‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’!
ग्रंथनामा - आगामी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘चौकट वाटोळी’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 25 May 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस अविनाश कोल्हे Avinash Kolhe चौकट वाटोळी Chukat Vatoli विश्वकर्मा पब्लिकेशन्स Vishvkarma Publications

अविनाश कोल्हे यांच्या ‘चौकट वाटोळी’ या आगामी कादंबरीतला काही भाग. ही कादंबरी विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे यांच्याकडून जून महिन्यात प्रकाशित होत आहे.

.............................................................................................................................................

दुसरे दिवशी रविवार होता. कलाल संध्याकाळी बाहेर पडले व मोटारसायकल काढून शनीवारवाड्याजवळ येऊन थांबले. तेथे रविवार संध्याकाळची तोबा गर्दी उसळली होती. त्यात पर्यटक होते. त्यांना शनिवारवाडा बघायचा होता. काही सहज फेरफटका मारण्यासाठी आले होते. या सर्व गर्दीत कलाल निष्कारण वासंतीला शोधत होते. तर्कशुद्ध विचार केल्यास तेथे त्यावेळी वासंती येणे शक्य नव्हते. रविवार म्हणजे तिच्या कंपनीला हाफ डे. ती दुपारीच घरी गेली होती. कलालांसारखी प्रेमात असलेली व्यक्ती असा तर्ककठोर विचार करू शकत नाही.

कलालांचे डोळे सर्वत्र वासंतीला शोधत होते. आजूबाजूचा अंधार वाढत होता. पर्यटकांची गर्दी ओसरली होती. कलाल हिरमुसले. साडेसात वाजायला आले होते. शनिवारवाड्याभोवती अंधाराचे साम्राज्य वाढायला लागले. कलालांनी अर्धा पाकिट सिगरेटी ओढून संपवल्या होत्या. मोठ्या नाखुशीने त्यांनी मोटारसायकल सुरू केली व घराच्या दिशेने सोडली. त्यांना घरी जाण्याची फारशी इच्छा नव्हती. त्यांनी मोटारसायकल वेस्ट एंड थिएटरजवळच्या ‘ए वन बार’ समोर लावली. आज त्यांना रघूची कंपनीसुद्धा नको होती.

सोमवारी संध्याकाळी कलाल इंजिनियरींग कॉलेजजवळ थांबलेले होते. वासंती उतरली व तिने अपेक्षेप्रमाणे इकडेतिकडे पाहिले. तिला मोटारसायकलजवळ उभे असलेले कलाल दिसले.

कलालांनी नेहमीची ऑर्डर दिली व तिला म्हणाले ‘अगं. काल मी संध्याकाळी शनिवारवाड्याजवळ आलो होतो व तुला शोधत होतो.’

‘अहो मला काय माहिती? मी तुळशीबागेत गेले होते. आता संक्रात येतेय ना. त्याची तयारी करण्यासाठी मी मुलीला घेऊन थोडी खरेदी केली.’

तिला कलालांच्या मनांतील घालमेलीचा अंदाज नव्हता. तिला वाटले कलाल सहज काही कामानिमित्त शनिवारवाड्याकडे आले असतील.

कलाल मान खाली घालत म्हणाले ‘काल मला तुला भेटण्याची इच्छा होत होती.कमीत कमी तू दिसावीस असे फार वाटत होते. मी तेथे साडेसातपर्यंत वाट बघत बसलो होतो’.

हे ऐकून तिला फार आश्चर्य वाटले. तिने कलालांच्या चेहऱ्याकडे निरखून बघितले. रात्री झोप व्यवस्थित झाली नाही तर जसा चेहरा दिसतो तसा दिसत होता.

तिने काळजीने विचारले ‘काय झाले? चेहरा असा का दिसतोय?’.

‘नाही ग. मात्र काल तुझी खुप आठवण येत होती. मला राहवले नाही म्हणून मी संध्याकाळी इकडे आलो’.

‘अहो. आज मी भेटणारच होते ना. मग काल एवढ्या वेळपर्यंत थांबण्याची काय गरज होती?’

कलाल गप्प बसलेले होते. तिला कलालांची मनस्थिती समजली. ती मृदू आवाजात म्हणाली ‘फार आठवण येत होती का माझी? काय करू? मला माहिती असते तर मी काही तरी निमित्त काढून शनीवारवाड्याकडे आली असती.’

कलाल काही न बोलता सिगरेट ओढत होते. तिला कलालांना असे गप्प बसलेले बघायची सवय नव्हती. एका बाजूने तिच्यातल्या स्त्रीला आनंद होत होता व दुसरीकडे आपल्यामुळे काल कलालांना मानसिक त्रास झाला याचा तिला त्रास होत होता.

ती अचानक म्हणाली ‘पुढच्या आठवडयात एखादे दिवशी दांडी मारायची का?’

कलालांचा चेहरा उजळला. त्यांनी चटकन सिगरेट समोरच्या अॅश ट्रेमध्ये विझवली. ‘चालेल. पण मग पुढच्या का? याच का नाही? आज सोमवार आहे. आपल्याला आजच ठरवता येर्इल.’

‘मला वाटते की बुधवारी जमू शकेल. म्हणजे मग गुरूवारची हक्काची सुट्टी आहेच.’

‘यस्स. बुधवारी मी पण एक कॅज्युअल टाकतो म्हणजे मग उगीच मनावर ताण नको. आमच्याकडे नवीन कमीशनर आलाय. तो बराच खडुस आहे. आम्ही दोघे राजकोटला एकत्र होतो तेव्हापासून त्याचा माझा छत्तीसचा आकडा आहे. उगीच छोट्याशा गोष्टीसाठी साल्याच्या तावडीत सापडायला नको. बरं. बुधवारी नेहमीच्या ठिकाणी म्हणजे दापोडीला व नेहमीच्या वेळी.’

त्यांनी बुधवारचे पक्के केले. घरी जातांना वासंतीच्या मनात विचार येत होते की असे नेहमी नेहमी दांडया मारणे आपल्याला परवडणार नाही. एव्हाना तिला नव्या कंपनीतील कार्यसंस्कृतीचा अंदाज आला होता. येथे विश्वासू व कामसू कर्मचाऱ्यांची कदर होते हे तिच्या लक्षात आले होते. तिच्या कामातील कार्यक्षमतेबद्दल वाद नव्हता. आता तिची नियमितता जोखली जाणार होती. तसे पाहिले तर कॅज्युअल लिव्ह घेणे कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. पण म्हणून प्रत्येक कॅज्युअल गुरुवारला जोडूनच घेतली पाहिजे असा काही नियम नाही.

आपण उगीचच कलालांना सुट्टी काढू असे म्हटल्याचा तिला आता थोडासा पश्चाताप होत होता. यापुढे जरा विचार करून सुट्टया घेतल्या पाहिजे असा निश्चय तिने मनाशी केला.

मात्र बुधवारी कलालांनी तिला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी मोटारसायकल दापोडीतून भोसरीला घेतली व तेथून सरळ आळंदीच्या दिशेने निघाले. तिला राहवले नाही व ती ओरडून त्यांना म्हणाली ‘अहो इकडे कोठे निघालो आपण? लोणावळ्याला जायचे ना?’

‘नो. आज आपण आळंदीला जात आहोत. देवदर्शनाला.’

तिला कमालीचे आश्चर्य वाटले. तिला वाटत होते की कलालांच्या मनांत वासना उसळया मारत आहे व म्हणून ते त्या दिवशी शनिवारवाड्याजवळ वाट बघत होते. तिच्याही मनांत त्या उसळल्या होत्या. त्यासाठी ती आज खास कॅज्युअल घेऊन आली. त्याचा फायदा घेण्याऐवजी कलाल तिला आळंदीला घेऊन चालले होते. तिला काही कळेनासे झाले.

आळंदी आली. त्यांनी आधी एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये चहा घेतला व मिसळ खाल्ली. मिसळ झणझणीत होती. वासंती ‘सुं सूं’ करायला लागली. तिला ते काही खाता येर्इना. कलालांनी एक बिस्कीटाचा पुडा मागवला. तिने तो पुडा आख्खा संपवला.

‘मिसळ काय तिखट आहे. ही लोकं कसे इतके तिखट खातात माहिती नाही. एका घासातच माझे नाक वाहायला लागले’.

कलालांनी एक सुरक्षित जागी मोटारसायकल उभी केली व ते दोघे मंदिराकडे चालू लागले.

आडवार असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती. वासंती तशी नास्तिक होती. माऊलीच्या मंदिरातील वातावरणाचा तिच्या मनांवर परिणाम व्हायला लागला. तिने मनांपासून नमस्कार केला व बाहेर आली.

कलाल तिची वाट पाहात होते. तिने कलालांकडे पाहिले व तिच्या मनांत त्यांच्याबद्दल उत्कट प्रेम उफाळून आले. ती दोघेही मंदिरातल्या परिसरात र्बयाच वेळ बसून होती. ती दोघं फारसे बोलत नव्हती.

ते दुपारी दोनच्या आसपास आळंदीहून निघाले व लवकरच पुणे स्टेशनच्या भागात पोहोचले. कलालांनी बंड गार्डनकडे मोटारसायकल घेतली व ते गार्डनमध्ये गेले. त्यांनी एक निवांत जागा बघितली व ते बसले.

वासंतीला सकाळपासून एक प्रश्न त्रस्त करत होता. एवढी चांगली संधी आलेली असूनही कलालांनी आपल्या लोणावळयाला न नेता आळंदीला देवदर्शनाला का नेले. तिने हिय्या करून हा प्रश्न विचारला.

‘अगं. लोणावळयाला तर आपण कधीही जाऊ शकतो. पण मला आज असे वाटले की तुला घेऊन आळंदीला जावे. लहानपणी मी काकांबरोबर येथे चारपाच वेळा गेलो होतो. कॉलेजमध्ये असतांनासुद्धा दोनचार वेळा टारगट मित्रांबरोबर गेलो होतो. तेथे गेलो की मनांला बरं वाटते. रागावलीस?’

‘नाही. रागावले नाही. पण मला जरा आश्चर्य वाटले म्हणून विचारत होते.’

वेळ दुपारची होती. गार्डनमध्ये फारशी गर्दी नव्हती. दोनचार कपल्स होती. ती स्वतःच मग्न होती. कलालांना एक आंब्याचे डेरेदार झाड दिसले. ते तिला घेऊन त्या झाडाखालच्या सावलीत, झाडाच्या भल्या थोरल्या बुंध्याला टेकून बसले.

तिला काय वाटले कोण जाणे तिने मांडी मारली व कलालांच्या डोके मांडीवर घेतले. कलालांनीसुद्धा मग पाय सरळ केले व तिच्या मांडीवर डोके ठेवले.

जानेवारीचा महिना होता. वातावरण प्रफुल्लित होते. हवेत हलकासा गारवा होता. आजुबाजुला थोडीशी वर्दळ होती पण एरव्ही शांतता होती. अशा वातावरणात त्यांची मनं एकमेकांशी बोलत होती. अशा संवादाचा दोघांनाही पूर्वानुभव नव्हता.

ती शांतपणे कलालांच्या केसांतून हात फिरवत होती. कलाल डोळे मिटून पडले होते. दोघांसाठी काळ जणू थबकला होता.

पाच वाजायला आले. तिने अगदी हळू आवाजात ‘निघायचं का? पाच वाजायला आलेत’ विचारले.

‘थांब ग. काय घार्इ आहे?’

कलालांना त्या वातावरणातून बाहेर निघावेसे वाटत नव्हते. अशात दहापंधरा मिनिटं गेलीत. शेवटी कलाल स्वतःहून उठले.

ती दोघं गार्डनच्या बाहेर आली व मोटारसायकल काढून मार्गस्थ झाली.

....

त्या दिवशी वासंती घरी गेली ती एका उदात्त आनंदात. तिला आठवले की ती दोघं दुसऱ्यांदा जेव्हा लोणावळ्याला जाऊन आली होती, तेव्हासुद्धा तिचे मन असेच आनंदात होते. तो देहाचा आनंद होता व आज ती आध्यात्मिक आनंद उपभोगत होती. तिचा चेहरा तृप्त दिसत होता.

त्या आनंदातच तिने सासुला प्रसाद दिला. सासुच्या चेर्हयावर प्रश्नार्थक चिन्ह बघून तिने सांगितले की तिच्या डिपार्टमेंटचा एक प्युन आळंदीला गेला होता व त्याने प्रसाद आणला.

....

कलाल आणि वासंती यांच्यातल्या प्रेमाचे रूटीन पक्के झाले होते. आठवड्यातून एक-दोनदा संध्याकाळी भेटणे होत असे. यातही सहसा सोमवार असेच असे. त्यानंतर जमल्यास शुक्रवारी संध्याकाळी. त्यांचे संध्याकाळच्या गप्पा करण्याचे हॉटेल ठरलेले होते व तेथे काय ऑर्डर करायचे हेसुद्धा ठरलेले होते. जमल्यास महिन्यातून एखाद्या शुक्रवारी किंवा बुधवारी ती कॅज्युअल घेत असे. तिने ऑफिसमध्ये सासुच्या सततच्या आजारपणाची सॉलिड स्टोरी तयार करून ठेवली. नवऱ्याची नोकरी फिरतीची असल्यामुळे तिलाच घराची सर्व जबाबदारी उचलावी लागत असे वगैरेमुळे तिच्या दांड्या मारणे फारसे खुपत नसे. इतर दिवशी ती एवढे मन लावून काम करत असे की तिच्याबद्दल तक्रारीला जागा नव्हती.

एका प्रकारे तिचा दुसरा, समांतर संसार मार्गी लागला होता.

तशाच एका संध्याकाळी कलालसाहेब कसले तरी कागदपत्रं घेऊन आले होते. आकुर्डीच्या पुढे असलेल्या निगडी येथील प्राधिकरणात एक हाऊसिंग सोसायटी होणार होती. त्यात सभासद झाल्यास दिवाळीपर्यंत, नाही तर पुढच्या वर्षी टू रूम किचनचा ब्लॉक मिळणार होता. सध्या सभासद होण्यासाठी दहा हजार रुपये भरावे लागणार होते. बाकीची सर्व रक्कम हाऊसिंग सोसायटी कर्जाद्वारे उभी करणार होती. सभासदांनी ब्लॉकचा ताबा घेतल्यानंतर पुढची वीस वर्षे या कर्जाचे हप्ते भरायचे होते.

कलाल तिला ही स्किम समजुन सांगत होते. तिला त्यातले काहीही कळत नव्हते. कलाल हे सर्व आपल्याला का सांगत आहे हेच तिला समजत नव्हते. वासंती मुळात समजुतदार असल्यामुळे ती मन लावून कलाल काय सांगत आहेत हे ऐकत होती.

सर्व सांगून झाल्यावर कलालांनी तिच्याकडे अपेक्षेने बघितले. तिने हळूच ‘मग मी यात काय करावे?’ असे विचारले.

कलालांनी तिच्याकडे दोन सेकंद टक लावून बघितले व नंतर जराशा अविश्वासाने विचारले ‘मी एवढा वेळ जे बोललो त्यातले तुला काहीच कळले नाही का?’

तिने मानेने नकार दिला.

कलाल पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने घायाळ झाले. मानेने नकार देताना ती गोड दिसत असे. मधोमध भांग, त्यात भरलेला सिंदूर, मानेवरून घेतलेला पदर, कानातले थोडेसे लोंबत असलेले इअररिंग वगैरेंच्या हालचाली कलालांना फार मोहक वाटत असत.

कलालांनी एकदा हातातल्या घडाळयाकडे बघितले. त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांच्याजवळ जवळजवळ पाऊण तास आहे. पुढच्या अर्ध्या तासांत त्यांनी तिला व्यवस्थित समजून सांगितले.

