आज कार्ल मार्क्स कालबाह्य ठरतो? काय सांगता? तो तर चिरकालीन आहे!
पडघम - अर्थकारण
हितेश पोतदार
  • कार्ल मार्क्स
  • Tue , 15 May 2018
  • पडघम अर्थकारण कार्ल मार्क्स Karl Marx कार्ल मार्क्सची जन्मद्विशताब्दी Karl Marx bicentenary कार्ल मार्क्सची द्विजन्मशताब्दी Karl Marx 200th anniversary of birth कार्ल मार्क्स @ २०० Karl Marx @ 200

कार्ल मार्क्सची जन्मद्विशताब्दी, ‘दास कॅपिटल’चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आणि ‘सोविएत क्रांती’ची शताब्दी, यामुळे मार्क्स व मार्क्सवाद चर्चेचा विषय झाला आहे. त्यानिमित्ताने...

..................................................................................................................................................................

“भांडवलवाद जागतिक झाल्याने वर्गसंघर्ष नाहीसा झालाय. कारण ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे आधुनिक समाजाचे ठळक वर्गीकरण आज करणे शक्यच नाही. त्यामुळे मार्क्सवाद मुळापासून संपलाय. उरला असेलच तर तो काही तद्दन लो-प्रोफाइल तुटपुंज्या भांडवलावर आधारित कारखान्यांपुरताच. वर्गरहित,  सामाजिकदृष्ट्या अस्थिर, पोस्ट-इंडस्ट्रियल पाश्चिमात्य मूल्यांआधारित व्यवस्थेत कार्ल मार्क्स कालबाह्य ठरतो”, अशा प्रकारचे अनेक लेख, युक्तिवाद सध्या विविध माध्यमांतून, व्यक्तींकडून ऐकावयास\ वाचावयास येत आहेत. यापूर्वीही येत होतेच. परंतु ‘मार्क्सवाद संपलाय’ हाच विरोधाभासी अलंकार आहे.

कारण मार्क्सवाद असणे हे कुठले हॉली रोमन एम्पायर असणे किंवा गडेगंज संपत्तीची मालकी असणे किंवा ५००-१०००च्या नोटा असण्यासारखे नाही, जी आज आहे उद्या नाही. मार्क्सवाद अत्यंत मूलगामी विचारसरणी (radical ideology) आहे. आणि त्यातील मूलगामी मार्क्सवाद्यांचे उद्दिष्ट टेरी ईगलटन या इतिहासतज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार अशा स्थितीला पोहोचणे आहे, जी प्राप्त केल्यानंतर त्यांची गरज त्यापुढे उरणार नाही. मार्क्स किंवा मार्क्सवाद संपला असे आपण तेव्हाच म्हणू शकतो, जेव्हा त्यांचा प्रतिस्पर्धी (शत्रू) संपेल. म्हणजेच जोपर्यंत मानवी शोषणावर आधारित ‘निर्दयी-दमनकारी’ असा भांडवलवाद मुळासकट फेकला जात नाही, तोपर्यंत मार्क्स व त्याची विचारसरणी निवृत्त होणे शक्य नाही.

असे का? याचे कारण शोधण्यासाठी आपल्याला मार्क्सने समाजाचे विवेचन करण्यासाठी वापरलेले पद्धतीशास्त्र जाणून घेणे गरजेचे ठरते. मार्क्स असे विवेचन करताना त्याच्या चिकित्सात्मक तंत्राला (method of enquiry), त्याच्या सिद्धांताच्या मांडणी तंत्रापासून (method of presentation) वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतो. जी चिकित्सा त्याच्या पहिल्यावहिल्या ‘Ruthless Criticism of Everything Existing’ (सगळ्या विद्यमान गोष्टींवरील निर्दयी टीका)पासून सुरू होते. मार्क्स समाजाचे विवेचन करताना आणि ऐतिहासिक सामाजिक परिस्थिती समजावून घेताना त्याच्याशी संबंधित सर्व घटकांच्या मुळाशी जाऊन मूलभूत संकल्पना शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग पुन्हा पृष्ठभागी येऊन अशा मूलभूत संकल्पना समाजाच्या विविध अंगांशी पडताळून आपली मते मांडतो. म्हणूनच मार्क्सने वापरलेल्या या पद्धतीमुळे आणि ऐतिहासिक कालबदलातून आकारास आलेल्या सामाजिक संबंधांची मांडणी केल्याने मार्क्सवादाला शास्त्रीय अधिष्ठान मिळते.

वर्गसंघर्षाची प्रसंगोपचितता खरंच संपली आहे का?

मार्क्सने मांडलेल्या वर्गसंघर्षाच्या सिद्धान्ताला हेगेल नावाच्या जर्मन तत्त्वज्ञाच्या ‘ऐतिहासिक द्वंदात्मक’ (Historical Dialectical) सिद्धान्ताची पार्श्वभूमी आहे. हेगेलच्या म्हणण्यानुसार इतिहास हा दोन प्रकारच्या विचारांमधील घर्षणाने निर्मित होत पुढे सरकत असतो. आणि इतिहासाचे ध्येय हे अंतिम ज्ञानाची अनुभूती आहे. हेगेलच्या या संकल्पनेतील आदर्शवादाला मार्क्स नाकारून लुडविग फ्युअरबॅककडून प्रेरणा घेत त्याला भौतिक रूप देतो. मार्क्सच्याही मते इतिहास हा द्वंदात्मक आहे, पण हे द्वंद्व दोन संकल्पनांतील (ideas) नसून दोन सामाजिक-आर्थिक वर्गांमधील आहे. पुढे इतिहासाची मांडणी मार्क्स गुलाम विरुद्ध मालक, मजूर विरुद्ध सरंजाम, सरंजाम विरुद्ध राजे-महाराजे, राजे-महाराजे विरुद्ध धर्मगुरू अशी करतो. आणि अशा वर्गसंघर्षांतूनच इतिहास निर्माण होऊन काळ पुढे सरकतो. म्हणजेच इतिहास हा वरवर जरी चक्रासारखा दिसला तरी त्याला एक गती आहे. तो प्रगतशील आहे. नवीन परिस्थिती निर्माण झाली की, नवीन भौतिक गुण निर्माण होतात. आणि हे भौतिक (दु)र्गुण एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेल्या शोषणातून निर्माण होतात. जोपर्यंत हा वर्गसंघर्ष संपत नाही, तोवर शोषण संपत नाही. आणि यातूनच आजचा बूर्ज्वा-भांडवलवादी (bourgeoisie) विरुद्ध कामगार (proletariat) हा संघर्ष उभा राहतो. या आवर्तनी शोषणाला थांबवण्यासाठी ‘नाही रे’ वर्गाने ‘आहे रे’ वर्गावर मात मिळवणे फार गरजेचे आहे असे मार्क्स मानतो. अशा प्रकारे मार्क्स प्रथमच मानवाला शास्त्रांच्या सर्वांगीय क्षेत्रांत केंद्रस्थानी आणतो. मग आजच्या घडीला हा वर्गसंघर्ष संपलाय असे म्हणता येईल काय? आणि संपला असेल तर मार्क्स कालबाह्य ठरतो का?

उत्पादनाची मालकी ठेवणारा बूर्ज्वा वर्ग आज हयात (असे सगळे मानतातच) आहेच, परंतु सर्वहारा (proletariat) असा वर्ग आज शिल्लक राहिलाय, असे मार्क्स व मार्क्सवादावरील टीकाकार मानत नाहीत. त्यांच्या मते ‘भांडवलशाहीने आज जगाचे स्वरूप पूर्णतः बदललेले असून ते मार्क्सने त्या काळी मांडलेल्या स्वरूपाशी सुसंगत नाही आणि नव-उदारमतवादी भांडवलशाहीच्या धोरणांमुळे पूर्वीचा कामगार वर्ग नाहीसा झाला आहे. त्यातील बहुतांश हे आजच्या मध्यमवर्गीयांत विरले गेल्याचे म्हटले जाते. म्हणून समाजाची ठळक दोन वर्गांत फोड होत नाही. आणि म्हणून वर्गसंघर्ष संपतो.’

