‘माइंडहंटर’ : गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास आणि त्याचे ‘एफबीआय’मधील उपकरण 
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • ‘माइंडहंटर’ची पोस्टर्स
  • Sat , 19 May 2018
  • कला-संस्कृती चलत्-चित्र माइंडहंटर टीव्ही मालिका Mindhunter TV series डेव्हिड फिंचर David Fincher नेटफ्लिक्स Netflix's

गेल्या तीनेक दशकात गुन्हे, थरारपट आणि मानसिकशास्त्राशी संबंधित विषयांवर आधारित चित्रपट करत आणि काही अपवाद वगळता इतर वेळी स्वतःच उभ्या केलेल्या विश्वाभोवती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या दिग्दर्शकीय शैलीमुळे डेव्हिड फिंचर प्रसिद्ध झालेला आहे. शिवाय अलीकडील काळात चित्रपटांबाबत जरी बरे-वाईट सर्व प्रकारचे चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी सीरिअल्सबाबत तरी ‘नेटफ्लिक्स ओरिजनल’ या ओपनिंग क्रेडिटसवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा डेव्हिड फिंचरचं नाव ‘माइंडहंटर’ या सीरियलशी जोडलं गेलं तेव्हाच नेटफ्लिक्सनं बाजी मारली असं मानायला हरकत नाही. 

अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऊर्फ एफबीआय या संस्थेकडे एक अधिक स्थानिक पातळीवर स्वायत्त संस्था म्हणून काम करते. जे. एडगर हूव्हरसारख्या लोकांनी तिची अधिक परिणामकारकरित्या पायाभरणी केली आहे. आता तर तिची तुलना ब्रिटिश इंटेलिजन्स सर्व्हिस ‘एमआय 5’शीही केली जात असली तरी ही गेल्या पाचेक दशकातील परिस्थिती आहे. सत्तरच्या दशकात तिच्या अनेक पातळ्यांवरील अनेक मर्यादा होत्या. जरी ती स्थानिक पोलिस दल आणि यंत्रणेहून अधिक कार्यकारी असली तरी या दशकात अमेरिका बऱ्याच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमधून जात होती. ज्याचं प्रतिबिंब तत्कालीन गुन्हेगारी क्षेत्रामध्ये दिसून येत होतं. 

या काळात गुन्हेगारांच्या मानसिक अभ्यासाची यंत्रणा प्रबळ तर नव्हतीच, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिलंही जात नव्हतं. त्या वेळी ‘सीरियल किलर’ ही संज्ञादेखील अस्तित्वात नव्हती. त्यामुळे गुन्हेगारी विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही पारंपरिक रूपात प्रकट होत होता. 

‘माइंडहंटर’ याच काळातील एफबीआय आणि खासकरून त्यातील दोन एजंट्सनी एफबीआयच्या क्रिमिनल सायकॉलॉजी विभागात आणलेल्या बदलांची कथा समोर घेऊन येते. जी ‘माइंडहंटर : इनसाइड एफबीआय’ज एलाइट सीरियल क्राईम युनिट’ या जॉन डग्लस आणि मायकल ओलशेकर या दोन माजी एफबीआय एजंट्सनी डेव्हलप केलेल्या ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’ आणि ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’बाबतच्या ‘माइंडहंटर’ याच नावाच्या पुस्तकावर बेतलेली आहे.

एजंट होल्डन फोर्ड (जोनाथन ग्रॉफ) आणि एजंट बिल टेंच (हॉल्ट मॅक्कॅलनी) हे दोघेही त्या वेळी नव्यानं रुजू झालेल्या एफबीआय एजंट्सचे प्रशिक्षक आहेत. फोर्ड हा अधिक पुस्तकी स्वरूपात काम करणारा आणि सुरुवातीच्याच दृश्यातील घटनेमुळे फिल्ड वर्कऐवजी प्रशिक्षण विभागात बदली झालेला आणि खऱ्या अर्थानं या सीरियलचा हिरो असलेला आहे. तर टेंच हा त्याच्याहून वयस्कर, मात्र त्याच्यात काहीतरी विशेष जाणवून त्याला स्वतःसोबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या, वेळी त्यांना मदत करण्याच्या, रोड शोचं स्वरूप असलेल्या उपक्रमात सहभागी करून घेतो. आणि खऱ्या अर्थानं या दोन ‘माइंडहंटर्स’चा प्रवास सुरू होतो. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे सत्तरचं दशक अधिक अस्थिरतेचं दशक होतं. फोर्ड आणि टेंचचं काम अधिक अभ्यासू स्वरूपाचं आणि त्यांचे सगळे आडाखे पाळण्यात असल्याच्या स्वरूपाचं होतं. याउलट लोकल पोलिस यंत्रणा गुन्हेगारांकडे मानसिक पातळीवरून न पाहता, पारंपरिक चष्म्यातून असल्यानं नव्यानं विकसित होत असलेल्या या गुन्हेगारांशी आणि प्रवृत्तीला कसं हाताळायचं, हे त्यांना कळत नव्हतं. सीरियलच्या सुरुवातीला फोर्डचा ‘सीरियल किलर्स’च्या मुलाखती घ्यायचा उपक्रम केवळ सुरूच झाला होता. ज्याला टेंचची म्हणावी तितकी साथ नसली तरी तो त्याच्या पाठीशी नक्कीच होता. त्यामुळे पुढे जाऊन जेव्हा फोर्डचे आडाखे त्यांना उपयुक्त ठरू लागले, तेव्हा तोही त्याच्या बाजूनंच येतो. आणि एकूणच सीरियल त्यांच्या या छोटेखानी उपक्रमापासून त्यांच्या प्रयत्नांमुळे झालेली ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’ची स्थापना, यांचा आढावा घेते. 

विकसनशील स्वरूपात असलेल्या एजंट फोर्ड आणि एजंट टेंचच्या या कामाकडे तितक्याशा गंभीरपणे न पाहण्याच्या, खिल्ली उडवण्याचा लोकल पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीपुढे जेव्हा नंतर एखादा अधिकारी एखाद्या संभाव्य सीरियल किलर केस संबंधित त्यांची मदत घ्यायला येतो, तेव्हा त्यांच्या कामाचं सार्थक झाल्याची एक भावना त्यांच्यासोबतच आपल्याही मनात निर्माण होते. मात्र त्याच वेळी तत्कालीन संदर्भ असलेल्या, १९६०-७० दरम्यान घडलेल्या ‘चार्ल्स मॅन्सन फॅमिली’ मर्डर केस संदर्भानं जेव्हा चार्ल्स मॅन्सनचा उल्लेख होतो, तेव्हा संपूर्ण भरलेल्या खोलीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या रूपानं दिसून येणारी तिरस्करणीय भावना त्या वेळी मॅन्सन आणि इतर काही गुन्हेगारांच्या प्रस्थाविषयी बोलकी ठरते. 

सीरियल केवळ त्यांच्या कामातील प्रवासाचा आढावा न घेता त्याला समांतर सुरू असलेल्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यही फॉलो करते. ज्यामुळे त्यांच्या या कामाचा त्यांच्या आयुष्यावर होत असलेला परिणामही तितक्याच प्रभावीपणे आपल्यासमोर येतो. फोर्डचा एक साधा, सरळ व्यक्ती म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे जाऊन ज्या पद्धतीनं अधिक महत्त्वाकांक्षी स्वरूपाचा आणि त्याच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करणारा ठरतो, त्यातून या ‘सीरियल किलर्स’चा त्याच्या मानसिकतेवर पडणारा प्रभाव दिसून येतो. सातव्या एपिसोडच्या आसपास जेव्हा त्याला लोकल पोलिस अधिकाऱ्यांकडून बीअर पीत असताना आधुनिक शेरलॉक अशी उपमा दिली जाते, त्या वेळी आणि एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून यांच्या चौकशीदरम्यान संभाव्य गुन्हेगाराशी त्याची होत असलेलं संभाषण, पुढे आणखी एका बारमधील दृश्यात त्याच्या नजरेतील एक आत्मप्रौढी चमक यातून त्याचा प्रवास स्वतःच्या ऱ्हासाकडे तर होत नाही ना असं वाटून जातं. 

याउलट टेंच हा अधिक संयमी, सांसारिक व्यक्ती आहे. असं असलं तरी त्याच्याही आयुष्यात तणाव आहे. जो पुढे जाऊन आपल्याला दिसून येतो. मात्र इथं त्यानं फोर्डला एक आदर्श पार्टनर या नात्याने वेळोवेळी दिलेली साथ आणि त्याची केलेली पाठराखण ही फोर्डच्या अधिक जिज्ञासू वृत्ती इतकीच महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’ची स्थापना झाल्यावर येतो. 

‘माइंडहंटर’चं लेखन ही त्यातील (अनेक) जमेच्या बाजूंपैकी एक आहे. ज्यात केवळ डायलॉग किंवा पटकथाच येत नाही तर जवळपास प्रत्येक पात्राचा विकास, क्रिमिनल सायकॉलॉजीचा केलेला अभ्यास इतकंच नव्हे तर एजंट फोर्डची प्रेयसी (हॅना ग्रॉस) किंवा या सीरियलमधील पहिलावहिला (आणि सर्वांत महत्त्वाचा) सीरियल किलर असलेला एड केम्पर (कॅमेरॉन ब्रिटर) किंवा वेंडी कार (अ‍ॅना टॉर्व), शेफर्ड (कॉटर स्मिथ) किंवा आपल्याला राग यावा असा ग्रेग स्मिथ (जो टर्टल) अशा सर्व लहानमोठ्या पात्रांचा विकास हाही महत्त्वाचा भाग आहे. 

