अजूनकाही
दलित आत्मचरित्रं ही सर्वांगीण शोषणाविरुद्ध आपल्या अनुभवजन्य विवेकनिष्ठ मांडणीतून परिवर्तनाचा विचार देतात. त्यातून फक्त शोषणाच्या रडगाण्याचा सूरच उद्भवत असल्याची टीका वारंवार होत असतानाही ज्या हजारो वर्षांच्या वंचना आणि अवहेलनेनंतरच्या काळात हे साहित्य जन्माला आलं, ते साहित्य जर जगाच्या तथाकथित सुंदरतेचं गीतच गात राहिलं असतं, तर ज्या समाजघटकातून हे साहित्य जन्मलं त्याच्याशी बेईमानी झाली असती. ही बेईमानी नाकारत आणि प्रस्थापित साहित्य विश्वाची कोणत्याही प्रकारची मक्तेदारी नाकारत दलित साहित्यानं साहित्यविश्वात स्वतःचं वेगळं जग निर्माण केलंय.
याच दलित आत्मचरित्रांच्या पंक्तीत १९९४ मध्ये ज्येष्ठ हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या आत्मचरित्रानं प्रस्थापित शोषणाधिष्ठित व्यवस्थेचे बुरखे फाडून टाकत परिवर्तनाचा जागर मांडला. दलित साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या अशा या आत्मचरित्राचा मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांनी ‘उष्टं’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. त्याचं प्रकाशन १३ एप्रिल २०१८ रोजी, म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झालं. ‘लोकवाङ्मय गृहा’न प्रकाशित केलेलं हे मराठी भाषेतलं एक महान साहित्य संचितच म्हणावं लागेल.
भारतीय वास्तवातील ‘भंगी’ समाजाच्या जीवनावर आधारित अत्यंत भेदक वास्तव चित्रण ‘उष्टं’च्या निमित्तानं वाचकांपुढं येतं. जातीयवादी व्यवस्थेनं थोपलेलं अत्यंत किळसवाणं असं हे जीवन वास्तव मात्र अजूनही बदलू शकलेलं नाही, हे विशेष. मुळात, इथला ‘भंगी’ समाज ज्या परिस्थितीत जगतो, ते आजही इथल्या सर्वसामान्य समाजासाठी निव्वळ अकल्पनीय आहे. ‘उष्टं’च्या माध्यमातून या वास्तवाची किळस आल्याशिवाय राहत नाही. मात्र, फक्त व्यवस्थेच्या विरोधातल्या शिसारीपुरतंच हे पुस्तक मर्यादित न राहता त्यातून मूलभूत परिवर्तनाचा विचार देत शोषणाविरुद्ध बंड करत व्यवस्था छेदण्याचा ‘अजेंडा’ही लेखक समर्थपणानं वाचकांपुढं मांडतात.
उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या छोट्याशा गावात ‘भंगी’ म्हणून जन्मास आलेले ओमप्रकाश वाल्मिकी हे अत्यंत अमानवी अशा व्यवस्थेत आपण पहिला श्वास घेतल्याचं सांगतात. ‘गावाची हागणदारी, हीच त्यांची वतनदारी’ असा भंगी समाज उत्तर प्रदेशसारख्या हिंदी राज्यात ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर जिथं थोरा-मोठ्यांपासून लोक विष्टा विसर्जनासाठी येतात आणि गावाचा सारा कचरा बिनदिक्कत आणून जिथं टाकला जातो, अशा वातावरणात ओमप्रकाशजींचं बालपण गेलं. याच काळात त्यांच्या कुटुंबियांनी मात्र कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना घरातील शेंडेफळ असलेल्या ओमप्रकाशजींना शिकवण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारक ठरला. मात्र, परिवर्तनाची कास धरण्यासाठी शिकणंही जिथं गुन्हा ठरावा, त्या व्यवस्थेत त्यांच्या नशिबी आली ती ‘भंगी’ म्हणून विटंबनाच. जिथं दोन वेळच्या अन्नाचीच ददात तिथं शिकणार तरी कसं? पराकोटीच्या वंचनेतून मार्गक्रमण करत असतानाही तथाकथित उच्चवर्णीयांकडून “काहीही केलं तरी ‘भंगी’ शेवटी भंगीच राहणार’’ या आणि अशा शब्दांतून केली जाणारी हेटाळणी जणू रोजचा विषय होता. शालेय शिक्षण घेतानाही केवळ भंग्यांची मुलं म्हणून शाळेच्या सफाईचं काम, शिक्षकांच्या विनाकारण मिळणाऱ्या जातीवाचक शिव्या, रोजचा मार, सोबतच्या विद्यार्थ्यांकडून केली जाणारी हेटाळणी, हे सारं काही जणू रोजच्या त्यांच्या जीवनाचा भाग होतं.
गावात असताना पोटाची खळगी भरण्यासाठी मेलेली गुरं – ढोरं ओढून त्यांची कातळी सोलून अत्यंत कमी पैशानं तालुक्याच्या बाजारात विकावी लागत असत. कुटुंबाला हाच एक हातभार असे. हे काम करण्याची इच्छा नसतानाही अपरिहार्यतेतून डोक्यावर सोलल्या मांसाचं ओझं आणि अंगावरील कपड्यांवर त्यातून गळणाऱ्या रक्ताचे डाग मिरवत अत्यंत निराशेनं गाव तुडवत यावं लागत असे.
हे व असे कितीतरी जातीयतेचे भीषण चटके अनुभवत असतानाच एका अवचित क्षणी लेखकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी वाचायची प्रेरणा मिळते. मात्र, सर्वांगीण समतामूलक विकासाचा आग्रह धरणाऱ्या बाबासाहेबांचं साहित्य त्यावेळी कोणत्याही वाचनालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. असं असतानाही वडिलांच्या ‘जात बदलण्यासाठी शिक’ या धेय्यानं शिक्षण पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष अक्षरशः अवाक करतो.
पुढील शिक्षणासाठी लेखक जबलपूरसारख्या शहरात जातात. त्यावेळी ग्रामीण अनुभवांपलीकडचं एक वेगळं विश्व लेखक अनुभवतात. नवं वाचन, नवे मित्र आणि नव्या वातावरणात बदलांच्या प्रक्रियेचा जणू ते एक भाग होतात. मात्र, त्या काळातही ‘वाल्मिकी’ या नावानं आलेली निनावी ओकारी अनेक जण दाबू शकत नाहीत. पुढं नोकरीनिमित्त लेखक सहारणपूर, अंबरनाथ, चंद्रपूरसारख्या शहरांमध्ये जातात. त्यावेळीही जातीय अनुभवांपासून लेखक वेगळे होऊ शकत नाहीत. इतकंच काय तर खुद्द स्वतःच्या पुतणीनंही त्यांना लेखक आपले ‘काका’ असल्याची ओळख एकदा नाकारली. त्यावेळी जातीयतेचे हे भीषण घाव त्यांना व्याकूळ करून गेले.
.............................................................................................................................................
‘उष्टं’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4337
.............................................................................................................................................
हे व असे कितीतरी अनुभव लेखक वाचकांपुढं मांडतात. त्या भीषण अनुभवांतून व्यक्त झालेली जिवंत अभिव्यक्ती विस्मयचकित करणारी आहे.
या उपेक्षित आयुष्याच्या एका टप्प्यावर लेखकाच्या जीवनात पुस्तकं येतात. विविधांगी वाचनानं मन समृद्ध होतं. व्यवस्था समजून घेण्याची संधी त्यातून मिळते. विविध विचारधारा, महापुरुष, इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य आदींच्या परिचयातून वाचकाला साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते. त्यातूनच ज्या उपेक्षित समाजातून मी जन्मास आलो, त्या समाजाच्या जगण्याचं वास्तव रेखाटण्याचा ते प्रयत्न करतात. त्यातूनच कथा, नाटक, कविता, कादंबरी आदी साहित्य प्रकारांबरोबरच वैचारिक लेखनालाही प्रारंभ होतो. महाराष्ट्रात त्या काळात सुरू असलेल्या जाती अंताच्या लढ्यात लेखक सहभागी होतात. नामांतराच्या लढ्यानं त्या काळात अवघ्या दलित वर्गात नवचैतन्य निर्माण केलं होतं. लेखकही या आंदोलनाचा भाग होतात. हा साराच त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक जीवनातील परिवर्तनाचा कालखंड वाचताना केवळ भोगलेल्या शोषणाचं उदात्तीकरण नाही, तर त्या विरोधात बंड पुकारात परिवर्तनाचा विचार वाचकाला प्रेरित करतो.
या आत्मकथानातून परिघाबाहेरच्या आणि जातीव्यवस्थेनं ‘भंगी’ म्हणून लादलेल्या परिस्थितीचं वास्तव चित्रण लेखकानं केलंय. स्वातंत्र्यानंतर इथल्या समाजानं लोकशाही स्वीकारली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूतेच्या चौकटीवर आधारित असलेलं संविधान स्वीकारलं. सामान्य माणूस मात्र आजही या मूल्यांच्या लाभापासून दूरच आहे. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दूषण देऊन नव्हे तर ती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार हे आत्मकथन देऊन जातं.
मूळ हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवादही तितक्याच ताकतीनं डॉ. मंगेश बनसोड यांनी साकारलाय. त्याला सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांची प्रेरणा असल्याचं मत ते या अनुवादाच्या प्रस्तावनेत व्यक्त करतात. संजय मोरे यांनी मुखपृष्ठ साकारलं असून श्रीधर अंभोरे यांनी आतील रेखाचित्रं केली आहेत.
.............................................................................................................................................
लेखक कुणाल रामटेके हे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई इथं दलित – आदिवासी अध्ययन व कृती विभागात शिक्षण घेत आहेत.
ramtekekunal91@gmail. com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 21 May 2018
वाल्मिकी समाज पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर आहे. किंबहुना पाकिस्तानातले हिंदूंमध्ये बहुतांश वाल्मिकी आहेत. हा समाज पूर्वी राजपूत होता. भारतावर वायव्येकडून इस्लामी आक्रमणे सुरू झाल्यावर वाल्मिकींनी बराच प्रतिकार केला. त्यांची खोड मोडावी म्हणून जेत्या मुस्लिम आक्रमकांनी त्यांचा मानभंग केला व त्यांना सफाईची कामं नेमून दिली. मानभंग झालेले ते भंगी अशी ती ओळख आहे. हिंदूंनी ही चूक सुधारली पाहिजे व वाल्मिकी राजपुतांना यथोचित सन्मान मिळायला हवा. तसेच हे सन्मानाचं लोण जातीय उतरंडीच्या अगदी शेवटल्या टोकापर्यंत पोहोचायला हवं. गांधीजी अंत्योदय म्हणायचे तो हाच. -गामा पैलवान