अजूनकाही
किशोर रक्ताटे यांचा ‘अॅड. प्रकाश आंबेडकरजी, तुम्ही नेमके कोणाच्या अन् कोणत्या हितासाठी लढत आहात?’ हा ‘अक्षरनामा’वरील (२४ मे २०१८) लेख वाचला. साधारणतः किशोर रक्ताटे हे त्यांची मतं मुद्देसूदपणे मांडतात. मी ‘अक्षरनामा’चा नियमित वाचक आहे. त्यामुळे किशोर रक्ताटे आणि राजा कांदळकर यांचे लेख मी नेहमी आवर्जून वाचत असतो. प्रत्येक लेखकाची विविध मतं असतात, ती तो मांडत असतो. त्यात काहीच गैर नाही, पण हा लेख मला अॅड. प्रकाश आंबेडकरणाची हेटाळणी किंवा द्वेष करणारा वाटला. (हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यांनी लेखात जी मतं मांडली आहेत, ती एखाद्या ट्रोलप्रमाणे आहेत. हा झाला लेखनशैलीविषयीचा अभिप्राय. आता आपण एका एका मुद्द्याकडे वळू. पण तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की, मी भारिपचा सदस्य नाही. तसंच अॅड. प्रकाश आंबेडकरजी हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, म्हणून मी हा लेख लिहीत नाही. (रक्तावरून मी कुणाचंच समर्थन करणार नाही!)
अॅड. प्रकाश आंबेडकरांना मी पहिल्यादां पाहिलं, ते रोहित वेमुलासाठी संघर्ष करताना. मी स्वतः त्यावेळेस हैदराबाद विद्यापीठात उपस्थित होतो. त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा आदर खूप वाढला. असो.
रक्ताटे तुमचा पहिला मुद्दा आहे की, अॅड. आंबेडकर रामदास आठवलेंशी स्पर्धा करायला बघतात. कशाला करतील ते स्पर्धा? त्यांना संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इकडे पाठिंबा मिळायला सुरुवात झालीय. (मी स्वतः या राज्यात फिरलो आहे.) तिथल्या लोकांना ज्या वेळेस अॅड. प्रकाश आंबेडकरांबद्दल समजलं, त्यावेळेपासून त्यांना लोकांचं प्रेम व समर्थन मिळायला सुरुवात झालीय. ज्या ज्या वेळेस एखाद्या दलित नेतृत्वाला सगळीकडून पाठिंबा मिळायला सुरुवात होते, त्या त्या वेळेस त्याला दुसऱ्या रिपब्लिक गटाच्या नेत्याशी स्पर्धा करतो म्हणून अडकवण्याची खेळी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आणि बऱ्याच पत्रकारांनी कायम केली आहे. (कालचा तुमचा लेख किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी/ पत्रकारांनी शेअर केला असावा, हे बघितलं पाहिजे.)
रामदास आठवलेंचा जनाधार खूप कमी झाला आहे, हे त्यांच्या येत्या मेळाव्यात दिसेलच. रोहित वेमुला, भीमा कोरेगाव, चिंचणेर-नाशिक दंगल, कोपर्डी या घटनांसाठी कुठला नेता सर्व ठिकाणी उभा राहिला असेल तर ते अॅड. आंबेडकरच आहेत.
तुमचा दुसरा मुद्दा आहे तिसरी आघाडी आणि व्यापक पाठिंबा याबाबतचा. एखाद्यानं तिसरी आघाडी करणं, हे त्याचं राजकारण असू शकतं. (कुमारस्वामी ३७ आमदारावर मुख्यमंत्री झालेत.) अॅड. आंबेडकरांनी जर तिसरी आघाडी उभारली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला काय प्रॉब्लेम आहे? मतं फुटायची भीती आहे का त्यांना? मग व्हा सामील तिसऱ्या आघाडीत. अॅड. आंबेडकरांच्या तिसऱ्या आघाडीची विचारधारा मला कायम प्रभावीत करत आली आहे. भले ते या राजकारणात यशस्वी नाही होऊ दे, पण त्यांचा त्यामागे एक विचार आहे.
............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4417
.............................................................................................................................................
