‘रॉकस्टार’ : जनार्दन ते जॉर्डन, रोमँटिक ट्रॅजेडी ते कॅरेक्टर ट्रॅजेडी
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
जीवन नवगिरे
  • ‘रॉकस्टार’ची पोस्टर्स
  • Sat , 12 May 2018
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा Hindi Cinema रॉकस्टार Rockstar इम्तियाज अली Imtiaz Ali रणबीर कपूर Ranbir Kapoor

“खताना भाई, मुझे ये सबकुछ नहीं चाहिए… मुझे नहीं बनना है बड़ा.. मेरे पास कुछ नहीं है इसके  इलावा… मेरा दिल नहीं टूटना चाहिए...” असं जॉर्डन जेव्हा म्हणतो, तेव्हाच ‘रॉकस्टार’ सिनेमा नेमकं काय सांगतोय हे कळतं. जनार्दन ते जॉर्डन हा त्याचा, स्वतःचा प्रवास एक प्रकारे पूर्ण झालेला असतो. आणि त्याला कळतं की, त्याच्या आयुष्यात फक्त हीर महत्त्वाची आहे.

जनार्दन जाखर (रणबीर कपूर) हा साधा सरळ एक कॉलेज तरुण असतो. त्याला मोठा रॉकस्टार होण्याची फार इच्छा असते, हे सुरुवातीलाच आपल्याला दिग्दर्शक इम्तियाज अली बस स्टॉपवरच्या दृश्यामधून दाखवतो. पण जनार्दनला त्याची छाप पाडता येत नाही. “टूटे हुए दिल से ही संगीत निकलता है” असं त्याचा मेंटॉर खताना भाई (कुमुद मिश्रा) त्याला सांगतो. “जोपर्यंत तुझ्यासोबत काही शोकांतिका घडत नाही, तोपर्यंत तू काही रॉकस्टार बनू शकणार नाहीस. तूला दुःखातून जावं लागेल तरच तुझ्यामधून संगीत येईल”, असं खताना भाई त्याला म्हणतो. दुःख आणि कलाकारांचं एक वेगळंच नातं आहे. ‘मिडनाईट इन पॅरिस’ या वुडी अॅलनच्या सिनेमातील एक सुरेख संवाद असं सांगतो की, “कलाकारानं जीवनातील अस्तित्वाच्या निराशेसमोर न हरता, आपल्या अस्तित्वाच्या शून्यतेसाठी औषध शोधायला हवं.” दुःखामधूनच कलाकार जन्माला येत असतो. आणि जनार्दनच्या आयुष्यात काहीएक वाईट घडलेलं नसतं. मग तो प्रश्न करतो की, मी ‘रॉकस्टार’ कसा बनणार?

कॉलेजमधील मित्र म्हणतात की, हीर (नर्गिस फाखरी) ‘दिल तोडणे की मशीन है’. म्हणून जनार्दन तिला प्रेमाबद्दल (काही प्रेम वगैरे नसतं) बोलून टाकतो. जनार्दनचं हे अनपेक्षित वर्तन पाहून हीर त्याला उलटसुलट बोलते. जनार्दन मोठ्या दुःखात बुडतो, पण एवढ्या मोठ्या नाही की, तो सामोसे खाऊ शकणार नाही किंवा जास्त चटनीसाठी लढणार नाही. पण नंतर हीर आणि तो चांगले मित्र होतात. काही दिवसांनी हीरचं लग्न असतं आणि ती लग्नानंतर प्रागला जाणार असते. जनार्दन तिच्या लग्नाला जातो. परत आल्यावर मात्र त्याला हीरची कमी जाणवते. पुढे भावांमुळे जनार्दनला घरातून बाहेर काढलं जातं. तो दर्ग्यात जाऊन राहतो. तिथं तो तेथील संगीतकारांसोबत सुफी संगीत गाऊ लागतो. अतिशय सुरेख गाणं ‘कुन फाया कुन’ म्हणजेच ‘बननं आणि तसं राहणं’. आणि इथूनच जनार्दनचा रॉकस्टार बनण्याचा प्रवास सुरू होतो. पण पुढे तो हीरच्या कमीमुळे दुःखी होत जातो. त्याची म्युझिक कंपनी त्याला प्रागला पाठवते, तो ते कॉन्ट्रॅक्ट फक्त हीरसाठी घेतो. कारण ती तिथं असते. तिथं तो तिला भेटतो. ती तिच्या वैवाहिक जीवनामध्ये खूश नसते. त्या दोघांना माहीत असतं की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. पण त्यांना एकत्र येता येत नाही. आणि हीच ‘रॉकस्टार’ची रोमँटिक ट्रॅजेडी आहे.

जनार्दन कधीच कोणाच्या प्रेमात पडलेला नसतो. पण जेव्हा तो हीरच्या प्रेमात पडतो, तेव्हा त्याला ते मिळवता येत नाही. आणि याच निराशेतून आपण जनार्दनचा जॉर्डन, एक मोठा रॉकस्टार झालेला बघतो. तो नंतर प्रसिद्ध होतो. जे पाहिजे होतं, ते सगळं काही त्याला मिळतं. पण जॉर्डन एक वादग्रस्त आणि बंडखोर रॉकस्टार असतो. त्याच्यावर सुरुवातीपासूनच जिम मॉरिसन या रॉकस्टारचा प्रभाव असतो. तो एक वादग्रस्त रॉकस्टार होता. जॉर्डन सतत पोलीस कारवायांमध्ये अडकत असतो, पोलिसांना मारहाण करतो आणि अशा प्रकारे स्वतःचा नाश करत जातो.

एकप्रकारे ‘रॉकस्टार’ला कॅरेक्टर ट्रॅजेडीसुद्धा म्हणता येईल. जॉर्डनच्या अशा वागण्याचं कारण काय? तो एवढा हिंसक का बनतो? तर जॉर्डन व्यवस्थेला, प्रसिद्धी आणि मीडियाला कंटाळलेला असतो. या जगातील नैतिकता त्याच्यासाठी अडथळा असते. कारण हीर एक लग्न झालेली स्त्री असते, म्हणून त्या दोघांना एकत्र येता येत नाही. आणि म्हणूनच जॉर्डन म्हणतो, “पता है, यहाँ से बहुत दूर, गलत और सही  के पार एक मैदान है. वहाँ मिलूंगा मैं तुझे.” आणि ‘तुम हो’ या गाण्यामधील ‘किस तरह छिनेगा आ, मुझ से ये जहाँ तुम्हे’ ही ओळ त्याचीच सूचक आहे.

जॉर्डन एक त्याच्याच धुंदीतला रॉकस्टार असतो. म्हणून सुरुवातीला तो काही म्युझिक कंपनीच्या कलाकारांसोबत फिट होत नाही आणि काम सोडून जात असतो. पण उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) यांच्यामुळे त्याला कंपनीवाले ठेवून घेतात. उस्ताद जमील खान यांनी त्याला दर्ग्यात गाताना बघितलेलं असतं. तेव्हा म्हणतात की, “ये बडा जानवर  है.. ये आपके छोटे पिंजरे में नहीं समायेगा. अपनी दुनिया बनायेगा.” आणि जॉर्डन पुढे ते बरोबर सिद्ध करतो. तो पुढे हीरसाठी कंपनीच्या काँट्रॅक्टसचासुद्धा विचार करत नाही आणि कॉन्सर्ट्सलासुद्धा जात नाही. तो कंपनीच्या पिंजऱ्यामध्ये अडकून बसत नाही, त्याची पर्वा करत नाही. जॉर्डन म्हणतो, “पता है बहुत साल पहले यहाँ एक जंगल होता था. घना भयानक जंगल. फिर यहाँ एक शहर बन गया, साफ़ सुधरे मकान, सीधे रास्ते, सब कुछ तरीके से होने लगा. पर जिस दिन जंगल कटा, उस दिन परिन्दो का एक झुण्ड यहाँ से हमेशा के  लिए उड़ गया.. कभी नहीं  लौटा. मैं उन परिंदो को ढून्ढ रहा हूँ, किसी ने देखा है उन्हें? देखा है?” जॉर्डनला त्या परिन्दोसारखं मुक्त व्हायचं असतं. जॉर्डनला काहीच नको असतो. तो एक मोठा रॉकस्टार झालेला असतो, पण तेसुद्धा त्याला नको असतं. त्याला कळून चुकतं की, हीर त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण त्याला तिच्यासोबत राहता येत नाही. आणि तीसुद्धा तिच्या वैवाहिक जीवनामुळे त्याला भेटण्यास नकार देते.

एकंदरीत कॉलेजचा जनार्दन जिम मॉरिसनसारखाच एक मोठा वादग्रस्त रॉकस्टार बनतो. त्याला सतत दुःखातून जावं लागतं. त्यामुळेच तो कसलीही पर्वा न करता पोलिसांना मारहाण करतो. त्याला हीरसोबत पण राहता येत नाही. कारण सतत मीडिया, पोलीस, कॉन्सर्ट्समध्ये येतात. जॉर्डन प्रेम आणि दुःखामध्ये अडकून जातो. एक मोठा दुःखानं वेढलेला कलाकार बनतो.  

जॉर्डनची कथा ही प्रेम, प्रसिद्धी, स्वतःला घडवणं, संपवणं आणि मुक्त होऊ पाहण्याची आहे. एक प्रकारची जॉर्डनची ट्रॅजेडीच आहे. आणि शेवटी जॉर्डनला सर्व सोडून देण्याची आणि या सगळ्यापासून दूर जाण्याची इच्छा होते. कारण सगळं काही असताना तो हीरलाच गमावून बसतो.

इम्तियाज अली त्याच्या सिनेमामधून प्रेम आणि जीवनातील सूक्ष्म अंतर वेगळ्याच पद्धतीनं दाखवतो. ‘हायवे’, ‘जब वि मेट’, ‘तमाशा’ ही त्याचीच वेगळी उदाहरणं आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये आपल्याला मुख्य पात्राची एक स्वतःचा शोध घेण्याची कथा आहे. ‘रॉकस्टार’मध्ये पण एका लहान घरातला साधा जनार्दन मोठा रॉकस्टार बनतो. पण तो त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हीरला मागे सोडण्यास तो तयार नसतो. जॉर्डन पैसा, प्रसिद्धीची पर्वा करत नाही. आणि त्याला रॉकस्टार बनून राहावंसं वाटत नाही. त्याला प्रसिद्धी हवी असते, पण जेव्हा भेटते तेव्हा त्याला ती नकोशी होते. कारण हीरपेक्षा त्याच्यासाठी काहीच महत्त्वाचं नसतं. म्हणूनच तो खताना भाईला म्हणतो, “मेरे पास कुछ नहीं है  इसके इलावा.. मेरा दिल नहीं टूटना चाहिए…” आणि हाच जनार्दन ते जॉर्डनचा एक स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे.

.............................................................................................................................................

लेखक जीवन नवगिरे चित्रपट अभ्यासक आहेत.

navgirejeevan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Mayur Navgire

Sat , 12 May 2018

Nice Article Jeevan.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......