अजूनकाही
१. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगरपालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’वर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. त्यामध्ये उमेदवाराने त्याच्या देवाची, कुलदेवतेची, आई-वडिलांची, जोडीदार व मुलांची शपथ घेऊन भष्ट्राचार करणार नाही, असे लिहून दिले आहे.
नोटाबंदीनंतर असं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावं लागतं, हेच मुळात आश्चर्य आहे… अहो, एकदा नोटाबंदीची प्रक्रिया पूर्ण झाली की, देशातला आहे तो काळा पैसा संपणार आहे, नवा काळा पैसा कमावण्याची कोणाची हिंमत कशी होणार? तो ठेवणार कसा? सुपरमॅनवर तुमचा विश्वास कसा नाही? आणि एक लक्षात घ्या, ज्या देशात असं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावं लागतं, जिथे शपथसुद्धा लोक खोटी घेतील म्हणून तिच्यातही देव, कुलदेवता, बायको, मुलं असे ऑप्शन ठेवायला लागतात, त्या देशात असल्या प्रतिज्ञापत्रांना स्टंटबाजीपलीकडे काही अर्थ आहे का?
...............
२. नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर शरसंधान केले असून ‘टोकाची भूमिका घेण्यास मी मागेपुढे बघणार नाही’ असा इशारा दिला आहे.
चला, आतापर्यंत एवढा वेळ गेला, तो मागेपुढे पाहण्यात गेला म्हणायचं तर. मात्र, आता तुम्ही तो दवडणार नाही आणि तात्काळ निर्णय घ्याल, अशी कोणाची समजूत झाली असेल, तर ती मात्र व्यर्थच असेल. कारण, आता तुम्ही डावीउजवीकडे पाहायला सुरुवात कराल आणि ते साधारण पुढची अडीच वर्षं नक्कीच चालेल, हो ना?
...............
३. घाईगडबडीत प्रिंटिंग मिस्टेक झालेल्या ५००च्या नोटा चलनात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ; मात्र त्या निर्धास्तपणे व्यवहारात वापराव्यात असा रिझर्व्ह बँकेचा सल्ला
आता कोणी डुप्लिकेट नोटा बनवत असेल, तर त्याने थोडं सेटिंग हलवून ठेवावं… हललेली आहे म्हटल्यावर हमखास ओरिजिनल मानून खपेल… वाहवा! नोटांच्या छपाईतल्या त्रुटींचं वाढतं प्रमाण लक्षात घेतला लवकरच गव्हर्नर ऊर्जित पटेल एकेका कोऱ्याच छापून आलेल्या नोटेवर मी पाचशे, दोन हजार रुपये देण्याचं वचन देतो म्हणून एका खिडकीत सही करायला बसलेले आढळतील बहुतेक.
...............
४. सहा महिने ते वर्षभरात ४२ शहरांमध्ये घरांच्या किंमती ३० टक्के घसरणार : एका आघाडीच्या वृत्तसमूहात छापून आलेले एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष.
या वृत्तसमूहात रोजच एक सर्वेक्षण छापून येतं. त्यात कोणीही त्या क्षेत्रात नाव न ऐकलेली एखादी संस्था सर्वेक्षणाचे सरकारधार्जिणे निष्कर्ष जाहीर करते आणि ते इमाने इतबारे ठळक टायपात छापले जातात. सरकारने एकच कॉमन अॅप सगळ्यांना दिलंय का झटपट सर्वेक्षणासाठी?
...............
५. आठ नोव्हेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की १० ते २४ नोव्हेंबर या काळात चार हजार रुपयांपर्यंत जुन्या पाचशे-हजारच्या नोटा बदलता येतील, २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात ही मर्यादा वाढवण्यात येईल… प्रत्यक्षात २४ नोव्हेंबरला नोटाबदलीच थांबवण्यात आली.
अख्ख्या देशाला दिलेला शब्द टप्प्याटप्प्याने फिरवायला ५६ इंचाची मर्दानी छाती लागते, तिच्यात वाघाचं काळीज लागतं, राव. सोप्पं काम आहे का? घरदार सोडून ते देशासाठी बाहेर पडले आहेत, ते थापा मारत असले म्हणून काय झालं, देशहितासाठी किरकोळ थापाही सहन करू शकत नाहीत का तुम्ही?
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment