अजूनकाही
कर्नाटकी संगीतातील दिग्गज आणि प्रख्यात गायक बालमुरली कृष्णन यांचे नुकतेच निधन झाले. कर्नाटक शैलीतील प्रमुख कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रगण्य होते, याबद्दल कसलेच दुमत नसावे. आयुष्यभर त्यांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचीच कास धरली. आपण इथं याच मुद्द्याला धरून त्यांच्या गायकीचा समग्र विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करू. वास्तविक, त्यांना अनेक विषयांची आवड होती, परंतु त्यांनी गायन हेच लक्ष्य ठेवले आणि त्यातच आयुष्यभर रममाण झाले. संगीताच्या क्षेत्रातदेखील त्यांनी उत्तर भारतीय संगीतातील कलाकारांच्या समवेत मैफिली केल्या. म्हणजे पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि हरिप्रसाद चौरासिया इ.
त्याचबरोबर जॅझ फ्युजनसारख्या पाश्चात्त्य संगीतमैफलीत भाग घेऊन स्वतःच्या आवडींना कसलेही बंधन नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले; परंतु हे सगळे करताना स्वतःच्या मूलस्रोताकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. अर्थात असे म्हणता येईल की, उत्तर भारतीय संगीत काय किंवा पाश्चात्य जॅझ संगीत काय, या सगळ्याचा मूल:स्रोत एकच - निखळ सूर आणि तिथे या गायकाच्या अस्तित्वाची खरी प्रचिती यायची.
आपल्याकडे एक गंमत बघायला आणि अनुभवायला मिळते. वास्तविक, कर्नाटकी संगीत हे भारतीय(च) संगीत आहे, पण अजूनही ‘उत्तर भारतीय संगीत’ आणि ‘कर्नाटकी संगीत’ यांच्यात अकारण एक भिंत उभी आहे. आजही महाराष्ट्राच्या वरच्या बाजूची, उत्तरेकडील राज्ये कर्नाटकी संगीताकडे काहीशा त्रयस्थ नजरेने तरी बघतात किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करतात. ज्याला ‘अभिजात’ म्हणावे असे सगळे गुण कर्नाटकी संगीतात आढळतात, पण तरीही दोन्ही शैली जितक्या प्रमाणात एकत्र यायला हव्यात, तितक्या आजही आलेल्या नाहीत, हे निखालस सत्य आहे. शैली भिन्न ठेवल्या, तरी किमान आपपर भाव नाहीसा व्हावा. या दोन्ही शैलींमध्ये शास्त्रीय संगीतातील सगळे अलंकार यथास्थितपणे आढळतात; फरक असतो, तो सुरांच्या लगावाबाबत!!
जुलै १९३०मध्ये जन्माला आलेल्या बालमुरली कृष्णन यांनी आयुष्यभर कर्नाटकी संगीताचीच पूजा केली आणि ही शैली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. मी इथे ‘प्रयत्न केला’ असाच शब्दप्रयोग वापरेन, कारण जसे आजही आपल्याकडे उत्तर भारतीय संगीताचे रसिक एकूण रसिकांच्या तुलनेत फारच कमी आढळतात, तोच प्रकार कर्नाटकी संगीताबाबतही आढळतो; मग त्या सुब्बलक्ष्मी असोत किंवा बालमुरली कृष्णन असोत.
या लेखाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास गायक म्हणून बालमुरली कृष्णन किती श्रेष्ठ होते आणि एकूणच भारतीय संगीतावर त्यांचा किती प्रभाव होता, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या. तिन्ही सप्तकात सहज विहार करू शकणारा निकोप आवाज त्यांना लाभला होता. त्यांचा तारता पल्ला फार विस्तृत होता. उदाहरणच द्यायचे झाल्यास, त्यांनी गायनात ‘सशब्द क्रिया’ म्हणून नव्याने अलंकार शोधून वापरायला सुरुवात केली. वेगळ्या शब्दांमध्ये मांडायचे झाल्यास, कर्नाटकी संगीतात सुप्रसिद्ध असलेला ‘आदिताल’ इथे उदाहरण म्हणून घेऊ. ८ मात्रांचा हा ताल सर्वसाधारणपणे मध्य लयीतील बंदिशींमध्ये वापरला जातो (कर्नाटकी संगीत बहुतांशी मध्य लय आणि द्रुत लय, या दोन लयीमध्येच सादर होते). आता या ८ मात्रा समान विभागणीमध्ये वापरल्या जातात. या तालाचे जे बोल आहेत, त्यांचा बालमुरली कृष्णन गायनात इतका समर्पक उपयोग करत असत की, ते बोल म्हणजेच त्या बंदिशींचे अभिन्न घटक वाटावेत! हे लिहायला फार सोपे आहे, पण प्रत्यक्षात गायकीसंदर्भात खूप अवघड आहे.
बालमुरली कृष्णन यांनी पं. भीमसेन जोशींबरोबर केलेल्या मैफिली शास्त्रीय संगीताच्या रसिकांना आठवल्या, तर माझ्या म्हणण्याची प्रचिती यावी. एका बाजूने पंडित भीमसेन जोशी स्वतःच्या आवाजाने सगळे सप्तक आवाक्यात घेत असत, तर दुसऱ्या बाजूने बालमुरली कृष्णन त्याच तानेचे तालाच्या मात्रेच्या अंगाने सादरीकरण करत असत. ‘सशब्द क्रिया’ हा त्यांनी नव्याने शोधलेला संगीतालंकार आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळवणे म्हणजे अहोरात्र रियाज करणे, हेच होय.
इथे मी मुद्दामून भीमसेन जोशी आणि बालमुरली कृष्णन यांचे युगलगान घेतले आहे (‘जुगलबंदी’ हा शब्द मी मुद्दामून टाळला!). एकतर या दोन्ही शैली कुठे भिन्न आहेत आणि कुठे एकत्र येऊ शकतात, याचा आपल्याला अंदाज घेता येईल. सुरुवातीच्या आलापीनंतर लगेच मध्य लयीत चीज सुरू होते आणि पुढे द्रुत लयीत ती समाप्त होते. या दोन्ही शैलींमध्ये यमन राग ऐकायला मिळतो. अर्थात, कर्नाटकी शैलीत सूर कसा लावला जातो आणि त्यायोगे सांगीतिक अलंकार कसे घेतले जातात, याची या गायनातून आपल्याला सुरेख कल्पना येईल. विशेषतः: तानक्रिया घेताना तानेचा शेवट कसा घेतला जातो, हे ऐकणे अधिक उद्बोधक ठरावे. यात आणखी एक बाब विशेष उजळून येते, कर्नाटकी शैलीत ‘सरगम’ या अलंकाराचा प्रभाव अधिक आहे, पण सरगम घेण्याची पद्धत उत्तर भारतीय संगीतापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे नेहमीचाच यमन राग ऐकायला वेगळा वाटतो.
याच व्हिडियोत पुढे मालकंस रागातील एक छोटीशी रचना सादर केली आहे आणि तिथे ‘सशब्द क्रिया’ या शब्दाचा मघाशी मी जो उपयोग केला, त्याचे नेमके प्रत्यंतर येते आणि त्याचबरोबर हा अलंकार गळ्यावर चढवून घेणे किती अवघड आहे, याची कल्पनादेखील येते. जरा बारकाईने ऐकल्यास ‘सशब्द क्रिया’ ही क्रिया ‘तराणा’ या प्रकाराशी बरेच जवळचे नाते दर्शवणारी क्रिया असल्याचे लक्षात येते. सरगम घेताना शेवटच्या स्वरावर ठेहराव घेताना किंचित ‘टोक’ आणून तो स्वर विसर्जित करायची बालमुरली कृष्णन यांच्या गायनाची शैली फारच विलोभनीय होती.
मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकणारा गळा, घुमारेदार आणि आश्वासक सूर ही त्यांची खासीयत म्हणावी लागेल. तसेच ‘स्वरोच्चार’ आणि ‘दमसास’ ही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. रुंद, भरदार आवाज आणि त्याला साजेसा गरिमा त्याच्यांकडे होता. ‘गरिमा'’ म्हणजे ध्वनीचे लहान-मोठेपण. त्यांच्या गायनात जाणवणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीच्या आलापीनंतर मध्य लयीत बंदिश सुरू करायची झाली, तरी त्यात पायरी पायरीने बढत घेण्याची पद्धत त्यांनी अंगीकारलेली आढळते. त्यामुळे गायनातील ‘स्वर’ या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच ठरते. याचाच दुसरा परिणाम म्हणजे गाण्यातील शब्दांना गौणत्व मिळणे! भाषिक स्वरांपेक्षा व्यंजनांना उच्चारण्यात कमी श्वास लागतो. वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, घेतलेल्या श्वासात स्वरांचे काम दीर्घ पद्धतीने करता येते. त्यामुळे बालमुरली कृष्णन यांचा आवाज, त्यांनी केलेली मांडणी आणि त्यासाठी निवडलेले राग या सर्वांवर ‘घुमारायुक्त अखंडता’ या तत्त्वाचा वरचष्मा दिसतो. त्याचा वेगळा परिणाम होतो. तानक्रिया जाणवण्याइतकी द्रुत करून, त्यांचा आविष्कार करण्याचे तंत्र, गुंतागुंतीच्या, द्रुत-दीर्घ पल्ल्याच्या ताना सहज घेतल्या जातात. त्यामुळे ऐकणारा रसिक भारला जातो.
असा हा विलक्षण ताकदीचा कलाकार होता. या कलाकाराने स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने स्वतःचा निश्चित रसिकवर्ग तयार केला होता. सर्वांत महत्वाचे म्हणजे, कर्नाटकी संगीतात जाणीवपूर्वक प्रयोग करून रसिकांना कर्नाटकी संगीताकडे खेचून घेतले होते. आपल्याकडे एक फार मोठी खुळचट पद्धत आहे. एखादा लोकप्रिय कलाकार निजधामाला गेला की, आपल्या लोकांना लगेच ‘पोकळी’ जाणवते. वास्तविक, कुठलीही कला एकाच कलाकारावर अवलंबून नसते; परंतु इतका सारासार विचार फारसा आढळत नाही आणि भरमसाट विशेषणे लावून त्या व्यक्तीचा गौरव केला जातो. प्रथितयश कलाकार येतात-जातात. क्वचित एखादाच कलाकार असा निघतो, जो कलेच्या क्षेत्रात थोडीफार सर्जनशील भर टाकतो आणि त्या कलेची व्याप्ती रुंदावतो, पण त्यामुळे कलेच्या अवकाशात कायमचे रितेपण कधीच येत नसते. आता बालमुरली कृष्णन आपल्यात नाहीत, पण या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलाकारांना कृष्णन यांनी निर्मिलेली कलेची वेगवेगळी शिखरे निश्चित गुंगवून टाकतील.
लेखक शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment