अजूनकाही
तो इयत्ता आठवीत होता तेव्हाची गोष्ट. कधी कधी, नव्हे रोजच त्याला सकाळी उठायचा कंटाळा यायचा. पण नियमित क्लासला जाणं तर भाग आलंच. मग हा पठ्ठ्या पहाटे अलार्म वाजला की, बिछान्यातूनच गिझरला सांगायचा, ‘चल पाणी तापवायला घे.’ बरं, गिझरनं नुसतं पाणी तापवायचं नाही तर गरम आणि थंड पाण्याची योग्य मात्रा त्यात घ्यायची. हे प्रमाण ठरवायलाही तो नळाला हात लावणार नाही. गिझरनं स्वत:हूनच हे काम करायचं. इतकंच नव्हे तर आंघोळ करता करताच तो टोस्टरलाही हुकूम द्यायचा- आंघोळ होत आली आहे, ब्रेड टोस्ट करून घे. गिझर आणि टोस्टर गपगुमान त्याचं म्हणणं ऐकायचं.
सेन्रसच्या लिफ्टच्या दरवाज्यात तर अशी काही गडबड करायचा की, माणूस उभा राहिला तरी दार उघडायचंच नाही. कधी वर्गात बसून मैदानावर फटाके फोडायचा. शिक्षकांना पत्ताच लागायचा नाही, फटाके फोडत कोण आहे आणि वर्गात बसून हा सर्वांची मजा घ्यायचा. मग त्याच्या पालकांनी दूर हैद्राबादमध्ये कॉलेजसाठी धाडलं. पण तिथंही तो गप्प थोडाच बसणार होता? हॉस्टेलवर घरच्यासारखं आयतं जेवण कुठून मिळणार, पण याची करामतच अशी ना हुकूम देऊन फर्माईशी पूर्ण करण्याची. हा भिडू हॉस्टेलवर पोहचण्याआधी आपल्या फोनवरून कुकरला सूचना द्यायचा. दोन माणसांचं भात-वरण लाव. कधी कधी तर मसालेभात, लेमन-राईचीसुद्धा फर्माईश करायचा. तो हॉस्टेलवर पोहचेपर्यंत त्याचा कुकरही त्याच्या फर्माईशीनुसार गरमागरम जेवण तयार करायचा. भारी गमत ना!
त्याच्याकडे एक हेल्मेट आहे. दारूडा माणूस ते हेल्मेट घालून गाडी चालवूच शकत नाही. आणि समजा तुम्ही वेग वाढवला, वेडीवाकडी गाडी चालवू लागला की, त्याचं हेल्मेटही त्याच्यासारखं सूचना करायला सुरुवात करतं. ‘हळू चालव नाहीतर मी गाडी थांबवेल.’ ऐकलं नाही की पुढच्या क्षणी गाडी थांबलीच म्हणून समजा. हवेतून पाणी काढायची युक्तीसुद्धा आहे त्याच्याकडे. हवेतून मस्तपैकी दोन बाटल्या पाणी काढून दाखवतो तो.
अंहं! हे काही चमत्कार सांगत नाहीये की हातचलाखी करून केलेले जादूचे प्रयोग. ही सारी जगण्यातली धमाल विज्ञान-तंत्रज्ञानानं केलीये आणि या विज्ञानामागचा मेंदू आहे जव्वाद पटेल याचा. या तेवीस वर्षीय तरुणाचं तंत्रज्ञानाविषयीचं कुतूहल इतकं की, त्यानं जगणं सुसह्य करणार्या अशा २००० हून अधिक ‘इनोव्हेशन्स’ केली आहेत. आजपर्यंत त्याला त्याच्या हवेतून पाणी काढणार्या ‘ड्यूड्रॉप’ आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ या दोन संशोधनासाठी पेटंट मिळाली आहेत, तर तब्बल ३९ हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
जव्वाद मूळचा अकोल्याचा. त्याचे वडील निवृत्त मुख्याध्यापक, आई गृहिणी आणि एक मोठी डॉक्टर असलेली बहीण. शालेय अभ्यासात साधारण असणार्या जव्वादला लहानपणापासूनच हत्यारं-साधनं फार प्रिय. तो फारसा मित्रात रमायचा नाही, पण वस्तूंची तोडफोड करून नवं काहीतरी करून पाहण्यात त्याला मजा यायची. त्याच्या वडिलांच्या ‘टुलबॉक्स’मधील स्क्रू ड्रायव्हरशी त्याची पहिली मैत्री झाली. त्यानं त्याचे ‘टोनी’ असं नामकरण करून टाकलं. या टोनीसोबत तो विविध मशीन्स उघडून पाहण्याची करामत करू लागला. साधरणत: मुलं आपल्या वाढदिवसाला मोठमोठ्या खेळण्यांची मागणी करतात, पण जव्वाद स्क्रू ड्रायव्हरचे सेट, विविध उपकरणं, मल्टीमीटर, टेस्टर अशा भेटवस्तू मागायचा. त्याच्या या ‘उद्योगी’ वृत्तीमुळे त्यानं इयत्ता आठवीत असतानाच ‘इन्फ्रारेड रेडीयशन’वर पहिला शोधनिबंध लिहिला होता.
या सगळ्या खटाटोपामागील जव्वादचं तत्त्व खूप साधं आहे. तो म्हणतो, ‘‘मी ‘थिंक बियाँड नॉर्मल’ या सूत्रानं काम करतो. मुळातच कथित ‘इनोव्हेटीव्ह कल्पना’ वगैरे अशी काही भानगड नसते. अशा काही कल्पना मला तरी सुचत नाहीत. मी माझ्यापुढं असणार्या समस्यांचा, प्रश्नांचा विचार करताना सर्वसाधारण विचारापलिकडं कसं जायचं, साधारण उत्तरांच्या पुढची काय पायरी असेल असा विचार करतो आणि तिथंच मला उत्तरं सापडतात. म्हणून तर लहानपणी मी ‘डीटीएमएफ- ड्वेल टोन मल्टि फ्रिक्वेन्सी’ हे तंत्र वापरून ऑटोमॅटीक गिझर, टोस्टर, राईसकुकर बनवू शकलो. ’’
जव्वाद तंत्राबरोबरच अधिकाधिक राहायचा. त्याचा एकटेपणा घालवणारे त्याच्या या दोस्तमंडळींसोबत त्याची चौकसबुद्धी वाढीस लागली. त्याबरोबरच त्याच्यात संवेदनशीलताही टिकून होती. त्यामुळेच केवळ स्वत:च्या जीवनशैलीपलिकडेही काही समस्या दिसली की, तो ती सोडवण्याच्या मागे लागे. दहावीपुढचं शिक्षण घेण्यासाठी जव्वाद औरंगाबादला गेला. तो बारावीत असताना एक घटना घडली. त्याचे एक नातेवाईक रस्ता अपघातानं कायमचे बिछान्याला चिकटले. वेळीच त्यांना उपचार मिळाला असता तर ते कदाचित बरे होऊ शकले असते, हे कळाल्यावर जव्वाद कमालीचा अस्वस्थ झाला. त्यातून त्यानं ‘स्मार्ट हेल्मेट’ तयार केलं. या हेल्मेटमध्ये बसवण्यासाठी त्यानं एक चीप बनवली. हे हेल्मेट घातल्यानंतर दारू पिलेला माणूस असला तर गाडी सुरूच होत नाही. शिवाय फोनवर बोलत गाडी चालवल्यास गाडी तीनदा सूचना देऊन आपोआप थांबते, वेग वाढल्यावरही थांबते, तसेच अपघात झालाच तर जीपीएस यंत्रणेद्वारे जवळच्या हॉस्पिटल, पोलिसांना व त्याच्या एका नातेवाईकाला याबाबत तात्काळ माहिती कळवली जाते. ही साधारण दोन हजार रुपयांत मिळणारी चीप त्यानं तयार केली.
जव्वादचा हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा कल पाहता त्यानं बी. टेकसाठी प्रवेश घेतला. अकोल्यात फारशा सुविधा नसल्यानं त्यानं बी.टेकसाठी हैद्राबाद इथं प्रवेश घेतला. तिथंही त्याचं छोटं-मोठं संशोधन सुरू होतं. असाच एकदा तो हैद्राबादहून अकोल्याला जात होता. त्याच्या हातात पाण्याची बाटली होती. एक बाई व तिचा मुलगा त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहत होते. त्याला वाटलं खायला पैसे हवेत म्हणून तो त्यांना काही पैसे देऊ लागला, पण त्यांना पाणी हतं होतं. पैसे नाकारून ते त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे पाहत राहिले. त्या प्रसंगानं त्याचं मन हेलावून गेलं. पाण्यासाठी इतकी तगमग? त्याच्या डोक्यात हा विचार घोळत राहिला आणि त्यानं एका तासात कमी दाबाच्या हवेतून दोन बाटली पाणी तयार करण्याचं ‘ड्यूड्रॉप’ हे उपकरण तयार केलं. साधारणपणे अशा प्रकारच्या उपकरणांसाठी लिक्वीड नायट्रोजन, अमोनिया अशा वायूंचा वापर केला जातो, परंतु या वायूंचा ओझोन थराला धोका असतो. त्याला हे टाळायचं होतं. मग त्यानं इलेक्ट्रॉनिक कन्डेशन या तंत्राचा वापर करायचा ठरवला आणि त्याला यशही मिळालं. स्मार्ट हेल्मेट आणि ड्यूड्रॉप या दोन्ही उपकरणांसाठी त्याला पेटंट मिळाली आहेत. इतकंच नव्हे तर त्यानं सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठीही एक डिव्हाईसचा शोध लावला आहे. यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यातही आलं आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्येच्या घटना सतत कानावर पडू लागल्या तेव्हा त्याला प्रश्न पडला की, शेतकर्याला सोयाबीनच्या उत्पादनात घट का होत असेल. प्रत्येक पीकाला ‘बॅलन्स डायट’ आवश्यक असतो. मातीची विशिष्ट प्रत, पाण्याचं प्रमाण, आद्रतेचं प्रमाण, योग्य बी बियाणं, पूरक वातावरण. जव्वादनं सोयाबीनला आवश्यक असणार्या माती, वातावरणाचा अभ्यास करून त्यासाठी एका जागेत सोयाबीन या बॅलन्स डायटप्रमाणे लावला व दुसरीकडे शेतकर्यांच्या पद्धतीनं. उत्पादनात १० टक्क्यांनी फरक दिसला. योग्यरीत्या वाढवलेल्या सोयाबीनचं उत्पादन नेहमीपेक्षा १० टक्के अधिक मिळालं. आता तो शरिरातून रक्त न काढताही रक्तातील साखर शोधणारं उपकरण बनवण्याच्या मार्गावर आहे. त्याचं असे कित्येक प्रकारचे शोध-नवसंशोधन सुरूच आहे.
जव्वादला आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात केलेल्या संशोधनासाठी नुकतंच केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्राडी मंत्रालयाच्यावतीनं युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आजतागायत जव्वादला ४१ पुरस्कार आणि सन्मान लाभले आहेत. इतक्या सन्मानानंतर माणूस हुरळून जाईन, पण जव्वादची संशोधनमग्नता आणि बडबडा स्वभाव भेटणार्याला जाणवतो.
जव्वादनं आता बी.टेकची पदवी पूर्ण केली आहे. स्वत:ची एक लॅब हैद्राबादमध्ये सुरू केली आहे. जव्वादला ‘सोशल इनोव्हेटर’ बनायचं आहे. तो म्हणतो, ‘‘वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांना मी आदर्श मानतो. आपण काम करत रहावं आणि लोकोपयोगी काम करत रहावं असं मला वाटतं. मी तंत्रज्ञानाकडे जगणं सुसह्य करणारं साधन मानतो. मला अनेकदा अमेरिकेतून, परदेशातून संशोधनासाठी स्कॉलरशिपची विचारणा होते. काही बड्या कंपन्यांत संशोधनासाठी, नोकरीसाठीही गळ घालण्यात आली, मात्र मला कधीही परदेशात जाऊन संशोधन करावं वा काम करावं असं वाटत नाही. माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या देशातील माणसांना व्हावा, माझ्यासाठी हेच देशभक्तीचं एक प्रतीक आहे. ’’
जव्वादनं मोठमोठ्या ऑफर धुडकावून लावल्या. गलेलठ्ठ पगारांची आमिषंही सोडून दिली आहेत. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग गेम्स किंवा फुटकळ मनोरंजनासाठी न वापरता लोकोपयुक्त गोष्टींसाठी वापरावा या हेतूनं हा तरुण धडपडत आहे. विचारातील त्याची ही स्पष्टता, संशोधकवृत्ती त्याचा मार्ग उजागर करत राहील, हे निश्चित.
.............................................................................................................................................
जव्वाद पटेलच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Fri , 25 May 2018
Gamma Pailvan
Fri , 25 May 2018
अरे वा! जव्वाद त्वाडा जव्वाब नाही. तुझे मनोरथ पूर्ण होवोत. तुला आयुष्यात भरपूर आव्हाने लाभोत व त्यातून तुझं जीवन समृद्ध होवो. तुझ्या समृद्धीतच भारतीयांचं सौख्य सामावलं आहे. तुझं कर्तृत्व उत्तरोत्तर वाढतं राहो. तुझा नम्र, -गामा पैलवान