हा युक्तिवाद फार उथळ ठरतो. कारण मार्क्सने भांडवलशाहीचे वर्णन करताना त्याचे कालानुरूप बदलत जाणारे स्वरूप लक्षात घेतले होतेच. त्यात त्याने भांडवलाची बदलत गेलेली विविध ऐतिहासिक प्रारूपे दिली आहेत. जसे- व्यापारी- शेतकीय- औद्योगिक- मक्तेदारीयुक्त- वित्तीय (Financial)- साम्राज्यवादी अशी अनेक. कालांतराने पारंपरिक कामगार वर्गात घट होऊन पांढरपेशीय वर्ग वाढेल हेही मार्क्सने म्हणून ठेवलेय. त्यामुळे मार्क्स त्याच्या अप्रचलित पद्धतीमुळे आजही समर्पक ठरतो. झालेही तसेच- भांडवलशाहीने पारंपरिक औद्योगिक उत्पादनाकडून चंगळवादाकडे नेणाऱ्या पोस्ट-इंडस्ट्रियल व्यवस्थेकडे वाटचाल करत संप्रेषण, वित्त, माहिती-तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात आगेकूच केली. जसे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिग्लित्झ म्हणतात ‘नव-आंतरराष्ट्रीय आर्थिक व वित्तीय संस्थांच्या उगमामुळे संपूर्ण जगाला नव-उदारमतवादी धोरणे अवलंबायला भाग पाडले. आणि ज्यातून लेस्ली स्क्लेअरनुसार बहुराष्ट्रीय भांडवलवादी वर्ग तयार झाला. ज्याने शोषणसुद्धा जागतिक झाले.’

काहींना वाटते तंत्रज्ञानातील प्रगती ही फक्त भांडवलशाहीत होते आणि त्यात मानवाचे अनेक फायदे आहेत. प्रसिद्ध मार्क्सवादी भूगोलतज्ज्ञ डेविड हार्वे यांच्यानुसार मार्क्स उत्पादन शक्तींच्या अखंड विकासाबद्दल बोलतांना ‘तंत्रज्ञाना’विषयीसुद्धा खास टिपणे करतो. (Harvey, 2017) तंत्रज्ञानातील प्रगतीने भांडवशाही व्यवस्था उत्पादन प्रक्रियेतून अधिक ‘वरकड मूल्य’ काढण्यास यशस्वी ठरणे, हे मार्क्सला तेव्हाही अपेक्षित होते. केवळ भांडवलशाहीखाली तांत्रिक आणि संघटनात्मक गतिशीलतेसाठी एक पद्धतशीर आणि सामर्थ्यवान शक्ती सापडते, जिचा प्रभाव अधिकाधिक वाढत राहतो आणि भांडवलाचे संचयीकरण बळावते.  हे साहजिकच आजच्या भांडवलदारांतील वाढत्या स्पर्धेमुळे शक्य होते.

भांडवलाचेही दोन प्रकार असतात- एक स्थिर भांडवल (Constant Capital), दोन- चल भांडवल (Variable Capital). त्यातही मुख्यत्वे कामगारांचे श्रम. तंत्रज्ञानात केलेल्या गुंतवणुकीची किंमत स्थिर भांडवलातून निघते. एकदा ती निघाली की पुन्हा ‘वरकड मूल्य’ स्थिरावते. भांडवदारांचा नफा स्थिरावतो. तो अधिक वाढवण्यासाठी पुन्हा चल भांडवलावर म्हणजेच कामगारांच्या श्रमातून ते काढले जाते. याचाच अर्थ तंत्रज्ञानाचे मूळ उद्देश हे ‘ह्यूमन कम्फर्ट’ असूनसुद्धा त्याने मानवाचे शोषणच जास्त होते.

मार्क्सच्या मते ‘भांडवलशाहीचा कुठल्याही देशातील विकास हा त्यातील पूर्वीच्या सर्व व्यवस्था मोडीत काढून होत असतो. म्हणजे जसे युरोपात झाले. तेथील भांडवलशाही ही सरंजामव्यवस्थेच्या अस्थींवर स्वार होऊन आधुनिक विचारांच्या आड उदयास येते.’

परंतु भारतात तिचा विकास हा जातीव्यवस्था व पितृसत्ता यांना धक्काही न लावता/लागता झाला आहे. त्यामुळे भांडवलशाहीचा भारतातील विकास हा पितृसत्तेवर व जातिव्यवस्थेवर सुपर इम्पोज करून झाला आणि पूर्वीची स्त्री-श्रम व जातीवार श्रमविभागणी तशीच राहिली. पारंपरिक वर्गांतील हितसंबंध कमकुवत होत गेले असे वाटत असले तरी जातींचे व स्त्रियांचेही आर्थिक वर्गीयकरणातून होणारे शोषण दुर्लक्षित करता येत नाही. दुर्लक्षित झाल्यास त्याची परिणीती नव-उदारमतवादी भांडवलशाहीमुळे निर्माण झालेले प्रश्न झाकोळण्यात होते.

