अजूनकाही
भाजपचा यशाचा आलेख कर्नाटकच्या रूपाने पुन्हा उंचावला, पण सत्तेच्या संधी थेट मिळत नसल्यानं भाजपमध्ये सुप्त अस्वस्थता आहे. भाजपचे अध्यक्ष अन चाणक्य म्हणून मान्यता पावत चाललेले अमित शहा यांचा १३० चा आकडा त्यांना गाठता आलेला नाही. भाजप बहुमतापासून दूर आहे, तर जेडीएस अन काँग्रेसला सरकार स्थापन करता येईल असे कल हाती आले आहेत. भाजपला अंतिमतः १०४ जागा , काँग्रेसला ७८ तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय बसपला १ तर अन्य २ जागा अपक्ष व स्थानिक पक्षाला मिळाल्या आहेत. सरकार कोण स्थापण करेल हा प्रश्न आहेच. आजवर गोवा – मणिपूर या राज्यांत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनदेखील सत्ता स्थापन करू शकलेली नाही. कारण त्या त्या राज्यांत राज्यपालांच्या भूमिका संशायस्पद राहिलेल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात भाजप सरकारने नेमलेले अन थेट भाजप पक्षाचे गुजारातमध्ये मोदी मुख्यमंत्री होण्यसाठी स्वतःच्या पदाचा एकेकाळी राजीनामा दिलेले कर्नाटकचे राज्यपाल काय भूमिका घेतात, यावर सरकार कोण स्थापन करू शकणार हे अवलंबून आहे.
कर्नाटक कसंबसं कॉंग्रेसला मिळेल अन राहुल गांधी पूर्णवेळ राजकारणी म्हणून अधिक जोमानं पुढे येतील, या आशावादावर पाणी फिरलं आहे. मतदान चाचण्यांनी वर्तवल्याप्रमाणे जेडीएसच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. जागा अन मतं सर्वांत कमी मिळूनदेखील त्यांच्या पक्षाला थेट मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली आहे. भाजपला सत्तेवरून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जागा जास्त असतानीदेखील थेट मुख्यमंत्रीपद जेडीएसला देऊ केले आहे. राष्ट्रीय स्तरावर आघाडी सरकार चालवलेल्या देवेगौडांच्या पक्षाला अन त्यांच्या दुसर्या पिढीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळण्याच्या शक्यता या निकालांनी निर्माण केल्या आहेत.
सरळ सरळ पाहिलं तर भाजपला कर्नाटकात मिळालेलं यश वाखणण्यासारखं आहे. कारण ग्रामीण भागात भाजपवर नाराजी आहे यात शंका नाही. त्याचबरोबर सिद्धरामया यांचं सरकार कुठल्याही मोठ्या विषयांच्या कचाट्यात सापडलेलं नसताना भाजप वाढतो हे विशेष आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये मोठ्या पदांना वयाची अट आहे. ती कर्नाटकाच्या बाबतीत मोदीप्रणीत भाजपनं बाजूला ठेवलेली असताना तो विरोधाभासही जनतेला फार पटलेला नाही का? की अशा मुद्यांचे महत्त्वच निवडणुकांच्या राजकारणात नसतं?
खरं तर विरोधाभास अन भाजप हे वेगळंच प्रकरण आहे. कर्नाटकाच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी पेट्रोलचे भाव वाढतात, अशी अनेक उदाहरणं घेता येतील. पण तरीही भाजपला यश कसं मिळतं? अशा असो किंवा कोणत्याही निवडणुका असो, त्याला अनेक स्थानिक संदर्भ असतात. जे बाहेरून पाहताना\अभ्यासतांना लक्षात येणं कठीण असतं, मात्र तरी राज्याच्या निवडणुकीला अन राज्याला एकुण सत्तेच्या संदर्भाला काही एक व्यापक संदर्भ असायला हवा. आणि ते असतातदेखील. तो कर्नाटकातही होता.
त्यामुळे भाजपला मिळालेल्या एकुण मतापेक्षा काँग्रेसची एकुण मतं जेडीएस वगळून जास्त आहेत. काँग्रेसच्या जागा द्वितीय क्रमाकांच्या असल्या तरी तब्बल ३८ टक्के मतं मिळवून मतांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. तर भाजप ३६ टक्के मिळवत मतांच्या बाबतीत द्वितीय, तर १८ टक्के मते घेऊन जेडीएस तिसर्या स्थानावर राहिला आहे. म्हणजे एकुण गणित पाहिलं तर काँग्रेसच पुढे आहे. पण जागांच्या गणितात काँग्रेस मागे का पडते, हे समजून घेतलं पाहिजे. ते समजून घेताना अमित शहांच्या पुढाकारानं होणार्या अभ्यासाला दाद द्यावी लागते. सत्तेसाठी वेगप्रसंगी अधिक तटस्थ होऊन वेगवेगळ्या सर्वक्षणांच्या आधारे ते तिकिट वाटप करतात. नाराजांच्या नाराजीला एका मर्यादेपर्यंत दाद देतात. त्यांना पक्षाच्या कामात गुंतवून घेतात. ऎकलं नाही तर त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती ते वापरू शकतात, ही भीती निर्माण करत असावेत. त्यामुळे शक्यतो कोणी विरोधात जात नाही. या त्यांच्या व्यूहनीतीचा फायदा पक्षाला होतो.
तसेच त्यांच्या यथेच्छ प्रचार नियोजनाला अन त्यासाठी नैतिकतेच्या पलीकडे ‘मुद्दे’ धरण्याला अन सोडण्याला दाद द्यावीच लागेल. कर्नाटकाच्या या निकालानं एक गोष्ट अधिक जोरकसपणे सुस्पष्ट केली आहे. ती अशी की, भारतीय निवडणुका आता नियोजनाच्या आधारे जिंकता येऊ शकतात. ज्याच्याकडे इएव्हेंट बेस टीम आहे अन टार्गेट बेस काम करणारा नेता आहे, तो जिंकू शकतो. अन्यथा आपण लढलो याच्या आनंदात रममाण व्हायला कुठे अडथळा आहे? निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सत्ताधारी म्हणून ‘जगाचे काय कल्याण केले’ हे फारसे महत्त्वाचे नाही. त्याशिवाय जे केले नाही ते सांगता येणे... जे शक्य नाही तेही नीटपणे सांगता येणे... जे करता येत नाही त्याबाबत विरोधकांना दोष देणे, हे ज्याला जमेल त्याला निवडणुका जिंकता येतात, असा नवा अर्थ आहे. या वर्णनातील उपरोधीपणा बाजूला ठेवून आपल्याला यापुढे असेच अर्थ लावावे लागतील की, काय असा प्रश्न कर्नाटकच्या निमित्ताने अनेक विश्लेषक अभ्यासकांच्या मनात डोकावला असेल.
भाजपला सर्वाधिक जागा एवढ्या गुंतागुतींच्या परिस्थितीत मिळतात याची कारणं खरंच खोलात जाऊन शोधायला हवीत. या निकालाचा बाकी अर्थ निघत राहिल. जातीची अन धर्माची गणितं मांडली जातील. पण यातला मुख्य अर्थ लावायचा आहे तो भाजपला मिळणार्या यशाचा. कारण एकदा भाजपचं यश समजलं की , बाकींच्याचं अपयश स्वतंत्र समजून घ्यायची गरज नाही. त्यातच भाजपचं यश भाजप समर्थकांपेक्षा विरोधकांनी नीट समजून घेण्याची ही वेळ आहे. कारण भाजप जिंकली की, लगेच एव्हीएमवर शंका घेणं बरं नाही. शंकेच्या पलीकडे जाऊन भाजपचं यश अभ्यासलं पाहिजे. त्यातून लॉजिकल मुद्दे पुढे आणायाला हवेत. त्यात देशाच्या र्दीर्घकालीन हिताचे जे मुद्दे असतील, ते अग्रक्रमावर घेऊन ते धसाला लाव्ण्यासाठी अजेंडा सेट केला जायला हवा. हे काम सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. अन्यथा आली निवडणूक झाली चर्चा… पुढे काय? त्यात जे त्यांच्या गुणवत्तेचं आहे त्याचं श्रेय द्यायचं मोठेपण दाखवा, जिथं गडबड वाटते त्यावर कसा मार्ग काढायचा ठरवा… अन्यथा उगाच शंका नको.. भाजपबद्द्ल शंका घेऊन त्यावर प्रामाणिकपणे अन नेटानं काम केलं नाही तर काँग्रेससारखं उरलो चर्चेपुरते, असं होऊ शकतं.
भाजपने मिळवलेलं यश अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे, कारण निवडणुका जवळ येईपर्यंत कर्नाटकात काँग्रेस जिंकेल असे अगदी रामचंद्र गुहासारख्या अभ्यासकांनादेखील वाटत होतं. मात्र जसजशी निवडणूक जवळ येत गेली, तसं चित्र भाजपच्या बाजूनं परावर्तीत होत गेलं. कर्नाटकला परिवर्तन करण्याची सवय आहे. तिथं गेल्या दोन दशकात कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे या परिवर्तनाचा एक अर्थ तोही आहे. तरी राहुल गांधींच्या नावावरील अपयशाचा आलेख पाहता, हे परिणाम गंभीर स्वरूपाचे आहेत. गुजरातने राहुल गांधींना किमान लढण्याचा जो आत्मविश्वास दिला होता, तो काहीसा कमी होईल, असं मानायला जागा आहे.
मोदी-शहांचं यश?
कर्नाटकात मिळालेलं यश मोदी-शहांचं आहे का? ते यशाचे शिलेदार आहेत असं भाजप म्हणेल. अन अपयश तर राहुल गांधींचं एकट्याचं आहे, असंही म्हटलं जाईल. पण वस्तुस्थिती तशी नाही. हे यश केवळ या जोडीचं नाही आणि हे अपयश एकट्या राहुल गांधींचं नाही. भाजपच्या यशात येडियुरप्पा हा मोठा धागा आहे. यातील मुख्य खेळाडू तेच आहेत. शिवाय यामध्ये स्थानिक गणितं आहेत. येडियुरप्पा यांच्या सभांना मोदी-शहांच्या सभा इतकीच गर्दी होती. ते लिंगायत समाजात लोकप्रिय आहेत. ते गेले वेळ्यास भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले होते.
त्याचबरोबर काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. राहुल गांधींना अजूनही सगळ्या राज्यात स्वतःला जम बसवता आलेला नाही. गुजरातमधील काँग्रेस मृत अवस्थेत होती. त्यामुळे तिथं त्यांना पूर्णपणे आपली भूमिका वठवता आली. कर्नाटकात तसं झालं नाही. सिद्धरामया हे जुनेजानते अन सत्ताधारी नेते असल्यानं त्यांच्या भूमिकेप्रमानं त्यांना चालावं लागलं. त्याचाही परीणाम झाला. अर्थात असं असलं तरी राहुल गांधी अन एकुणच काँग्रेसला या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
काँग्रेसकडे विचार आहे यात शंका नाही; पण हा विचार केवळ विचार करण्यापुरता राहू नये. त्यासाठी नवे चेहरे आणले पाहिजेत असा सल्ला पुरेसा नाही. मात्र काँग्रेसला आपला विचार लोकापर्यंत जात का नाही? आपण सत्तेत आहोत तिथे पक्ष चालवण्याला बळ मिळण्यापलीकडेही काही गोष्टी रुजवायला हव्यात. त्याचबरोबर विरोधकांचे दावे खोडण्याबरोबर आपल्याकडेही काहीतरी सकारात्मक करण्यासारखं आहे हे बिंबवावे लागेल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण या देशात राजकारण अन निवडणुकाच्या पलीकडे काही तरी देणं लागतो, हे अधूनमधून नव्हे, तर वारंवार सिद्ध करावं लागणार आहे. खासकरून अशा पराभवानंतर ती जबाबदारी अधिक वाढते. काँग्रेसपासून सरकलेली वोट बॅंक अन दर निवडणुकीत नव्यानं येणारे मतदार, अशा दोन्हींना आकर्षित करणारा अजेंडा सेट करावा लागणार.
प्रचाराचे मुद्दे अन यश?
मोदी जे राज्य प्रचारासाठी मनावर घेतात, तिथं निवडणूक त्यांच्याभोवती स्वाभाविकपणे केंद्रित होते. त्यातच त्यांच्याकडे लोकांना खिळवून ठेवण्याची उत्तम क्षमता असल्यानं त्यांच्या भाषणांचा परिणाम रिझल्ट ओरिएण्टेड असतो. दुसर्या बाजूला त्यांच्या भाषणात आपण ‘व्हिक्टीम’ आहोत, हे पटवण्याची क्षमता असल्यानं त्याचाही त्यांना फायदा होतो. गुजरातमध्ये त्यांना जातीचं हत्यार मिळालं होतं. कर्नाटकात त्यांनी काँग्रेसनं कसं २०१४ च्या यशानंतर साधे शुभेच्छापर दोन शब्ददेखील बोलले नव्हते, असा चक्क धादांत खोटा मुद्दा मांडून लोकांना भावनिक केलं. एकुणच काँग्रेस अन सिस्टीमचे आपण बळी आहोत, हे पटवण्यात ते कमालीचे यशस्वी होतात. त्याचा परिणाम त्यांना निकालात मिळतो.
अमित शहांचे मुद्दे फारसे प्रभावी नसतात. मात्र मोदींच्या स्टाईलनेच राहुल गांधी अन चार पिढ्या, सत्तर वर्षं या भोवती ते लोकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आले आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपला मोदींच्या काळात जे राज्य दुसर्या पक्षाकडे आहे, ते मिळवण्यात कमालीचं यश प्राप्त मिळालं. ज्या राज्यातील जनतेला मोदींचा थेट अनुभव नाही, ते यांच्या प्रचारनीतीचा बळी ठरतात. कारण नंतर त्या राज्याच्या भल्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष नवं राज्य, नवी निवडणूक याकडे केंद्रित झालेलं असतं. २०१४ पासून आजपर्यंत भाजपनं नवनवी राज्यं मिळवण्यात यश संपादित केले आहे. गुजरात हे सत्ता टिकवलेलं एकमेव राज्य आहे. कर्नाटक नव्यानं मिळवलेल्या यादीतील राज्य आहे. काही राज्यं निकालाच्या पलीकडे जाऊन केंद्राची ताकद वापरून मिळवली आहेत. कर्नाटक मोदीसाठी फ्रेश होतं. त्यामुळे मोदी-शहांचं यश खर्या अर्थानं छत्तीसगड - राजस्थान - मध्य प्रदेशमध्ये कळेल. राजस्थान अन छत्तीसगड भाजप सहज मिळवू शकला तर त्यानंतर त्यांच्या यशाकडे जनमताच्या कलाच्या पलीकडची ताकद म्हणून पाहिलं जाऊ शकतं. ती ताकद किंवा ते यश वेगळ्या चिकित्सेचा विषय असेल.
पण जनमत कुठे आहे असं माध्यमांनी मांडणं, सर्वसामान्यांना वाटणं अन निकाल वेगळं लागणं, हे जरा वेगळीकडे जाणारं चित्र आहे, अशी भावना आगामी काळात बळावू शकते. ती न बळवता भाजप यशस्वी होत राहिला, तर शंकास्पद भावनेला बळ मिळेल. त्यामुळे या पुढच्या काळात भाजपसमोरचं मुख्य आव्हान निवडणूक यंत्रणा पारदर्शी आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे. अन्यथा यश मिळत राहिल, पण संशयाच्या भोवर्यात ते अडकत राहिलं तर त्याला कधीही आव्हान दिलं जाईल. लोकशाहीत कुठल्याही व्यवस्था जनतेचा मनोमन विश्वास असेपर्यंत टिकतात. त्या एकदा का जनतेच्या मनातून उतरल्या, तर मात्र त्याला दिलं जाणारं आव्हान तेवढंच मोठं असतं. ज्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं.
तूर्तास कर्नाटकाचा निकाल मर्यादित अर्थानं राज्यातील सत्तेच्या विरोधातील कौल अन केंद्रातील सत्तेच्या बाजूकडे जाणारा आहे. त्यात अनेक स्थानिक संदर्भ आहेत. या निकालात निवडणूक चाचण्यांच्या अंदाजाच्या आसपास राहता आलं म्हणून काही प्रमुख शंका निकालापासून दूर झालेल्या आहेत. तरी भाजपला शिवसेनेसारख्या पक्षांना एव्हीएम जी भीती किंवा शंका वाटते, ती दूर करूनच पुढे प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा वास्तव काहीही असलं तरी गुंता वाढत जाईल.
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment