‘परमाणु’ : इतिहास आणि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ यांच्यातील असंतुलनाचा विस्फोट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘परमाणु’ची पोस्टर्स
  • Sat , 26 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण Parmanu: The Story of Pokhran अभिषेक शर्मा Abhishek Sharma जॉन अब्राहम John Abraham

देशभक्ती आणि देशप्रेम हे राष्ट्रवादाशी जोडण्याची चूक जवळपास प्रत्येक राष्ट्र करत आलेलं आहे. अलीकडील काळात अशाच प्रकारच्या अतिरेकी आणि चुकीच्या पद्धतीनं मांडल्या (किंबहुना लादल्या) जाणाऱ्या राष्ट्रवादाचा भारतातील आणि भारतीय जनमानसावरील प्रभाव वाढीस लागला आहे. तो या ना त्या रूपात वेळोवेळी व्यक्त होत राहत असतो. मग चित्रपट या माध्यमातूनही त्याची वेगवेगळी रूपं दिसून येत असतात. अशा चित्रपट निर्मात्यांमध्ये प्रामुख्यानं नीरज पांडे, अक्षय कुमार आदि लोकांचा समावेश होत असतो. आता त्यात जॉन अब्राहम या नावाचीही भर पडली आहे इतकंच. 

अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘परमाणु’ मुख्यतः १९९८ मधील ‘पोखरण २’ ही आण्विक चाचणी आणि चित्रपटाचा ‘नायक’ अश्वत रैना भोवती (जॉन अब्राहम) फिरत राहतो. अर्थातच त्याला त्याच्या नायकाविषयी सांगण्यात अधिक स्वारस्य असल्यानं त्याचं लक्ष कायम आण्विक चाचणी आणि अश्वतचं वैयक्तिक जीवन या दोन्हींमध्ये विभागलं गेलं. परिणामी कथा कायम या दोन्हींपैकी अधिक लक्ष कुणाकडे द्यायचं, या प्रश्नानं ग्रासलेली दिसून येते. 

अश्वत रैना हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी १९९५ मध्ये भारताला आण्विक राष्ट्र बनवण्याच्या, तसंच पाकिस्तान-चीन आणि इतरही राष्ट्रांच्या शस्त्र सज्जतेच्या तुलनेत पुढे राहण्याच्या उद्देशानं भारतानंही आण्विक चाचणी घ्यावी असं मत मांडतो. जे तत्कालीन प्रशासनाकडून विचारात घेतलं गेलं असलं तरी त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्यानं ती चाचणीची तयारी अमेरिकेच्या नजरेत येऊन भारताला राजकीय दबावाला बळी पडून ती रद्द करावी लागते. ज्यात रैनाची मानहानी होऊन तो निलंबित होतो. मात्र १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार ही चाचणी करण्याचा निर्णय घेतं आणि त्याची जबाबदारी रैनावर येते. 

अर्थात हा झाला चित्रपटाच्या मुख्य कथानकाचा भाग. जो इथवर काही बदललेली नावं आणि उभा केलेला नायक वगळता इतिहासाशी फारशी फारकत घेत नाही. मात्र याला जेव्हा रैनाचं कुटुंब, त्याची पत्नी अशा उपकथानकांची जोड मिळते, तेव्हा मुख्य भाग आणि त्या अनुषंगानं चित्रपट रेंगाळू लागतो. शिवाय याला ‘क्रिएटिव्ह लिबर्टी’ असं म्हटल्यानं त्याबाबत तक्रार करायला फार जागा राहत नाही. 

फक्त मुद्दा इतकाच आहे की, जेव्हा अशा एखाद्या ऐतिहासिक क्षणाचं सिनेमॅटिक रूप पडद्यावर आणलं जातं, तेव्हा त्यात नाट्य किंबहुना तणाव निर्माण करण्याचे केलेले प्रयत्न, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून केलेले बदल, हे त्याच्या मूळ गाभ्याला आणि त्या घटनेला धक्का पोचवणारे नाहीत ना, हे पाहणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. कारण वैचारिक पातळी खालावून दाखवलेली दृश्यं देशभक्ती जागृत करणारी असली तरी चित्रपटात विशेष इनपुट देणारी ठरत नाहीत. 

जॉन अब्राहम या भूमिकेत योग्य ठरण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करत राहतो. याला मुख्य कारण त्याच्या अभिनयाच्या क्षमता असलं तरी मुळात त्याच्या ‘फोर्स’ आणि तत्सम चित्रपटांमधून निर्माण झालेल्या माचो भूमिकेतही हे पात्र कुठेच बसत नाही. त्यामुळे खरं तर या बाबतीत त्याचं शारीरिकदृष्ट्या अधिक फिट असणं इथं उणीव ठरतं. परिणामी गन लॉक्ड आहे हेही माहीत नाही, असं म्हणणारा धष्टपुष्ट जॉनचा रैना खरा वाटण्याची शक्यताच उरत नाही. 

याखेरीज चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी असणारी त्याची दोन स्वगतं अपरिणामकारक ठरण्यात त्याचा आणि दिग्दर्शक-लेखकांचा नाट्य निर्माण करण्यातील अभाव यांचं तर द्योतक आहेच. मात्र नीरज पांडे किंवा आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाखाली अक्षय कुमार किंवा मनोज वाजपेयी जी कामगिरी करतात, ती इतर कुणी तशा दिग्दर्शनाच्या आणि निष्ठेच्या अभावानं का करू शकत नाहीत, अशा प्रश्नही निर्माण होतो, ज्याचं उत्तर अर्थातच पडद्यावरील जॉनच्या रूपात समोर असतं. 

बाकी बोमन इराणी, डायना पेंटी, विकास कुमार, योगेंद्र टिकु, अनुजा साठे हे लोक शक्य त्या प्रकारे सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. इराणीला स्क्रीन टाइम कमी असला तरी तो एखाद-दुसरा अपवाद वगळता पडदा व्यापून टाकतो. खेरीज चित्रपट बरीचशी पात्रं स्टेरियोटाईप म्हणून वापरू पाहतो आणि काही वेळा त्याला याचा विसरही पडतो. उदाहरणार्थ आधी ऐकू आलेला रंगनाथनचा दाक्षिणात्य शैलीतील आवाज आणि बोलण्याचा लहेजा तीनेक वाक्यानंतर सामान्य पातळीवर येतो. जे हास्यास्पद ठरतं. 

तरीही चित्रपटात स्वतःची अशी काही रंजक दृश्यं आहेत. जी त्यांचं तणावपूर्ण वातावरण निर्माण करणारं अपयशी संकलनाकडे दुर्लक्ष करता उजवी ठरतात. स्वतः या चाचणीकरिता तयार केलेलं आणि समोर दिसणारं मिशनही खिळवून ठेवणारं आहे. त्यामुळे यात चांगल्या बाबी नाहीत असं नाही. फरक इतकाच आहे की, त्या वाईट बाबींसमोर झाकोळल्या जातात. 

आधीच बऱ्यापैकी लांबी असलेला चित्रपट त्यातील सचिन जिगरच्या गाण्यांमुळे अधिक रेंगाळत राहतो. नसता चित्रपट आहे त्याहून अधिक फास्ट पेस्ड आणि पर्यायानं सुकर झाला असता. शिवाय या चित्रपटाला असलेलं संदीप चौटाचं पार्श्वसंगीतही म्हणावा तो परिणाम साधत नाही. अर्थात ही अपरिणामकारकता एकवेळ सहनीय आहे. मात्र त्यासोबत ‘डंकर्क’ आणि ‘इंटरस्टेलर’च्या ओरिजनल पार्श्वसंगीतावर मारलेला डल्ला नक्कीच सहनीय ठरत नाही. (आणि ही कृती समर्थनीय तर नक्कीच नाही.) उलट ती चित्रपटाच्या उणीवा आणि समस्यांमध्ये भर घालतो. 

चित्रपटाच्या शेवटाकडे जात असताना दिग्दर्शक अचानक ‘एडगर राइट’ किंवा ‘रुबेन फ्लिशर’ बनत, आण्विक परीक्षणानंतर झालेल्या भूकंपासम हालचालीनंतर कुणी उडून पडत असतानाचं किंवा कॉफीचा कप हातातून निसटून पडत असण्याचं पॉज केलेलं दृश्य स्लो मोशनमध्ये दाखवत अचानक चित्रपटाला विनोदी अंगानं घेऊन जातो. ज्यामुळे त्याच्या दिग्दर्शकीय पातळीवरील निर्णयांवर शंका उपस्थित होते. 

चित्रपटाच्या नायकाच्या आगमनाला पडल्या नसतील तितक्या टाळ्या माजी पंतप्रधान वाजपेयींच्या एका क्लिपनं घेतल्याची परिस्थिती आणि पडद्यावरील ‘भारत माता की’च्या स्वराला चित्रपटगृहातून मिळणारा ‘जय’चा प्रतिसाद हा शासनकर्त्यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना जनमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्या स्वीकारल्याही गेल्या आहेत, याचं द्योतक आहे. 

एकूणच ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ हा इतिहास आणि त्याचे लेखक सैवीन क्वाड्रस, संयुक्ता चावला-शेख आणि अभिषेक शर्मा यांची ‘सिनेमॅटिक लिबर्टी’दरम्यान हेलकावे खात राहतो. आणि देशभक्तीपर चित्रपटांच्या यादीत आणखी एका नावाची भर घालतो. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Er

Sat , 26 May 2018

छान झालंय समीक्षण


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......