अजूनकाही
आरक्षणाचा प्रश्न जसजसा लांबतोय तसा धनगर समाजातला असंतोष वाढत चाललाय. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत हा समाज एसटी आरक्षण मिळेल, या आशेनं भाजपबरोबर गेला होता. धनगर समाजानं भाजपला भरभरून मतदान केल्यामुळेच मुख्यमंत्री झालोय, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा व्यक्त केली होती. पण चार वर्षं झाली तरी एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून या समाजाचा संयम सुटू पाहतोय.
धनगर समाजातील ही खदखद भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखली. त्यांनी कालच्या २० मेला पंढरपूरमध्ये सत्तासंपादनाचं स्वप्न दाखवत मेळावा घेतला. प्रकाश आंबेडकर हे एखाद्या मुद्याचं राजकियीकरण करण्यात माहीर असलेले नेते आहेत. त्यांनी या मेळाव्यात घोषणा केली की, ‘आता मागते न राहता देते होऊयात. बंड करून आमदार-खासदारकींची तिकिटं देणारे होऊयात. सत्तेची भीक मागू या नको, सत्ताधारी जमात बनुया.’
धनगर समाजाची ताकद प्रकाश आंबेडकरांना माहीत आहे. अधिकृत जनगणना जाहीर नसली तरी धनगरांची लोकसंख्या जवळपास दीड कोटीच्या आतबाहेर आहे. आंबेडकरांचा ‘अकोला पॅटर्न’ हा बहुजन जातींची मोट बांधून राजकीय यश मिळवण्याचा फॉर्म्युला आहे.
पंढरपूरला प्रकाश आंबेडकरांनी धनगर समाजाला सुचवलंय की, तुम्ही पुढे आलात तर राज्याची सत्ता आपण मिळवू. धनगर समाजातील माजी आमदार हरिभाऊ भदे, विजयराव मोरे, नवनाथ पडळकर, बापूसाहेब हटकर आणि इतर नेते पंढरपूर मेळाव्याला होते. या मेळाव्याचे अध्यक्ष सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख असणार होते. गणपतराव शेकापचे नेते. त्यांनी उभी हयात शेकापक्षात घातली. ५५ वर्षं ते आमदार आहेत. शेतकरी, कामगार, मजुरांची बाजू सडकेवर आणि विधानसभेत गणपतराव लढवत आलेत. धनगर समाजात त्यांना सर्वव्यापी मान्यता आहे. म्हणून त्यांना प्रकाश आंबेडकरांनी सोबत घेतलंय.
या मेळाव्याला गणपतराव आले नाहीत. त्यांची अनुपस्थिती बोलकी ठरावी. गणपतराव आले नाहीत, पण त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख मेळाव्यात होते. त्यामुळे संयोजकांना हायसं वाटलं असेल. पंढरपूर मेळाव्यातून राज्याला एक राजकीय संदेश देण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न दिसतोय. धनगर समाजाला बरोबर घेऊन ‘अकोला पॅटर्न’ राज्यभर राबवू. तिसरी आघाडी करून सत्तेचं समीकरण जुळवू हा तो संदेश दिसतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4417
.............................................................................................................................................
‘अकोला पॅटर्न’मध्ये धनगर समाजासह इतर छोट्या मोठ्या ओबीसी जाती, मुस्लीम आणि दलित यांची बेरीज घडवून सत्ताधारी वर्गाच्या कब्जातून सत्ता हिसकवायचं सूत्र आहे. अकोला जिल्ह्यात हा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी यशस्वी करून दाखवलाय. राज्यात जवळपास १०० विधानसभा मतदार संघात धनगर समाजाची जिंकवू किंवा पाडू इतकी लक्षणीय संख्या आहे. या समाजाकडे शेती, शेळ्या-मेंढ्या, गाई अशी उत्पन्नाची साधनं आहेत. उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलंय. त्यामुळे गावगाड्यात हा समाज सत्ताधारी जातींच्या विरोधात उभं राहू शकतो, असं आजचं वास्तव आहे.
उत्तर भारतात १९६० च्या दशकात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी ‘पिछडा पावे सौ में साठ’ ही घोषणा दिली. त्या घोषणेतून यादव, कुर्मी, कोयरी या ओबीसी जातींमध्ये राजकीय जागृती आली. त्यातून त्या जाती सत्तेच्या जवळपास गेल्या. १९९० च्या दशकात बहुजन नेते कांशीराम यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी सत्ता में हिस्सेदारी’ ही घोषणा दिली. त्यातून दबलेल्या दलित-ओबीसी जातींना सत्तेतल्या हिस्सेदारीचं अधिक भान आलं. त्यातून देशभर ओबीसी-दलित नेते उभे राहिले. सत्ताधारी जातींकडे हे नेते सत्ता भांडून मिळवू लागले. कर्नाटकात धनगर समाजात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा उदय या प्रक्रियेचाच भाग आहे. पण शेजारी कर्नाटकात धनगर समाज सत्तेची फळं चाखण्यापर्यंत प्रगती करता झाला तरी महाराष्ट्रात धनगर समाजात तेवढी एकी झाली नाही. सत्तेच्या राजकारणात हा समाज मागे पडला.
२०१४ ला आरक्षणाच्या प्रश्नावर हा समाज जागा झाला. भाजपनं या समाजाचं राजकीय महत्त्व ओळखून त्याला जवळ घेतलं. पुढे भाजप सत्तेत आल्यानंतर प्रा. राम शिंदे आणि महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली. डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. प्रा. राम शिंदे यांच्याकडे अगोदर गृह आणि नंतर जलसंधारण खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. जलसंधारण हा मुख्यमंत्र्यांचा आवडता प्रोजेक्ट. आज या राज्यसरकारकडे अभिमानाने सांगण्यासारखं एकच काम आहे आणि ते म्हणजे जलसंधारणात केलेली क्रांती. प्रा. राम शिंदे यांनी हे खातं प्रभावी केलं. एकूण मंत्रिमंडळातही शिंदे उठून दिसतात. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. भाजपमध्ये ओबीसींचा एक नवा दमदार चेहरा अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालीय. खरं म्हणजे फडणवीसांनी शिंदे यांना अधिक चांगलं खातं देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा उपयोग करून घ्यायला हवा होता. ती संधी फडणवीसांनी दवडली. त्याबद्दलही धनगर समाजात नाराजीचा सूर उमटतोय. असो.
पंढरपूरच्या मेळाव्यानंतर धनगर समाजाचं लक्ष ३१ मे रोजी चोंडी (जि. अहमदनगर) येथील मेळाव्याकडे आहे. चोंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव. माहेर. ३१ मे हा अहिल्यादेवींचा जन्मदिन. या दिवशी अहिल्यादेवींच्या स्मृती जागवायला, वंदन करायला राज्यभरातून धनगर समाज येत असतो. या दिवशी प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी मेळावा होतो. त्यात सर्व पक्षातले धनगर समाजातले आजी माजी आमदार, मंत्री, कार्यकर्ते सहभागी होतात. यावेळी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, खासदार छत्रपती संभाजीराजे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यालाही अध्यक्ष गणपतराव देशमुख हेच आहेत.
सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या प्रश्नाला चालना देण्याचा प्रयत्न या मेळाव्यात होणार आहे, असं प्रा. राम शिंदे यांनी सांगितलंय. पंढरपूर आणि चोंडी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील खदखदीची दखल राज्य सरकारनं सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन घेतलीय. हे नाव देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जे राजकारण केलं, ते धनगर समाजाला आवडलेलं नाही. लिंगायत व धनगर समाजात कोणतंही भांडण नव्हतं. ते सत्ताधाऱ्यांनी लावायचा प्रयत्न करून बघितला. ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. असो.
आरक्षणाचा प्रश्न सुटायचा रस्ता अजून दृष्टीपथात नाही. पण या प्रश्नामुळे जागा झालेला हा समाज आता सत्तेत त्यांच्या हक्काचा हिस्सा मागणार हे उघड आहे. याची दाखल सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वच पक्षांना घ्यावी लागेल. धनगर समाजात विविध संघटना सक्रीय झाल्यात. नवे नेते तयार होत आहेत. त्यांना सत्तेची स्वप्न पडू लागलीत.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही १०० ठिकाणी धनगर समाजातल्या तरुणांना आमदारकीची तिकिटं देऊन उभे करू, राज्याची सत्ता ताब्यात घेऊ, असं प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. याचा दबाव भाजपसह इतर पक्षांवर पडेल. या प्रस्थापित पक्षांनाही अधिकाधिक आमदारकीची तिकिटं धनगर समाजातील कार्यकर्त्यांना आता द्यावी लागतील. धनगर समाजाला सत्ताधारी जमात बनण्याचं स्वप्न पडलं आहे. हे स्वप्न पूर्ण होईल की अर्ध्यातच तुटेल, प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय चुलीवर कायकाय शिजेल, हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.
धनगर समाज राजकारणात जेवढा सक्रीय होईल तेवढा त्याचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल. कुणी सांगावं या प्रक्रियेत सिद्धरामय्यांसारखा आत्मविश्वासू नेता या समाजाला मिळाला, तर महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकारणाचा सध्याचा चेहराही बदलू शकेल, एवढी या समाजाची राज्यात ताकद आहे. धनगर समाजाच्या दृष्टीने हा काळ कसोटीचा आहे.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Thu , 24 May 2018
धनगर समाजावर आजही राजकीय पक्ष म्हणून भाजपचा प्रभाव आहे.संघाच्या "माधवं" योजनेतला तो प्रमुख घटक आहे.त्यामुऴे मातंग व वंजारा प्रमाणे संघाने तिथे पाय रोवलेत.प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न स्तुत्य असले तरी धनगरांसह सर्वच ओबीसी,भटके,यांची जातीय मानसिकता बदलणे सोपे नाही.भाजप मधलं त्यांचं संघटन हिंदू म्हणून जाणीवपूर्वक केलं जातं.हा धर्मांतरित बौध्दांच्या विरोधातील गनिमी नीतिचा भाग आहे.
Sumangal P
Wed , 23 May 2018
हा हा ! जो माणूस २००९ आणि २०१४ ला स्वत:ची निवडणूकपण जिंकू शकला नाही, जो माणूस रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळ्या गटांना एकत्र आणू शकला नाही, तो आता धनगर समाजाला एकत्र वगैरे आणायच्या गोष्टी करत आहे. फारच विनोदी आहे बाबा हे. पण काय हो धनगर समाज यांना नेताम्हणून मान्य करेल ? यांच्या नेतृत्वामुळे, धनगर समाजात , रिपब्लिकन पक्षासारखे वेगळे वेगळे गट नाही पडले म्हणजे मिळवले.