अजूनकाही
जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी मानवाच्या अधिकारकक्षेत मोडत नाहीत. या दोन्ही घडामोडींबाबतचे आकलन करणे यावरच माणसाने समाधान मानलेले आहे. वरदान म्हणून अथवा निसर्गनियमानुसार मिळालेले जीवन शक्य त्या मार्गाने सार्थकी लावणे आणि मरणाकडे जातानाचा त्याचा प्रवास लांबवणे या दोन्ही दिशेने त्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतात. आपल्याकडे ‘जन्म-मरणाचा सोहळा’ असा शब्दप्रयोग सर्रासपणे केला जातो. पण सोहळा ठरावा अथवा व्हावा असे जन्म-मरण प्रत्येकाच्या भाळी शक्य नसते. या सोहळ्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यामागील ‘सोहळा’ सहजशक्य नसल्याची प्रचिती येत असते.
जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा प्रवास सोहळा ठरलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी गत गुरुवारी स्वेच्छामरण स्वीकारत मृत्युचा सोहळा साजरा केला आहे. जगण्यातील आनंद, रसरशीतपणा मनसोक्तपणे उपभोगल्यानंतर वयाच्या १०४ व्या वर्षी गुडॉल यांनी ठरवून जीवनयात्रेचा समारोप केला आहे. जगण्यातील मौज आता बास झाली, अशी जाहीर कबुली देत डेव्हिड गुडॉल मृत्यु साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियातून स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले. स्वित्झर्लंडमध्ये वैद्यकीय कारणावरून स्वेच्छामरणास संमती देणारा कायदा अस्तित्वात आहे. १९४० सालापासून तिथे नागरिकांचा हा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे.
जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी मानवाच्या हाताबाहेरील गोष्टी मानल्या जात असल्या तरी त्या दोन्हींस अर्थ प्राप्त करून देण्याची संधी प्रत्येकास निसर्गदत्त उपलब्ध असतेच. जन्माला आणि मृत्युला सामोरे जाण्याची ज्याची त्याची पद्धती ठरलेली असते. मृत्युपेक्षा जगण्याला सामोरे जाण्यास कदाचित जास्त धाडस लागते. गुडॉल यांनी जगण्यातील गंमत पूर्णत: अनुभवल्यानंतर, जीवनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर समाधानी वृत्तीने मृत्युची आकांक्षा व्यक्त केली आणि स्वत:चा सुखान्त केला. जगणे परिपूर्ण झालेले असून आता मृत्युसाठी हीच वेळ योग्य आहे, असे वाटल्यानंतर जीवनाचा निरोप घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा, हा विचार जगासमोर मांडत त्यांनी मृत्युला अर्थ प्रदान करून दिला.
वास्तविक जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा प्रवास आपण कसे करतो?, याला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा प्रवास, वाटचाल सार्वजनिक कल्याणाकरिता खर्ची लागला तरच मृत्युनंतर तुमची नोंद राहते आणि जन्मल्यानंतरच्या वाटचालीचे औचित्यही! खरे तर ज्यांच्या जगण्याला जीवन संबोधले जाते, अशी माणसे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात. जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रत्येकाच्या रटाळ रहाटगाडग्याला जीवन म्हणण्याचा आपला प्रघात आहे. आपल्या अस्तित्वाच्या जोरावर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्यांचे जगणे प्रचंड समाजहितैषी असते आणि म्हणूनच चारशे-पाचशे वर्षांनंतरही ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आणि शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या कर्तृत्वाचे गोडवे समाज गात असतो. त्यांच्या जयंत्या पुढच्या कैक पिढ्यांना प्रेरणादायी ठरतात. जन्मल्यानंतरची वाटचाल ही संबंधीत व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभाशक्तीचे, सृजनशीलतेचे, पराक्रम आणि मूल्याधिष्ठीत वर्तनाचे पर्व समजले जाते. या महापुरुषांचे जगणे तोलाचे तर काही महापुरुषांचे मृत्यु इतिहास घडवणारे ठरले आहेत, म्हणून तर ‘मरणात जग जगते’ असे मानल्या जाते.
संभाजी महाराजांच्या धर्मासाठी पत्करलेल्या हौतात्म्याने या मातीला स्वराज्यासाठी प्राणार्पणाचा वारसा प्रदान केलेला आहे. अगदी तीच परंपरा पुढे सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग या क्रांतिविरांना देशासाठी हसत-हसत फासावर चढण्याचे धैर्य देऊन गेली आहे. व्यक्ती जन्मतो या पेक्षा जन्मल्यानंतर मृत्युपर्यंत तो काय करतो आणि मृत्युला कसा सामोरा जातो याला महत्त्व आहे. आधुनिक विज्ञानातील संशोधनामुळे आणि दैनंदिन व्यवहारातील सुलभीकरणामुळे व्यक्तीच्या आयुष्याची सरासरी वाढली आहे. औषधोपचारांची मुबलकता आहे म्हणून जराजर्जर देह जगवण्याचा मोह असणे साहजिक आहे.
भारतात तशी संमती असावी, असे मानणारा मोठा प्रवाह आहे. दृष्टे सुधारणावादी नेते राममनोहर लोहिया यांनी त्यांच्याकाळी याबाबत जाहीर आग्रह धरलेला होता. जगण्यातील मौज संपली आहे असे वाटणाऱ्या आणि जगण्यातील इतिकर्तव्ये संपल्यामुळे तृप्त ज्येष्ठांना असा सुखान्त करण्याची संमती द्यावी की, न द्यावी याबाबत भारतात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून सध्या वाद सुरू आहे. खरे तर जीवन जगण्याचा जसा मूलभूत अधिकार घटनेत नमूद आहे. तसेच एका विशिष्ट टप्प्यावर शारीरिक व्याधींना बळी पडण्यापेक्षा जीवनाची इतिश्री करण्याची संमती द्यायला काहीच हरकत नसावी.
जीवन सार्थकी लागल्याचे समाधान झालेल्या आणि सुखासुखी देह ठेवू इच्छिणाऱ्यांची संख्या भारतात बरीच मोठी आहे. अनेक व्याधींनी त्रस्त शरीरावर महागडे उपचार झाल्यानंतर संबंधीत व्यक्ती उठून चालणार नाही, हे ज्ञात असतानाही त्याच्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा अट्टाहास धरणे इष्ट नाही. विशेषत: ज्यांना जगणे नकोसे झाले आहे अशा ज्येष्ठांना त्यांचा सुखांत अधिकार मिळायला हवा. “इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही सुरेश भटांच्या कवितेतील भावना आपण या ज्येष्ठांवर लादण्याइतपत अनुदारपणा हितावह नसतो. त्यामुळेच गुडॉल या विचारी, प्रगल्भ शास्त्रज्ञाच्या सुखान्तानंतर जगभरात त्यास संमती देण्याबाबत विचार सुरू होईल, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment