‘102 नॉट आऊट’  :  ना चांगला, ना वाईट, फक्त स्वीकारार्ह
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘102 नॉट आऊट’चं एक पोस्टर
  • Sat , 05 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie 102 नॉट आऊट 102 Not Out ऋषी कपूर Rishi Kapoor अमिताभ बच्चन Amitabh Bachchan

‘102 नॉट आऊट’चा दिग्दर्शक उमेश शुक्ला हा दिग्दर्शक म्हणून मीडिऑकर असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे ‘ओह माय गॉड’च्या यशात त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यापेक्षा पटकथेचा जास्त वाटा असल्याचं लक्षात येतं. ज्याला त्याच्या पुढील चित्रपट असलेल्या ‘ऑल इज वेल’नं मूकपणे दुजोरा दिला. सामान्य स्वरूपाची पटकथा आणि दिग्दर्शनामुळे तो काही विशेष प्रभावी वाटत नाही. एकूणच त्याचं वर्णन साधारणपणाच्या आसपास रेंगाळणारा दिग्दर्शक असं करता येतं. आणि ‘102 नॉट आऊट’मधूनही हीच गोष्ट दिसून येते. जी त्याच्या काहीशा चांगल्या असलेल्या मूलभूत कथानकाला मारक ठरते. 

दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) हा वयाच्या १०२ व्या वर्षात आहे. तो बराच उत्साही, आनंदी अशा स्वभावाचा आहे, तर याच्या नेमका उलट स्वभाव त्याचा वयाच्या पंचाहत्तरीतील मुलगा, बाबुलाल ऊर्फ बाबूचा (ऋषी कपूर) आहे. गेली वीसेक वर्ष बाबूचा शांत, सगळं काही व्यवस्थित आणि अगदी चौकटीबद्धपणे जगणारा, आजार वगैरेंची नको तितकी चिंता करणारा स्वभाव सहन केल्यावर दत्तात्रय त्यात बदल घडवून आणण्यासाठी त्याला वृद्धाश्रमात भरती करण्याची धमकी देतो. आणि तसं न होऊ देण्यासाठी काही अटी पूर्ण करण्याचा पर्याय देतो. मग त्याची अटी पूर्ण करण्याची आणि (एकूणच टिपिकल बॉलिवुडपटासारख्या शैलीत) कथानक पुढे सरकण्याची कहाणी, यातून त्याचा आनंदी बनण्याच्या दिशेनं होत असलेला प्रवास असा साधारण चित्रपट आहे. 

हे मूळ कथानक व चित्रपटाचा पूर्वार्ध बऱ्यापैकी खिळवून ठेवणारा आणि मनोरंजक असला तरी त्याची हाताळणी बरीच ‘क्लिशे’ स्वरूपाची आहे. ज्यात सोबतीला तितकंच ‘क्लिशे’ वाटणारं जॉर्ज जोसेफचं पार्श्वसंगीतही आहे. त्यामुळे सौम्या जोशीच्या मूळ पटकथेला शुक्लाच्या टिपिकल शैलीमुळे म्हणावा तितका न्याय मिळत नाही. शिवाय स्वतः पटकथाही काही वेळा पाहून पाहून नकोसे झालेल्या आणि सहजासहजी पुढे काय घडेल, याची जाणीव करून देणाऱ्या कंटाळवाण्या दृश्यांवर खास लक्ष केंद्रित करते. ज्यामुळे चित्रपटाच्या एकूण परिणामकारकतेवर नकारात्मक परिणाम होतो. 

हे मूळ कथानक सौम्या जोशीच्या याच नावाच्या हिंदी नाटकावर आधारित आहे. त्यामुळे त्याचा जीव लहान आहे. परिणामी पावणे दोन तासही जरासे ताणलेले वाटू लागतात. लक्ष्मण उतेकरचा कॅमेराही काही जागा सोडता फार विशेष लक्षवेधी ठरत नाही. त्यामुळे हे रूपांतरण त्याच्या सैल पकडीमुळे ‘सिनेमॅटिक’ रूपात तितक्याशा प्रभावीपणे साकार होत नाही. 

दिग्दर्शक, पटकथालेखक आणि पार्श्वसंगीतकार यांनी आयुष्यात नवं काहीतरी शोधू पाहणाऱ्या, या दोन वृद्धांच्या या कथानकादरम्यान आपली हत्यारं टाकून देत, जुन्याच वळणानं जाणं पसंत केल्यानं चित्रपटाचा भार बहुतांशी भागात बच्चन आणि कपूर यांच्यावर येऊन पडतो. आणि हे दोघंही त्यांची जबाबदारी शक्य तितक्या चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. त्यांची पात्रं ही त्यांनी अनुक्रमे ‘पिकू’ आणि ‘कपूर अँड सन्स’मध्ये साकारलेल्या पात्रांच्या उलट असल्यानं एक अभिनेता म्हणून त्यांच्यातील विविधता दिसून येते. त्यामुळे नव्वदच्या दशकात वारंवार एकत्र दिसून आलेल्या या दोन्ही अभिनेत्यांना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना पाहणं आणि त्यातही अलीकडील काळात एक अभिनेता म्हणून त्यांनी आत्मसात केलेले बदल घडून आल्यानंतर आपापल्या भूमिका समर्थपणे साकारताना पाहणं, हा नक्कीच एक चांगला अनुभव आहे. बाकी धिरू (जिमित त्रिवेदी) आणि अमोल ही पात्रं पूर्णतः स्टेरिओटाईप्स आहेत. 

चित्रपटाच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीबाबत नक्कीच कौतुक करता येईल. त्यातील स्केचेस चांगली आहेत. मात्र त्यांचं आणि चित्रपटाचं काहीएक थिमॅटिक कनेक्शन असतं तर आणखी योग्य झालं असतं. याखेरीज विजय राजनं सुरुवातीला केलेलं कथनही अनावश्यक वाटतं. 

सुरुवातीच्या दृश्यात आणि नंतरही अनेकदा दिसून येणारा ‘सारेगमा’चा म्युजिक प्लेअर आणि आणखी एका जुन्या रेकॉर्ड प्लेअरवर वाजणाच्या तीन-चार गाण्यांमुळे या चित्रपटात सत्तर ऐंशीच्या दशकातील गाण्यांचा मुबलक वापर असणार असं वाटत असलं तरी तेही काही नाही. त्याऐवजी सलीम सुलेमान या जोडीनं संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणी समोर येतात. जी चित्रपटानं निर्माण केलेल्या वातावरणाला समांतर नसल्यानं अधूनमधून येणाऱ्या ‘वक्त ने किये क्या हंसी सीतम’ किंवा तत्सम गाण्यांवर समाधान मानावं लागतं. 

एकूणच ‘102 नॉट आऊट’ हा एक बराच चांगला, छान काहीतरी पाहिल्याचं भावना निर्माण करणारा चित्रपट असला तरी कथानकात असलेली सहजतेची उणीव ही ओढूनताणून काहीतरी (किंवा तसा प्रयत्न) केल्याच्या गोष्टीकडे जास्त लक्ष वेधून घेण्यात परावर्तित होते. त्यामुळे चित्रपट ना चांगला ठरतो, ना वाईट. तो फक्त स्वीकारार्ह ठरतो. कधीतरी क्वचित पाहण्यात आला तर पाहावा असाच उरतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......