‘हे बघ. तुम्ही आता राहता त्या वाडयात तुम्ही भाडेकरू आहात. तेथे तुमच्यासारखे सर्वजण भाडेकरूच आहेत. हाऊसिंग सोसायटी म्हणजे तेथे सर्व जण आपापल्या ब्लॉकचे मालक.  पाचपंचविस लोकांनी एकत्र यायचे व एक सोसायटी स्थापन करायची. त्यांनी सोसायटीचे सभासद होतांना काही एक रक्कम द्यायची. समजा ती रक्कम दहा हजार रूपये आहेत व सोसायटीत वीस सभासद आहेत तर सोसायटीकडे दोन लाख रूपये जमतील. या दोन लाखांनी सोसायटी एक प्लॉट विकत घेर्इल व मग बिल्डरला बोलावून त्याला तेथे ब्लॉक बांधण्याचे काम देर्इल. मधल्या काळात सोसायटी एखाद्या हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घर बांधण्यासाठी कर्ज मिळवेल व या कर्जाच्या पैशातून बिल्डरकडून ब्लॉक बांधून घेर्इल. ब्लॉक तयार झाले की मग सभासद दरमहा हप्ता भरून त्या कर्जाची परतफेड करतील. हे कर्ज टीव्ही किंवा फ्रिजसारखे तीन किंवा पाच वर्षांत फेडायचे नसते तर परतफेडीसाठी चांगले वीस-पंचवीस वर्षे मिळतात. कर्ज फिटले की घराची मालकी आपल्याकडे. कळलं?’

वासंतीला थोडेसे कळले होते पण बरेचसे कळले नव्हते. ती शांतपणे ऐकत होती.

शेवटी कलाल म्हणाले ‘आता तुला वाटत असेल की हे सर्व मी तुला का सांगत आहे?’

‘अहो. माझ्या मनांतला प्रश्न विचारलात. मला मेलीला यातले काही कळत नाही.’

‘हे बघ. माझी इच्छा आहे की तू या सोसायटीत सभासद व्हावेस.म्हणजे आठदहा महिन्यांत तुझा स्वतःचा ब्लॉक होर्इल.’

‘तुझा स्वतःचा ब्लॉक’ हे शब्द ऐकल्यावर वासंतीच्या अंगातून वीज चमकून गेली. तिने स्वप्नातही कधी स्वप्न बघितले नव्हते की पुण्यात, अगदी निगडीसारख्या दुरच्या पुण्यात, तिचा स्वतःचा, स्वतःच्या मालकीचा ब्लॉक होर्इल. तिची छाती आनंदाने धडधडायला लागली. तिने कलालांकडे थोडाशा अविश्वासाने पाहिले. साहेब आपली थट्टा तर करत नाही ना अशी शंका तिच्या मनांत येऊन गेली.

तिच्या मनांतील शंका अगदी स्वाभाविक होत्या. मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, नोकरी करणारी महिला स्वतःच्या मालकीच्या जागेचे स्वप्नसुद्धा बघू शकत नाही अशी परिस्थिती नेहमीच होती.

तिला बराच वेळ काय बोलावे हे समजेना.

तिची मानसिक स्थिती कलालांच्या लक्षात आली.

‘तू काही काळजी करू नको. मुख्य म्हणजे कसलेही टेंशन घेऊ नको. मी आहे ना सर्व काही सांभाळायला’.

तिच्या डोळयांत कृतज्ञता दुथडी भरून वाहायला लागली. बघताबघता तिचे डोळे भरून आले. तिने हळूच डोळे पुसले. कलाल म्हणाले ‘आता रडतेस कशाला?’

तिने तिच्या सवयीप्रमाणे मान हलवली व मनापासून हसली.

‘तुम्हाला काही कळत नाही. अहो हे आनंदाचे अश्रू आहेत. दुःखाचे नाहीत’ म्हणत तिने कलालांच्या हातावर स्वतःचा हात ठेवला. कलालांनी इकडेतिकडे बघितले व हळुच तिच्या हाताचे चुंबन घेतले. तिने घार्इघार्इने हात मागे घेतला व कलालांनी वेटरला बिल आणण्याची खूण केली.

मोटारसायकल सुरू करताना कलाल तिला म्हणाले ‘हे बघ. ती संधी सोडू नको. आमच्यासारख्यांच्या नोकरीचा काही भरवंसा नसतो. आज इथे तर उद्या तिथे. आज मी इथे आहे. त्या प्रोजेक्टमधील लोकं माझ्या परिचयाचे आहेत. पटकन तुझे काम होर्इल आणि तुझा स्वतःचा ब्लॉक होर्इल. फारसा विचार करू नको. माझ्यावर विश्वास ठेव.’

‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4424

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.         

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......