‘डेडपूल 2’ : यशस्वी गाथेतील आणखी एक पान 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘डेडपूल 2’ची पोस्टर्स
  • Sat , 19 May 2018
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा डेडपूल 2 Deadpool 2

रायन रेनॉल्ड्स हा ‘डेडपूल’चा मोठा चाहता असण्याची शक्यता आहे. जे त्याचा स्वभाव आणि ऑफ स्क्रीनही सुरू असलेलं उपरोधिक बोलणं पाहता लक्षात येण्यासारखं आहे. जेव्हा असे एखाद्या गोष्टीचे चांगले चाहते एखाद्या कलेत निष्णात असतात, तेव्हा ते त्यांचं विशिष्ट गोष्टीवरील प्रेम व स्वतःची मतं, तसंच इनपुट्स यांचा अशक्यप्राय संगम साधत एखादी अफाट कलाकृती निर्माण करतात. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘ग्राइंडहाऊस’ चित्रपट, जपानी व अमेरिकन क्लासिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या ‘क्वेंन्टिन टॅरंटिनो’च्या चित्रपटांमधून किंवा ऐंशीच्या दशकातील पॉप कल्चरवर प्रेम असणाऱ्या डफर ब्रदर्स निर्मित ‘स्ट्रेंजर थिंग्ज’मधून त्यांना दिली जाणारी मानवंदना होय. हेच निर्मिती आणि लेखनात रायन रेनॉल्ड्सचा मोठा वाटा असलेल्या ‘डेडपूल सागा’ला लागू पडतं. 

चित्रपटाच्या सुरुवातीलाच वेड विल्सन ऊर्फ डेडपूल (रायन रेनॉल्ड्स) ऑईल ड्रम्सवर झोपून स्वतःचा स्फोट करवून घेतो. त्यानं हा स्फोट का घडवून आणला, स्वतःला मारण्याचा (अर्थातच असफल) प्रयत्न का केला, यासाठी तो नेहमीप्रमाणे ‘फोर्थ वॉल’ ब्रेक करत थेट आपल्याशी संवाद साधत एका फ्लॅशबॅकचं कथन करतो. आणि चित्रपटाला सुरुवात होते. 

‘डेडपूल’ची खरी मजा त्याच्या पटकथेच्या एकसंध असण्यात किंवा तिनं थ्री अॅक्ट स्ट्रक्चर फॉलो करण्यात (खरं तर जे तो यावेळी करत नाही) नसून त्याच्या सॅव्हेज क्षणांमध्ये, पॉप कल्चरचे संदर्भ आणि त्यांची खिल्ली उडवणाऱ्या संवादांमध्ये आहे.

‘डेडपूल’च्या पहिल्या भागातील त्याची श्रेयनामावलीही त्याइतकीच विशेष होती. याही वेळी दिग्दर्शक म्हणून आलेलं ‘डायरेक्टेड बाय वन ऑफ द गाइज व्हू किल्ड द डॉग इन जॉन विक’ अर्थात ‘जॉन विकमध्ये कुत्रं मारणाऱ्या अनेक लोकांपैकी एक’ असं कार्ड असो किंवा त्याआधी जेम्स बॉन्डच्या श्रेयनामावलीप्रमाणे ‘स्कायफॉल’ची आणि बॉन्ड-पटांतील ‘बॉन्ड-गर्ल्स’ची खिल्ली उडवत केलेली सुरुवात असो, जागोजागी खुबीनं पेरलेले पॉप कल्चरचे संदर्भ असो आणि रायन रेनॉल्ड्सचा टॉप नॉच परफॉर्मन्स असो, या जोरावर चित्रपट एक ‘किक-अॅस’ सुरुवात करून देतं. 

तरीही चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा अप्रभावी वाटत राहतो. कारण केबल (जॉश ब्रोलिन) या खलनायकाला पूर्वार्धात फार वाव नाही. ज्यामुळे त्याचं ध्येय काहीसं अस्पष्ट स्वरूपात दिसत राहतं. त्यामुळे ‘डेडपूल’च्या अगदी ध्येय स्पष्ट नसलेल्या तरी त्याचं किमान कारण माहीत असलेल्या पार्श्वभूमीवर केबल सुरुवातीला फारसा कॅरेक्टर आर्क नसलेला वाटत राहतो. मात्र ही उणीव उत्तरार्धात त्याच्या पात्राला इमोशनल आर्क बहाल करून, फास्ट पेस्ड अॅक्शन सीक्वेन्सेसच्या सोबतीनं भरून काढली जाते. त्यामुळे एकूणच थर्ड अॅक्टमध्ये तो अधिक प्रभावी ठरतो. 