व्यापक समर्थनाबद्दल बोलायचं झाल्यास सध्याच्या घडीला दलित समाजाबरोबरच इतर समाजसुद्धा अॅड. आंबेडकरांना पाठिंबा देत आहे. मराठा मोर्च्याच्या वेळेस दलित विरुद्ध मराठा असा वाद पेटला असताना त्यांनी मराठा मोर्चाविरुद्ध मोर्चा न काढण्याचा सल्ला देऊन गढूळ वातावरण निवळायला मदत केली होती. (त्यावेळेस मराठा समाजानं त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं.) इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत नसते. त्यामुळे या वेळेससुद्धा ते फक्त पत्रकार परिषद आणि मोठ्या मोठ्या गप्पांसाठी उरणार नाहीत. हे मी ग्राउंडवर अभ्यास करून, विविध घटकांतील लोकांशी बोलून बनवलेलं मत आहे.
धनगर, धनगड आरक्षणाचा विषय कोण लांबवत आहे आणि का, हे टाटा इन्स्टिट्यूटला विचारलं तर समजेल. तुमचा मुळात अॅड. आंबेडकर धनगर मेळाव्यात जातात आणि आपण सत्ताधारी होऊया अशी घोषणा देतात, याला का आक्षेप आहे ते समजलं नाही. यात तुम्हाला गंमत का वाटली, ते स्पष्ट नाही.
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी ‘माधव’ फॉर्मुल्यानं सत्ता आणली, हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. महादेव जानकर यांच्या मागे असेल ताकद, म्हणून काय अॅड. आंबेडकरांनी जाऊच नये असं मत आहे का तुमचं?
रिपब्लिकन ऐक्य म्हणजे नक्की काय हे मला तरी उमजलं नाही. माझं वय २६ आहे. अगोदर काय झालं माहीत नाही. आजकाल कोणही उठतो आणि रिपब्लिक गट काढतो. त्याला मीडिया फुटेज देतं. दलितांनी फक्त दलित पक्षांची वोटबँक का व्हावी? मला तर किती छोटे-मोठे पक्ष कार्यक्षम आहेत हेही माहीत नाही. हां, आंबेडकरी राजकारणातील काही लोक एकत्र आले पाहिजेत, हे मला वाटतं, पटतं. अॅड. सुरेश माने हे त्यातलं एक नाव.
अॅड. आंबेडकरांना बहुजन समाजातील कार्यकर्ते आपलेसे करता आले नाहीत म्हणजे काय? प्रत्येक माणूस हा राजकारण काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. हळूहळू शिकतो. बहुजन समाजातले कार्यकर्ते त्यांच्यामागे उभेच आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल.
एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाला असा प्रश्न विचारणं की, ही निवडणूक तुम्ही का लढत आहात? तुमची किती ताकद आहे? हे सभ्यतेला धरून नाही असं मला वाटतं. हाच प्रश्न तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विचारा. शरद पवारांना विचारा. (राष्ट्रवादीचे गोंदियाचे उमेदवार मधुकर कुकडेनं खैरलांजीमध्ये काय भूमिका घेतली आणि काय काय केलं, हे तुम्हाला माहीत असतं, तर तुम्ही हाच प्रश्न शरद पवारांना विचारला असता.)
अॅड. आंबेडकरांनी ‘मनमोहनसिंग हे राहुलपेक्षा उजवे आहेत’ अशा अर्थाचं एक विधान केलं. त्याला इतकं उचलून फक्त तुम्हीच धरलं असावं. मनमोहनसिंग हे आघाडीचे सरकार चालण्यात माहीर आहेत, म्हणून त्यांचं ते विधान आलं असावं. त्यात एवढं काय?
भारतीय लोकशाही ही फक्त द्विपक्षी नाही. फक्त भाजप जावा म्हणून ही निवडणूक असणार आहे का? काँग्रेसनं कर्नाटकमध्ये लहान भावाची भूमिका घेतली तर कितीसं बिघडणार आहे? प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना दिल्लीमध्ये कसं दुखवल गेलं आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. (२० मिनिटं आणि टाइमओव्हरच्या बेलचा किस्सा ममता, चंद्राबाबू नायडू के.सी. आर., नवीन पटनाईक यांच्या मनातून गेला नसेल अजून.)
मुळात तुम्ही अशी अपेक्षा का करत आहेत की, अॅड. आंबेडकरांनी तिसरी आघाडी न उभारता काँग्रेस आघाडीत सामील व्हावं? तशी जर काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी पुढं आलं पाहिजे (भाजपनं रासप, आरपीय, शिवसंग्राम यांच्यासोबत युती करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला होता.).
शेवटचे काही मुद्दे. तुम्ही शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. दोन राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टिप्पणी केली तर बिघडलं कुठे? त्यांनी खरं तेच सांगितलं की, शरद पवार हे पंतप्रधान नाही बनू शकत. तुम्हाला शरद पवार कुठल्या दृष्टीनं जातीधर्मापलीकडे गेलेले दिसले?
खैरलांजीला तंटामुक्त गावाचा पुरस्कार कुणी दिला? ज्या रयतचे पवार अध्यक्ष आहेत, त्या रयतच्या शाळेत नितीन खर्डेचा जो अमानुष खून झाला, त्याबाबत पवारांनी काय भूमिका घेतली? ज्या ज्या शिक्षकांनी साक्ष बदलली, त्यांच्यावर काय कारवाई केली? समता परिषदमुळे कुणाला धडकी भरली? इतक्या राष्ट्रवादीच्या लोकांवर आरोप झाले, त्यातले फक्त छगन भुजबळ आत गेले. भीमा कोरेगावमध्ये दलितांवर जो हल्ला झाला, त्याच्या आजूबाजूला कुठल्या पक्षाची सत्ता आहे? असो.
बहुजन युवकाला बाहेर काढायची जबाबदारी फक्त अॅड. आंबेडकरांनीच का घ्यावी? ते मनोहर भिडे जिकडे वाढले, तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची उठबस असते मनोहर भिडे यांच्यासोबत. ती जबाबदारी सर्वार्थानं शरद पवारांची आहे. मान्य आहे की, अॅड. प्रकाश आंबेडकर हे परिवर्तनवादी चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव आहे, पण समाजसुधारणेची सगळी अपेक्षा त्यांच्याकडूनच करणं मला पटलं नाही.
शेवटी मला आश्चर्य वाटलं किशोरजी, तुम्ही हा प्रश्न विचारला की, तुम्ही नेमके कोणाच्या अन कोणत्या हितासाठी लढत आहात? माझं स्पष्ट मत आहे की, अॅड. आंबेडकर महाराष्ट्रासाठी, इथल्या आर्थिक प्रश्नांसाठी आणि वंचित जनतेसाठी लढत आहेत. मग त्यात शिक्षणासाठी भरसमाठ फी द्यावी लागणारा मराठा असो किंवा ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून दुसऱ्या जातींकडून विनाकारण द्वेष मिळणारा असो वा बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून मरणारा सागर असो! रोहित वेमुलापासून ते काल-परवाच्या मुंबई मोर्च्यापर्यंत अॅड. आंबेडकरांचं नेतृत्व अधिकच उजळून निघत आहे.
किशोरजी मी तुमच्यापेक्षा लहान आहे. माझ्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे, तरीही तुमच्या लेखाचा प्रतिवाद केला. क्षमस्व!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Sat , 26 May 2018
मत मांडायचा अधिकार मिळतोच.तो तुम्ही तुमच्या पध्दतीने साधार मांडायचा प्रयत्न केलाय.तो स्वागतार्ह आहे.त्यामुळे क्षमस्व वगैरे अप्रस्तुत विनयाची गरज नाही.
Sanjay Pawar
Sat , 26 May 2018
लेखाचा प्रतिवाद केलाय तर शेवटी क्षमस्व कशाला?विचारांची लढाई लढताना वय,अनुभव,या गोष्टी विचारात घ्याव्यात असं जरी असलं तरी मतदानाचा अधिकार असलेलं वय पार केलं की
Gamma Pailvan
Fri , 25 May 2018
एक वाचक, तुम्ही सव्वीस वर्षांचे तरुण आहात. तुम्हांस अजून बरंच जग बघायचंय. एक गोष्ट सांगतो. इच्छा असेल तर ऐका. प्रकाश आंबेडकरांना जो पाठींबा मिळाल्यासारखा वाटतोय ना, तो त्यांच्या नक्षली कनेक्शनमुळे आहे. तेव्हा सांभाळून. आपला नम्र, -गामा पैलवान (तळटीप : तुमच्या तुलनेने सव्वीसाव्या वर्षी मला काहीच अक्कल नव्हती. मी पप्पूसारखा बेंबट्या होतो. तुम्ही डोळे उघडे ठेवून निरीक्षण करणारे दिसताय. तेव्हा नक्षाल्यांकडे लक्ष असू द्या.)