देवेंद्र फडणवीसांचा ‘शहा’जोग सल्लावजा ‘आदेश’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 29 May 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

भाजप हा चेहरे कमी, मुखवटे जास्त असलेल्यांचा पक्ष आहे, हे अटल-अडवाणी युगापासूनच आपण बघत आलोय. आता त्यात फरक असा झालाय की, हळूहळू मुखवट्यांचीच अडचण होऊ लागल्यानं खऱ्या चेहऱ्यानंच लढण्याची तयारी गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्यानं समोर आलीय. अटल-अडवाणी युगाला अडगळीत टाकून मुखवटे फेकून खऱ्या चेहऱ्यानिशी आक्रमक खेळी खेळण्याचं नव युग निर्माण केलंय ते मोदी-शहा या दुकलीनं! ज्या साबरमतीच्या किनाऱ्यानं जगाला अहिंसेचा महात्मा दिला, त्याच किनाऱ्यावरून या जोडीचा उगम हा काळाचा महिमा की महात्म्याच्या शिकवणुकीचा पराभव?

मोदी-शहांच्या आशीवार्दानं महाराष्ट्रात मांड पक्की केलेले देवेंद्र फडणवीस म्हणजे पांढरपेशा, उच्च वर्ण, जाती-वर्गाचा ‘ब्ल्यू आय बॉय’! सभ्य, सुसंस्कृत, भ्रष्टाचाराचा डाग नसलेला असा बेदाग मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्धी पावलेला. थेट भाजपच्या पुढच्या संभाव्य पंतप्रधानांच्या यादीत, गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक मिळवलेला मुख्यमंत्री. पण एका पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यानची त्यांची अॅडिओ क्लिप दस्तुरखुद्द शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतच ऐकवल्यानं मुख्यमंत्र्यांसह भाजपचीच गोची झाली. फडणवीसांचा मुखवटाच फाडला सेनेनं!!

असं काही घडलं की, ज्यांच्यावर आरोप असतो, ते लगेच ठरावीक प्रतिक्रिया देतात : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय, आमचा विजय नक्की दिसत असल्यानं विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, ती टेप ऐकली नाही- माहिती घेऊ, कुठल्याही चौकशीला तयार, जनतेच्या न्यायालयात निर्णय लागेल वगैरे वगैरे. त्यात पुन्हा टेपमध्ये छेडछाड, फोरेन्सिक अहवाल मागवा, आदि वेळकाढू तांत्रिक मागण्या.

प्रगत तंत्रज्ञानामुळे अक्षरक्ष: काहीही होऊ शकत असल्यानं आरोपी किंवा दोषी यांना प्रथमदर्शनी संशयाचा फायदा मिळू शकतो. पण या टेप प्रकरणात फडणवीसांनी जो आक्रमक पवित्रा घेतला, तो निरपराधाऐवजी अपराध्याचा अधिक वाटला. कारण फडणवीसांनी टेप नाकारली नाही, आवाज अथवा संदेश नाकारला नाही, सामदामदंडभेदाचं (लंगडं) समर्थनही केलं. नाकारलं काय? तर सेनेनं हा संदेश अर्धवट ऐकवला!

शाळेतला वांड मुलगा अथवा सराईत गुन्हेगार शिक्षक वा पोलिस यांनी हात उगारायच्या आधीच अशी काही बोंब ठोकतो की, बाहेरून ऐकणाऱ्याला वाटावं किती निर्दयपणा चाललाय! यालाच ‘चोराच्या उलट्या’ किंवा ‘मुखवटी बोंबा’ही म्हणता येईल. आणि ही संघनीतीमधील एक चालही आहे. आपल्या विरोधात एखादा गुन्हा जाऊ लागला की, फिर्यादीपेक्षा आपलाच आवाज चढवायचा. आरोपातला अर्धा भाग मान्य करायचा आणि तोच जोरजोरात पुन्हा पुन्हा मांडत राहायचं आणि चर्चा एखाद्या शब्दावर सीमित करून पुढे नुस्ता शब्दच्छल करत राहायचं.

फडणवीस हीच संघनीती वापरत चर्चा ‘सामदामदंडभेद’ या शब्दापुरती सीमित करून ‘नीती’, ‘कुटनीती’ असा शब्दच्छल करत बसले. त्यांच्या या आक्रमक प्रत्युत्तराचा फायदा असा झाला की, त्यांच्या विरोधातली अधिकृत तक्रार सेनेनं नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं केली. उद्धव ठाकरे मराठी शिकवणीपर्यंत खाली आले. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, जे गृहमंत्रीही आहेत, गंभीर आरोप काही पुराव्यासकट करूनही सेना मुद्दा मध्येच सोडून मार्गस्थ झाली!

