अजूनकाही
परवा एक बातमी वाचली. ३० एप्रिलला जो महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव झाला, त्याचं प्रक्षेपण कदाचित १५ ऑगस्टनंतर होईल. कारण १ मेच्या मुहूर्तावर मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचा समूह सोनी, आपली मराठी वाहिनी सुरू करणार होता. पण त्यांचा मुहूर्त आता १५ ऑगस्टपर्यंत लांबलाय. या नव्या वाहिनीनं या वर्षासह पुढच्या तीन वर्षाचे राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण हक्क एका करारानं विकत घेतलेत. पुरस्कारांच्या भाऊगर्दीत आणि त्यांच्या सततच्या पुनर्प्रक्षेपणानं कुठल्या वर्षीचा पुरस्कार सोहळा चालू आहे पटकन कळत नाही. अगदी सुरुवातीला जेव्हा हे पुनर्प्रक्षेपण व्हायचं, तेव्हा लोक घाईघाईनं अभिनंदनही करायचे, पुन्हा पुन्हा! असो.
मुदलात हिंदी-मराठीसह हे चित्रपट सोहळे म्हणजे सत्तरच्या दशकात निम्नस्तरीय वस्तीत केल्या जाणाऱ्या रेकॉर्ड डान्सनामक प्रकारचंच नवं उच्चभ्रू पुनरुज्जीवन. चाळी, झोपडपट्ट्या किंवा त्यावेळचा लोअर मिडल, लोअर आणि त्याखालच्या वस्त्यात साधारण १५\१५ च्या फुळकुटानं उभारलेल्या स्टेजवर हा प्रकार चाले. स्टेजला मुख्य पडदा, विंग काही नाही. कपडेपट, रंगभूषा सगळं स्टेजच्या मागे अथवा जवळच्याच कुणाच्या खोलीत. हे नाचणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, जितेंद्र, शम्मी कपूर वगैरे असत. अमिताभचं आगमन झालं, तेव्हा हा प्रकार लुप्त झाला होता. मुली\बाई ही आशा पारेख, हेमामालिनी, मुमताज, हेलन वगैरे असत. त्यावेळी आजच्यासारखे स्पीकर नव्हते. छोटे वा लांबलचक कर्णे. लाल, हिरवे, पिवळे, निळे दिवे. नंतर डिस्को लाईट आले. नाच सुरू होण्याआधी अनाऊन्समेंट व्हायची आणि कलाकार स्टेजवर येऊन पाठमोरे उभे राहत. ते तसे उभे राहिले तरी प्रेक्षकात एक ‘लहर’ फिरायची. त्यात राजेश खन्ना, मुमताजचं गाणं असेल तर मग विचारायलाच नको. म्युझिकच्या पहिल्या पीससोबत गिरकी घेऊन ते प्रेक्षकांसमोर येत आणि मग असलीपेक्षा नकलीला दाद मिळे!
आजही जेव्हा हिंदी\मराठी पुरस्कार सोहळ्यात जेव्हा नन अनदर देन वगैरे घोषणा चालू असते, तेव्हा मला तेच जुने दिवस आठवतात. फरक इतकाच इथं खरे सितारे असतात. पण हे सारे सितारेही जेव्हा दुसऱ्याच्या गाण्यावर नाचतात, तेव्हा ते रेकॉर्ड डान्सरच वाटतात. ते रेकॉर्ड डान्सर उपेक्षेनं नेस्तनाबूत झाले, हे नवे रेकॉर्ड डान्सर लाखोंची कमाई करून मालामाल झाले!
या रेकॉर्ड डान्सरव्यतिरिक्त डोके भणाणून टाकणारी निवेदकांची अकृत्रिम म्हणून सादर केली जाणारी कृत्रिम शैली. हिंदीत तरी गेली काही वर्षं शाहरुख, सैफ, करण यांनी त्यात सहजता आणलीय. मराठीत ती अजूनही नाही. मराठीत याच्या जोडीला हल्ली ‘स्किट’ म्हणून जो प्रकार माथी मारला जातो. त्यात पाच-दहा वर्षांत एखादाच बरा विनोद जमून जातो. बाकी त्याच त्याच अभिनेत्यांच्या त्याच त्याच नकला आणि सोड्या नेसून किन्नरांनाही लाजवणारे पुरुष कलाकार म्हणजे चढत्या क्रमानं सहनशीलतेचा अंत!
............................................................................................................................................
‘तरंग-अंतरंग’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414
............................................................................................................................................
मराठी चित्रपट सोहळ्यात मराठी चित्रपट, भाषा माणूस यावरच तेच ते विनोद आणि नंतर आमचा मराठी माणूस म्हणून एखाद्या हिंदी चित्रपटात काम मिळवलं म्हणून टोलेजंगी सत्कार. मराठी पाऊल पडते पुढे! पूर्वी मंडईत बाजार उठताना काही लोक खरेदीला निघायचे (आजही जात असतील). कारण बाजार उठताना भाजीपाला स्वस्त मिळतो. हिंदी सिनेमात बाजार उठलेल्या अभिनेत्री मराठी मांडवात थेट ‘महाराष्ट्र भूषण’ होतात! जोडीला ‘मराठीत प्रथमच’ वगैरे पालुपद आहेच. ‘मी आजही वरण-भात खाते’, यावर टाळ्या वाजवणारा समाज शिशुवर्गातून पुढे सरकलाच नाही असं वाटतं!
हिंदीत अशी स्किट कमीच आणि तिथं प्रथमच वगैरे काही नसतं. तिथं जीवनगौरव नसेल तर दिग्गजांना निमंत्रणही नसतं. मराठीत मात्र असे मानाचे गणपती वीस वीस वर्षं सोहळ्यात पहिल्या रांगेत दिसतात. यातले काही तर निमंत्रण मागवून घेतात. काहींना आपल्या हस्ते पुरस्कार द्यायचा असतो. हे पुरस्कार देण्यासाठी उद्योजक प्रायोजित करतात, कार्यक्रम अथवा पारितोषिक. तर सत्ताधारी अथवा विरोधी पक्षातले चमको नेते थेट वाहिनीच्या मालकाला फोन करून प्रोग्राम डिरेक्टरवर दबाव आणतात. या दबावाची वाहिनी प्रमुखाला इतकी तिडिक येते की, शेवटी तो दयेच्या पातळीवर येऊन चमको नेत्याच्या हस्ते एक पारितोषिक देतो. पारितोषिक ज्याला मिळतं त्याचा चेहरा मात्र उतरतो.
सर्वच पुरस्कार सोहळ्यात अगदी ऑस्करलासुद्धा तांत्रिक पुरस्कार प्रदान सोहळा अक्षरक्ष: उरकला जातो. खरं तर चित्रपट हे तंत्रज्ञानाचं माध्यम. पण दिग्दर्शक व छायाचित्रकार वगळता लेखकासह इतर तंत्रज्ञ म्हणजे पांडवातले नकुल-सहदेव. हिंदी सिनेमानं हिरोभोवती फिरणारीच इंडस्ट्री तयार केलीय. ते लोण आता सर्वदूर परसतंय. मराठीतही हिरो वरचढ भावात सिनेमा करू लागलेत. पण हिंदीत १०० कोटी घेणारा हिरो निर्मात्याला ५००-७०० कोटी मिळवून देतो. मराठी हिरोमुळे काही वेळा चाळीस लाखांचं अनुदानही मिळत नाही, बॉक्स ऑफिस तर दूरच राहिलं. तरीही या चमचमत्या ताऱ्यांसह तथाकथित दिमाखदार सोहळे होतात. रेकॉर्ड डान्सर लाखो कमावतात, पुरस्कार विजेत्याच्या हाती फक्त गौरवचिन्ह!
राज्य पुरस्कार वगळले तर कुठल्याही पुरस्कारासोबत रक्कम मिळत नाही. सोहळ्यावर, नाचणाऱ्यांवर, स्किट करणारे सगळे पाकिटं घेऊन जातात. मग प्रायोजकांची मोठी यादी वाचणारे आणि काही कोटींत प्रक्षेपण हक्क विकणारे आयोजक विजेत्यांना १०००-५०० रुपयेही देऊ शकत नाही? आज मुंबईत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्यातही १०००-५०० रुपये सहज जातात. मग प्रतीकात्मक रक्कम द्यायला काय हरकत आहे? अजीर्ण होईपर्यंत मलिदा खाणाऱ्या वाहिन्या यावर काही करणार नाहीत किंवा कुठेलच आयोजक आणि त्यांच्या विरोधात बोलून पुढील वाटचाल\पुरस्कार धोक्यात कशाला आणा म्हणून कलाकार, तंत्रज्ञ बोलणार नाहीत.
हिंदी सोहळ्यात निदान नवीन कलाकार, नवी गाणी दिसतात. जीवनगौरवपुरती जुनी मंडळी. मराठी सोहळ्यात तर मराठीसोबत हिंदी गाणी असतात. ती का असतात यावर खळ्ळ खट्याक करणारेही मूग गिळून गप्प असतात. भैय्या बिहारी चालत नाही, पण उत्तरी भाषेतलं आयटम साँग मराठी चित्रपट सोहळ्यात चालतं.
यात गेली किमान १५-२० वर्षं तरी साधारण सर्वच मराठी चित्रपट सोहळ्यात एक दृश्य हमखास बघायला मिळतं. ते म्हणजे रंगमंचावर ‘हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे’ गाणं सुरू होतं, कुठली तरी नवी जोडी दोनदा या बाजूला, दोनदा त्या बाजूला, एकदा हात वर, एकदा खाली, असं पीटी केल्यासारखी नाचत असते.
मग अचानक तो नाचणारा तरुण नाचत नाचत प्रेक्षकात जातो आणि पहिल्याच रांगेत बसलेल्या सचिन पिळगावकर यांच्याजवळ जातो, त्यांना ‘रंगमंचावर या’ असं खुणावतो. मग ते ही ‘मी कशाला?’ वगैरे अभिनय करत मग ‘बरं’ म्हणत रंगमंचावर येऊन तशीच कवायत करू लागतात. असं वाटतं, हे त्या नाचात असणारच होते, पण अशा सरप्राईज एंट्रीसह!
हा नाच व हे गाणं बघताना वाटतं, या गाण्यानंतर मराठी चित्रपटात गाणी झालीच नाहीत, कुणी त्यावर नाचलंच नाही? आम्हाला कधी फिल्मफेअर किंवा तत्सम सोहळ्यात अमिताभ बच्चन दरवर्षी ‘खईके पान बनारसवाला’ किंवा ‘मैं हू डॉन’ म्हणत नाचताना दिसला नाही. मग मराठीतच हा रिपिट परफॉर्मन्स तोही अशा लटक्या पद्धतीनं! पुणेरी भाषेत म्हणायचं तर ‘आवरा आता’!
नवा मराठी सिनेमा आशय, विषय, सादरीकरणात वेगळ्याच पातळीवर जाताना, हे असं कल्पना दारिद्रय दाखवणारे व अंतिमत: वाहिन्यांचं उखळ पांढरं करणारे सोहळे हवेत कशाला? त्यापेक्षा वाहिन्यांनी प्रक्षेपण हक्क विकत घेताना जी मुजोरी दाखवली जाते, ती कमी करून मराठी निर्मात्याला सन्मानानं वागवावं आणि त्याच्या कलाकृतीला योग्य ते मोल द्यावं!
निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनीच वाहिन्यांच्या संरजामदारीला संघटित विरोध करत हक्काचं दान मागून घ्यावं. मानसन्मानाच्या बाहुलीसाठी आत्मा विकू नये.
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Mahendra Teredesai
Tue , 08 May 2018
पवारी चिरफाड. पण हे पोस्टमाॅर्टम झाले. आत्मे विकू नका हा सल्ला मयतांना देऊन काय उपयोग? न्युड ने हे किती कच्चे आहेत व कच्चा लिंबुने ह्यांचं नागडेपण आॅलरेडी सिध्द झालय. त्यामुळे पवार तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. आपले आत्मे थंड करत राहू.
vishal pawar
Tue , 08 May 2018