सत्तेत नसूनही लोक आपल्याला ‘सत्ताधारी जमात’ का समजतात, हे कळलं तर जयंत पाटलांना राष्ट्रवादी पुढे घेऊन जाता येऊ शकेल!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • जयंत पाटील
  • Wed , 09 May 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शरद पवार Sharad Patil जयंत पाटील Jayant Patil राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress Party NCP

इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचं सर्व स्तरात स्वागत होत आहे. जयंत पाटील हे मनमिळावू स्वभावाचे नेते असल्याने त्यांना शत्रू कमी आहेत. मनोहर उर्फ संभाजी भिडे हेही त्यांची मर्जी राखून असतात आणि जयंत पाटील यांनीही भिडेंच्या ‘मन’मोहक प्रयोगांना कधी विरोध केला नाही. यात सर्वकाही आले. सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण-अजित पवार यांचं पटत नसे. पृथ्वीराज बाबांची जयंत पाटील यांच्यावर मात्र मर्जी बहाल होती. आघाडीची सत्ता बुडाली आणि महायुतीचं राज्य आलं, तेव्हा नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जयंत पाटलांची मैत्री वाढली. सांगली जिल्ह्यात पतंगराव कदमांचं वर्चस्व होतं. जयंत पाटलांनी पतंगरावांचा कार्यकर्ता होणं नाकारलं तरी दोघांत वितुष्ट आलं नाही. जयंत पाटलांना त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांचा वारसा लाभला. बापू घडले काँग्रेस संस्कृतीत आणि रमले समाजवाद्यांच्या जनता पक्षात. पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. एस. एम. जोशी, मधु दंडवते, बापू काळदाते, मृणालताई गोरे अशा नेत्यांच्या सहवासात राजाराम बापूंचे नेतृत्व फुलले. बापूंना काँग्रेसवाले काँग्रेस पक्षात बोलावत. तेव्हा त्यांना बापू सांगत, “मला काँग्रेसनं मंत्रीपदं दिलीत, पण जनता पक्षानं प्रेम करणारे कार्यकर्ते दिले.” लोकसंग्रह हा सत्तेपेक्षा प्रभावी असतो, असा विचार मानणाऱ्यांपैकी बापू एक नेते होते. म्हणूनच ‘सत्ताग्रही’ न होता ‘सत्याग्रही’ होण्याचं व्रत त्यांनी आयुष्यभर घेतलं होतं. त्या परंपरेत जयंत पाटील वाढलेत.

अभ्यासू मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेता म्हणून जयंत पाटील यांची प्रतिमा उजळ आहे. अर्थकारण, सहकार यांची समज दांडगी आहे. प्रवाही वक्ते आहेत. साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्थांचं जाळं, बँक अशा संस्थांनी इस्लामपूर मतदार संघ त्यांनी बांधलेला आहे. कार्यकर्त्यांचा गोतावळा आणि संस्थांचं जाळं उभारून या परिसराचा विकास त्यांनी केला. या जोरावरच ते गेली ३० वर्षं आमदार म्हणून निवडून येतात.

राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून कारभार हातात घेताना त्यांचं वय ५६ आहे. हे वय राजकारणात तारुण्य मानलं जातं. आजवरचा अनुभव आणि वयाबरोबर आलेला परिपक्वपणा या जोरावर जयंत पाटील पुढची राजकीय वाटचाल करतीलच. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलीय. ती पार पडताना त्यांची पुढची वाट काही साधी सोपी नाही. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्याचं उद्धिष्ट जयंत पाटलांपुढे असणं स्वाभाविक आहे.

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414

............................................................................................................................................

राज्यात चार प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सत्तास्पर्धा आहे. चार प्रमुख पक्षांपैकी तीन पक्षांचे राज्य प्रमुख ‘मराठा’ समाजातले आहेत. सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत. ते मराठवाड्यातले ‘मराठा’ आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाणही मराठवाड्यातले ‘मराठा’ आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातले ‘मराठा’ आहेत. शिवसेना हा एका घराण्याचं वर्चस्व असणारा पक्ष असल्यानं त्याचा अध्यक्ष कायम ‘ठाकरे’ घराण्यातली व्यक्ती राहणार हे गृहीत आहे.

भाजप-सेना सत्तेत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षात आहेत. आता या चारही पक्षांची अडचण अशी की त्यांची पहिली स्पर्धा मित्र पक्षांबरोबर असते. भाजपचा सेना हा नैसर्गिक मित्र आहे. विचारमित्र आहे. पण भाजपला सेनेला लोळवल्याशिवाय जिंकता येत नाही. राज्यात सत्तेवर राहता येत नाही. एक नंबरचा पक्ष होता येत नाही. सेनेलाही भाजपला धूळ चारल्याशिवाय ना मुंबई महापालिकेत सत्तेत येता येतं, ना राज्यात नंबर एकच पक्ष म्हणून वावरता येतं. त्यामुळे या पक्षांना पहिलं भांडण एकमेकांशी करावं लागतं, हे आपण रोज बघतोय. त्यामुळे भाजप-सेनेच्या उसण्या भांडणाला लोक वैतागलेले दिसतात.

काँग्रेस-राष्ट्रवादीचंही असंच आहे. या दोन्ही पक्षांना आपला मित्रपक्ष चीतपट केल्याशिवाय नंबर एकचा पक्ष होता येत नाही. म्हणून सत्तेत असताना हे दोन्ही पक्ष गल्लीतल्या लहान मुलांच्या कलागतीसारखी भांडणं करताना दिसले होते. त्याला वैतागून लोकांनी भाजपला मतं दिली, हा ताजा इतिहास आहे. आता मजबुरी अशी की, हे सर्व असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला येत्या लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकांत आघाडी करावी लागणार आहे. या राजकीय वास्तवात जयंत पाटील यांना वाटचाल करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘मराठा’ जातीचा पक्ष असा शिक्का आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे यांना पुढे आणून तो पुसण्याचा प्रयत्न शरद पवारांनी करून पाहिला. पण वंजारी समाज धनंजय यांच्या मागे एकमुखी उभा राहात नाही हे दिसलंय. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना प्रस्थापीत करून पवारांनी ओबीसी मतदारांना ओढण्याचा डाव खेळून पहिला. पण भुजबळांवरचे आरोप, त्यांचा तुरुंगवास, लांबलेल्या तुरुंगवासानं उभे राहिलेले प्रश्न, डोकावलेल्या शंका यामुळे तो डावही उधळला गेल्यात जमा आहे. जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यात वेगवेगळे मुद्दे उभे करत असतात. पण त्याला फारसा मोठा प्रतिसाद लोकांमधून मिळताना दिसत नाही. नवी मुंबई परिसरात गणेश नाईक यांच्या रूपानं राष्ट्रवादीला आगरी समाज जोडणारा नेता मिळालेला आहे. पण खुद्द नाईकांच्या राजकारणाच्या मर्यादा आणि शहरी पट्ट्यात राष्ट्रवादीची भाजपपुढे होणारी पीछेहाट, यामुळे या भागात राष्ट्रवादीला बळ मिळत नाही.

आदिवासी, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक या घटकांत राष्ट्रवादी अजून खऱ्या अर्थानं रुजायचीय. ग्रामीण महाराष्ट्रात धनगर समाजासारख्या मोठ्या जातसमूहाचा राष्ट्रवादीवर रोष आहे. तो सत्तेत संख्येच्या प्रमाणात भागीदारी न दिल्यानं उभा राहिलाय. आरक्षणाच्या प्रश्नानं त्या रोषाला तोंड फुटलंय.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस गेली चार वर्षं विरोधी पक्षात आहेत. पण या दोन्ही पक्षांचा चेहरा सत्ताधारी वर्गाचा बनलाय. ग्रामीण भागात लोक त्यांनाच सत्ताधारी समजतात. यांचे कारखाने, यांच्या शिक्षण संस्था, यांच्या पंचायत समित्या, यांच्या जिल्हा परिषदा. यांची मुलंबाळं पुढारी आणि लोकांचे प्रश्न जैसे थे. हे दोन्ही पक्ष स्वतःची सत्ताधारी जमात ही प्रतिमा काही केल्या पुसून टाकू शकले नाहीत, सत्ता एवढी यांना चिकटलेली आहे.

आपण विरोधी पक्षात असूनही लोक आपल्याला सत्ताधारी जमात का समजतात, हे जयंत पाटलांना कळलं तर त्यांना राष्ट्रवादी पुढे घेऊन जाता येऊ शकेल. वाटेवरची फुलं कोणती, काटे कोणते हे उमगेल. नेत्यांची मुलंबाळं गोळा करून सत्तेची गणितं बांधायचे दिवस आता गेले. ज्यांच्या समाजात, गावात, कुटुंबात सत्ता अजून पोहोचली नाही, तिथले नवे नेते पुढे जो पक्ष आणेल त्याचीच सत्ता नांदणार आता यापुढच्या काळात.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Wed , 09 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......