‘रेडू’ : एक श्रवणीय आणि रमणीय भावस्पर्शी श्रुतिका  
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘रेडू’चं एक पोस्टर
  • Sat , 19 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie रेडू Redu सागर वंजारी Sagar Vanjari शशांक शेंडे Shashank Shende

एकेकाळी म्हणजे दूरचित्रवाणीचा शोध लागण्यापूर्वी ‘आकाशवाणी’ म्हणजेच ‘रेडिओ’ हे एक प्रमुख प्रसारमाध्यम होतं. माहितीबरोबरच मनोरंजन करणारं हे माध्यम लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होतं. सुरुवातीला भारतात खेडोपाडी रेडिओ नव्हते. मात्र जसजसं तंत्रज्ञान बदलत गेलं, तसतसं रेडिओचं आकारमान बदलत गेलं आणि बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओमुळे ते हातात घेऊन कोठेही घेऊन जाण्याची सोय निर्माण झाली. अर्थात त्या काळात खेड्यापाड्यातही असे रेडिओ दुर्मीळच असायचे. त्यामुळे साहजिकच त्याच्याविषयी काहीजणांना जबरदस्त आकर्षण असायचे. घरात रेडिओ असणाऱ्यांची गावात वेगळीच पत असायची. ‘माणूस कोठेही दिसत नसताना तो आपल्याशी ‘संवाद’ साधतो आहे’ या वैज्ञानिक आश्चर्याचं अनेकांना अप्रूप वाटायचं. ज्यांना ‘रेडिओ’ असा शब्दही नीट म्हणता यायचा नाही, जे त्याला ‘रेडू’ असे संबोधायचे. तो त्यांचा जीव की प्राण असायचा.

‘रेडू’ या नवीन मराठी चित्रपटात अशाच एका गरीब, निरक्षर आणि मजुरीकाम करणाऱ्या रेडिओवेड्या माणसाची भावस्पर्शी कहाणी सांगण्यात आली आहे. दिग्दर्शक सागर छाया वंजारी यांनी आपल्या पदार्पणातच एक वेगळा विषय हाताळून मोठ्या पडद्यावर सादर केलेली ही श्रुतिका लक्षणीय ठरली आहे.

ज्या काळात खेडोपाडी रेडिओ (ट्रान्सिस्टर) दुर्मीळ होते, अशा सुमारे सत्तरच्या दशकात घडणाऱ्या या कथेचा जीव तसा फार छोटा आहे. मात्र कथा-पटकथा लेखक संजय नवगिरे यांनी निसर्गरम्य कोंकणच्या पार्श्वभूमीवर या ही कथा छान फुलवली  आहे.

‘रेडू’ मध्ये पाहायला मिळते ती एका छोट्या गावात राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून जगणाऱ्या तातू या गृहस्थाची कथा. तातू संसारी आहे. पत्नी छाया आणि मुलगी सरू हे त्याचं छोटंसं कुटुंब. त्याची पत्नीही त्याच्याबरोबर मोलमजुरी करून संसाराच्या गाड्याला हातभार लावत असते. अशा या तातूला रेडिओचं मात्र जबरदस्त आकर्षण असतं. मात्र अर्थातच गरिबीमुळे रेडिओ विकत घेणं त्याला शक्य नसतं. त्यामुळे ‘दुधाची तहान ताकावर’ या न्यायानं कोठेतरी रेडिओ पाहायला वा ऐकायला मिळाला तर त्यावरच तो समाधान मानून आहे. 

एके दिवशी अकस्मात, घरातून मुंबईला पळून जाऊन लग्न केलेली तातूची मेव्हणी (सुमन) तिच्या नवऱ्यासह तातूच्या घरी येते. लहान बहीण घरी आल्यामुळे तातूच्या पत्नीला आनंद होतो, मात्र तातूला हे ‘झंझट’ नकोसं वाटतं. मात्र मुंबईहून आलेले त्याचे साडूभाऊ जेव्हा पिशवीतून रेडिओ बाहेर काढतात, तेव्हा तातूची कळी खुलते. तो त्यांना राहण्याचा आग्रह करतो. जेव्हा त्यांचा परत जाण्याचा दिवस येतो, तेव्हा साडूभाऊ तो रेडिओ तातूला भेट म्हणून देतात. त्यामुळे तातूच्या आनंदाला पारावर राहत नाही. त्याच गावात राहणाऱ्या तातूच्या बहिणीचा मुलगा सुदामा हा पैशासाठी छोट्या-मोठ्या चोऱ्या करत असतो. एके दिवशी तातूच्या घरातून रेडिओ गायब होतो आणि सुदामाही बेपता होतो. बेपत्ता सुदामाचा शोध घेण्यासाठी तातू आणि त्याची पत्नी जात असताना वाटेत त्यांना त्याचा रेडिओ जवळ बाळगणारी दोन माणसं भेटतात. मात्र हा रेडिओ एकानं आमच्याकडे गहाण टाकला आहे. त्यामुळे सत्तर रुपये दिल्यास हा रेडिओ तुम्हाला परत करू असं ते सांगतात. निराश झालेला तातू पुन्हा गावाकडे येतो आणि दुप्पट मोलमजुरी करून सत्तर रुपये गोळा करतो आणि ते देण्यासाठी त्या माणसाकडे जातो. मात्र त्याला त्याचा ‘रेडु’ त्याला परत मिळतो का? ते कळण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहण्यासारखा आहे.    

चित्रपटाची कथा साहजिकच रेडिओभोवती फिरते. त्यामुळे कथेत फारसे नाट्यपूर्ण प्रसंग नाहीत. त्यामुळे कथेचे सादरीकरण संथ वाटत असलं तरी देखील कथा औत्स्युकपूर्ण ठरतं. शिवाय कथा मालवणी भाषेत असल्यामुळे तिचा वेगळाच बाज मनात ठसतो. निसर्गरम्य कोकणचे दर्शन घडवताना तेथील दारिद्र्याचंही सम्यक दर्शन घडवण्यात आल्यामुळे कथेला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. शेवटचा प्रसंग तर खूपच भावपूर्ण वठला आहे. आत्यंतिक गरिबीमुळे तातूची बनलेली जीवनविषयक दृष्टी, रेडिओ घरी आल्यानंतर त्याच्यात झालेला बदल, हे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या काही प्रसंगातून फार छान पद्धतीनं दाखवलं आहे गरिबीमुळे तातूची पत्नीही संसाराला वैतागली आहे, मात्र तातू आणि त्याच्या रेडिओवरील प्रेमासाठी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहताना ती संसाराचा वेगळाच अर्थ सांगून जाते. रेडिओ घरी आल्यानंतर तातूला झालेला आनंद, गावात वाढलेली त्याची पत तर  रेडिओ हरवल्यानंतर आणि तो मिळवण्यासाठी तातूची चालू असलेली धडपड, याचं दोन गाण्यांतून उत्तम प्रकारे प्रकटीकरण केलं आहे. त्यादृष्टीनं दोन्ही गाणी श्रवणीय आणि अर्थपूर्ण ठरली आहेत. 

शशांक शेंडे या बहुश्रुत अभिनेत्यानं तातूची भूमिका उत्तम प्रकारे वठवली आहे. ते या भूमिकेत एकदम फिट्ट बसले आहेत. छाया कदम हिनेही तातूच्या पत्नीच्या भूमिकेत गहिरे रंग भरले आहेत. गौरी कानगो (सुमन), विनम्र भाबळ (सुमनचा नवरा-साडू), मृण्मयी सुपल (सरू) यांच्याही भूमिका छान रंगल्या आहेत. थोडक्यात, हा चित्रपट रेडिओवर गाजलेल्या एका जुन्या भावपूर्ण श्रुतिकेसारखाच श्रवणीय  (आणि रमणीय) ठरला आहे.

 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......