगत. पुष्प शर्मानं या लोकांबरोबर पैसे किती, काय अशी व्यवहारी चर्चा केली. पैसे मिळत असतील तर आम्ही सर्व काही तुमच्या शब्दाबरहुकूम करू, असं हे मालक-संपादक-अधिकारी-पत्रकार सांगत. हे सारं आश्चर्यजनक आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
पुष्प शर्मानं सर्व प्रसारमाध्यमांना साधारण एक योजना सांगत असे. पहिले काही महिने माध्यमसमूहांनी त्यांना देण्यात येणारा मजकूर त्यांची वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या यांवर प्रसिद्ध करायचा. त्यात भाजप विरोधी राजकीय पक्ष, नेते यांची बदनामी करायची. विशेषत: राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, मायावती यांची यथेच्छ टिंगलटवाळी करत बदनामी हा परिणाम साधायचा. सुरुवातीचे तीन महिने छुपी हिंदुत्वलाईन चालवायची, २०१९ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. ती जवळ येईल तशा भाजपचा कैवार घेणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करायच्या.
पुष्प शर्माच्या या हिंदुत्वसमर्थन योजनेमध्ये अरुण जेटली, मनेका गांधी, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा आणि वरुण गांधी यांची बदनामी करायचा डाव स्पष्ट करत असे. तोही बहुतांशी प्रसारमाध्यमांनी मान्य केला. जनतेच्या बाजूनं आवाज उठवणारे प्रशांत भूषण, दुष्यन्त दवे, इंदिरा जयसिंग या चळवळ्या लोकांची बदनामीची मोहीम करायलाही हे माध्यमसमूह एका पायावर तयार झाले. शेतकरी, कामगार, आदिवासी, गरिबांच्या चळवळींना ‘नक्षलवादी’ ठरवून ठोकायचं यासाठी हे माध्यमसमूह उत्सूकता दाखवत होती.
पुष्प शर्माचा अजेंडा पैसे घेऊन राबवायला कोण कोण तयार झालं? १७९ वर्षांचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे वृत्तपत्र आणि संबंध टाइम्स ग्रूप, रजत शर्माचा इंडिया टीव्ही, दै. जागरण, सब टीव्ही, अमर उजाला, पंजाब केसरी, टीव्ही १८, हिंदुस्तान टाइम्स, एबीपी न्यूज, लोकमत, इंडिया टुडे ग्रूप, स्टार इंडिया यांसारखे मोठे माध्यमसमूह या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडेनागडे झाली.
‘Cobrapost’नं केलेला हा प्रयोग वेगळा जरूर आहे, पण हे भारतातील माध्यमसमूह आतून पोखरलेले आहेत, त्यांच्या चकचकीत चेहऱ्याआड विद्रूप चेहरा आहे, हे सर्वांना माहीत होतं. तो विद्रूप भाग ‘Cobrapost’च्या पुष्प शर्मानं कॅमेऱ्यात कैद करून जगासमोर आणला, एवढाच यातला नवा भाग आहे.
माध्यमसमूह विकले जाताहेत. ते पैसे देईल त्याचा अजेंडा राबवायला तयार आहेत, हे २०१४च्या लोकसभा निवडणुका व्हायच्या आधी दोन-तीन वर्षांपासून स्पष्ट दिसत होतं. ‘मोदीकाळ’ आला आणि हे माध्यमसमूह रवीशकुमारच्या भाषेत सांगायचं तर ‘गोदी मीडिया’ म्हणून ओळखले जाऊ लागला एवढंच.
पूर्वी तालुका, जिल्हा स्तरावरच्या छोट्या वृत्तपत्रांना लोक दोष देत. हे पैसे घेऊन बातम्या देतात, असं म्हटलं जाई. स्थानिक पुढाऱ्यांच्या खिशातली ही बातमीपत्रं, लंगोटीपत्रं आहेत, असं म्हटलं जाई. यात वस्तुस्थिती होतीच. पण आतापर्यंत जे माध्यमसमूह आम्ही खूप जागतिक दर्जाची व्यावसायिक पत्रकारिता करतो, असा टेंभा मिरवत असत, त्यांचा चेहरा या जिल्हापत्रांपेक्षा किती विद्रूप आहे, हे ‘Cobrapost’नं जगाससमोर आणलं.
‘ऑपरेशन १३६’ची बातमी अपेक्षेप्रमाणे सर्वत्र दाबली गेली. कारण सर्व बड्या माध्यमसमूहांचा नादानपणा यात उघड झाला. आपलाच किळसवाणा चेहरा पाहायला कोणाला आवडणार? उलट आमची बदनामी होतेय, अशी हाकाटी या बड्या माध्यमसमूहाच्या मालकांनी सुरू केली आहे. काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सोशल मीडियामुळे ‘Cobrapost’चे व्हिडिओ प्रत्येकाला स्वत:च्या मोबाईलवरही पाहता येतील. त्यातून प्रत्येक जण निश्चितच जागा होईल. तो वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांमधील बातम्या, मुलाखती, चर्चा यांकडे यापुढे संशयानं पाहू लागेल. राहुल गांधी यांची अमूक एक बातमी तशी का दाखवत आहेत, यापूर्वी त्याला ‘पप्पू’ ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात होत्या. त्यासाठी काही कंपन्यांनी पैसे घेतले असण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, मायावती यांनी मीडिया टार्गेट का करतो, याविषयीच्या बातम्या साध्या सरळपणे दिलेल्या नसणार, हे यापुढे वाचक-दर्शकांना समजून घेता येईल.
‘Cobrapost’च्या ऑपरेशननंतर सर्वांत गंभीरपणे पुढे आलेला मुद्दा असा की, प्रसारमाध्यमांमध्ये सर्वच पत्रकार विकले गेलेत काय, अशी सरसकट चर्चा होत आहे. तशी चर्चा स्वाभाविक असली तरी प्रसारमाध्यमं आणि त्यात काम करणारे पत्रकार हे दोन वेगवेगळे घटक आहेत. पत्रकार हे नोकर असतात. त्यामुळे त्यांना मालकाचं म्हणणं ऐकावं लागतंच. म्हणून ते पत्रकार विकाऊ आहेत, असं सरधोपटपणे म्हणता येणार नाही. आजही सर्व लहान-मोठ्या प्रसारमाध्यमांमध्ये काही चांगले, स्वतंत्र पत्रकार आहेत. ते त्यांना शक्य होईल तसं आपलं काम चोखपणे करत आहेत.
आताच पत्रकारिता विकाऊ झाली, असं म्हणण्यात फारसं हशील नाही. कारण हा विषय इतका साधा सरळ नाही. सध्याचा काळ हा जगभर प्रत्येक व्यक्ती, संस्था, प्रक्रिया यांच्यापुढे खडतर होऊन उभा आहे. आपल्या देशात लोकशाहीच्या चारही स्तंभांपुढे आव्हानं उभी राहिली आहेत. त्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. कायदेमंडळ, नोकरशाही, न्यायव्यवस्था, यांचे धिंडवडे निघालेले आपण दररोज पाहत आहोत. जीवनाचं एकही क्षेत्रं असं नाही की, त्यावर आघात होत नाहीये.
हे आघात करणारी एक संघटित शक्ती आहे. ती जागतिक पातळीवर जशी आहे, तशीच आपल्या देशातही आहे. या शक्तींचं एकमेकांशी संगनमत आहे. ती शक्ती विविध युक्त्या, बळ वापरून आपल्या संवेदना, विचार मारू पाहत आहे. हा खूप मोठा हल्ला आहे. तो जसा सर्व संस्थांवर आहे, तसा प्रत्येक व्यक्तीवरदेखील आहे. प्रत्येक व्यक्तीचं माणूसपण मारून ही शक्ती तिला हवं असणारं ईप्सित साध्य करू पाहतेय,
त्या शक्तीचा ईप्सिताकडे जाण्याचा मार्ग किती भयंकर आहे, हे ‘Cobrapost’च्या ‘ऑपरेशन १३६’मधून आपल्याला दिसतं. नीतीमत्ता ही नेहमी गरिबांना लागू होते. बडे लोक ती मानत नाहीत. त्यांच्यावर ती पाळण्याचं बंधन नसतं. तेव्हा ‘Cobrapost’च्या ऑपरेशननं मोठ्या माध्यमसमूहांना काही फरक पडेल असं नाही. ते त्यांचा सभ्यपणाचा टेंभा खुलेआम निलाजरेपणानं मिरवत राहतील. पण लोक जागे झाले तरी हे ऑपरेशन कारणी लागलं असं म्हणता येईल. त्यासाठी पुष्प शर्माचा खटाटोप उपयोगी ठरावा.
यापुढे छापलेल्या, दिसणाऱ्या बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, हा ‘Cobrapost’च्या पुष्प शर्माच्या स्टिंग ऑपरेशनाचा मतलब आहे. पैशाच्या प्रभावानं प्रसारमाध्यमं कशी वागायला तयार आहेत, हे या ऑपरेशनमध्ये दिसतं. आता जातजाणीवेच्या प्रभावानं मीडिया कसा वागतो, हे उघडं करणारं स्टिंग ऑपरेशन कुणी केलं तर याच प्रसारमाध्यमांचा आणखी वेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. तेही काम कुणीतरी करायला हवं.
.............................................................................................................................................
‘Cobrapost’च्या ‘ऑपरेशन १३६’च्या निमित्तानं भारतीय प्रसारमाध्यमांविषयी ज्येष्ठ संपादक Paranjoy Guha Thakurta आणि Urmilesh यांनी केलेली चर्चा पाहण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 31 May 2018
लेखाशी पूर्णत: सहमत आहे. -गामा पैलवान