विजयाचं मशीन आणि विरोधक
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 16 May 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar कर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा उद्धव टाकरे राज ठाकरे

कर्नाटक विधानसभेचे निकाल लागले आणि परिस्थिती त्रिशंकू आहे. भाजपने विजयी परंपरा कायम राखत, सर्वाधिक आमदारांचा पक्ष बनत, सत्तास्थापनेचा दावा केलाय.

दुसरीकडे काँग्रेसने नमते घेत जेडीएसला बिनशर्त पाठिंबा देत मतदानोत्तर आघाडी करत, बहुमताचा दावा करत, सत्तास्थापनेत उडी घेतलीय.

ज्या तांत्रिक मुद्द्यावर भाजपने गोवा, मणिपूर आणि मेघालयात राज्यपालांच्या स्वेच्छाधिकाराचा लाभ पदरात पाडून घेतला, तेच तांत्रिक मुद्दे आता काँग्रेसने पुढे केलेत.

कागदावरचं गणित आणि अगदी ताज्या त्रिशंकू विधानसभासंदर्भातले देशभरातले राज्यपालीय निर्णय पाहिले तर काँग्रेस-जेडीएसला पाचारण करणे हे तर्कसंगत होईल. पण हे होणार नाही, भाजपला सत्तास्थापन करायला संधी देऊन सभागृहात बहुमताची परीक्षा पास करायला लावली जाईल. जी भाजपसाठी सोपी असेल. सत्ता खुणावू लागली तर काँग्रेस-जेडीएसमधले आमदार विचलित होणारच नाहीत याची शाश्वती नाही. शिवाय पूर्ण जेडीएसच, नीतीशकुमारांसारखा भाजपशी मैत्री करू शकतो. थोडक्यात पुढचे आठ दिवस कर्नाटकात मान्सून आधीच निवडणुकीदरम्यान जो पैशाचा ‘पाऊस’ पडला, त्याचं रूपांतर ‘गारां’च्या पावसात होईल.

निकाल जाहीर होताच महाराष्ट्रातल्या दोन सेना प्रमुखांनी एकाच पद्धतीची प्रतिक्रिया देत विजयाचे श्रेय एव्हीएम मशीनला दिलं. उद्धव ठाकरेंनी त्यात साम, दाम, दंड, भेदही जोडले. त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली. आणि भाजपला आव्हान दिलं की, एकदा बॅलेट पेपरवर होऊनच जाऊ द्या!

उद्धव ठाकरेंचा इतिहास मोदींइतका कच्चा किंवा जुमलेबाजीला बढावा देणारा नसावा. तरीही एक आठवण म्हणून त्यांना सांगावंसं वाटतं की, १९७१ साली बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या होत्या. इंदिरा गांधींनी विरोधकांचा ‘पाचोळा’ केला होता. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं - ‘गाय-वासरू’. इंदिरा गांधींच्या या बॅलेट बॉक्स विजयावर बोलताना उद्धवजींचे पिताश्री, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘ना गायीची, ना बाईची, ही तर शाईची करामत!’ बॅलेट पेपरवर जो शिक्का उमटवला जाई, त्यासाठी जी शाई वापरली होती, ती इनव्हिजिबल, न दिसणारी शाई होती! त्यानं शिक्के मारून मतपत्रिका आधीच मिसळल्या, मतमोजणीत शाईचा चमत्कार झाला. ती प्रकटली! आपल्या या आरोपात तथ्य नव्हतं किंवा तो चुनावी जुमला होता, असं उभ्या हयातीत बाळासाहेब कधी बोलले नाहीत, की मोदी-शहांसारखी गोष्ट उडवून लावली नाही. त्यामुळे यावेळी मतपत्रिकेची मागणी करताना उद्धव ठाकरेंनी शाईबद्दलची शंका आधीच उपस्थित करावी!

भाजपच्या सातत्यपूर्ण विजयाचं आश्चर्यकारक कोडं विरोधकांना जेवढं पडतं, तेवढंच ते प्रत्यक्ष भाजपवाल्यांनाही पडत असावं. पण स्वातंत्र्योत्तर भारतात जवळपास तीन दशकं, म्हणजेच सहा-सातहून अधिक वेळा काँग्रेस अशीच जिंकत होती. अगदी पंचायत ते पार्लमेंट अत्रतत्रसर्वत्र काँग्रेसच. आताचा भाजप म्हणजे त्यावेळचा जनसंघ, यांची त्या वेळची अवस्था बघता, आजची काँग्रेस सुस्थितीतच म्हणता येईल. स्वत: शिवसेनाप्रमुखांना ६६नंतर प्रत्यक्ष सत्ता तीही भागीदारीत मिळवायला तीन दशकं घालवावी लागली. ‘मार्मिक’मधून ते मतदारांनाच सुनवायचे, ‘प्रश्न सोडवायला आम्ही, मते मात्र काँग्रेसला!’

उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी मशीनला श्रेय देत भाजप विजयाला संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण मग या एव्हीएम मशीनबाबत विरोधक नेहमी पराभवानंतरच का बोलतात? जेव्हा निवडणुका नसतात, तेव्हा लोकसभा, विधानसभा, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय इथं दाद का मागत नाहीत? ईव्हीएमबद्दल जो संशय आहे, तो सप्रमाण सभागृहात किंवा जाहीरपणे का नाही करत? दिल्लीत आपने विधानसभेत असं प्रात्यक्षिक घडवून आणलं. पण त्याचं पुढे काय झालं?

आणखी एक मुद्दा मांडला जातो. सार्वत्रिक निवडणुका जिंकणारी भाजप पोटनिवडणुकांत सर्वत्र का हरली? पण पोटनिवडणुकाही ईव्हीएम मशीनद्वाराच मतदान करून लढवल्या गेल्या ना?

मागच्या लोकसभा आणि विधानसभेत सेनेला जे काही यश मिळालं, तेव्हाही ईव्हीएम मशीनच होतं. मुंबई पालिकेसह इतर अनेक महापालिका, नगरपरिषदा, पंचायती सेनेनं जिंकल्या, तेव्हाही ईव्हीएमच होतं. मग तो विजयही मशीनचा?

राज ठाकरेंनी पहिल्याच फटक्यात १३ आमदार, नाशिक पालिका जिंकली, तेव्हाही मशीन होतंच. मुद्दा हा आहे- केवळ मशीनवर प्रयोग करून या खंडप्राय देशात सातत्यानं निवडणुका जिंकता येतील?

खरं तर या मशीनवर भाजपनंही शंका उपस्थित केली होती. भाजपचे आंध्रमधले नेते व सध्याचे राष्ट्रीय प्रवक्ते जी.एल. नरसिंहराव यांनी या मशीनचा गैरवापर होऊ शकतो, यावर पुस्तिकाच लिहिली होती. ती पुस्तिका ठाकरे बंधू का नाही मिळवत?

भाजपची एक रणनीती असते. ते विरोधात असताना ज्याचा तीव्र तिरस्कार करतात, सत्तेत आल्यावर ते त्याचाच त्याहून जास्त तीव्र पुरस्कार करतात! मग ते जीएसटी असो, आधार असो, थेट परदेशी गुंतवणूक असो, मनरेगा असो की पेट्रोल-डिझेल भाववाढ. मोदी तर यामध्ये माहीर!
भाजपच्या सततच्या विजयाचं समर्थन करतोय का आम्ही असं कुणाला वाटेल. पण तसं नाही. विजय, विजय असतो. विरोधक स्वत:च्या पराभवाचं विश्लेषण करताना थोडी गल्लत करताहेत असं वाटतं.

सगळ्यात पहिली गल्लत म्हणजे ते आपली लढाई भाजपशी आहे असं समजतात. तर लढाई भाजपशी आहेच, पण मुख्य लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असते हे विसरतात. संघ शाखा, तिच्या जनसंघटना आणि मतभेद असले तरी विचारधारा समान असणाऱ्या छोट्या-मोठ्या गटांना मतदानाला उतरवणं, हे काम ९२पासून चालू आहे. १४च्या निवडणुकांपासून त्याला इंटरनेट, सोशल मीडिया, जाहिराती आणि आवश्यक तिथं निधीची कमतरता न पडू देणं हा भाजपचा ‘वॉर रूम’ अजेंडा, संघ शिस्तीचा राजकीय अवतार आहे. त्यात त्यांची पारंपरिक ‘गोबेल्स नीती’ असतेच. प्रमोद महाजनांनी तत्त्वांवर नाही तर जिंकून येण्याच्या पद्धतीवर निवडणुका लढवण्याचं तंत्र भाजपमध्ये आणलं, त्याचा आज मोदी-शहांनी एकहाती विस्तार केलाय. त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गतही दबावाचं राजकारण करत पक्षही ताब्यात ठेवलाय. तिथंही साम, दाम, दंड, भेद याचा वापर होतोच आहे.

भाजप असा निवडणुका जिंकण्याचं बूथ स्तरापासून नियोजन करत असताना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची संघटनात्मक बांधणी ही रामभरोसे आहे. सत्तेचे दलाल मोठ्या पक्षापासून छोट्या पक्षापर्यंत सर्वांतच असतात. पण तळातला जो कार्यकर्ता लागतो, तो आज भाजप आणि कम्युनिस्ट वगळता कुणाकडे नाही. शिवसैनिक कधी काळी होता. सैनिकांची ती पिढी आता साठीत पोहचली. आताचा सैनिक सत्ताकांक्षीच असतो.

बाकी लालू, मुलायम, नीतीशकुमार, मायावती हे समाजवादी, फुले-शाहू-आंबेडकर मानणारे असले तरी सत्तेच्या राजकारणात ते इतके गुरफटलेत की, भ्रष्टाचार, तत्त्वशून्य आघाड्या, एकमेकांनाच संपवण्याची राजकीय घाई, घराणेशाही दलित-मुस्लिम व्होट बँकेचं राजकारण, पण त्यांचं जीनवमान कणभरही न उंचावण्याची नाकामी. शिवाय ‘भद्र’ माध्यमांनी सुरुवातीपासून गावंढळ, जातीयवादी, दबंग नेते अशी केलेली प्रतिमा, त्याला संपत्तीच्या बीभत्स प्रदर्शनानं अधोरेखित करण्याचा सार्वजनिक मूर्खपणा, यामुळे भाजपशी ते तत्त्वानं लढू शकत नाहीत आणि सध्याच्या सत्ता, संपत्ती व संघटनमुक्त भाजपशी लढण्यापेक्षा ‘सेटिंग’कडे त्यांचा कल जास्त. एखादा लालू अपवाद. बाकी ममता, चंद्राबाबू केव्हाही सरकू शकतात.

काँग्रेसचं राजकारण हे कायम आपण सत्ताधारी याच तोऱ्यातलं. त्यांना विरोधी पक्ष हे बिरूदच सोसत नाही. सत्ता मिळवण्यासाठी विरोधी म्हणून काम करण्यापेक्षा काँग्रेसवाले जो सत्ताधारी, तो आपलासा करून टाकतात.

कधी थेट पक्षांतर करून तर इतर वेळी निष्क्रिय राहून सत्तेतला पक्ष आपल्या मरणानं कधी मरेल, त्याची कवटी फुटायची वाट बघत विरोधातले दिवस ढकलायचे. जनता कंटाळून बदल करेल आणि पुन्हा सत्तेत बसवेल, या दिवास्वप्नात काँग्रेसवाले (राष्ट्रवादीसह) जगतात! पण २००० सालानंतर जग बदललं, तसा मतदार बदलला, निवडणुकीचा माहौल, आवाका बदलला, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. संघाच्या बामनाची भीती दाखवून दलित-मुस्लिम मतं एकगठ्ठा घ्यायची या जुन्याच गृहितकावर ते अजूनही चाललेत.

अमेरिकेचा अध्यक्ष कोण असावा यासाठी रशियन अध्यक्ष सक्रिय होण्याच्या हा काळ आहे. या नव्या काळाची कृष्णनीती भाजप कोळून पितेय आणि विजय मिळवतेय. त्याकडे दुर्लक्ष करून साम, दाम, दंड, भेद नि मशीनवर अपयश ढकलणं म्हणजे साप सोडून भुई धोपटणं.

विरोधकांची सर्व पातळीवरची गाफील निष्क्रियता हा भाजपचा साधा संजीवनी मंत्र आहे, उद्धवजी!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......