दिलीप पाडगावकर : ‘ग्लोबल’ मराठी माणूस!
संकीर्ण - श्रद्धांजली
कुमार केतकर
  • दिलीप पाडगावकर (१ मे १९४४ - २५ नोव्हेंबर २०१६) यांची एक भावमुद्रा
  • Sat , 26 November 2016
  • श्रद्धांजली दिलीप पाडगावकर Dileep Padgaonkar टाइम्स ऑफ इंडिया Times of India फ्रेंच French शामलाल Sham Lal

महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पाडगावकर यांना २०१३ साली साधना साप्ताहिकाने निमंत्रित केलं होतं. त्यानिमित्ताने १२ जानेवारी २०१३च्या साधनाच्या पुरस्कार विशेषांक हा लेख प्रकाशित झाला होता. त्याचं हे पुनर्मुद्रण.

संगीतापासून स्वादिष्ट स्वयंपाक करणाऱ्यापर्यंत, साहित्यापासून सौंदर्यशास्त्रापर्यंत, राजकारणापासून तत्त्वज्ञानापर्यंत, मार्क्सपासून फ्रॉईडपर्यंत आणि बालगंधर्वांपासून इटालियन चित्रपट दिग्दर्शक रॉबर्टो रोसेलिनीपर्यंत तितकीच उत्कंठा आणि शिकण्याचा उत्साह कोठून येतो? दिलीप पाडगावकरांविषयी हा प्रश्न मला नेहमी पडतो. माझ्या सुमारे ४० वर्षांच्या ओळखीत मी नेहमी त्याची अचाट ऊर्जा आणि कमालीचे कुतूहल ओसंडून वाहताना पाहिले आहे. वर्ष-दीड वर्षांत दिलीप सत्तरीत प्रवेश करेल; पण मला खात्री आहे, त्याची ऊर्जा तितकीच उदंड असेल.

ज्या काळात पत्रकारितेतही ‘स्टार सिस्टीम’ उदयाला येत होती, त्या काळात पाडगावकर देशातील सर्वांत प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाचे, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’चे वयाच्या फक्त ४४व्या वर्षी (पहिले मराठी!) मुख्य संपादक झाले. शामलाल आणि गिरीलाल जैन यांसारख्या मातब्बर आणि ख्यातनाम संपादकांनंतर पाडगावकरांकडे ‘टाइम्स’ची सूत्रे आली होती.

शामलाल यांनी स्वत: दिलीपला त्याअगोदर २० वर्षे, म्हणजे १९६८मध्ये पॅरिसला विशेष वार्ताहर म्हणून नेमले होते. शामलाल यांच्यासारख्या अक्षरश: अफाट व्यासंगी संपादकांनी दिलीपला (वयाच्या फक्त २४व्या वर्षी) पॅरिस आणि नंतर युरोपहून वार्तापत्रे लिहिण्यासाठी नियुक्त करावे, हाच खूप मोठा सन्मान होता. शामलाल व्यासंगासाठी तर गिरीलाल वादग्रस्त भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते (आता त्या दोघांसारखे अवघ्या मीडियात कुणीही नाही!).

शामलाल स्वतःच्या लेखनातून वैचारिक आणि बौद्धिक अजेंडा देशासमोर ठेवायचे. पुढे गिरीलाल जैन राजकीय आणि धोरणात्मक दृष्टिकोन मांडायचे. दोघांच्या विचारसरणीत आणि व्यासंगशैलीत फरक होता, पण त्यांच्या संपादकत्वाचा दर्जा अभिजात होता. म्हणूनच त्यांच्यानंतर ‘टाइम्स’च्या संपादकपदाची सूत्रे दिलीपकडे यावीत, याला वृत्तपत्रसृष्टीत आणि एकूणच ‘इंटेलेक्च्युअल एस्टॅब्लिशमेंट’मध्ये विशेष महत्त्व होते.

त्या काळी खाजगी टीव्ही चॅनल्स नव्हते. ‘डी डी’ दूरदर्शनचा विस्तार आजच्यासारखा सर्वव्यापी नव्हता. राजकीय आणि वैचारिक वर्तुळात वृत्तपत्रांना अनन्यसाधारण स्थान होते. सुरुवातीच्या काळात पंडित नेहरू आणि शामलाल-गिरीलाल यांच्या काळात इंदिरा गांधी ‘टाइम्स’च्या भूमिकेला गांभीर्याने घेत असत. मतभेदांमध्ये विखार नसे. राजकारण्यांचा वर्ग एक प्रकारची वैचारिक लोकशाही पाळत असे (आणीबाणीत त्याचा संकोच झाला, पण जनता पक्ष सत्तेत असताना गिरीलाल जैन यांनी मोरारजी देसाई सरकारवर शरसंधान करून इंदिरा गांधींचे समर्थन केले. त्यामुळे तर गिरीलाल जैन कमालीचे वादग्रस्त ठरले होते. असो.)

दिलीप पाडगावकर संपादक झाले, तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (दिलीप आणि राजीव दोघांचा जन्म १९४४चा). १९७३मध्ये दिलीप पॅरिसहून भारतात (तेव्हा मुंबईत) टाइम्सचे ‘असिस्टंट एडिटर’ म्हणून आले. माझ्यासारख्या ‘टाइम्स’च्या वाचकांना दिलीपची ओळख होती, ती पॅरिस आणि युरोपच्या वार्तापत्रांमधून. तो काळ बंडखोरीचा होता; प्रस्थापितविरोधाने भारलेला होता; नवीन साहित्यप्रवाह, समांतर चित्रपट, प्रतिकारवादी नाटके, प्रयोगशीलता, क्रांतिकारक मानसिकता, चे गव्हेरा, कॅस्ट्रो, रेजिस डेब्रे, माओ, होचिमिन्ह आणि व्हिएतनाम युद्ध, विद्यार्थी आंदोलने अशा अनेक गोष्टींनी युरोप ढवळून निघत होता.

पॅरिसमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या आणि तशाच बंडखोर वृत्तीने झपाटलेल्या दिलीपला वातावरण आणि मूड युरोपमध्ये गवसला. ‘१९६८ जनरेशन’ म्हणून जी पिढी ओळखली जाते, ती पॅरिसमधील विद्यापीठामध्ये बंडाचे झेंडे फडकावू लागली होती. कामगार कारखाने ताब्यात घेऊ लागले होते. तरुण मुले-मुली ‘दुसऱ्या फ्रेंच क्रांती’साठी सिद्ध होत असल्यासारखे दृश्य होते. ते सर्व उत्तेजक आणि प्रक्षोभक वातावरण ‘टाइम्स’च्या वार्तापत्रांमधून दिलीपने आमच्यासमोर उभे केले होते. छापील माध्यमातून ‘स्टार’ उदयाला येत होता. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल, आयपॅड असे काही नसलेल्या त्या काळात ‘टाइम्स’ ही एक विद्यापीठसदृश ‘इन्स्टिट्यूशन’ होती, शामलाल हे त्या विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि दिलीपसारखे पत्रकार उगवते तारे होते.

१९७३मध्ये त्या ‘टाइम्स’ इमारतीतच या उगवत्या ताऱ्याशी माझी भेट झाली. शामलाल यांनी दिलीपकडे ‘टाइम्स’च्या रविवार पुरवणीचे काम सोपवले होते. दिलीपने मराठी दलित व समांतर साहित्यावर विशेषांक काढायचे ठरवले होते. त्या वेळेस मी ‘टाइम्स’मध्ये नोकरी करत असतानाच ‘सत्यचित्र’ नावाच्या एका पाक्षिकाचेही काम पाहत होतो. तीन-चार वर्षे अगोदर ‘दलित पँथर्स’ची स्थापना झालेली असल्यामुळे ‘सत्यचित्र’मधून त्यांच्या बंडखोर व चैतन्यशील साहित्याला आम्ही उचलून धरत असू. ‘सत्यचित्र’ हे तसे समांतर, बंडखोरवादी पाक्षिक होते. दिलीप तेव्हा दलित साहित्यातील नव्या प्रयोगांचा शोध घेत होता; आणि आमची ओळख झाली. पॅरिस व युरोपमधील बंडखोरीच्या वातावरणाने आम्हांला जोडलेले असले, तरी तो ‘स्टार’ होता आणि आम्ही शामलाल यांचे भक्त होतो (शामलाल व्हिएतनामी जनतेच्या संघर्षाच्या बाजूने, अमेरिकेच्या विरोधात आणि बौद्धिक बंडखोरीच्या बाजूने लेखन करत असत. त्यामुळे तोही आम्हांला जोडणारा एक धागा होता).

दिलीपने पुढे पाच-सात वर्षे ‘टाइम्स’मध्ये काढल्यानंतर तो पुन्हा ‘युनेस्को’मध्ये नोकरी करण्यासाठी पॅरिसला गेला. तो परत आला आणि अल्पावधीत, १९८८मध्ये संपादक झाला. ते वर्ष ‘टाइम्स’चे दीडशे वर्षपूर्तीचे वर्ष होते. स्वतःची परंपरा टिकवत-टिकवतच ‘टाइम्स’ कात टाकू लागला होता. ‘टाइम्स’चे मालक अशोक जैन यांचा तरुण चिरंजीव व्यवस्थापनेची सूत्रे हाती घेऊ लागला होता. परंपरेने आलेली प्रतिष्ठा, शामलाल यांचा व्यासंगी वारसा, गिरीलाल यांचा वादग्रस्त पवित्रा हे सर्व खांद्यावर आलेल्या दिलीपसमोर मोठेच आव्हान होते – ‘प्रतिष्ठा तर टिकवायची, पण नवे प्रवाहही दैनिकात आणायचे’; ‘व्यासंगी दबदबा टिकवायचा, पण तरुण पिढीला आकर्षून घेण्यासाठी बॉलिवूड आणि फॅशनलाही स्थान द्यायचे’; ‘बौद्धिकता आणि वैचारिकता जपायची, पण ‘मार्केट’ही सांभाळायचे’ अशा परस्परविरोधी जबाबदाऱ्या दिलीपसमोर आल्या. वृत्तपत्रांची व्यवस्थापनशैली बदलू लागली होती आणि त्याचा संपादकीय धोरणांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत होती. अशा वादळी लाटांवर वृत्तपत्रसृष्टी असताना दिलीपकडे कॅप्टनपद आले होते.

दिलीपने खरे म्हणजे सविस्तर आत्मचरित्र लिहायला हवे. ते एका पिढीचे आत्मचरित्र असेल - उद्बोधक आणि प्रक्षोभकही! कारण १९६८ ते अगदी आजपर्यंत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘टाइम्स’ या मुख्य वृत्तपत्रसमूहाशी जवळचा संबंध राहिला आहे. राजीव गांधी, नरसिंह राव, सोनिया या सर्वांशी त्याचे निकटचे (राजकीय-वैचारिक) नाते राहिले होते; डाव्या, उदारमतवादी, सेक्युलर विचारांचे उघड व धाडसी समर्थन केल्यामुळे अनेकांशी ‘शत्रुत्व’ आणि ‘हेट-मेल’ नाते निर्माण झाले आहे; परंतु दिलीपने मूळ वैचारिक व बौद्धिक पीळ सोडलेला नाही.

त्या बौद्धिकतेला त्याने फ्रेंच भाषेची जोड दिली आहे. मी दिलीपबरोबर पॅरिसच्या रस्त्यांवर भटकलो आहे. रेजिस डेब्रे या एकेकाळच्या माझ्या ‘आयडॉल’बरोबर दिलीपनेच माझी भेट घडवून आणली. जितक्या सहजतेने दिलीप दिल्लीत वावरतो तितक्याच लीलया तो पॅरिसमध्ये फिरतो आणि आता अगदी पुण्यातही वावरतो. तसा त्याचा पुण्याशी असणारा संबंध अगदीच जुना; शाळेपासूनचा. म्हणजे पॅरिसला जाईपर्यंत दिलीप पुणेकरच होता. त्यामुळे निवृत्तीनंतर तो पुण्यात येणे म्हणजे, ‘कमिंग बॅक टू रूट्स!’ निवृत्ती अर्थातच नावापुरती. कारण लेखन, जगभर भटकंती, परिसंवाद-चर्चा, टीव्ही पॅनेल्सवरच्या मुलाखती, पुस्तक-लेखन, सरकारने नेमलेल्या काश्मीरसंबंधातील समितीचे काम, त्याचा (वादग्रस्त) अहवाल, बालगंधर्वांविषयी पुस्तक लिहिण्याचा मानस आणि त्याच वेळेस जर्मन भाषा अधिक चांगली शिकण्याचा अभ्यास, हे त्याचे सर्व एकाच वेळेस चालू आहे. एकाच वेळेस इतक्या क्षेत्रांमध्ये वावरणे सोपे नाही, पण ते दिलीपला अगदी लीलया साध्य होते.

दिलीपला मातृभाषेपेक्षाही अधिक उत्तम रीतीने फ्रेंच अवगत आहे, असे म्हटले तर त्यात फारशी अतिशयोक्ती नाही, परंतु याच ‘फ्रेंचभाषक’ दिलीपने मला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बालगंधर्वांची गाणी (सुरेलपणे) ऐकवली आहेत. न्यूयॉर्क मॅनहटनमध्ये रात्री १२-१ वाजता बालगंधर्वांचे शब्द व सूर रस्त्यावर (बऱ्यापैकी जोरात) गायले जाण्याचा तो पहिला व शेवटचा प्रसंग असावा. एकोणिसाव्या शतकातील अखेरचा व विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हे महाराष्ट्रातील ‘रेनेसाँ’ आहेत, हे दिलीप एखाद्या प्रबंधाप्रमाणे सांगू शकतो. त्यामुळे त्याचे मराठीपण आणि पुणेकरगिरी अगदी शाबूत असली, तरी त्याच्या जगभरच्या भटकंतीमुळे व युरोपच्या बौद्धिक विश्वाशी त्याने स्वत:ला जोडून घेतल्यामुळे तो सर्वार्थाने ‘ग्लोबल मराठी’ झाला आहे.

त्याच्या जागतिकतेचा आणखी एक संदर्भ म्हणजे, तो चिनी खाद्यपदार्थ आणि फ्रेंच, सारस्वतांची सोलकडी व फिश करी अशा जगभरच्या स्वयंपाकाचा व जेवणशैलीचा एक तज्ज्ञ आहे. तो ‘टाइम्स’चा संपादक होऊन देशातील (त्या वेळच्या) दुसऱ्या सर्वांत महत्त्वाच्या पदावर गेला नसता, तर संजीव कपूर या जगप्रसिद्ध स्वयंपाक्याच्या पोटावर पाय आला असता. दिलीपने ती जागा संजीव कपूरसाठी सोडून दिली!

दिलीपचा संस्थात्मक प्रवास ‘टाइम्स’शी अजूनही जोडला गेला असला, तरी त्याचा सामाजिक-वैचारिक प्रवास मात्र दिल्लीच्या प्रतिष्ठित ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’पासून ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’पर्यंत आला आहे. ज्या सहजतेने तो पॅरिस-दिल्ली-मुंबई या मेट्रो संस्कृतीत रुळला, त्याच सहजतेने त्याने आता पुणे शहरात स्वतःचे जीवन नव्याने वसवले आहे.

हे सर्व त्याला इतक्या स्वाभाविकपणे जमले, त्याचे मुख्य कारण त्याची पत्नी लोतिका. तीसुद्धा त्याच्याप्रमाणेच उद्योगी, कलासक्त, सामाजिक प्रगल्भता असलेली, चित्रकला व शिल्प यांवर प्रेम करणारी, कमालीची आतिथ्यशील आहे. दिलीपचे चित्रकलाप्रेम त्याच्या संग्रहावरून दिसतेच; पण त्याला खरा ओढा आहे, तो पुस्तकांचा! ग्रंथप्रेमातून त्या दोघांनी जमवलेला ग्रंथसंग्रह ही त्यांची खरी सांस्कृतिक ओळख आहे.

दिलखुलास वृत्ती, गप्पांवर प्रेम, उत्साह, उमेद आणि ऊर्जा; आणि या सर्व स्वभाववैशिष्ट्यांना प्रगत, प्रगल्भ, सुसंस्कृत विचारांची व जीवनविषयक दृष्टिकोनाची अतूट जोड मिळाल्यामुळे दिलीप हे समृद्ध व्यक्तिमत्त्व घडले आहे. ते कसे घडले, हे दिलीपने आत्मचरित्र लिहिले, तरच आपल्याला अधिक बारकाईने कळू शकेल.

लेखक ज्येष्ठ संपादक आहेत.

kumar.ketkar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......