एकीकडे ‘सीरियल किलर्स’ना अजून एफबीआयच्या संज्ञेत काही विशेष नावानं पुकारलं जात नसल्यानं त्यांना कोणत्या नावानं संबोधित करायचं यावर त्यांना ‘सीरियल किलर’ ही संज्ञा देऊ करणारा एजंट टेंच आपल्याला त्याच्या काम करण्याच्या शैलीमुळे आवडून जातो. तर दुसरीकडे नायकत्वाचा स्वीकार करत, वेळोवेळी पारंपरिक शैलीच्या विरूद्ध, काहीसा ऑफ द रोड जाणारा एजंट फोर्ड त्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळे आपल्याला आवडून जातो. 

एड केम्पर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा गळा कसा अधिक चांगल्या पद्धतीनं कापावा याबद्दल बोलतो, आणि ते स्पष्ट करत असताना तेव्हा एजंट फोर्डचा गळा धरून त्या (त्याच्या मते थराराचं) दृश्याचं वर्णन करतो, तेव्हा किंवा जेरी ब्रुडोस (हॅपी अँडरसन) जेव्हा त्यानं मारलेल्या स्त्रियांविषयी बोलतो, तेव्हा फोर्ड आणि टेंच करत असलेल्या कामाचं महत्त्व अधिक प्रभावीपणे विशद होतं. 

एजंट टेंचचं “How do we get ahead of crazy if we don’t know how crazy thinks?” या वाक्याच्या रूपानं त्यांच्या उद्देशाचं आणि कामाचं किमान शब्दात जास्तीत योग्य वर्णन करतो. वास्तविक पाहता ही सीरियल जो पेनहॉलनं (Joe Penhall) तयार केली असली आणि फिंचर सदर सीरियलचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असला, आणि त्यानं जरी यातील चारच भाग दिग्दर्शित केले असले तरी एकूणही सर्व सीरियलवर त्याच्या दिग्दर्शकीय शैलीची असलेली छाप सहज दिसून येते. ज्यात त्याच्या ‘सेव्हन’ आणि ‘झोडियाक’छाप संदिग्ध वातावरण, हिरव्या आणि पिवळ्या रंग पटलांचा केलेला वापर, इत्यादी गोष्टी सहज उठून दिसतात. 

याखेरीज जेसन हिलचा ओरिजनल स्कोअर आणि साउंडट्रॅक यांचा सीरियलच्या यशात आणि प्रभावी असण्यात महत्त्वाचा वाटा आहे. ओरिजनल स्कोअरसोबतच योग्यवेळी लागणारी ‘व्हॉट यू वोन्ट डू फॉर लव्ह’, ‘आय वुड’न्ट वॉन्ट टू बी लाईक यू’सारख्या गाणी असलेला साउंडट्रॅकही नक्की ऐकावा असा आहे. 

तिचं लेखन, निर्मितीमूल्यं, एड केम्पर आणि तत्सम भयावह सीरियल किलर्स आणि त्यांच्या रंजक मुलाखती यांच्यामुळे ही मालिका खास पहावी अशी झाली आहेच. मात्र क्रिमिनल सायकॉलॉजीसारख्या महत्त्वाच्या विषयाला तितक्याच ताकदीने समोर उभी करणारी ही अलीकडील काळातील एक महत्त्वाची मालिका आहे. काहींना ही डिस्टर्बिंग वाटेल, तिरस्करणीय वाटेल मात्र आपण कोणत्या समाजात आणि युगात राहत आहोत हे सांगणाऱ्या, क्रूर सत्य समोर आणत आपल्या रोमँटिक कल्पना आणि स्वप्नांमधून जागं करणारी एक ‘रिअ‍ॅलिटी चेक'’ म्हणून काम करणारी आणि या दशकातील एका उत्कृष्ट दिग्दर्शकाचं एक तितकंच उत्कृष्ट काम म्हणून आवर्जून पहावा असा हा 'सिनेमॅटिक ब्रीलियन्सी'चा एक अभूतपूर्व नमुना आहे. 

टीप : 'माइंडहंटर'चा पहिला सीझन 'नेटफ्लिक्स'वर एअर झालेला आहे, तर त्याच्या दुसऱ्या सीझनची अनाउन्समेंटदेखील गेल्याच महिन्यात झाली आहे. पहिल्या सीझनमध्ये एकूण दहा एपिसोड्स आहेत. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख