‘नॅशलन जिओग्राफिक’नं १३० वर्षं आफ्रिकन-आशियायींना वस्तूसंग्रहालयातील कलाकृतींसारखं पेश केलं आणि एप्रिल २०१८मध्ये माफी मागितली!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अलका गाडगीळ
  • ‘नॅशलन जिओग्राफिक’च्या एप्रिल २०१८च्या अंकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 09 May 2018
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नॅशलन जिओग्राफिक National Geographic सुझन गोल्डबर्ग Susan Goldberg

‘नॅशलन जिओग्राफिक’ या मासिकाच्या आठवणी बालपणासोबत जोडल्या गेल्या आहेत. ग्रंथलायातून इंग्रजी नियतकालिकं घरी यायची. ‘इलस्ट्रेटेड वीकली’ आणि ‘नॅशलन जिओग्राफिक’. नजर साहजिक ‘नॅशलन जिओग्राफिक’कडेच वळायची. त्याच्या मुखपृष्ठावरच्या पिवळ्या चौकटीच्या आत एखाद्या अफगाणी, आफ्रिकी मुलाचा किंवा माणसाचा चकचकीत रंगीत फोटो, कधी दिमाखदार प्राणी, शिकार करताना... कधी थेट कॅमेऱ्यात पाहताना. आतल्या पानांवर ‘चित्रविचित्र’ आदिवासींचे फोटो, घनदाट वनं, झरे, नद्या, वाळवंटं, बर्फाळ प्रदेश, सावजावर टपून बसलेले प्राणी, दोन प्राण्यांमधल्या चित्तथरारक झुंजी आणि आणि आफ्रिकन जमातीतल्या माणसांची छायाचित्रं असायची. कधी वादळाची, पावसाची, रेल्वेगाड्यांची, शहरातल्या बजबजपुरीची, जत्रा आणि उत्सवाची सुद्धा. त्यातला मजकूर अजिबात कळत नसे, पण या श्रीमंती मासिकाच्या चित्रांवरून नजर हटायची नाही.

आशियाई, आफ्रिकी, आदिवासी आणि मुस्लिम परकी, मागास, विचित्र, सुरस आणि चमत्कारिक असल्याचं या मासिकांतून प्रतीत व्हायचं. ‘नॅशलन जिओग्राफिक’नं आफ्रिकन आणि आशियाई माणसांना वस्तूसंग्रहालयातील कलाकृतींसारखं पेश केलं. या माणसांच्या छायाचित्राखालील मथळ्यात त्यांची नावं नसायची, जमातीचं नाव नमूद केलेलं असायचं. छायाचित्रकाराचं नाव मात्र ठळक अक्षरांत छापलं जायचं. यातल्या छायाचित्रणानं आशियाई आणि आफ्रिकी लोकांची ओळख मिटवून टाकली.

ही मांडणी सर्वसामान्य पाश्चात्य वाचकांना अपील होत राहिली. ‘नॅशलन जिओग्राफिक’चे बहुसंख्य मूळ वाचक अमेरिकी आणि युरपिय. त्याच्या एक शतकापेक्षा अधिक काळाच्या छायाचित्रणामुळे सावळ्या आणि काळ्या वर्णाचे लोक मागास आणि अप्रगत असल्याचा भ्रम निर्माण झाला. खरं तर हा भ्रम वसाहतीच्या काळापासून प्रचलित होता. यासाठी छाया-पत्रकारिता, पत्रकारिता, मानववंशसास्त्र, अनुवंशिकताशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजकारणाच्या मांडणीचा आधार मिळत गेला. या भ्रमाचा शिरकाव जागतिक संपत्तीचं वाटप, विज्ञान आणि कलाक्षेत्रांतही झाला.

कला, शास्त्रं आणि विद्वत्तेच्या नावाखाली धर्म-वंशश्रेष्ठत्वाचं राजकारण खेळलं जात होतं. एक काळ असाही होता, ज्यात आपलं मागासपण आपणंच मान्य केलं होतं. पण अशी मांडणी आता सहजपणे विद्वत्ता म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही. कला, साहित्य, पत्रकारिता, इतिहास, इतिहासलेखन, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्रांच्या स्कॉलरशिपमध्ये सतत भर पडत असते. त्यामुळे वंशश्रेष्ठत्वाचे भ्रम टिकू शकत नाहीत. या चुकांची जाणीव ‘नॅशलन जिओग्राफिक’च्या संपादक मंडळाला झालीय.

या मासिकानं १९२८ साली ऑस्ट्रेलियन मूलनिवासी समूहांसबंधी मुखपृष्ठ कथा केली होती. त्याचा मथळा होता, ‘दक्षिण ऑस्ट्रेलियन काळतोंड्या रानट्यांचा बुध्यांकं मानवांच्या बुध्यांकापेक्षा कितीतरी पटीनं कमी आहे’.

या मासिकाचा १३० वर्षांचा इतिहास अ-गौरवर्णीयांचं अगोचर चित्रण करण्याचा इतिहास आहे. यांच्या संग्रहात गौरवर्णीयांकडे आ वासून पाहणाऱ्या सावळ्या/काळ्या ‘रानटी’ माणसांच्या फोटोंचा खच पडलेला असेल. पॅसिफिक आयलंडवरील छाती न झाकणाऱ्या महिलांची छायाचित्रंही यात असतील.  

‘‘परप्रांतातील परिसर आणि अर्धवस्त्रांकित, ‘रानटी’ मानलेली नेटीव माणसं युरोपीय वंशाच्या आमच्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या संशोधनासाठी नेहमी ‘उपलब्ध’ असायची. आम्ही छायांकनं-वृत्तांकनं केली. पूर्वी कधीतरी ‘बायबल’ घेऊन प्रचार केला गेला होता, दुफळी माजवली गेली होती, शस्त्रास्त्रं विकली गेली होती. आमच्याकडूनही वंशवादी वृत्तांकन आणि छायांकन केलं गेलं. त्याबद्दल आम्ही माफी मागतो’’, असा माफीनामा ‘नॅशलन जिओग्राफिक’च्या संपादिका सुझन गोल्डबर्ग यांनी आपल्या एप्रिल २०१८च्या अंकात छापला आहे.

धर्मांतर करणाऱ्या धर्मगुरूंना आशिया आणि आफ्रिकेतील दुर्गम भागातील तथाकथित ‘आदिम’ टोळ्यांची भुरळ पडली. तशीच ती मानववंशशास्त्रज्ञांना आणि ‘नॅशलन जिओग्राफिक’सारख्या मासिकांनाही पडली. पण इतर बहुसंख्य काळी-सावळी माणसं धर्मातरं आणि वसाहतवादामुळे शहरवासी झाली. शहरात कीडा-मुंग्यांसारखी वाढणारी ही माणसं ‘मागासपणा’चे नमुने बनली. गर्दी, बकाली, दंगली, यादवी, बालमृत्यू आणि भूकबळीची चित्रं ‘नॅशलन जिओग्राफिक’ला खुणावत राहिली. एक काळ असा होता जेव्हा आपल्या छायाचित्रकारांना ‘नॅशलन जिओग्राफिक’ ‘शोधक प्रवासी’ म्हणायचं.

आशिया आणि आफ्रिकेतल्या विपन्नावस्थेचं, सोशीकपणचं चित्रण हटकून छापलं जायचं. पुढलं छायाचित्र भारतातल्या पुराचं आहे. एक प्रकारे ते भारतातल्या दुरव्यवस्थेचं, विपन्नावस्थेचंही चित्र आहे. ‘नॅशलन जिओग्राफिक’चे छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्करी यांनी हे छायाचित्र काढलं. ते मुखपृष्ठावर छापलं गेलं. भारताचं ‘स्लमडॉग मिलियनेर’शी जुळणारं चित्रण पाश्चात्य दर्शकाच्या पूर्वग्रहांना बळकटी देण्याचं काम करतात. ‘स्लमडॉग मिलियनर’ चित्रपटानंही हेच काम केलं. 

वसाहतवादी, पाश्चात्य एकाग्रदृष्टीचं प्रत्यंतर ‘नॅशलन जिओग्राफिक’ पाहताना येतं, तसं ‘स्लमडॉग मिलियनर’ पाहतानाही येतं. विकसनशील देशातील सर्वार्थानं सामान्य तरुणाची ही कथा. गरिबी, घाण, दारिद्रय, धार्मिक उन्माद ही मानवी घटितं म्हणून या सिनेमात दिसत नाहीत. ती पूर्वेकडील घटितं म्हणूनच सिनेमात दिसत राहतात. त्यामुळे पाश्चात्य प्रेक्षकांच्या मनावर नैतिक ताण येत नाही आणि दूरस्थ दृष्टीनं ते चित्रपट पाहू शकतात. चित्रपटातील चलाख मांडणी\हाताळणीमुळे भारतातील गरिबीसहित अनेक प्रश्न वसाहतकालीन वारशांमुळेही उत्पन्न झालेले आहेत, या वास्तवावर पांघरूण घातलं जातं. पौर्वात्य अनागोंदी आणि भ्रष्टाचारामुळे भारताचा ऱ्हास झाला आहे, असं सूचन या चित्रपटात होते.

‘नॅशलन जिओग्राफिक’चे छायाचित्रकारच ‘विलक्षण’ जमातींचे छायांकन करत होते असं नाही. अमेरिकेतील इतर काही छायाचित्रकारही आफ्रिकेतील ‘अनाचारा’चं चित्रण करत होती.

पुढील चित्र पाहा

उपासमारीमुळे मरणासन्न अवस्थेतील बालिका...मृत्युचा वास आल्यामुळे तिच्यावर टपून बसलेलं गिधाड. आणि हे छायाचित्र मिळवू शकणारा छायाचित्रकार केव्हीन कार्टर.

१९९३ साली सुदानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. देशांतर्गत यादवी सुरू होती. उपासमार आणि रोगराईमुळे माणसं मृत्युमुखी पडत होती. गिधाडं इकडेतिकडे पडलेल्या प्रेतांचा समाचार घेत होती. सुदानच्या क्षिताजावर गिधाडांचं साम्राज्य होतं.

आफ्रिकेतील हताशेचं जणू रूपक बनून गेलेला, हा फोटो ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये छापून आला. हजारो लोकांनी फोनवरून विचारणा केली. ती मुलगी वाचली का? ती जिवंत आहे का? फोटो पाहून ती लवकरच मरणार आणि तिचा देह गिधाडाच्या भक्ष्यस्थानी पडणार असं भासत होतं.

सुदानमधील भीषण दुष्काळाचं वार्तांकन आणि चित्रांकन करणाऱ्या प्रत्रकार आणि छायाचित्रकारांनी एका नियमाचं पालन केलं होतं- दुष्काळग्रस्तांना स्पर्श करायचा नाही. रोगाची लागण झाली तर? उपासमार, मृत्यु, यादवी या सा-या घटना पश्चिमी देशांतील पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना पर्वणी सारख्या वाटत होत्या. गोरे पत्रकार गावागावांत जमाती जमातींमधल्या हिंसाचाराचे व्हिडिओ शूटिंग करत. 

हिंसाचार करणाऱ्या, रोगाला बळी पडलेल्या, मरू घातलेल्या आणि अन्नासाठी भटकणाऱ्या माणसांची छायाचित्रं आणि व्हिडिओ पाश्चात्य प्रेक्षकांच्या मनांत युरोपीय श्रेष्ठत्व आणि अधिकारांची जाणीव निर्माण करतात.

अर्थात केव्हिन कार्टरच्या छायाचित्रावर टीका झालीच नाही असं म्हणता येणार नाही. ‘मरू घातलेल्या मुलीचं छायाचित्र घेण्यासाठी आपली लेन्स अ‍ॅडजस्ट करणारा हा फोटोग्राफर भक्षकच, तिथं असणारं दुसरं गिधाड’, अशी जहरी टीका ‘सेंट पीटर्सबर्ग टाइम्स’नं केली आणि इतर अनेक लेखक-विचावंतांनीही आपलं परखड मत व्यक्त केलं. कार्टर यांचं मन अपराधी भावनेनं होरपळून गेलं आणि त्यांनी आत्महत्या केली.

‘‘नॅशलन जिओग्राफिक’चं गारूड अनेकांवर अनेक वर्षं पडत राहिलं. त्याचा खप वाढत गेला. पण गेली काही वर्षं मासिकातील माणसांच्या आणि निसर्गाच्या चित्रणाबददल सतत टीका होतेय. त्याआधी त्यात काही वावगं आहे ही जाणीव होती. पण ‘नॅशलन जिओग्राफिक’नं या चर्चांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अमेरिकास्थित टुल्सा विद्यापीठातील प्राध्यापक जॉन कॉवर्ड यांनी ‘रीडिंग नॅशनल जियोग्राफिक’ या पुस्तकांत मासिकाच्या वंशवादाचे असंख्य दाखले दिले होते. हे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झालं. त्या काळात ‘नॅशलन जिओग्राफिक’नं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिका खंडातील मूलवासी रेड इंडियन जमातींसंबंधी लोकप्रिय माध्यमांतून कसं आणि किती वेळा वार्तांकन आणि चित्रांकन होतं याचा शोधही जॉन कॉवर्ड यांनी घेतला होता.

‘लोकप्रिय माध्यमांतून मूलनिवासींच्या प्रतिमा नेहमी दिसतात, पण त्यांच्या रोजच्या जगण्याकडे मात्र कोणीही पाहात नाही’, असा निष्कर्ष कॉवर्ड यांनी काढला होता. अमेरिकेतील काही पत्रकार मात्र विविध वंशांच्या घडामोडींचा अभ्यास बारकाईनं अभ्यास करतात.

या मासिकाच्या वंशवादी आशयाबद्दल सप्रमाण दाखले देउन फारसा फरक पडला नाही. १९९३ पासून ‘नॅशलन जिओग्राफिक’च्या असहिष्णूतेबद्दल चर्चा होऊनही माफी मागण्यासाठी २०१८  साल उजाडावं लागलं. ‘भिन्न वंशाच्या समूहांचं वार्तांकन आम्ही वाढवू. लटिनो समूहाचं कव्हरेजही आम्ही वाढवू. दक्षिण आशियाई लोकांच्या वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञानातील योगदानाची दखल घेऊ’ असं मोघम विधान मासिकाच्या सांस्कृतिक संपादिका डेब्रा अ‍ॅडम्सनी केलं आहे.

“१८८८ साली सुरू झालेल्या या मासिकाची मी दहावी संपादक आहे. संपादकपदी बसणारी पहिली महिला आणि पहिली ज्युईश व्यक्ती. ज्यू धर्मीय आणि स्त्रियांनाही मोठ्या भेदभावाला तोंड द्यावं लागलं होतं.या मासिकाच्या लज्जास्पद भूतकाळाबद्दल बोलताना क्लेश होतोय. आमच्या भेदभाव आणि वंशभेद करणाऱ्या चित्रांनी मासिकाच्या मूळ वाचकाला गुंतवून ठेवलं. पण इतर अनेक लोकसमूहांवर अन्याय होत होता. गेली अनेक दशकं आमचं वार्तांकन वंशवादी होतं. हा भूतकाळ आम्हाला मागे टाकायचा आहे. म्हणूनच आम्ही कबूली देतोय. युनायटेड स्टेट्स आणि इतरत्रही आमचं वार्तांकन/चित्रांकन कसं होतं याचा शोध घेण्याचं काम आम्ही काही नामांकित इतिहासकारांना दिलं होतं. जे सापडलं ते लज्जास्पद होतं”, इती सुझन गोल्डबर्ग.   

अत्यंत श्रीमंती निर्मितीमूल्य असणाऱ्या या मासिकाच्या विचारसरणीत मात्र आत्यंतिक दारिद्र्य दिसून येत होतं. आपल्या वंशवादाची जाणीव ‘नॅशलन जिओग्राफिक’च्या संपादिकेला झाली हे चांगलं. पण या वंशवादानं गेली अनेक शतकं धुमाकूळ घातला आहे. या काळात भरून न येणारं नुकसान झालं त्याचं परिमार्जन कसं होणार?

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......