अजूनकाही
भारतामध्ये ‘समाजशास्त्र’ ही ज्ञानशाखा हवी तशी विकसित झाली नाही, असे अनेकांचे मत आहे आणि ते खरेदेखील आहे. याचे कारण शोधावयाचे असेल तर, काही गोष्टींचा विचार करून, काही आकडेमोड करून ते करता येऊ शकेल. मात्र, त्याहीपेक्षा एका सोप्या पद्धतीने याच्या मुळाशी जाता येणे शक्य आहे. हे मूळ म्हणजे भारतीयांची मूळ वृत्ती. समाजशास्त्राची अभ्यासशाखा जवळ जवळ संपूर्णपणे ‘सामाजिक बदलांच्या’ अभ्यासावर आधारित आहे. म्हणजे, ‘बदलांचा’ अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. आणि ‘बदलांचा स्वीकार न करणे’ ही आपली मूळ वृत्ती आहे. कदाचित या कारणामुळे ही अभ्यासशाखा भारतामध्ये हवी तशी विकसित झाली नाही असे म्हणता येईल. या मताला सरळ विरोध करणारी मंडळी असणारच, परंतु, मानापमान बाजूला ठेवून जरा खोल विचार केला तर हे मत पटूही शकेल. यावरच आधारित किंवा उदाहरणादाखल काही अशा संकल्पना मांडता येतील ज्या भारतीयांनी, त्यांच्या विचारसरणीने आजवर मान्य केल्या नाहीत. म्हणजे थोडक्यात, बदल अजून पचवलेला नाही असे म्हणता येईल.
यातील काही संकल्पना पुढीलप्रमाणे-
१) फ्रीलान्सर (Freelancer) : म्हणजे मुक्तपणे काम करणे. पण आजही Freelancer म्हणजे कमी प्रतिष्ठेचे अन् न पचणारे काहीतरी काम वाटते किंवा कामच वाटत नाही. म्हणजे कदाचित या माणसाकडे करण्यासारखे काही काम नाही, पण ‘काय करतो’ या प्रश्नाचे उत्तर जगाला तर द्यावे लागते म्हणून शोध लावला गेलेला शब्द इथवरच आपले ‘ज्ञान’ सीमित असते. म्हणजे एखादी व्यक्ती मुक्तपणे एखाद्या संस्थेसाठी किंवा व्यक्तीसाठी काम करत असेल, त्यातून नोकरी करणाऱ्या व्यक्तीएवढाच पैसे कमावत असेल तरी त्या व्यक्तीची प्रतिष्ठा मात्र अगदीच ‘नहीं के बराबर’ असते. आपल्याला IT मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती किंवा तत्सम रोज १२-१२ तास कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच काय त्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या व्यक्ती वाटतात. आपण ‘Freelancer’ ही १८१९ मधील सर वॉल्टर स्कॉट यांच्या पुस्तकातील संकल्पना समजून घेतलेलीच नसते. शिवाय, ‘चाकोरीबद्ध’ जगायचे हा मंत्र अंगिकारलेला असतो. त्यामुळे अडचण अशी होते की, आपण संकल्पनेच्या मुळाशी न जाता बदल स्वीकारणे ‘टाळतो’.
हे क्षेत्र काय आहे, त्यातील काही आकडेमोडीचा अंदाज म्हणून पुढील लेख वाचता येईल-http://www.thehindu.com/business/india-largest-market-for-freelancers/article22406109.ece
२) मुक्त विद्यापीठ : मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे असे सांगितले तर एखादी भटकी विमुक्त जमात असल्यासारखी वागणूक आपल्याला मिळते. ही संकल्पना जातिव्यवस्थेच्या रचनेमुळे उदयाला आली असा एक मतप्रवाह आढळून येतो. म्हणजे, शिक्षणक्षेत्रात खूप पूर्वी ब्राह्मणांचे वर्चस्व होते, परंतु त्यात सर्वांना सामावून घेणे गरजेचे होते म्हणून ‘मुक्त विद्यापीठ’ ही संकल्पना उदयाला आली असा एक मतप्रवाह आहे. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात कोणाचे वर्चस्व आहे हा भाग निराळाच आहे. परंतु, कुठल्या विद्यापीठांच्या पदव्या ‘मान्यताप्राप्त’ आहेत, ही अलिखित यादी आपण निष्ठेने पाळत असतो. संकल्पना समजून न घेता, बदलाला घाबरून, आणि कदाचित स्पर्धेलाही घाबरून मागे राहिल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.
............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4417
.............................................................................................................................................
३) शॉर्ट कोर्सेस (short courses) : म्हणजेच कमी अवधीचे काही अभ्यासक्रम. आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे कसा ‘वर्षानुवर्षे’ चालणारा, परीक्षांच्या वेळीच अभ्यास होईल इतपत ऐसपैस असा असला की, तो बहुधा ‘आदर्श’ वाटतो. आज ऑनलाईन अनेक विद्यापीठांचे दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ते आपण अगदी वर्गात बसून अभ्यास करतो, तसेच पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून, कुठल्याही विद्यापीठाचे, आपल्या आवडीप्रमाणे निवडणे शक्य आहे. मात्र आपली ‘आदर्श’ विचारसरणी हाही ‘बदल’ पचवण्यास नकारच देते. इतक्या कमी दिवसांत तुम्हाला काय कळले यावर प्रश्नचिन्ह, पण तीन-तीन, चार-चार वर्षांच्या कालावधीत काहीही न शिकवता पदवी दिलेली अगदीच चालते. या संदर्भात भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलेला ‘Global Initiative For Academic Networks (GIAN)’ हा एक लक्षवेधी प्रयोग आहे.
४) शिक्षणाची समांतर पद्धती : शिक्षणक्षेत्रात तासांना अनेक तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. असे करताना, मुलांना त्या त्या विषयातील सखोल आणि नेमके ज्ञान मिळावे असा उद्देश असतो. मात्र, तज्ज्ञ मंडळींनी शिक्षणक्षेत्रात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे यातून एक समांतर शिक्षणपद्धती (सकारात्मक अर्थाने) उदयाला येत आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. विशिष्ट क्षेत्रांतील व्यक्तींनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे हे शिक्षण संस्थांच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असते. अशा तज्ज्ञांकडून मिळणारे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त देखील ठरते. समांतर शिक्षण पद्धतीकडे आजवर आपण साचेबद्ध पद्धतीने बघत होतो, शिकवण्यांना जाणारी मुले हे त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल. मात्र, तज्ज्ञ मंडळींनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे यातून एक दर्जात्मक शिक्षण पद्धती विकसित होत आहे, असे म्हणावयास वाव आहे.
शिवाय, शिक्षण क्षेत्राची दूरवस्था, त्यातील राजकारण आणि नोकरीची संधी नाकारली जाणे, याही दृष्टीने ही समांतर शिक्षणपद्धती सर्वसमावेशक ठरेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. ही संकल्पना आपण जितक्या लवकर पचवू तितक्या लवकर प्रस्थापित शिक्षणपद्धतीचे विनाकारण प्रस्थापित झालेले वर्चस्व हा केवळ एक आभास आहे हे आपल्या लक्षात येईल.
५) स्त्रियांमधील पितृसत्ताक कौशल्य : ‘आपण पितृसत्ताक व्यवस्थेत राहतो’ हे वाक्य आपल्या तोंडी अगदी सहज येऊन जाते. परंतु, असे म्हणताना ‘पितृसत्ताक’ या शब्दाचा खरा भाव आपण जाणलेला असतोच असे नाही. यामध्ये कुटुंबातील पुरुष व्यक्तीचा एकाधिकार आणि स्त्रियांना ओघाने देण्यात येणारा दुय्यम दर्जा हा अर्थ सर्वसाधारणपणे अभिप्रेत आहे. परंतु, पितृसत्ताक असणे हे एक कौशल्य असू शकते हा विचार आपण कधी केला आहे का? अपत्ये पदरी असताना पतीचा मृत्यू झालेल्या स्त्रिया, काहीही नोकरीधंदा न करणारा किंवा आजारी पती घरात असल्यास संपूर्ण घराची जबाबदारी स्वतः उचलणाऱ्या स्त्रिया ही आणि तत्सम अनेक उदाहरणे अगदी रोजच्या रोज समाजात बघावयास मिळतात. तेव्हा या स्त्रियांमध्ये काळाची गरज म्हणून का होईना परंतु, पितृसत्ताक पद्धतीने घर चालवण्याचे कौशल्य विकसित झाले आहे का, यावर विचार करून बघावयास हरकत नाही. पितृसत्ताक पद्धतीच्या उगमाशी संबंधित काही सिद्धान्त असे सुचवतात की, समाजातील लिंग भेदभाव हा अशी व्यवस्था उदयाला येण्यास कारणीभूत आहे. विद्यमान काळातील बदललेल्या परिस्थितीत लिंग संबंधित समीकरणेच बदललेली असल्याने कदाचित पितृसत्ताक पद्धत आता कालबाह्य ठरतेय, असा विचार करून बघावयास हरकत नाही.
६) पिढीची बदलती संकल्पना : कार्ल मानहिम (Karl Mannheim) यांचा ‘पिढीचा सिद्धान्त’ (Theory of generation) वाचण्यात आला. अत्यंत साधा वाटणारा पण ताकदीचा सिद्धान्त आहे. ‘पिढी’ म्हणजे काय आणि ते समजून घेतल्यानंतर तीच ‘पिढी’ची संकल्पना आजच्या काळात नवे रूप धारण केलेली दिसते असे लक्षात येते.
मानहिम यांच्या मते, पिढी म्हणजे एक असा समूह होय, ज्यामधील लोकांनी एका विशिष्ट काळात विचारांवर प्रभाव करणार्या एकसारख्या घटना अनुभवल्या आहेत. या व्याख्येनुसार, साधारण ३० वर्षे एवढ्या काळातील सर्व लोक म्हणजे एक पिढी असे मानले जाते. मात्र, आज या व्याख्येत मूलभूत बदल झालेला दिसतो. म्हणजेच, आपल्यापेक्षा अगदी तीन-चार वर्ष लहान किंवा मोठ्या व्यक्तीचे विचार आणि आपले विचार यात तफावत जाणवते. अचानक आपण फारच मोठे झालो का असे वाटू लागते. म्हणजे, मुळातच या व्याख्येतच बदल झालेला दिसून येतो. एक पिढी म्हणजे आता अगदी पाच-सहा वर्षांची झाली आहे असे निरीक्षण पुढे येते.
शिवाय, तंत्रज्ञानाचा वेग अन ताबडतोब सगळे हवे असलेली पिढी लक्षात घेता ही व्याख्या मान्य देखील करावी लागते. म्हणजे, कदाचित ‘उप पिढी’ची संकल्पना उदयाला आली आहे असे तरी मानावे लागेल किंवा पिढीच्या संकल्पनेतील वयातील फरकांचा आकडा पाच-सहा इतकाच मानावा लागेल. सर्वांनीच रोज अनुभवली असेल अशी गोष्ट आहे. मात्र, यावर सिद्धान्ताच्या अंगाने विचार केला जात नाही, तो व्हावा ही काळाची गरज आहे.
‘समाजशास्त्र हा विषय आता मृत होत जाणार आहे’ हा मतप्रवाह प्रमाण मानणाऱ्या, बदलांना घाबरणाऱ्या आणि त्याहीपेक्षा जास्त, बदल आपल्याला समाजापासून वेगळे तर करणार नाही ना, हा प्रश्न डोक्यात येणाऱ्या अन स्वच्छंदी जगणे आवडणाऱ्या अशा सर्वांसाठी वरील काही मुद्दे विचार करावेत असे आहेत.
.............................................................................................................................................
लेखिका देवयानी देशपांडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये समाजशास्त्र व लोकप्रशासन या विषयांच्या व्याख्यात्या आहेत.
ddevyani31090@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Thu , 24 May 2018
आपण freelancer बद्दल जे म्हटलंय ते 10 वर्षापूर्वी होतं.आता तर त्या अर्थाने सर्वच freelancers आहेत.contract पध्दतीत skill hire केले जातेय.उदा.मनोरंजन क्षेत्र.यात अभिनेत्यापासून स्पाॅटबाॅय पर्यंत सर्व freelancer च आहेत.त्यांना मान ही आहे. मान आता काम असणे वा नसणे यावर ठरतो. कशापध्दतीने करतो यावर नाही. एक मोठा समूह जो आज सरकारी नोकरी किंवा दरमहा सर्व भत्यासह मिळणारी नोकरी सुरक्षित मानतो.लग्नाच्या बाजारात याची किंमत अधिक. बाकी बदलाची मानसिकता नाही कारण आपले जातवास्तव.जाती इतकं सुरक्षित भारतीय माणसाला कुठेच वाटत नाही. जातीनिर्मूलनाचे प्रयत्न अखंड चालूच आहेत.पण बदलत्या राजकारणाने जातीनिर्मूलनाऐवजी त्यांच्या बळकटीकरणाला चालना दिलीय. त्यातून कुठलाही अभ्यास करणे,निष्कर्ष काढणे हे जीवावर बेतू शकते इतके हिंस्त्र वातावरण तापवले जातेय. संजय पवार writingwala@gmail.com