यावेळी कोलॉसस (Stefan Kapičić), दोपिंदर (करन सोनी), ब्लाइंड अॅल (लेस्ली युगम्स), विसेल (टी. जे. मिलर) यांना काहीसा अधिक स्क्रीनटाइम असणाऱ्या भूमिका देऊ केल्या आहेत. तर रसेल कॉलिन्स (ज्युलियन डेनिसन) आणि वॅनेसा (मॉरेना बॅकरिन) हे अधिक मध्यवर्ती भूमिकांकडे वळतात. वॅनेसाच्या पात्राला आणि ती असलेल्या दृश्यांना पहिल्या भागाहून अधिक भावनिक मूल्य आहेच, मात्र सोबत तिचा आवाज आणि संवाद यांच्या उत्तम मेळामुले ते पात्र अधिक परफेक्शनच्या दिशेनं वाटचाल करतं. याखेरीज डॉमिना (जेझि बीट्झ) आणि पीटर (रॉब डेलनी) ही पात्रं विशेषकरून मजेशीर आहेत. 

दिग्दर्शक टिम मिलरचा ‘डेडपूल’ हा अधिक उत्तम होता असं म्हणायला वाव असला तरी तो कथानकाच्या जोरावर वाटचाल करणारा होता याउलट डेव्हिड लीच दिग्दर्शित ‘डेडपूल 2’ हा पात्रांना वाव देत, त्यांना अधिक बहरू देणारा आहे. ज्याचं यश काही अंशी रेट रीस (Rhett Reese), पॉल वर्निक (Paul Wernic) आणि सोबतच रायन रेनॉल्ड्सला श्रेय दिलेल्या पटकथेला आहे. 

टायलर बेट्सचा ओरिजनल साउंडट्रॅक आणि स्कोअरही पहिल्या ‘डेडपूल’ इतकाच चांगला आहे. अर्थात पहिल्या भागातील ‘जंकी एक्सएल’ इथं नाही हा भाग वेगळा. तरीही सेलिन डियनचं ‘अशेस’ ते पट बेनेटरचं ‘वुई बिलाँग’ आणि सोबत ‘स्वदेस’मधील ‘यू ही चला चल राही’पर्यंत बरीच व्हरायटी असलेला साउंडट्रॅक ‘डेडपूल’ चित्रपटमालिकेला साजेसा आहे. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘डेडपूल 2’ पॉप कल्चरमधील संदर्भांनी नटलेला आहे. ज्याची खास बाब अशी की, हे संदर्भ केवळ ‘डीसी’ किंवा ‘मार्व्हल’ विश्वापुरतं मर्यादित नसल्यानं त्यांना अधिक वैश्विक स्वरूप प्राप्त होतं. ज्यात ‘फाईट क्लब’मधील (१९९९) संदर्भापासून ते ‘से एनीथिंग’मधील (१९८९) एका प्रसिद्ध दृश्याची खिल्ली उडवण्यापर्यंत, आणि जेम्स बॉन्ड, ‘ग्रीन लटर्न’, वगैरे अनेक सु(आणि कु)प्रसिद्ध अमेरिकन आयडॉल्सची खेचत ‘डेडपूल 2’ स्वतःच्या ‘फोर्थ वॉल’ ब्रेक करण्याच्या स्वभावाला जागतो. एका ठिकाणी तर तो ‘रायन रेनॉल्ड्स’ अशी सहीदेखील करून येतो. याखेरीज कॅमेरा सुरू असताना स्पॉटला बोलावणं, वगैरे बऱ्याच गोष्टी करत तो त्यानं ट्रेलरमधून निर्माण केलेल्या अपेक्षांची पूर्ती करतो. 

‘मार्व्हल’शी परिचय असलेल्या लोकांना याच्या ‘पोस्ट-क्रेडिट’ दृश्यांकरिता थांबायला सांगण्याची गरज नक्कीच नाही. आणि पॉप कल्चरशी संबंध नसलेल्या इतर लोकांना त्यातील संदर्भ लक्षात येणार नाहीत त्यामुळे आपल्याला ‘पॉप कल्चर’ बऱ्यापैकी ज्ञात असलेल्या व्यक्तींनी या दृश्याकरिता थांबायला हरकत नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख