काँग्रेसला ‘धडा’ शिकवणारी कानडी कला
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • येडियुरप्पा, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सिद्धरामय्या आणि अमित शहा
  • Wed , 16 May 2018
  • कर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi अमित शहा Amit Shah नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah राजा कांदळकर Raja Kandalkar

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप, जनता दलाला भानावर आणणारे आणि काँग्रेसला धडा शिकवणारे आहेत. या निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिलं म्हणून नरेंद्र मोदी-अमित शहांचं कौतुक होत आहे. पण भरमसाठ कलागती करून, हिकमती लढवून, खालच्या स्तरावरचे आरोप-प्रत्योरोप करूनही मोदी-शहा यांना इथं बहुमत मिळवता आलेलं नाही. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जसे गावपुढारी उणीदुणी काढत, धमक्या देत गल्लोगल्ली फिरतात, तसं मोदी-शहा हिंडले. तरीही त्यांना अपेक्षित प्रतिसाद कानडी लोकांना दिला नाही. भाजपला एकूण ३६ टक्के मतं पडली आहेत. पण काँग्रेस आणि जनता दलाची मिळून एकूण ५० टक्के मतं आहेत. म्हणजे कर्नाटकात ५० टक्के मतदारांनी मोदी-शहा यांच्या नेतृत्वाला नकार दिला आहे, हे स्पष्ट आहे.

काँग्रेसला या निवडणुकीनं मोलाचा धडा शिकवलाय. या निवडणुकीत काँग्रेसकडे सिद्धरामय्यांसारखा आत्मविश्वासू नेता होता. त्याला काँग्रेसनं तिथला निवडणुकीचा चेहरा बनवला नाही. राहुल गांधींना नाहक तिथं नेऊन मोदी-शहांच्या हाती कोलित दिलं. राहुल गांधींना कर्नाटकात नेऊन, त्यांची भाषणं घडवून फारसा फायदा नव्हताच. तरीही त्यांना मिरवून मोदी-शहांच्या भाषणांना काँग्रेसनं विषय पुरवले.

राहुल गांधी यांनीही भाषणं करण्याची कला दाखवत हिंडण्यापेक्षा आता राजकारणाचे डावपेच शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे. मोदी-शहा यांचा नवा भाजप ही काय चीज आहे, याचं आकलन त्यांनी करून घेण्याची नितांत गरज आहे.

वास्तविक या निवडणुकीत कोणाचीही लाट नव्हती. सत्ताधारी काँग्रेसविरोधी फारशी नाराजी नव्हती. सिद्धरामय्या हेच पुढेही मुख्यमंत्री होऊ शकतील, अशा कानडी लोकांचा अदमास होता. त्यांची त्यांना पसंतीही होती. भाजपचे येडियुरप्पा हे म्हातारे उमेदवार होते. एकतर त्यांचं व्यक्तिमत्त्व भ्रष्टाचारानं बरबटलेलं. मुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात जावं लागलं, राजीनामा द्यावा लागला. पण ते एवढे निर्लज्ज की, स्वत: भ्रष्टाचारात बुडालेले, आरोपानं बरबटलेले असतानाही ‘यापुढे मी भ्रष्टाचारविरहित स्वच्छ सरकार जनतेला देईन’, असं अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्यासमोर छातीठोकपणे सांगत होते. मोदी-शहा त्याला माना डोलवत होते. हे दोन्ही नेते एवढे धाडसी की, ‘येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात पारदर्शक सरकार आणू’ असं सांगत होते. त्यांच्या याच धाडसाचं कौतुक होतंय की काय?

मोदी-शहा यांनी देशाला नवी नैतिकता दिली आहे, काँग्रेसवाल्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. कर्नाटकात खाण घोटाळ्यात आकंठ बुडालेले, माणसं मारण्यापासून भरमसाठ पैसे खाण्यापर्यंत सारे आरोप असणारे रेड्डी बंधू नावाचे ‘आदर्श राजकारणी’ मोदी-शहांच्या मंचावर वावरत होते. त्यांच्यासाठी मोदी-शहा मतं मागत होते. अशा महान उमेदवारांसाठी मतं मागताना, नैतिकतेच्या बाता मारताना मोदी-शहा यांच्या आत्मविश्वास अजिबात डळमळत नव्हता. व्वा, नेते असावे तर असे!

काँग्रेसनं मोदी-शहा यांच्या नेतृत्वाची पठडी समजून घेऊन यापुढे राजकारण करायला हवं. आपला पक्ष फार मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ही घमेंड आता सोडून देण्याची गरज आहे. या देशात आता भाजप विरुद्ध साऱ्या विरोधी पक्षांची मोट बांधावी लागणार आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसनं नमती भूमिका घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे आघाड्या करताना, जागावाटप करताना पूर्वीचे चोचले काँग्रेस करू पाहील तर सरशी मोदी-शहा यांचीच होईल. आणि इतर पक्ष कमकुवत होत जातील.

काँग्रेसमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष झाला म्हणून राहुल गांधींचा प्रभाव पडत नाही, आता प्रियंका गांधी येऊ द्या, मग बघा काँग्रेस कशी सुसाट सुटते, अशा बालिश युक्तिवादांपासून काँग्रेस नेत्यांनी दूर राहिलं पाहिजे. मोदी-शहांपुढे कुणालाही आणून फारसं काही साध्य होणार नाही. त्यांना त्यांचं राजकारण समजून घेऊनच उत्तरं द्यावी लागणार आहेत. भाजपच्या ईव्हीएम मशीन वापरावर शंका जरूर घेतली पाहिजे, पण ती घेताना गेली चार वर्षं काँग्रेस किंवा इतर पक्ष त्याविरोधात काही कृती करताना दिसत नाहीत. ‘ईव्हीएम हटाव’ ही चर्चा फक्त निवडणूक निकाल लागल्यानंतर करण्यामुळे उलट भाजपलाच बळ मिळतं. पारावरच्या माणसांचं या प्रकारच्या चर्चेनं मनोरंजन होण्यापलीकडे दुसरं काहीही होत नाही. त्यामुळे भाजपला, मोदींना पर्याय देऊ पाहणाऱ्यांना या चर्चा करून काडीचाही फायदा होणार नाही.

अमित शहा यांची इलेक्शन मॅनेजमेंटची पद्धत काँग्रेसनं अभ्यासावी. ते मतदार यादीच्या एका पानावर जेवढे मतदार आहेत, त्यांना बुथपर्यंत आणण्याचं नियोजन करतात. बुथपासून ते दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयापर्यंत ते निवडणूक नियोजन करतात. त्यासाठी केडर तयार करतात. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक फौज राजकारणाच्या बाजारात उतरवली जाते. संघाच्या सर्व संघटना कामं वाटून घेऊन हिंदूराष्ट्र साकारण्यासाठी तनमनधनानं अहोरात्र धर्मकार्य करतात. हे कसं घडतं हे समजून घेतलं पाहिजे. लोकांना एरवी ‘आम्ही धर्मकार्य करतो’ असं सांगणारी माणसं निवडणुकीच्या हंगामात सर्व कार्य कशी पवित्रपणे उरकतात हे दिसतं. धर्मकार्यासाठी अधर्माची मदत घ्यावीच लागते. त्याशिवाय धर्मकार्य पुढे जात नाही, यश मिळत नाही, ही या परिवाराला मिळालेली विशेष शिकवण या काळात खूप कामी येते. सामान्य लोकांना हे दिसत नाही असं नव्हे, पण पर्याय नसल्यानं लोक हा अधर्म खपवून घेतात एवढंच.

संघाची ही यंत्रणा कर्नाटकात कशी राबली, हे काँग्रेसवाल्यांना कळलं तर त्यांना त्याला पर्यायी यंत्रणा उभी करता येईल. अन्यथा मोठ्या घराण्यातले मंदाड युवराज धरून निवडणुकीत घोड्यावर बसवायचे, त्यांच्या बापजाद्यांच्या पैशावर निवडणूक लढवायची, पैशावर काम करणारे बाजारबुणगे प्रचारात उतरवायचे, सामान्य लोकांना गृहीत धरायचं, त्यांना गांधी-नेहरू-इंदिरा-राजीव किती थोर होते याच्या टेपा ऐकवायच्या, या प्रकाराला लोक आता कंटाळले आहेत. ज्यांच्या घरात, गावात, कुटुंबात सत्ता कधी नव्हती, त्यांना काँग्रेसनं उमेदवार बनवायला हवं. तिथून नवे नेते आले तर ते भाजपला पर्याय ठरू शकतील. अन्यथा सामान्य माणूस विचारतो, ‘काँग्रेस वाचवायची म्हणजे कुणाला वाचवायचं?’ वेगवेगळ्या आजीमाजी मंत्र्यासंत्र्यांच्या मंदाड युवराजांना वाचवण्याची जबाबदारी जनतेनं का घ्यावी?

मोदी-शहा यांनी देशाचं राजकारण बदलवून टाकलंय, हे काँग्रेस नेतृत्वानं लक्षात घ्यायला हवं. राहुल गांधींच्या हे नाहीच लक्षात येणार. कारण त्यांना तळगाळ कळू शकणार नाही. पण आम जनतेशी संवाद असणाऱ्या नेत्यांनी हे समजून घ्यायला हवं. ‘राजकारण मला आवडत नाही,’ असं म्हणणाऱ्या सामान्य लोकांचं मोदी-शहा यांनी राजकियीकरण केलंय. जे लोक राजकारण म्हटलं की, डोक्याच्या शिरा ताणत, साऱ्या राजकारण्यांना शिवीगाळ करत, द्वेष करत, ती माणसं मोदी-शहा यांच्या राजकारणावर फिदा आहेत. पण कमळ फुलायला चिखल-गाळ तर लागतोच. अशा विचित्र, विशिष्ट नवनैतिक विचारांचा पगडा त्या माणसांवर आहे. जुना भाजप आता गेला. मोदी-शहांचा या अशा विचारांचा पगडा असलेला माणसांचा पक्ष आहे. त्या महान पक्षाला समोरं जाण्याची, त्याचा सामना करण्याची पद्धत काँग्रेसकडे आहे असं दिसत नाही.

नव्या भाजपला सामोरं जाण्याचं थोडंफार कसब अरविंद केजरीवाल, शरद यादव, ममता बॅनर्जी, सिद्धरामय्या, कॅप्टन अमरिंदर सिंग, अखिलेश यादव, कुमारस्वामी, मायावती, प्रकाश आंबेडकर या नेत्यांजवळ आहे. पण हे नेतेही एकेकटे पुरे पडणार नाहीत. त्यांना एकत्र येऊन, मोट बांधून त्यांच्या जवळच्या युक्त्यांची बेरीज घडवून आणावी लागेल. अशा बेरजेची युक्ती कर्नाटकात आधी वापरली असती, जनता दलापुढे नमतं घेतलं असतं तर आज कर्नाटकात काँग्रेस-जनता दलाच्या दोनशेच्या आसपास जागा असत्या. भाजप भुईसपाट झाला असता. पण ते झालं नाही.

कर्नाटकात काँग्रेस फसली. अशी फसगत यापुढे होऊ द्यायची नसेल तर ‘राहुलला घालवा, प्रियंकाला आणा’ अशा बालिश गोष्टींवर चर्चा न करता मोदी-शहांच्या नव्या भाजपला समोरं जाण्याची व्यूहरचना आखायला हवी. तरच काँग्रेस वाचू शकेल. अन्यथा मोदी-शहांनी काँग्रेसमुक्त भारताचे प्रयत्न चालवले आहेतच. त्यांच्या बुलडोजरसमोर चिरडून नष्ट व्हायचं की नवी काँग्रेस उभी करायची, हा निर्णय राहुल गांधींना घ्यावा लागेल. कर्नाटक निवडणुकीचा त्यांच्यासाठी हाच सर्वांत मोलाचा आणि महत्त्वाचा धडा आहे!

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

mahesh naik

Thu , 17 May 2018

correct


Mukund pardeshi

Thu , 17 May 2018

आपल्या लेखात सद्य परिस्थितीचे अचूक विश्लेषण केले आहे. काँग्रेसने आता मोठा भाऊ असण्याची भूमिका सोडून, ज्या राज्यात ज्याचे प्राबल्य असेल त्या पक्षाला सोबत घेऊन रहावे. शक्ती क्षीण झालेल्या पहेलवानालाही कुबड्यांंची मदत घ्यावी लागते हे लक्षात घेणे गरजेचे आहे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......