समलैंगिकता – मिथकं आणि सत्य; निमित्त कोलकात्याच्या शाळेतील घटना
पडघम - सांस्कृतिक
अनुज घाणेकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 21 May 2018
  • पडघम सांस्कृतिक समलैंगिकता गे Gay लेस्बियन Lesbian एलजीबीटी LGBT Lesbian Gay Bisexual and Transgender

कोलकातामधील एका शाळेमधील काही विद्यार्थ्यांनी १० मुलींबद्दल अशी तक्रार केली की, या मुलींनी एकमेकींचे हात पकडले होते आणि हात एकमेकींच्या गळ्यात घातले होते. या तक्रारीमुळे शाळेनं या मुलींना शिक्षा दिली. शिक्षा काय दिली तर ‘आम्ही लेस्बियन आहोत’ अशा आशयाचं पत्र लिहून त्यावर स्वाक्षरी करावयास लावली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी ‘मुलींना योग्य मार्गावर आणणं’ हा त्यामागचा उद्देश सांगितला. मुलींच्या पालकांनी ही घटना पोलिसांपर्यंत नेली आणि मग ती मोठी झाली. कळस म्हणजे पश्चिम बंगालच्या शिक्षणमंत्र्यांनी याची चौकशी करावयास सांगितली आणि ‘समलैंगिकता’ ही पश्चिम बंगालच्या संस्कृतीविरुद्ध आहे, असं विधान केलं.[1]

समलैंगिक व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समुदायातही याचे पडसाद उमटले आणि तळागाळामध्ये अजून किती काम बाकी आहे, हे वास्तव समोर आलं.

उदाहरणार्थ, पारो आनंद (जागतिक कीर्तीच्या लेखिका) म्हणाल्या की, “आपल्या शिक्षकांना दुर्दैवानं वेगवेगळे विषय शिकवण्याचं प्रशिक्षण तर दिलं जातं, पण मुलांच्या प्रश्नांना कसं हाताळायचं हे शिकवलं जात नाही.” तर “अशा प्रकारच्या समलैंगिकतेला विरोध करणाऱ्या घटनांमुळे लहान मुलं, जी स्वत:च्या शरीराला आणि लैंगिकतेला ओळखू पाहत आहेत, ती स्वत:ला दडपून टाकतील. ‘गे असणं चांगलं नाही’ हा संदेश पसरेल आणि अजून जास्त भेदभाव वाढेल.” असं सायान्तिका मजुमदार (बंगळूरच्या समलैंगिकतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या) यांनी मत व्यक्त केलं.

बातम्यांच्या असंख्य गदारोळात ही घटना नजरेआड गेली. पण ‘समलैंगिकता’ या विषयाच्या बाबतीत आपला समाज अजूनही किती मागासलेला आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. तसंच या घटनेचे पडसाद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला जाणाऱ्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह उठवणारे असल्यानं ते अधिकच महत्त्वाचे आहेत.

काय लक्षात घेणं महत्त्वाचं?

या घटनेद्वारेसमोर येणारी समलैंगिकतेबद्दलची चार मिथकं आणि सत्यं अशी आहेत –

मिथक १ - मुलांची मुलांशी किंवा मुलींची मुलींशी रोजच्या जगण्यात शारीरिक जवळीक असेल तर काहीतरी ‘चुकीचं’

सत्य – आपल्या वयातील समान किंवा विरुद्ध लिंगी व्यक्तींना निरोगी स्पर्श करणं ही माणसाच्या वाढीदरम्यानची नैसर्गिक गरज आहे. विशेषत: पाश्चिमात्य देशांशी तुलना केली तर, (जिथं मुलाचा मुलाशी अथवा मुलीचा मुलीशी अशा प्रकारचा स्पर्श टाळला जातो), स्पर्शातून किंवा गळाभेटीद्वारे मैत्री किंवा प्रेम व्यक्त करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.

दुर्दैवानं एका बाजूनं आपला बहुसंख्य समाज मुला-मुलींची एकत्र शाळा असेल तर त्यांच्यात प्रेम-प्रकरणं होतील या भीतीनं विरोध करतो, तर दुसऱ्या बाजूनं समलिंगी संबंधांचीही काळजी करतो.

मिथक २ – मुलांची मुलांशी शारीरिक जवळीक असेल तर ते ‘गे’ होऊ शकतात, तसंच मुलींची मुलींशी शारीरिक जवळीक असेल तर त्या ‘लेस्बियन’ होऊ शकतात.

सत्य – गे किंवा लेस्बियन असणं हे जनुकांवर म्हणजेच जीवशास्त्रीय कारणांवर अवलंबून आहे. कुठल्याही विशिष्ट प्रकारचं वागणं माणसाला ‘गे’ किंवा ‘लेस्बियन’ बनवू शकत नाही. इंडियन सायकीयाट्रिक सोसायटी सांगते की, “उपलब्ध शास्त्रीय आधार आणि मानसशास्त्रातील चांगल्या कार्यपद्धतीच्या मार्गदर्शनानुसार ‘समलैंगिकता हा मानसिक आजार आहे’ या समजुतीची पाठराखण करणारा कुठलाच पुरावा नाही”.

मिथक ३ – गे किंवा लेस्बियन असणं ही एक चुकीची, ‘शिक्षा’ वाटावी अशी, स्वत:बद्दल नकारात्मक वाटावी अशी गोष्ट आहे.

सत्य – समलैंगिकता ही नैसर्गिक गोष्ट असून त्यात स्वत:बद्दल नकारात्मक वाटावं असं काही नाही. वर्ल्ड सायकीयाट्रिक असोसिएशनदेखील “समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि जैविक-मानसिक-वाढीसंबंधित आणि सामाजिक घटकांनी ठरवली जाते”, असं मानते. ती शिक्षा नाही. तुम्ही डावखुरे आहात का उजव्या हाताचा वापर करता, तुम्ही उंच आहात की ठेंगणे, या सारखीच तुमची लैंगिकता हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, ज्यात चूक-बरोबर असं काही नाही.

मिथक  ४ – समलैंगिकता ही आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे.

सत्य – जगातील सर्व संस्कृतींच्या ऐतिहासिक दाखल्यांमध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर अनेक कथा, काव्य, शिल्प यांमध्ये अशी अनेक पात्रं आपल्याला दिसतात, जी समलैंगिक होती किंवा आहेत. समलैंगिकता किंवा त्यासंबंधीचे विचार हे कायमच प्रत्येक संस्कृतीचा एक घटक राहिलेला आहे. भारतीय संस्कृतीसुद्धा त्याला अपवाद नाही, मग खजुराहो येथील शिल्पांचे दाखले असोत, ‘कामसूत्र’ या ग्रंथामधील भाष्य असो किंवा शिखंडीसारखी महाभारतामधील महत्त्वाची पात्रं असोत. समलैंगिकता ही कुठल्याही संस्कृतीच्या विरोधात नाही.

समलैंगिक व्यक्तींच्या हक्काची भारतातील कायदेशीर लढाई आशावादी स्वरूपात सध्यापुढे जात आहे. ब्रिटिश काळात बनलेल्या कलम ३७७ नुसार ‘अनैसर्गिक संभोगास (प्रजनन करू न शकणाऱ्या संभोगास)’ गुन्हा मानलं गेलं. त्यामुळे समलैंगिक संभोगासही या कलमानुसार गुन्हा समजलं गेलं. दोन प्रौढ व्यक्तींमधील खासगी लैंगिक संबंध जर संमतीनं असतील तर तो गुन्हा नाही, असं २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. परंतु सामाजिक व धार्मिक संघटनांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सध्या सर्वोच्च न्यायालय भारतीय दंडविधानातील कलम ३७७ बाबत पुनर्विचार करत आहे.

पण त्याहून मोठी लढाई आहे ती मानसिकतेच्या बदलाची. समलैंगिकतेबद्दलची सर्व मिथकं जेव्हा व्यापक समाजमनातून गळून पडतील आणि सत्य अगदी पुढच्या पिढीपर्यंतदेखील पोहोचेल, तेव्हा ही मानसिकतेची लढाई जिंकली जाईल आणि भेदभाव खऱ्या अर्थानं नष्ट होईल.

(या लेखासाठी समलैंगिकता विषयाचे अभ्यासक आणि कार्यकर्ते बिंदुमाधव खरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.) 

.............................................................................................................................................           

[1]संदर्भ बातम्या- https://www.firstpost.com/india/kolkata-school-that-forced-students-to-confess-to-lesbianism-exemplifies-how-not-to-treat-queer-children-4391763.html

https://www.thequint.com/neon/gender/kolkata-news-queer-rights-activists-react-to-kamala-girls-incident-and-partha-chatterjee-comments

https://www.thedailybeast.com/indian-schoolgirls-forced-to-confess-to-being-lesbians-after-holding-hands

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Anuj Ghanekar

Sat , 26 May 2018

नमस्कार गामा पैलवान. आपल्या मुद्द्यांवरील काही प्रतिमुद्दे मांडत आहे. १. समलैंगिक स्थितीवरील उपचार - प्रथम, येथे "समलैंगिकता" हा शब्द वापरणे उचित आहे. लैंगिकता ही लिंगबदल, लैंगिक संबंध, संभोग याच्या पलीकडची गोष्ट आहे. ती भावनिक आकर्षण, स्वभाववैशिष्ट्ये, जीवनशैली या सर्वांना घेऊन सर्वसमावेशकपणे पाहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ - लैैंगिकता आणि एपेंडिक्स यात फरक आहे. एपेंडिक्स ही जैविक स्थिती नको असल्यास काढून टाकली जाते. "लैंगिकता" जैविक स्थितीच्या पल्याड आहे. उपचारांच्या संदर्भात केलेल्या मुद्द्यांमध्ये (किंवा एकुणच आपल्या प्रस्तुत मुद्द्यांमध्ये) " फक्त जैविक आधार घेतला जात आहे, जो संकुचित आहे. २. पशुप्रमाणे वागणे - आपले विधान वाहवा मिळवणारे जरी असले तरी नैतिकता/अनैतिकता यावर भाष्य करणारे आहे. प्रस्तुत चर्चा शास्त्रीय (एम्पिरिकल) दुवे जोडण्याच्या संदर्भात चालु आहे. ३. समलैंगिकता आणि बालबलात्कार - हे दोन्ही वेगळे मुद्दे आहेत हे मान्य केल्याबद्दल आभार. (आकडेवारीच बघायची असल्यास पुढील शास्त्रीय लेखात अनेक शोधनिबंधांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. http://psychology.ucdavis.edu/rainbow/html/facts_molestation.html) त्यामुळे हे दोन्ही मुद्दे स्वतंत्रपणे पहायला हवेत. "चाइल्डलाइन", "डु नॉट ऑफेन्ड" यासारख्या अनेक प्रथितयश संस्था या मुद्दयावर काम करतात व हे मुद्दे स्वतंत्रपणे पाहतात. या दोन मुद्द्यांना जोडण्याचा प्रयत्न म्हणजे, संख्येने कमी असलेल्या समाजघटकाला विशिष्ट आरोपात बंदिस्त करण्याची दुर्दैवी सामाजिक प्रव्रुत्ती आहे. ४. अमली पदार्थ सेवन - एखाद्या समाजघटकात एखादी "वर्तणूक समस्या" जास्त दिसु शकते. उदा. दारू पिण्याचे / जोडीदाराला मारण्याचे/ लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण भारतीय पुरूषांमध्ये स्त्रीयांपेक्षा जास्त आहे. ५. गुप्तरोग - सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ऍंड प्रिवेन्शन आणि डब्ल्यु एच ओ यासारख्या जागतिक संस्थांच्या विश्लेषणानुसार समलैंगिक पुरूषांमध्ये लैंगिक संबंधांतून होणार्या आजारांचे प्रमाण जास्त असते हे खरे. पण त्यामध्ये आपण कल्पिल्याप्रमाणे लैंगिक संबंधांचा मार्ग हे कारण कुठेच नसून जंतु/विषाणूसंसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क येण्याची जास्तीची शक्यता, संरक्षणाचा वापर न करणे, आणि समाजातील गैरसमज व भेदभाव यांतून दुर्लक्षिले जाणारे लैंगिक स्वास्थ्य अशी आहेत. (उदा. https://www.cdc.gov/std/life-stages-populations/stdfact-msm.htm) ही सर्व कारणे जैविक नसून "वर्तनातील" आहेत. ६. उपचार/लिंगबदल - मुद्दा क्र. १ नुसार पुन्हा लैंगिक संबंध वा लिंग यांवर आधारित हा जैविक आणि तो सुद्धा चुकीचा उपाय आहे. येथे "लैंगिकता" विचारात घेतली जात नाहीये. डावखुर्या व्यक्तीला उजवखुरं करण्यासाठी डावा हातच कापून टाकावा, असं सुचवल्यासारखं.. असो.


Gamma Pailvan

Wed , 23 May 2018

नमस्कार अनुज घाणेकर. एकेक मुद्दे पाहूया. १. >>समलैंगिकता हा आजार नाही - हे सांगणारे वर्ल्ड सायकिएट्रिक असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीची अधिक्रुत स्टेटमेंट्स (२०१६ साल) उपलब्ध आहेत. >> याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. अमेरिकेत १९७३ सालापर्यंत हा आजार होता, पण त्या वर्षी अचानकपणे तो आजार नाही असं ठरवलं गेलं. हे करतांना कोणतेही नियम पाळले गेले नाहीत वा कसलीही चर्चा झाली नाही. त्यावेळेस समलैंगिक स्थितीवर उपचार (=थेरपी) उपलब्ध होते. आजही आहेत. साधारणत: तीनपैकी दोघे जन्मदत्त लिंगाकडे परत यायचे. आज मात्र हे उपचार स्पष्टपणे सांगितले जात नाहीत. उलट समलैंगिक स्थिती नैसर्गिक आहे असं बिंबवलं जातं, जे चुकीचं आहे. २. >> दुर्दैवाने समलिंगी व्यक्तींबद्दल द्वेष पसरवण्यासाठी यांचा संबंध जोडला जातो. >> समलैंगिक व बालबलात्कार हे शास्त्रीय दृष्ट्या वेगळे असले तरी समलैंगिक पुरुषांत बालबलात्काराची विकृती जास्त प्रमाणावर फोफावलेली आढळून येते. अंमल सेवन (=ड्रग्ज घेणे) ही विकृती देखील समलैंगिक पुरुषांत फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ३.१. >> . समलैंगिकता अनैसर्गिक नाही. अन्यथा ती पशु पक्ष्यांमध्ये देखील आढळली नसती.>> माणसाने पशूप्रमाणे वागायचं नसतं. ३.२.>> तथाकथित चुकीच्या अवयवांचा संभोगात वापर तर मुखमैथुनातही होतो. पण तो अनैसर्गिक मानला जात नाही. >> समलैंगिक पुरुषांत गुदसंभोग होतो. गुदद्वार नैसर्गिक संभोगाची जागा नाही. योनी नैसर्गिक संभोगाची जागा आहे. शारीरिक रचनेत योनीत विविध स्राव स्रवल्याने ती जागा सतत धुतली जात असते. त्यामुळे जंतुसंसर्ग होत नाही. याउलट गुदद्वार कोरडं असतं आणि तिथे जंतुसंसर्ग झाला की तो थोपवणं अवघड बनतं. म्हणून समलैंगिक पुरुषांचं गुदद्वार चटकन नाना प्रकारच्या गुप्तरोगांचं माहेरघर होऊ शकतं. ४. >> समलैंगिक व्यक्तींमधील मानसिक समस्यांची कारणे समाजाने दिलेल्या भेदभावाच्या वागणूकीत, असुरक्षिततेमध्ये आणि पर्यायाने आलेल्या नैराश्यात आहेत.>> आजिबात नाही. निसर्गाच्या विरुद्ध गेल्याने या समस्या उत्पन्न अझाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणजे यथोचित उपचार घेऊन जन्मदत्त लिंगाकडे परतणं. हे जमलं नाही तर लिंगबदल करून घेणं. समलैंगिक वर्तन हा कधीही उपचार होऊ शकंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


Anuj Ghanekar

Wed , 23 May 2018

गामा पैलवान, आपण लेख वाचून प्रतिक्रिया नोंदवलीत, त्याबद्दल आभार. या संदर्भात, काही तथ्यं इथे नोंदवणे आवश्यक वाटते. १. समलैंगिकता हा आजार नाही - हे सांगणारे वर्ल्ड सायकिएट्रिक असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीची अधिक्रुत स्टेटमेंट्स (२०१६ साल) उपलब्ध आहेत. २. समलैंगिकता (प्रौढ व्यक्तींमधील शारिरिक भावनिक आकर्षण) आणि बालबलात्कार (प्रौढ व्यक्तीने वयानेे लहान व्यक्तीवर केलेले लैंगिक अत्याचार) या मुळात शास्त्रीय व्याख्येनुसार दोन भिन्न गोष्टी आहेत. दुर्दैवाने समलिंगी व्यक्तींबद्दल द्वेष पसरवण्यासाठी यांचा संबंध जोडला जातो. ३. समलैंगिकता अनैसर्गिक नाही. अन्यथा ती पशु पक्ष्यांमध्ये देखील आढळली नसती. तथाकथित चुकीच्या अवयवांचा संभोगात वापर तर मुखमैथुनातही होतो. पण तो अनैसर्गिक मानला जात नाही. मुळात फक्त प्रजननासाठी संभोग करणे, हा विचार भिन्नलिंगी संबंधांतही अस्तित्वात नाही. टेस्ट ट्युब बेबीची प्रक्रिया अनैसर्गिक मानली जात नाही. समलैंगिक व्यक्तींमधील आजाराची कारणे ही वर्तनाशी (संरक्षण वापरणे किंवा न वापरणे) संबंधित आहेत. जैविक नाहीत. ४. समलैंगिक व्यक्तींमधील मानसिक समस्यांची कारणे समाजाने दिलेल्या भेदभावाच्या वागणूकीत, असुरक्षिततेमध्ये आणि पर्यायाने आलेल्या नैराश्यात आहेत.


Gamma Pailvan

Mon , 21 May 2018

अनुज घाणेकर, समलैंगिकता हा मनोकायिक आजार आहे असं अमेरिकन मानसतत्ज्ञांचं मत होतं. १९७३ साली त्यात अचानक बदल करून तो आजार नाही असं ठरवलं. हे करण्यासाठी कोणतीही चर्चा व/वा शास्त्रीय पुरावा जाहीर केला गेला नव्हता. म्हणून समलैंगिकता हा आजही एक आजारच मानला गेला पाहिजे. असो. आता सामाजिक परिणामांकडे वळूया. पाश्चात्य समलैंगिकांत २० पैकी १ बालबलात्कारी निपजतो. उर्वरित पाश्चात्य जगात हेच प्रमाण ४०० : १ इतके आहे. यावरून समलैंगिकता व बाल-अत्याचार यांच्यातला दृढ संबंध उघड होतो. शिवाय बहुतांश समलैंगिक पुरुष विविध रोगांचे बळी असतात. कारण की समलैंगिकांचा संभोग अनैसर्गिक आहे. संभोगास उचित नसलेले अवयव वापरले जातात. शिवाय समलैंगिक पुरुषांचं वर्तन आज इथे तर उद्या तिथे असं वेश्येसारखं असतं. त्यामुळे मानसिक गुंतागुंत व शारीरिक समस्या अधिकंच वाढतात. माझ्या मते समलैंगिकांच्या समस्यांची योग्य चर्चा केल्याविना घाईने निर्णय घेतले जाऊ नयेत. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......