या प्रश्नांचे आजचे उदाहरण म्हणजे- वेगाने वाढणारी विषमता (ज्याचे पुरावे भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि जाती जनगणना-२०११ व थॉमस पिकेटीच्या अहवालापासून क्रेडिट सुएझ, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल, OECDने प्रकाशित केलेल्या आकडेवारीपर्यंत मिळतात!), भांडवलावरील अधिक केंद्रित होत जाणारी मक्तेदारी; भांडवल जागतिक होऊनही कामगार वर्ग अधिक स्थानिक राहणे, ही होत. म्हणून फ्रेडरिक जेम्सन म्हणतो- अशा परिस्थितीत मार्क्सवाद आज अपरिहार्यपणे खरा ठरायला हवा.

मार्क्सच्या पलीकडचा मार्क्सवाद आणि भारत

मार्क्सवाद मार्क्सपश्चात अधिक फोफावतो आणि मानवी जीवनाशी संबंधित जवळपास सर्वच अंगावर भाष्य करण्यास समर्थ होतो. त्यामुळे मार्क्सवाद हासुद्धा स्वतःत एक ग्रँड-नरेटिव्ह आहे. एक सार्वत्रिक विवरण करणारी विचारसरणी आहे. म्हणूनच त्याला ‘theory of all seasons’ म्हटले जाते. मार्क्सवाद्यांमध्येही अनेक गोष्टींवर मतभेद होतात, आहेत. ‘Ruthless Criticism’ हा शब्द अगदी गंभीरपणे घेऊन अगदी मार्क्सच्याही अनेक सिद्धान्तांवरही मार्क्सवादीच ताशेरे ओढतात. तरीही विवेचनाचे प्रत्येक अंग ‘द्वंद्वात्मक भौतिकवादा’ला अनुसरून होते.

मार्क्सचा जोर फक्त सैद्धांतिक मांडणीवरच नाही तर प्रत्यक्ष कृतीवरही तितकाच होता. त्याला ‘प्रॅक्सिस’ स्वरूपात लेनिन आणि स्टालिनने सोविएत रशियात आणून दाखवले. आर्थिक विकासासाठी शेती व उद्योगधंदे यांच्या राष्ट्रीयीकरणावर आधारित नियोजनबद्ध विकासाचे प्रारूप व प्रतिमाने मांडून जगाला मार्क्सचे व मार्क्सवादाचे कृतीतील महत्त्व दाखवले. परंतु सत्तेच्या परिघापलीकडेही मार्क्सवादाचा अधिक विकास होत राहिला. या विकासात ग्रामशी, लुकास, कोर्श व गोल्डमन यांचे मोलाचे योगदान राहिले. अशोक चौसाळकरांच्या मते यांनी मार्क्सच्या विचारांचा अधिकसूक्ष्म अभ्यास केला आणि सिद्धान्त व व्यवहार यांच्या एकात्मतेचा विचार मांडून इतिहासाच्या  घडणीत मानवाच्या सर्जनशील कार्यभागाचे स्वरूप व्यक्त केले. (चौसाळकर, 2017)

मार्क्सवाद हा मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबींचे विश्लेषण करतो जसे- प्रँकफर्ट स्कूलचे (अडोर्नो, होर्कहेमर, मार्क्यूस) ‘कले’बद्दलचे विवेचन; बेर्टोल्ट ब्रेख्त, आजचे टेरी ईगलटन, जॅक्स रॅन्सिअर. सॅम्युअल बेकेट-फॉल्कनर-जॉयसी यांचे नाट्यक्षेत्रातील योगदान; जॉर्ज लुकासचे साहित्यावरील विवेचन; तसेच अप्रत्यक्ष प्रभाव असणाऱ्यांमध्ये काफ्काचे साहित्य, मिशेल फूकोचे ज्ञानासंबंधीचे विश्लेषण; फ्रॉईडपासून लेकनचे मनोविश्लेषणातील मार्क्सवादाचे योगदान, अशी अजून अनेक/बरीच महत्त्वाची नावे आहेत जी या लेखात मांडणे अगदीच अशक्यप्राय आहे.

मार्क्सवादाचे कलाक्षेत्रावरील विवेचन घेतले तर आजच्या भारतीय राजकीय परिस्थितीचेही स्वरूप लक्षात येते. थियोडोर अडोर्नो ज्याप्रमाणे ‘डायलेक्टिक ऑफ एनलाइटनमेंट’मध्ये म्हणतो की, ‘अशी संस्था किंवा व्यवस्था जी मानवाला उद्धाराचे मार्ग मिथक निर्माण करून सांगण्याचा प्रयत्न करते आणि यातून लोकांवरील वर्चस्व अधिक प्रबळ बनवते, त्यावेळेस अधिक मिथकांची निर्मिती होऊन वर्चस्वाचेही स्वरूप अधिक प्रबळ होत जाते. आणि त्यापुढे जाऊन मिथकांतून अनेक प्रादेशिक, लैंगिक, [जातीय (भारताच्या संदर्भात)], भाषिक प्रश्न झाकले जाऊन मिथकांच्या बळावर राज्य करता येते.’ किती समर्पक ठरते हे आजच्या भारतीय राजकीय परिस्थितीला!

अजून मार्क्सवादाच्या उपयुक्ततेचे पुरावे काय हवेत?

मार्क्सविषयी अजून काही

मुळात मार्क्सची व मार्क्सवादाची भुरळ का पडते? याला वरवरचे कारण द्यायचे झाले तर त्यात समाविष्ट असणारा रोमँटिसिझम तर आहेच. ज्याला फिडेल कॅस्ट्रो-चे गव्हेरा या जोडगोळीमुळे अजून बढावा मिळतो. परंतु रोमँटिसिझमच्या पलीकडे जाऊन अकादमीक क्षेत्रालाही मार्क्सवाद प्रभावित न करता रहात नाही. अमेरिकेतील बहुतांश प्रसिद्ध विद्यापीठांपासून भारतीय विद्यापीठांपर्यंत मार्क्सवाद आपली छाप सोडतो.

मार्क्सची मुळेही पत्रकारितेत असल्याने त्याचे लिखाण अधिक मोहक वाटते. त्यातही त्याच्या लिखाणावरील शेक्सपिअरचा प्रभाव अधिक उत्तेजित करतो. जसे मार्क्सची मांडणीही मध्य-युरोपीय मानवतावादी परंपरेतून येत असल्याने अधिक प्रभावी वाटते. जसे- ‘कम्युनिस्ट मेनिफेस्टो’मध्ये मार्क्स ‘प्रत्येक व्यक्तीच्या अनिर्बंधित विकासापासून सर्वांच्या अनिर्बंधित विकासाकडे’ म्हणतो (‘आत्मनोमोक्षार्थ जनत्हितायच्’सारखं). मार्क्स कौटुंबिक जीवनावर गाढ विश्वास असणारा होता. त्यातही त्याची बायको जेनीचा त्याच्यावरील प्रभाव सर्वश्रुत आहेच (अधिक माहितीसाठी वाचा- लेखिका मेरी गेब्रियलचे- ‘लव्ह अँड कॅपिटल’). त्याचे जेनीसोबतचे संबंध हे भौतिक गोष्टींच्याही अधिक पुढचे होते. त्यांच्यात अतिशय प्रगल्भ संभाषणे होत. जेनीशिवाय मार्क्सला कुठलेही लिखाण शक्य नव्हते. म्हणून मार्क्सला अधिक समजावून घेण्यासाठी त्याच्या घराचाही वेध घ्यावा लागतो.

मार्क्सवर बहुतांशी स्त्री-केंद्रित लिखाण कमी केल्याचा आरोप होतो. परंतु त्याला फक्त ‘श्रमा’च्या चौकटीत बंद करणे उचित नाही ठरत. कारण मार्क्स ‘लेबर’विषयी कमी तर ‘लेजर’ (Leisure) विषयी जास्त आहे. त्याची पहिली राजकीय कृतीही कारखान्यांत काम करणाऱ्या स्त्रिया व लहान मुले यांच्या शोषण विरोधातच होती. मार्क्सने कामाचे तास मूलगामी स्वरूपात कमी करण्याची मागणी केली. कारण स्त्रियांना व लहान मुलांना स्व-विकासासाठी योग्य वेळ (leisure time) मिळावा. यावरून मार्क्स व त्याची उपयुक्तता अधिक लक्षात येते.

जाता जाता- ‘तत्त्वज्ञांनी फक्त जगाचे अनेक प्रकारे विवेचन केले, पण प्रश्न आहे हे जुने जग बदलण्याचा’ असे मार्क्स ‘फेअरबॅकवरील अकराव्या प्रबंधा’त म्हणत असेल तर तो चिरकाल आहे.

संदर्भ -

Harvey, D. (2017). Marx, Capital and the Madness of Economic Reason. New York: Oxford University Press.

चौसाळकर, अ. (2017). आधुनिक राजकीय सिद्धांत . पुणे : द युनिक अकॅडमी.

..................................................................................................................................................................

लेखक हितेश पोतदार विविध महाविद्यालयं आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे अध्यापन आणि अध्ययन करतात.

hdpotdar199@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......