अजूनकाही
१२ मे रोजी कर्नाटकची जनता विधानसभेसाठी मतदान करणार आहे. १५ मे रोजी मतदानाचे निकाल हाती येतील. या राज्यात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल, की भाजपला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल, हे त्यादिवशी कळेल. कर्नाटकात सध्या दोन गोष्टींची चर्चा खूप आहे – १) परेशान करणारं ऊन आणि २) उत्सूकता वाढवणारा राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार. उन्हाचा उकाडा वाढतोय आणि प्रचारातही गरमागरमी सुरू आहे.
कर्नाटक ३० जिल्ह्यांत वसलंय. २२४ विधानसभेची क्षेत्रं. त्यापैकी २२३ जागांसाठी हे मतदान होतंय. ४.९७ कोटी मतदार मतदान करू शकतील. या राज्याची लोकसंख्या ६ कोटी ११ लाख. देशातलं हे आठवं मोठं राज्य. पूर्वी या राज्याला ‘म्हैसूर’ हे नाव होतं. १९७३ नंतर ‘कर्नाटक’ हे नामकरण झालं. कन्नड ही राज्याची भाषा. काळी माती हे इथल्या शेतांचं वैशिष्ट्य. सुपीक जमीन. म्हणून हे राज्य शेतीत पुढे आहे. १ नोव्हेंबर १९५६ साली हे राज्य अस्तित्वात आलं. म्हणजे आपल्यापेक्षा चार वर्षं आधी. कर्नाटकला ‘करूनाडू’ म्हणतात. करू म्हणजे उंच आणि नाडू म्हणजे भूमी. काळ्या मातीतली उंच भूमी.
सुपीक काळ्या मातीचा इथल्या जनजीवनावर, संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. काळी शेतं, सावळी माणसं हे कर्नाटकचं वैशिष्ट्य. जशी सुपीक जमीन, तशीच सुपीक संस्कृती. कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत इथं फुललं. सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक कन्नड आहेत. गंगुबाई हनगल, मल्लिकार्जून मन्सूर, भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, सवाई गंधर्व या भूमीनं भारताला दिले. कवी कुवेंपू आणि यू. आर. अनंतमूर्तींसारखे साहित्यिक या भूमीत जन्मले. अनंतमूर्ती शेवटच्या काळात म्हणाले होते, ‘नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन.’ प्रत्यक्षात त्यांनी मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडला नाही. पण ते हे जग मात्र काही महिन्यांनी सोडून गेले. तेव्हा त्यांच्या मृत्यूनं आनंद झालेली, उत्सव साजरा करत नाचणारी माणसंही कन्नडच निघाली. अनंतमूर्तींच्या निधनामुळे कर्नाटकबाहेरची माणसं हळहळली, पण कर्नाटकात मात्र काहींनी आनंदोत्सव साजरा केला.
सध्या कर्नाटकात निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे. अनंतमूर्ती नाहीत. पण त्यांना खटकणारे मोदी जोशानं प्रचार करताहेत. त्यांच्या जोडीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवस प्रचारात रंग भरून गेले. मोदी, शहा, योगी यांचं प्रचारातलं टार्गेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आहे. राहुल गांधींवर ते अधूनमधून टीका करतात जरूर, पण या तिघांना खटकणारा माणूस सिद्धरामय्या हेच आहेत.
मोदी, शहा, योगी यांना राहुल गांधींची टर उडवणं सोपं जाईल एकवेळ, पण सिद्धरामय्या यांना तोंड देणं सोप्पं नाही. ते ४० वर्षं कर्नाटकच्या राजकारणात आहेत. ते मूळचे समाजवादी. जनता पक्षात त्यांची कार्यकर्ता म्हणून जडणघडण झाली. करूबा या धनगर समाजात ते जन्मले. खेड्यात त्यांचं बालपण गेलं. पुढे ते शिकले, वकील झाले. राजकारणात पडले. आमदार झाले. नंतर मंत्री झाले. एच.डी. देवेगौडा यांचा विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी राज्यात दबदबा निर्माण केला. उत्तम प्रशासक, अभ्यासू नेता अशी प्रतिमा निर्माण केली.
देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी यांच्याशी पटेना आणि देवेगौडांना पुत्रप्रेम सुटेना म्हणून सिद्धरामय्या काँग्रेसमध्ये गेले. २०१३मध्ये त्यांनी काँग्रेसला १३३ आमदार निवडून आणून एकहाती बहुमत मिळवून दिलं. काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं. काँग्रेसचे दिल्लीतले नेते पाच वर्षं कुणाला मुख्यमंत्रीपदी राहू देत नाहीत. पण सोनिया-राहुल गांधींनी सिद्धरामय्यांच्या कारभारात ढवळाढवळ केली नाही. पाच वर्षं ते मुख्यमंत्री आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. पक्षांतर्गत असंतोष नाही. स्वच्छ प्रतिमा आणि दलित, मुस्लिम, ओबीसींचा मुख्यमंत्री ही त्यांची पाच वर्षांची प्रतिमा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
अमित शहा यांनी जवळपास महिनाभरापासून कर्नाटक दौरे करून काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. बैठका, सभा, रोड शो केले. त्यांनी सिद्धरामय्या हे ‘हिंदूविरोधी’ आहेत, असा सनसनाटी आरोप करून पाहिला. पण त्याला यश आलं नाही. सिद्धरामय्या स्वत:ला हिंदू म्हणवतात. ते इतके अस्सल हिंदू आहेत की, त्यांना हिंदूविरोधी ठरवता ठरवता मोदी, शहा, योगी हे ‘बेगडी हिंदू’ ठरतील. बेंगलुरूमधील एक स्थानिक पत्रकार जी. नाडगौडा याविषयी सांगत होते, “मोदी, शहा, योगी यांचे आरोप पोरकट, हास्यास्पद आहेत. आंध्र प्रदेशात जाऊन चंद्राबाबू नायडू यांना ‘हिंदूविरोधी’ म्हटलं तर तिथली तेलुगू जनता विश्वास ठेवेल काय? पश्चिम बंगालात जाऊन ममता बॅनर्जी कशा हिंदू धर्म डुबवायला निघाल्या असे आरोप केले तर शेंबडं पोरंग तरी विश्वास ठेवेल काय? ओरिसात जाऊन नवीन पटनायक हे ‘हिंदूविरोधी’ आहेत असा आरोपी उडिया लोक खपवून घेतील काय? तसं सिद्धरामय्या यांना ‘हिंदूविरोधी’ ठरवण्याची खेळी यशस्वी होणार नाही. भाजप, रा.स्व. संघ परिवाराचे बोलके पोपट सर्वत्र एकच एक भाषा बोलतात. मुस्लिमांविरोधी जी घिसीपिटी भाषा ते वापरतात, तीच भाषा इतर भाजपेतर नेत्यांविषयी वापरून ते स्वत:ची विश्वासार्हताच पणाला लावत आहेत. मोदी, शहा, योगी यांना सिद्धरामय्या हा माणूस तर कळला नाहीच, पण कर्नाटक हे राज्यही समजलेलं नाही.”
पत्रकार नाडगौडा म्हणाले ते खरंच आहे. कर्नाटक हे राज्य प्रथम समजून घेतलं पाहिजे. मग तिथल्या लोकांचं राजकीय वर्तन कळू शकेल.
आधुनिक कर्नाटक सहा विभागात विभागलं गेलंय. म्हैसूरचा टिपू सुलतान, हैद्राबादचा निजाम, कोडगू आणि करावली या राजे-रजवाड्यात हा प्रदेश वाटलेला होता. नंतर ब्रिटिश काळात हा प्रदेश मद्रास आणि बॉम्बे विभागात समाविष्ट झाला. पुढे कन्नड भाषिक प्रदेश एक करून कर्नाटक राज्य झालं. सध्या चार प्रशासकीय विभागात (बेंगलुरू, म्हैसूर, बेळगावी आणि कलबुर्गी) कारभार चालतो. पण मूळ सहा विभागात कन्नड जीवनशैली फुलली. त्यातला पहिला भाग आहे – करावली. हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याचा प्रदेश. उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड हे भाग यात येतात. २२४ पैकी १९ आमदार या भागातून निवडून जातात. करावली हा भाग भाजपचा नेहमी बालेकिल्ला राहिलाय. योगी आदित्यनाथ या भागात सभा घेत फिरले. काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांच्या या भागात सतत मारामाऱ्या होतात. खून पडतात. टिपू सुलतानची कर्नाटकात जयंती साजरी करायला या विभागात सर्वांत मोठा विरोध झाला होता.
त्यानंतर दुसरा विभाग येतो जुना म्हैसूर. ६१ आमदार या भागात आहेत. म्हैसूर, कोडगू, मांड्या, हसन, चामराजनगर, तुमाकुरू, चिक्कबल्लापुरा, कोलार आणि बेंगलुरू ग्रामीण हे भाग या विभागात येतात. पूर्वी जनता दल आणि काँग्रेसचं या भागावर वर्चस्व होतं. नंतर भाजपही इथं विस्तारलं. सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी हा सध्याचा मतदारसंघ या विभागातच येतो.
तिसरा विभाग बेंगलुरू शहर हा आहे. २८ आमदार या शहरातून निवडले जातात. कर्नाटकची राजधानी असलेलं बेंगलुरू शहर ‘आयटी सिटी’ म्हणून नावारूपाला आलंय. औद्योगिक परिसर अशी या विभागाची ख्याती आहे. इथला मतदार नागरी प्रश्नांवर मतं देतो. वाहतूक, रोजगार, भ्रष्टाचार, नागरी सुविधा हे प्रश्न इथं महत्त्वाचे आहेत.
इथला शिकलेला मध्यमवर्ग भाजपप्रेमी आहे. पण २०१३ च्या निवडणुकीत येडियुरप्पा आणि रेड्डी बंधूंच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे हा मध्यमवर्ग काँग्रेसकडे वळला. तेव्हा या भागात काँग्रेसला २८ पैकी १३, तर भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या. सध्या या शहरी पट्ट्यात काँग्रेसविरोधी वातावरण दिसतंय. आयटी कंपनीत काम करणारे एस.डी. हेगडे म्हणतात – “बेंगलुरू शहरात वाहतूक, रस्ते हे प्रश्न गंभीर आहेत. पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्यानं नागरिक वैतागलेत. काँग्रेसनं भाग्य योजना, इंदिरा कँटिन अशा योजना राबवून गरिबांना, अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. पण रोजगार, भ्रष्टाचार, नागरी असुविधा या प्रश्नांना कंटाळलेले लोक काँग्रेसविरोधी जातील असं चित्र आहे. शिवाय भाजपनं हिंदू-मुस्लिम तेढ वाढवलीय. त्यामुळे शहरी हिंदू-मुस्लिम द्वेषापायी भाजपकडे आकर्षित होतील असा अंदाज दिसतोय.”
चौथा विभाग बेळगावी, बागलकोटे, हुबळी-धारवाड, विजयपुरा, गडग आणि हवेरी हा आहे. हा लिंगायतबहुल भाग आहे. सिद्धरामय्या यांनी ‘लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या आणि अल्पसंख्याक सवलती द्या’ ही मागणी केंद्र सरकारकडे केलीय. त्याचा परिणाम या भागावर होईल असा अंदाज आहे. पूर्वी हा प्रदेश भाजपचा बालेकिल्ला होता. पण २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसनं या भागातून ३१ आमदार निवडणून आणले होते. जनता दलाचं इथं अस्तित्व अल्प आहे. या वेळी लिंगायत धर्माच्या मुद्द्यावर इथं सिद्धरामय्यांना किती पाठिंबा मिळतो हे दिसणार आहे.
या बेळगाव विभागातून ५० आमदार निवडून जातात. भाजपसाठी या विभागात लिंगायत मुद्दा मोठा पेचाचा आहे. लिंगायत धर्म वेगळा आहे, हे आता लिंगायतांमधील मोठा गट सांगू लागलाय. या गटाचा प्रभाव वाढतोय. पण संघ परिवार, भाजप यांना लिंगायतांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. अमित शहांनी तर लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा द्यायला विरोध केलाय. लिंगायत हे हिंदू आहेत, हे संघ परिवार दडपून सांगतो. गेल्या काही वर्षांत लिंगायत समाजात स्वतंत्र धर्म चळवळीनं जोर धरलाय. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. यापुढे कर्नाटकात हा मुद्दा एका सांस्कृतिक चळवळीचा भाग होणार आहे. त्यातून लिंगायत विरुद्ध संघ परिवार अशा अटीतटीच्या भांडणाला तोंड फुटेल. एम.एस. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या या सांस्कृतिक भांडणाची सुरुवात ठरल्यात. पुढे मोठी लढाई होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुढच्या लढाईची बीजं दिसू शकतील.
पाचवा विभाग हैद्राबाद कर्नाटक असा आहे. बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पला, कलबुर्गी आणि बल्लारी हे भाग त्यात येतात. ४० आमदार या भागातले आहेत. अवैध खाणी या भागात आहेत. एससी, एसटी आणि मुस्लिमबहुल भाग अशी या प्रदेशाची ओळख आहे. लिंगायतांचीही संख्या नजरेत भरणारी आहे. काँग्रेसचे सध्याचे वजनदार नेते मल्लिकाजूर्न खरगे हे इथले मोठे नेते आहेत. २०१३ला या भागातून काँग्रेसला २३ जागा मिळाल्या होत्या. पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा भाग आहे.
१९९९मध्ये सोनिया गांधी विरुद्ध सुषमा स्वराज अशी बल्लारी लोकसंभा मतदार संघातली देशाचं लक्ष वेधून घेणारी लढत या विभागात झाली होती. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आणि आता मोदींच्या जवळपास मंचावर वावरल्यानं चर्चेत आलेले रेड्डी बंधूंचे बेकायदा खाण साम्राज्य या विभागात येतं.
कर्नाटकातला सहा विभाग मध्यम कर्नाटकचा आहे. चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर, शिवमोग्गा आणि देवनगेरे हा आहे. विधानसभेच्या २६ जागा या भागातल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेले येडियुरप्पा यांचं गाव या भागात येतं. जनता दलाचं इथं थोडंफार अस्तित्व आहे. पण भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या लढाईत जनता दलाला इथून किती यश मिळतं हेबघावं लागेल.
कर्नाटकात जातवास्तव कसं आहे? लिंगायत १७ टक्के, वक्कलिग १२ टक्के, मुस्लिम १३ टक्के, एससी १७ टक्के, आदिवासी ७ टक्के, कुरूबा धनगर ८ टक्के. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी जात, धर्मनिहाय या मतदारसंघांवर प्रभाव पडण्याचं प्रमाण कसं आहे? लिंगायत समूह ६२ मतदारसंघांवर प्रभाव टाकू शकतो. वक्कलिंग समूह ४३ मतदारसंघांत जिंकण्याच्या स्थितीत आहे. मुस्लिम समूह २४ मतदारसंघात निर्णायक आहे. दलित-आदिवासी जनसमूह ६२ जागांवर प्रभावी ठरतात. ओबीसी समूह ३३ आमदार निवडून आणू शकतो.
मोदी, शहा, योगी इथं प्रचारात असले तरी या निवडणुकीत येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री करा म्हणून भाजप मतं मागत आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सिद्धरामय्या हे काँग्रेस पक्षासाठी मतं मागत आहेत. सिद्धरामय्या दररोज राज्यात त्यांच्या सरकारनं केलेली कामं सांगतात. पण मोदी-शहा त्यांच्या सरकारची केंद्रातली कामगिरी न सांगता धार्मिक मुद्दे उगाळतात. व्यक्तिगत टीकाटिपणी करतात.
कर्नाटकातली निवडणूक ही कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे, असं सिद्धरामय्या सांगतात. त्यात तथ्य आहे. संघ परिवारानं कर्नाटक ही कट्टरवादाची प्रयोगशाळा बनवलीय. टिपू सुलतानला मध्ये आणून या प्रयोगशाळेला चालना दिली. उलट सिद्धरामय्यांनी लिंगायत धर्म चळवळीला पाठिंबा देऊन या प्रयोगशाळेला पाचर मारलीय. लिंगायत समूहाला कट्टरवादी बनवून संघ परिवार राजकारण खेळू पाहतोय. ते राजकारण यशस्वी होणार की, नाही हे या निवडणुकीत ठरणार आहे. हे राज्य यापुढे दक्षिण भारतातलं संघ परिवाराचं कट्टरवादाची संघर्षभूमी ठरणार आहे, हे संघ परिवाराच्या कर्नाटक निवडणुकीतल्या व्यूहरचना बघितल्या तर स्पष्ट होतं. या राज्यात भाजपची सत्ता आली तर या संघर्षभूमीला आणखी राजकीय बळ मिळेल. इथं हार झाली तर संघ परिवाराच्या कट्टरवादाला अडथळा निर्माण होऊ शकेल.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Tue , 08 May 2018