अजूनकाही
भारत गणेशपुरे हे ‘चला, हवा येऊ द्या’ या मनोरंजनापर कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार. त्यांनी आपल्या बायकोशी नुकतंच दुसर्यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास १८ वर्षं ओलांडल्यानंतर त्यांना असं लग्न करावंसं वाटलं. या लग्नाची प्रसारमाध्यमांनी कौतूक म्हणून दखल घेतली. पण अशा आगळ्यावेगळ्या लग्नामागे अनेक हेतू अन कारणं असण्याची शक्यता आहे. त्या शक्यता माध्यमांनी दुर्दैवानं पाहिलेल्या नाहीत. मात्र लग्नाला कोण आलं? दुसर्यांदा लग्न करताना कसं वाटतं, याचा लेखाजोखा नेहमीच्या बाळबोध पद्धतीनं टीव्हीवाल्यांनी दाखवला.
या लग्नाबाबत स्वतः भारत गणेशपुरे यांनी ‘आम्ही आयुष्यात पुन्हा गंमत यावी म्हणून लग्न करत असल्याचं’ गमतीनं सांगितलं आहे. त्यांच्या पत्नीनं ‘घरी काहीतरी फंक्शन असावं असं वाटलं. त्यातून पुन्हा लग्न करण्याची कल्पना पुढे आल्याचं’ सांगितलं.
काही मोजक्या माध्यमांनी गणेशपुरे यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास या लग्नाला कारणीभूत असल्याचं पुढे आणलं आहे. ते खरं असण्याची शक्यता अधिक आहे. स्वतः गणेशपुरे यांनी मात्र थेट तसा दावा केलेला नाही. अर्थात तसा थेट दावा ते करणार नाहीतच. ज्यांनी ज्योतिषशास्त्राच्या संदर्भाचा दावा केला, तो गणेशपुरे यांनी खोडलेला नाही. त्यामुळे त्यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास हेच कारण असण्याची शक्यता अधिक वाटते.
या शक्यतेचा एक कंगोरा असाही आहे की, कुणी केवळ गंमत म्हणून त्याच जोडीदाराबरोबर लग्न करणं अशक्य वाटतं. त्याचबरोबर घरात फंक्शन ठेवायला कोणतंही कारण शोधता आलं असतं. त्यासाठी लग्नच पुन्हा करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे हा विषय गांभीर्यानं समजून घेतला पाहिजे.
गणेशपुरे अलीकडच्या काळात परदेशात ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात असताना त्यांना सौम्य ॲटॅक येऊन गेला. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असावा! पण ते त्यांना पुरेसं वाटलं नसावं. म्हणूनच त्यांनी आपला हात ज्योतिषाला दाखवला. सदर ज्योतिषानं ‘तुमच्या लग्नाची गाठ सैल झाली’ असल्याचं सांगितलं. त्यावरचा पर्याय म्हणून पुन्हा बोहल्यावर चढण्याचा अ-वैज्ञानिक सल्ला दिला. गणेशपुरे यांनी भावनिक भीती म्हणा किंवा ज्योतिषावर (भीतीयुक्त) श्रद्धा ठेवून तो स्वीकारला. अन पुन्हा लग्नगाठ घट्ट आवळून घेऊन स्वत:चं आयुष्य वाढवून घेतल्याची भंपक भावना बळावून घेतली.
आपल्या खाजगी आयुष्यात कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. त्यामुळे गणेशपुरे यांना तो अधिकार आहे. पण अशा प्रसिद्ध कलाकारानं असं केल्यावर त्याचे समाजमनावर होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. किंबहुना समाजप्रिय व्यक्तींच्या खाजगी आयुष्याचे सार्वजनिक परिणाम तेवढेच मोठे असतात. ते परिणाम काय अन कसे असू शकतात, यासाठी गणेशपुरे यांच्या लग्नाची दखल घेणं आवश्यक वाटतं.
सर्वप्रथम आपला एकूण समाज, त्याचे आकलन\आकर्षण या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यातच पॉप्युलर लोकांमध्ये सामाजिक-शैक्षणिक आकलनाच्या मर्यांदामुळे संकुचित भक्तीभाव डोकावलेला असतो. म्हणून आपल्याला अशा तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींचं दुर्दैवी व्यक्तीस्तोम लक्षात घ्यावं लागतं. त्यांच्या आकर्षणाचे संदर्भ अन त्याचे परिणाम समजून घ्यावे लागतात.
आपला एकुणच समाज इथल्या पारंपरिक मनुवादी व्यवस्थेनं संकुचित मानसिकतेत ठेवण्याचं काम एका विशिष्ट हेतूनं केलेलं आहे. ते करताना त्यामागे मानवी जीवसृष्टीच्या इतिहासक्रमापासून सोबतीला असलेल्या भीतीच्या भांडवलातून अर्थप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशानं ज्योतिषशास्त्राचा व्यूह रचला गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक वाटावं असं दर्शन घडवलेलं असतं. या सगळ्याचे परीणाम भोगत हा समज जगतो आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4259
.............................................................................................................................................
ज्योतिषशास्त्र नावाला शास्त्र आहे. ते खरं मुळात एक दुकान आहे. अशा दुकानावर प्रसिद्ध व्यक्तीनं खरेदी केली की, त्याची आपसूक जाहिरात होणार!
गणेशपुरेंच्या या लग्नामुळे त्याच जोडीदाराशी दुसरं लग्न लावण्याची फॅशन बोकाळायला वेळ लागणार नाही. गणेशपुरेंनी कितीही स्वतःच्या भावनासाठी हे केलं असलं तरी दुष्परिणाम आगामी काळात दिसतील. कारण आपल्या समाजाला आपण कशाच्या मागे जाण्यात दीर्घकालीन फायदा आहे, हेच अजून कळलेलं नाही. विनोदी अभिनय अन लोकांना हसवण्याचं काम गणेशपुरे करत असले तर त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्राच्या मागे धावण्याचं शास्त्रीय लॉजिक असण्याची शक्यता नाही. आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी विशिष्ट हेतूनं बिंबवलेनं ज्ञान म्हणजे ज्योतिषशास्त्र. आजवर अनेक लग्न या शास्त्राच्या प्रेमातून झाली. त्यातून अगदी पत्रिकेत ३६ पैकी ३६ गुण जुळणाऱ्यांची आयुष्यंदेखील बेचिराख झालेली पाहायला\अनुभवायला मिळतात.
त्याचप्रमाणे दुसर्या बाजूला पत्रिका न पाहता लग्न केलेली जोडपी उत्तम अन आनंदी आयुष्य जगताना पाहायला\अनुभवायला मिळतात. किंवा अगदी ज्यांनी पाहून केलं, पण पत्रिकेत फार कमी गुण जुळत असतानाही त्यांचंही उत्तम आयुष्य चालताना दिसतं. थोडक्यात पत्रिकेत अन ज्योतिषशास्त्राच्या खजिन्यात भरीव असं काही नाही. चालत आलंय म्हणून चाललं आहे. मात्र तरीही मनात भीती निर्माण करण्यात हे शास्त्र यशस्वी झालेलं आहे. ग्रामीण भागात जे लग्न जमवणारे ज्योतिषी असतात, ते पत्रिका हवी तशी जुळवून देतात. ते कसं होतं? आमच्या नातेवाईकांमध्ये\मित्रांमध्ये अनेक मुलांनी देवबाप्प्पाला जास्त पैसे देऊन पत्रिका जुळवल्या. आणि त्यांचंदेखील उत्तम चाललं आहे. कुठेही अडचण नाही.
त्यामुळे गणेशपुरेनी त्यांचं दुसरं लग्न पूर्णपणे खाजगीत पार पाडलं असतं तर बरं झालं असतं. पण तसं झालं नाही. ते न होण्याचं कारण तितकंच स्वाभाविक आहे. गणेशपुरेंसारख्या कलाकारांचा अभिनय कितीही लोभस वाटत असला तरी त्यांचा सार्वजनिक बुद्धांक तितकासा विकसित झालेला नसतो. इतरांचं सोडा, पण अगदी ‘चला, हवा येऊ द्या’च्या बाबतीत पाहिलं तर काय दिसतं? गेल्या तीन-चार वर्षांत सुमार दर्जाच्या साहित्याचं ओंगळवाणं दर्शन घडवत, ही माणसं लोकांचं मनोरंजन करत आहेत. या मनोरंजनानं महाराष्ट्राचं एकुण कलाविश्व अजूनच आक्रसलेलं आहे. कारण विनोदी चाठाळपणाला जोर चढला की, मूलभूत अन दर्जेदार विनोदाला लोक नाकारतात. हे सगळं इतकं सहज घडत जातं की, लोकांच्या लक्षात यायच्या आतच सार्वजनिक गुणवत्तेचा बळी गेलेला असतो.
गणेशपुरेंची ओळख विनोदी कलाकार अशीच आहे. त्यांचा विनोद अधिक प्रमाणात बघणारा समाज सर्वसाधारण आकलनाचाच आहे. त्यात शिक्षण अन सामाजिक जीवनाचं गुंतागुंतीचं आकलन असणाऱ्यांचं प्रमाण कमीच असण्याच्या शक्यता आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली आजवर अनेक भाकडकथा तयार झाल्या. त्यांनी समाजाच्या सर्वसाधारण आकलनाचा बळी घेतलेला आहे. समाज अवतीभोवतीच्या प्रतीकाकडे बघत असतो. टीव्हीच्या वाढत्या प्रभावाच्या जंजाळात टीव्हीवर दिसतं, ते सत्य अन तेच महान असं मानण्याची सवय असण्याचा हा काळ आहे. त्यामुळे गणेशपुरेंचं दुसरं लग्न करणं अन त्याची जाहीर वाच्यता, त्यात त्यानं स्वतः सहभागी होणं, अधिक नुकसान करणारं आहे.
लग्नगाठ ढिली झाली, त्यासाठी पुनश्च लग्न करण्याचा सल्ला देण्याच्या मागे मोठा व्यावसायिक हेतू असण्याची शक्यता अधिक वास्तववादी वाटते. कारण येत्या काळात हा एक नवीन पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भंपक विनोदबाजीनं लोकांच्या मनात घर केलेल्या सेलेब्रिटीसारखं करावंसं वाटणं स्वाभाविक असणार.
यावर असा प्रतिवाद केला जाऊ शकतो की, त्यांनाजे वाटलं त्यांनी ते केलं. ज्याला जे वाटेल त्यानं ते करावं. त्यांच्यामुळे समाजाला अशा गोष्टींचं आकर्षण वाटलं तर ती त्यांची चूक थोडीच आहे? क्षणभर हा प्रतिवाद स्वीकारला तरी प्रसिद्धीस आलेल्या कलाकारांना लोक फॉलो करतात, हे सत्य आहे. म्हणून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी समाजाला चुकीचं वळण लावत असतील तर त्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. ती घेतली गेली नाही तर होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांचे आपण कारक बनतो.
आधुनिक समाज वैज्ञानिक पायावर उभा असतो. ज्योतिषासारख्या तद्दन विज्ञानहीन कुडमुड्या शास्त्राचं बोट पकडत महाराष्ट्राला हसवणार्या या विनोदवीरानं आपल्या कृतीतून फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे!
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 14 May 2018
संपादकांस विनंती : कृपया लेखाचे शीर्षक तरी तपासावे. माझ्या मते फुले, आगरकर, आंबेडकर यांनी विज्ञानावर काहीही विचारमंथन केलेले नाही. त्यांना विज्ञाननिष्ठांच्या परंपरेत बसवायची घाई कशाला? उगीच पाट्याटाकू लेख प्रकाशित करू नयेत. हसे होईल. किशोर रक्ताटे त्यांच्या क्षेत्रात तत्ज्ञ असले तरी विज्ञानातले माहितगार नाहीत, हे या शीर्षकावरून कळतं. जे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला कळू शकतं ते संपादक समितीस कळावं अशी अपेक्षा आहे. आपला नम्र, -गामा पैलवान
chintamani K
Sun , 13 May 2018
काही खराब ज्योतिष्यांचे दाखले देऊन, ज्योतिषशास्त्रावर किशोरजींनी जे काही तारे तोडले आहेत ते पाहून त्यांचीच किव आली. पूर्विच्या काळी साधारण पत्रकारही कशावर लिहायचे असेल तर निदान त्या विषयाचा अभ्यास करत. आजकालचे पत्रकार मात्र वाॅटस्अप विद्यालयातील माहितीवर आपले लेख लिहितात का असा संशय येतो. लेखातील मुद्दे पटले नाहीत. काही खराब/खोट्या ज्योतिषांमुळे, सगळे ज्योतिषशास्त्रच चुकिचे हे कोणते लाॅजिक साहेब ? तुम्ही सांगा की १) जर गावात एखादा माणूस आजारी आहे, व तो त्या गावातील एका ढब्बू, फारश्या निपुण नसलेल्या डाॅक्टरकडे गेला व त्या डाॅक्टरच्या औषधाने मेला, तर तुम्ही काय वैद्यकशास्त्राला शिव्या देणार का ? २) जर शहरात एका मेडिकलची डिग्री नसलेल्या माणसाने दवाखाना काढला, व त्याच्या औषधाने रूग्ण दगावला तर तुम्ही भोंदू डाॅक्टरला दोष देणार कि वैद्यकशास्त्राला ? ३) जर शहरातील नामवंत सर्जनकडे एखादा माणूस छोट्या शस्त्रक्रियेसाठी गेला पण काही कारणाने जर त्याचा त्या शस्त्रक्रियेत मृत्यू झाला तर तुम्ही काय अॅलोपथी थोतांड असे म्हणणार का ? तेव्हा अश्या काॅम्प्लिकेशन होतात हे लोकांना मान्य करावेच लागते ना ? मग फक्त ज्योतिषशास्त्राचा दुःस्वास का ? काही ज्योतिषी भोंदू असू शकतात, तर काही अकुशल असू शकतात व त्यांची भविष्ये चुकू शकतात, पण त्यामुळे पूर्ण ज्योतिषशास्त्र कुडमुडे होत नाही. तसेच चांगल्या जोतिष्यांचिही काही भविष्ये चुकू शकतातच. सर्वौत्तम, प्रसिद्ध डाॅक्टरचेही काही सगळे पेशंट ठणठणीत बरे होत नाहीत हो. जरा सरकारी रूग्णालयात महिन्याला किती रूग्ण दगावतात याचा डेटा चेक करा. तुम्ही म्हणता कि ३६ गुण जमलेल्यांचेही आयुष्य बेचिराख झालेली पाहिली आहेत. यावर माझा प्रश्न हा आहे कि तुम्ही किती अभ्यास केला आहे ? किती डेटा चेक केला आहे (किती केसेसचा स्टडी केला आहे ?). पत्रिका पाहून लग्न केलेले व ते टिकलेले तर लाखो असतील हो, त्याबद्दल तुमचे मौन का ? तुमच्या लेखाकडे दुर्लक्षच करणार होतो पण शेवटी तुम्ही ज्योतिषशास्त्रावर मनुवादाचा अत्यंत 'बालिष' व हास्यास्पद आरोप केला. म्हणून हि प्रतिक्रिया दिली. अहो साहेब, भविष्याबद्दल ओढ असणे व ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे हा मनुष्य प्राण्याचा स्वभावच आहे. मग त्यासाठी पूर्वीच्या लोकांनी ग्रह तारे, ह्स्तरेषा यांचा वापर करायला सुरूवात केली. याचा जातीशी आणि मनुवादाशी काही संबंध नाही. ज्योतिष हे पूर्विपासून जगात सर्वत्र पाहिले जाते. युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया वगैरे सर्वत्र. युरोपात तर gypsy लोक प्रसिद्ध आहेत त्यांच्या psychic abilities साठी. म्हणजे युरोपीयन, आफ्रिकन लोक सगळे मनुवादीच समजायचे का ? आजकाल जे जे जुने, भारतीय परंपरेत तयार झालेल आहे त्याला नाव ठेवण्याचा किळसवाणा प्रकार सुरू झाला आहे. कोणत्याही संस्कृतींत किंवा कोणत्याही शास्त्रात १००% बरोबर किंवा १००% चूक काही नसते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रालाही थोतांड म्हणणे चूक वाटते.अर्थात हे कळण्यासाठी लोकांनी प्रथम डोळ्यावरून सवर्ण द्वेषाचा काळा चष्मा काढायला पाहिजे. कारण तरच जगाकडे, शास्त्राकडे किंवा देशाकडे निष्पक्षपणे पाहता येईल.
ramesh vaidambe
Sat , 12 May 2018
ज्योतिषशास्त्रावरील टीका करणे हा वेगळा भाग आहे. विनाकारण गणेशपुरे यांना लक्ष्यस्थानी आणून लेखकमहोदयांनी स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवले आहे. शिवाय शीर्षकामध्ये समाज-सुधारकांची नावे टाकून अवाजवी अभिनिवेश आणून हास्यास्पदरित्या तर्क ताणून स्वतःचे तोकडे आकलन दाखवले आहे. गणेशपुरे यांनी केले त्यामध्ये दोष जरूर दाखवावेत, परंतु ठोस पुरावा नसताना, किंवा तेवढा पुरावा शोधण्याचे किमान कष्टही न घेता वैचारिक मुखवट्याखाली अडाणी दुगण्या झाडणे हेच समाजासाठी जास्त घातक आहे. समाजाच्या आकलनाचे मोजमाप करण्याआधी स्वतःचे वाचन, आकलन, समजूत यांच्याबाबत थोड्या नम्रतेने शोधाशोध केली, तर कदाचित लेखन सुधारेल. एवढ्या अभिनिवेशाने, पोकळ पवित्रा घेऊन लिहिणारी व्यक्ती अशा साध्या वाचकांच्या प्रतिक्रियांनी सुधारेल, ही अपेक्षाही भाबडीच. असो.
Mahendra Teredesai
Sat , 12 May 2018
जो समाज उथळ कलाकारांच्या नादी लागून त्यांचं अनुकरण करतो त्याचा फुले/आंबेडकर/आगरकर यांच्या समाजाशी काही संबंध नसतो.
Prakash Ghatpande
Sat , 12 May 2018
महापुरुषांना वेठीस धरण्याचे प्रकार इथे लेखात दिसतो. गणेशपुरेंना ठरवु द्यात त्यांनी काय करायच? कलाकार म्हणजे विवेकी बुद्धीवंत विचारवंत असले पाहिजेत असे थोडे आहे? तुमची मत त्यांच्यावर अप्रत्यक्शपणे लादण्याचा प्रयत्न लेखात सरळ सरळ दिसतो. अशामुळेच पुरोगामी झोडपले जातात. श्रद्धा व अंधश्रद्धा यात तसा काही फरक नाही. घटनेने त्यांना श्रद्धा बाळगण्याचा अधिकार म्हणजेच अंधश्रद्धा बाळगण्याचाही अधिकार दिला आहे.