सरकारात असूनही विरोधात बोलणं, निवडणुकीत आमनेसामने येणं, हे ठाकरे सेना अगदी जोरात करते. पण मुद्द्यांवर सरकार सोडायची अथवा सत्ताधाऱ्यांना न्यायालयात खेचायची वेळ आली की, ‘योग्य वेळी’ असं उत्तर देऊन उद्धवजी सस्मित माघारी फिरतात, हा चार वर्षांचा इतिहास आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन्ही पदांचा योग्य वेळी, योग्य वापर फडणवीस करतात, हे आता उघड गुपित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी डरकाळी फोडली की, मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि वनमंत्री असलेल्या मुनगंटीवारांना भुसा भरलेला वाघ मातोश्रीवर भेट म्हणून देऊन यायची जबाबदारी देतात!

राजकीय पक्षांच्या आपापसातल्या नुरा कुस्ती या २४ तास माध्यमांना भरपूर खाद्य पुरवतात, पण विचारी व विवेकी जनांना चिंतित करतात. राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं म्हणून हेच फडणवीस, त्यांचा भाजप शरद पवारांवर तुटून पडत होते, विरोधी पक्षात असताना. चरित्र आणि चारित्र्याचे ढोल वाजवत हा पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत आला. सत्तेत आला तो तांत्रिकदृष्ट्या स्वबळावर आलाय. पण हे बळ त्यांनी स्वत:च ओवाळून टाकलेल्या विविध पक्ष आणि नेते यांना त्यांच्या मनी व मसल पॉवरसह भाजपचं ‘स्वच्छ चारित्र्याचं उपरणं’ गळ्यात अडकवून, पावन करून घेत मिळवलंय. हे असे आयात उमेदवार एकदा गाळणी लावून बाजूला करून भाजपनं दाखवावं स्वबळ! २०१४ला हा प्रयोग सुरू झाला आणि लोकसभा जिंकल्यावर तो अधिक आक्रमक व तितक्याच निलाजऱ्या पद्धतीनं पुढे रेटला जातोय.

पालघरला मुख्यमंत्र्यांची जी काही ‘वाणी’ किंवा ‘मन की बात’ व्हायरल झालीय, ती भाषा केंद्रातल्या मोदी-शहा जोडगोळीची देन आहे. सामदामदंडभेद हीच मोदी-शहा यांची विजयनीती आहे. जोडीला सोशल मीडियावरचा उन्माद, थैलीशहांचा अविरत पुरवठा आणि कायदा सुव्यवस्थेला कुणाही सत्ताधाऱ्याप्रमाणे बटिक बनवायचं. या अत्यंत खूनशी राजकारणाला वा नीतीला ‘कुटनीती’, ‘चाणक्य नीती’ म्हणून लेबलं लावायची, अमित शहांना ‘रणनीती शिरोमणी’ वगैरे बिरुदावल्या लावायच्या, ‘बुथ टु बुथ’ वगैरे थेअऱ्या पसरवायच्या आणि त्याखाली फक्त आणि फक्त ‘सामदामदंडभेद’ याचाच वापर करायचा. ‘कुटनीती’ म्हणजे ‘विरोध कुटून काढणारी नीती’!

पालघरची निवडणूक भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कारण पालघर हा पूर्वीचा ठाणे जिल्हा. इथल्या आदिवासी पाड्यांवर स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस व नंतर कम्युनिस्टांचा प्रभाव होता. आजही तुरळक प्रमाणात तो आहे. संघानं या आदिवासींमध्ये काम करायला सुरुवात करून वनवासी कल्याण आश्रमांच्या मदतीनं आदिवासींच्या मूळ जंगल संस्कृतीला, हिंदूंच्या ब्राह्मणी पितृसत्ताक संस्कृतीत आणलं. आजही ते त्यांना आदिवासी न समजता ‘वनवासी’ समजतात. चिंतामण वनगा अशाच आश्रमाचं फळ! त्यांच्या निरलस कार्याचं जोवर काही ‘मोल’ होतं, तोवर ते संघ व भाजपसाठी ‘अनमोल’ होते. त्यांच्या निधनानंतर ‘हवा तसा वारस’ नसल्यानं आता ‘शबरीची उष्टी बोरं’ खाण्याची गरज उरली नाही!

आगामी लोकसभेचा विचार करून, आणि समजा युती झालीच नाही तर काय? द्या २०१९चीही लिटमस टेस्ट. त्यामुळे आता वर्षा-सहा महिन्यासाठी जमीन तयार करण्यात जो वेळ जाईल, त्यापेक्षा आयात उमेदवार घेऊन, तयार मैदानावरच सामना रंगवायचा. जिंकलो तर नथिंग लाईट इट. हरलो तर ‘वनगा परिवारानं गैरसमजानं, विरोधकांना बळ दिलं’ असं वनगांवरच दोषारोप करणारं विधान करायचं. आणि आजच लिहून घ्या. समजा जिंकलेच तर ते ‘व्यक्ती नाही, पक्ष श्रेष्ठ असतो, जनाधार पक्षाचा असतो, तो नेतृत्व तयार करतो,’ अशी दर्पोक्ती करून भाजप वनगा परिवाराला खिजवणार.

पालघर आता जिल्हा झालाय. जे महत्त्व नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवडला आहे, ते भविष्यात पालघरला येणार. पुन्हा पालघर गुजरात सीमारेषा एकमेकांत मिसळल्यासारख्या. वनवासी आश्रम, म्हाळगी प्रबोधिनी, राम नाईकांचं एकेकाळचं प्रभावक्षेत्र, तेच आता उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणूक प्रचाराला येणं, यातून व्यापक रणनीतीचा भाग लक्षात यावा. बुलेट ट्रेनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि हितेंद्र ठाकुरांसारखे ‘बाहुबली’ कसे हाताळायचे, या सगळ्याची प्रयोगशाळा म्हणजे पालघर. वनगांशिवाय आता आदिवासींचं नवीन नेतृत्व आणायचं की, पुढेमागे ठाकुरांसारखे ‘बाहुबली’च स्वायत्त ठेवून पंखाखाली घ्यायचे?

ठाण्यात सेना, कल्याण-डोंबिवलीत समसमान, नवी मुंबईत राष्ट्रवादी नाईक. पनवेलात पूर्ण कमळ. ठाणे-भिवंडीकडून नाशिककडे जाणाऱ्या पट्ट्यात जो एक भाग गुजरातशी जोडला जातो, तिथे पुढच्या २५ वर्षांत पाय रोवायची ही सुरुवात आहे. सेनेला मुंबई उपनगरातून हलवून सायन, बांद्रापर्यंत सीमित करायची. ठाण्यात शहरातल्या शहरात आक्रसायची. मग ती उरते प्रामुख्यानं मराठवाड्यात. एकदा मुंबई-ठाण्यातून रेशन पाणी बंद झालं की, मराठवाडा ताब्यात घ्यायला वेळ लागणार नाही.

सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यातील बाहुबली अथवा नाराजा हेरा, त्यासाठी सामदामदंडभेद ही कुटनीती वापरा, असा खुला संदेशच खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलाय.

शिक्षणमंत्र्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘फडणवीस शब्दकोश’ अवांतर वाचनासाठी लावावा. आपादधर्म, शाश्वत धर्म आणि आता सामदामदंडभेद कुटनीती…शब्द व नवे शब्दार्थ वाहताहेत. अधिक आक्रमक व चेहरा, नावानिशी!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Tue , 29 May 2018


Samiksha JB

Tue , 29 May 2018

अत्यंत 'विकृत' आणि 'जातियवादी' या प्रकारामध्ये हा लेख मोडतो असे माझे मत आहे. 'अक्षरनामा' लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी वाचतात की नाही अशी शंका हा लेख वाचून आली. लेखातून मुख्यमंत्र्यांच्या जातीमुळे लेखक त्यांचा द्वेष करतात हे तर दिसलेच, पण आताकुठे प्रवाहात येऊ पाहणार्या आणि प्रगती करणार्या आदिवासी लोकांबद्दलही लेखकाच्या मनात राग आणि असूया आहे हेही जाणवले. आदिवासी प्रगती करतात यामुळे तुम्हाला का पोटशूळ उठतो ? त्यांनी मागास आणि जंगलातच रहावे, मग त्यांच्यावर नक्षल्याकडून दबाव टाकून सरकारविरूद्ध वापरायचे हा तुमचा डाव आहे का ? आणि काय हो, संघाने आदिवासी लोकांमध्ये काम केले, त्यांना मदत केली तर तुमचे काय जाते ? तुम्ही करा काम... तुम्हाला कोणी अडवले आहे का आदिवासींसाठी काम करायला ? म्हणजे स्वत: काही करणार नाही आणि दुसर्याने मदत केली तरी यांच्या पोटात दुखणार... कोणी आदिवासींसाठी काम करत नाही हे बघूनच, संघाने आदिवासींसाठी काम करायला, त्याना मदत करायला सुरूवात केली. यात काय चुकले ? अर्थात दान द्यायची, मदत करायची एक वृत्ती अंगात असायला लागते, ती सगळ्यांच्याच अंगात नसते. काही लोकांना, संस्थांना फक्त फुकट घ्यायची आणि देशाला लुटायची सवय लागली आहे, फक्त आम्हाला द्या, सगळं आम्हाला द्या...आम्ही मात्र कोणाला काही देणार नाही..त्यांना हे इतरांना देण्याचे, दान करण्याचे तत्वज्ञान समजणार नाहीच !!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......