अजूनकाही
कालच ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ पाहिलं. नाटक तर अप्रतिम आहेच, पण राघवचं पात्र मनात घर करून बसलंय. स्वतःचा शोध घेण्याची एका मनस्वी चित्रकाराची तळमळ आणि शहरावरचा राग नाटकात छान जमून आला आहे. मुंबईत जगताना समोर येणारे प्रश्न, त्यांची उत्तरं शोधताना होणारी दमछाक हे सगळं पाहताना मनात मंथन सुरू झालं आणि यापूर्वी पाहिलेल्या काही कलाकृतींशी असलेलं त्याचं साधर्म्य प्रकर्षाने जाणवलं.
गणपती आणि गोविंदा लहान होत गेलेत आणि इमारती मात्र उंच होतायत, या सईच्या वक्तव्यातून बऱ्याच गोष्टी अगदी लख्खपणे समोर येऊन उभ्या ठाकतात. शहरं प्रसरण पावत जातात, फुटतात. माणसांचा लोंढा आणि त्यांनी विकासाच्या नावाखाली केलेलं अतिक्रमण त्यांना झेपत नाही, तेव्हा शहरं पहिला बळी माणसांचाच घेतात. जवळच्या नात्यांमध्ये येणारा दुरावा, प्रत्येकाला हवी असणारी स्वतःची स्पेस, आत्मकेंद्री जगणं, ज्याला मी स्वतःही अपवाद नाही, अशा सगळ्या गोष्टी त्याचाच परिपाक म्हणून समोर येतात. ‘आबालाल’मधला तळमळणारा राघव शहर सोडून बाहेर पडतो, तेव्हाच त्याला स्वतःचा सूर गवसतो. सईबरोबरचं त्याचं नातं कुठल्याही ठरवून दिलेल्या साच्यात बसणारं नाही. मुळात अशी साच्यात बसणारी नाती नकोच, हाच एक सामाईक सूर (माझ्यासकट) अलीकडे दिसू लागला आहे.
शहरातल्या माणसांच्या गोष्टी सांगणारं मोहित टाकळकर यांचं ‘उणे पुरे शहर एक’ हे नाटक याच पठडीतलं. कसलंही कारण नसताना, केवळ आसुरी आनंद मिळवण्यासाठी गावाकडून आलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लुबाडणाऱ्या विकृत बाईचं पात्र त्यात होतं. आपला भाऊ शहरात गेला आणि त्यानं स्वतःची प्रगती साधून घेतली, आपण मात्र गावातच सडत राहिलो, याचा राग भर समारंभात काढणाऱ्या पुरुषाचंही एक पात्र होतं. ही सगळी पात्रं म्हणजे शहर फुगत असताना वाढीस लागणाऱ्या माणसांच्या एकाकी बेटांचीच उदाहरणं आहेत.
सचिन कुंडलकर यांच्या ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटात तर तीन पिढ्यांची गोष्ट होती. आताच्या पिढीला हवं असणारं स्वातंत्र्य, सगळ्यांत जुन्या पिढीची सत्ता स्वतःच्या हातात ठेवण्यासाठी चाललेली धडपड आणि जुन्या आणि नव्याचा मेळ साधताना पिचलेली मधली पिढी, अशा एका प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर ही कथा रंगली होती. पण त्याला पार्श्वभूमी होती ती बदलणाऱ्या पुणे शहराचीच. जुना वाडा पाडून त्याजागी नवं कॉम्प्लेक्स उभं राहतं, पण पंख पसरणाऱ्या नव्या पिढीला वेध लागलेत आभाळाचे.
शहर छोटे छोटे, होत गेल्यासारखे...
परत आल्यावर, सारे येथे आहे तसे...
हा विमानातून दिसणाऱ्या जगाचा चेहरा ‘राजवाडे अँड सन्स’मधल्या गाण्यातल्या ओळींनी नेमका टिपला होता.
याच ओळी अगदी चपखल बसल्या होत्या ‘लेडी बर्ड’ चित्रपटाच्या कथेत. नवीन ठिकाणी स्थलांतरित झालेली, पण त्या वातावरणाशी एकरूप होता न आल्याने चिडचिड करणारी एक टीनएजर मुलगी होती त्यात. तिच्या रूपानं आजच्या तरुणाईचीच बंडखोरी चित्रपटात मांडली होती. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, असं म्हणतात. शहरीकरणाच्या प्रक्रियेत शुष्क होत जाणारे नातेसंबंध चित्रपटांतून दिसू लागतात, त्यानिमित्तानं प्रायोगिक आणि व्यावसायिक चित्रकृतींतली, नाट्यकृतींतली सीमारेषा पुसट होत, एकमेकांत मिसळून जाते… तेव्हा या सगळ्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असं समजायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment