‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाचे संपादक, दलित साहित्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि ख्यातनाम लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचं २७ मार्च २०१८ रोजी औरंगाबाद इथं निधन झालं. त्यांच्याविषयी या ना त्या कारणानं निर्माण झालेल्या गैरसमजांना चोख उत्तरं देणारा हा त्यांच्या मित्रांनी लिहिलेला लेख...
.............................................................................................................................................
सेवानिवृत्तीनंतर एकाच गावात कायम वास्तव्याला राहणं माझ्या वाट्याला आलं नाही. समवयस्क मित्रांना कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सहज भेटता यावं अशी स्थिती उरली नाही. त्यामुळे गेल्या १२-१३ वर्षांत या ना त्या निमित्तानं डॉ. गंगाधर पानतावणे सरांची जी सहज भेट व्हायची, ती पुरेशी दुर्मीळ झाली. जे बोलणं व्हायचं ते अनेक वेळेस फोनवरूनच व्हायचं. ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाच्या लेखक-वाचक मेळाव्यात न चुकता काही मान्यवर सतत निमंत्रित केले जात असत. पण मी त्यांच्या अशाही परिवारातला सदस्य नव्हतो. प्रत्येक माणसांची काही खास स्वभाव वैशिष्ट्यं असतात. ती त्यांनी आखून घेतलेल्या जीवनशैलीची गरज म्हणून निर्माण होतात. उदाहरणार्थ, पानतावणे सर गावातल्या अनेक साहित्यिक अथवा सांस्कृतिक उपक्रमांना केवळ श्रोता म्हणून फारसे उपस्थित राहत नसत. विशेष निमंत्रित असले तरच त्यांची उपस्थिती असायची. त्यांनी अंगीकारलेली काही साहित्यिक आणि सांस्कृतिक कामं होती, ती पूर्ण करताना अशा प्रकारचा वेळ देणं त्यांना शक्य होत नसावं. अनेकांच्या लग्न कार्यात ते आवर्जून उपस्थित राहिले, असंही मला आढळून आलं नाही. त्यामुळे काही मित्रांना ते अहंमन्य असावेत, असंही वाटत असे. मी अशा काही प्रतिक्रिया कुजबुजत्या आवाजात ऐकल्या आहेत. पण तो त्यांच्याविषयीचा गैरसमज होता, हे मी खात्रीनं सांगू शकतो. पानतावणे सर घरी एकटे असले तरी ते स्वस्थ बसलेले नसत. ते सतत लेखन-वाचनात व्यस्त असत किंवा घरी आलेल्या लेखक-कवींसोबत अथवा मित्रांसोबत साहित्यिक गप्पामध्येच ते रमलेले असत, हे मला माहीत आहे.
मी विद्यापीठाच्या निवासस्थानी राहत होतो, त्या काळात डॉ. एलिनार झेलिएट त्यांना भेटायला आल्या. त्या भारतात आल्या म्हणजे त्यांच्या प्रवासातल्या नियोजनात पानतावणे सरांची भेट ही ठरलेलीच असायची. माझ्या ‘आवर्त’ या एकांकिकेचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलं होतं. मी, औरंगाबादेत वास्तव्याला आहे, हे कळल्यानंतर त्यांनी माझ्या भेटीची इच्छा व्यक्त केली. खरं तर त्यांच्या हॉटेलमधील, वास्तव्याची वेळ घेऊन त्यांनी मला ‘भेटीसाठी या’ असं सांगितलं असतं तरी मी सहज गेलो असतो. पण त्याऐवजी त्यांनी एलिनार झेलिएट यांची भेट माझ्या घरी घडवून आणली. ते स्वत: त्यांच्या सोबत आले. जवळपास दोन-तीन तास झेलिएट मॅडम यांनी गप्पा मारल्या. माझ्या पत्नीनं त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान केला. आज या साऱ्या आठवणींचे काही दुर्मीळ फोटो माझ्या संग्रही आहेत. आंबेडकरी चळवळीतील साहित्याची जागतिक पातळीवर दखल घेणाऱ्या विदुषीला आजचा आंबेडकर अनुयायी, त्याची जीवनशैली आणि त्यांची वैचारिक ओळख आतून बाहेरून होऊ शकली तर त्यांच्या लेखनात जी स्वाभाविकता येऊ शकेल, ती केवळ रिपोर्ट वाचून येणं शक्य नाही, असं एक आंतरिक सूत्र पानतावणे सरांच्या या तशा कृतीमागे होतं, याचा किती जणांनी विचार केला असावा?
पानतावणे सर केवळ लेखननिष्ठ समीक्षक नव्हते, तर आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी साहित्य चळवळ जोपासायची ही काळानं त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी आहे, अशी त्यांची दृढ समजूत होती. परिणामी त्यांच्या कृतीशीलतेमागील त्यांचं हे सूत्र लक्षात न घेणारी मंडळी त्यांच्यापासून दुरावली. या भूमिकेमुळे ते कधी कधी खूपच टोकदारपणेही वागत. औरंगाबादमध्ये कुठल्याही कामासाठी आलेल्या आंबेडकरी साहित्यिकानं आपल्या घरी उतरावं, आपला पाहुणचार घ्यावा या विषयी ते खूप आग्रही असत. आपल्या घरी नेहमी उतरणारा अन्य मित्र अन्य कुणाकडे वास्तव्यास गेला, हेही त्यांना रुचत नसे. मित्रावर मालकीहक्क असावा एवढे ते काळजी घेत. आणि दुरावलेल्या मित्रांशी ते उपचार म्हणूनसुद्धा संबंध ठेवत नसत.
वामन होवाळ हे आम्हा उभयतांचे मित्र. मी नांदेडला असेपर्यंत ते आले की माझ्याकडे उतरत आणि औरंगाबादला आले की पानतावणे सरांच्या घरी उतरत. आपल्या मित्रांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘श्रावस्ती’त त्यांनी एक वेगळी खोलीही कायम ठेवलेली होती. मी विद्यापीठात आलो आणि वामन होवाळांची मोठी पंचाइत झाली. पानतावणे सरांना ‘मी मुक्कामाला एक दिवसासाठी का होईना भगतकडे जाईन’, हे त्यांना सांगता येईना. पानतावणे सरांच्या स्वभावाचे कंगोरे वामन होवाळांनाही माहीत होते. शत्रूचं मन सहज दुखवता येतं, पण जीवाभावाच्या मित्राचं, त्यातही तो वयानं काहीसा ज्येष्ठ अथवा प्रेमळ असेल तर दुखवायचं कसं? वामनरावांना हे करणं अवघड वाटलं. कारण तेही अत्यंत प्रेमळ होते. अखेर मी सायंकाळच्या गाडीनं निघतो, असं सांगून वामनराव सूटकेस घेऊन निघाले. पानतावणे सरांच्या लक्षात येऊ नये म्हणून रिक्षा वेगळ्या वाटेनं त्यांनी माझ्या घरी आणली. आणि व्हायचं तेच झालं. वामनराव आले आणि थोड्याच वेळात नेमके ॠषिकेश कांबळे माझ्याकडे आले. ते मुद्यामहून माग काढत आले की, सहज आले हे मला माहीत नाही. पण पानतावणे सरांपर्यंत ही बातमी पोचली तर काय काय खोटं बोलायचं याचं नियोजन वामनरावांनी त्यावेळी केलं.
आज वामनराव नाहीत आणि सरही गेले. मी त्या उभयतांच्या आठवणीने गलबलून जातो.
आज कदाचित कुणाला खरंही वाटणार नाही, पण पानतावणे वहिनींची नांदेडला बदली झाली, त्या वेळची एक अशीच आठवण आहे. त्यांना क्वार्टर मिळायला अवकाश होता. त्या काळात वहिनी माझ्या घरी वास्तव्यास होत्या. अवघे दोन-तीन दिवस. माझ्या अनेक गैरसोयी असलेल्या घरात त्या रहायला आल्या. मी त्यावेळी सायन्स कॉलेजच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. माझ्या मनावर काही दडपण आलं, हे पानतावणे सरांनी अचूक हेरलं असावं. ‘काही काळजी करू नका, एकत्र कुटुंबात वाढलेल्या माझ्या पत्नीस तुमच्या घरातली गैरसोय मुळीच खटकणार नाही’, असं म्हणून सरांनी मला धीर दिला. आणि झालंही तसंच.
ही घटना बहुधा तीस-चाळीस वर्षांपूर्वीची आहे. पानतावणे वहिनी गेल्या, तेव्हा माझी पत्नी त्यांच्या अंत्यविधीत सामील तर झाली होतीच, पण त्यावेळच्या त्यांच्या अनेक आठवणींनी विव्हल झाली होती. इतकंच नाही तर, ‘महाराष्ट्रात एवढा ख्यातनाम असलेला विचारवंत आपल्या उपवर मुलींसाठी वर संशोधनात दुर्लक्ष करतो’, यासाठी खाजगीत पानतावणे सरांविषयीचा सात्त्विक संतापही माझ्या पत्नीनं मला बोलून दाखवला होता. माझ्या आणि सरांच्या वारंवार भेटीगाठी होत नव्हत्या. पण मनात मात्र जिव्हाळ्याची एक ओल होती. त्यांना पद्मश्री किताब जाहीर झाला, पण ते त्या समारंभास गेले नाहीत. मी बहुधा त्यावेळी नागपूर किंवा मुंबईला होतो. चौकशी केल्यानंतर कळलं ते आजारी आहेत आणि आयसीयुमध्ये आहेत. मी ॠषिकेश कांबळेना फोन केला. पण त्यांचा फोन लागला नाही. म्हणून मनाचा हिय्या करून मी सरळ पानतावणे सरांनाच फोन केला. फोन त्यांच्या मुलीनं उचलला. त्यांना नुकतंच घरी आणलं हे मला तिनं सांगितलं. त्यांना झोप लागलेली होती. मी औरंगाबादला आलो म्हणजे त्यांची भेट घ्यावी असं मी मनात ठरवलं, पण तो योग काही आलाच नाही. त्यांच्या निधनाची बातमी अगदी सकाळी सकाळी प्राचार्य वाहूळ सरांनी मला सांगितली. काही कौंटुबिक आपत्तीमुळे मला त्यांच्या अंत्ययात्रेतही सामील होता आलं नाही. पण आंबेडकरी विचारवंतातील निष्ठा आणि त्यासाठी घेतलेल्या, पण बऱ्याच वेळेला वादग्रस्त ठरलेल्या कृती यातील पेचांना तोंड देता देता विवाद्य होणारे एक प्रेमळ स्वरूपाचे ज्येष्ठ मित्र म्हणून कुणालाही त्यांचा विसर होणार नाही, याची मला खात्री आहे.
पानतावणे सर खूप जिद्दी होते. पराभव त्यांना निराश करू शकला नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची त्यांनी तीन वेळेस निवडणूक लढवली, पण त्याना यश मिळालं नाही. पण या पराभवांनी ते खचून गेले, असं मात्र मला कधी जाणवलं नाही. राजकीय निवडणूक आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक यातला फरक ते ओळखत होते. चंद्रपूरच्या पराभवानंतर ते दोन वेळेला उभे राहिले. आम्हा काही मित्रांना ही गोष्ट खटकली होती. पण त्यांना सरळ सरळ आपली नाराजी सांगितली तर ते दुखावतील, म्हणून अनेकांनी त्यांना ही नाराजी बोलून दाखवली नाही. म्हणून त्यांना ही गोष्ट कळायची राहिली होती, असं नाही. केवळ आपली वैयक्तिक प्रतिष्ठा वाढावी यासाठी ते पुन:पुन्हा निवडणूक लढवत नव्हते. पण स्वत:ची तात्त्विक भूमिका आणि त्या त्यावेळी उपस्थित होणाऱ्या व्यावहारिक अडचणी यांच्या गुत्यांची समाधानकारक उकल करण्यात त्यांना पुरेसं यश मिळत नव्हतं. त्यामुळे ते वादग्रस्त ठरत होते. अखेर त्यांना वैश्विक विचारपीठ मिळालं आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पराभवाचं सावट दूर झालं. वैश्विक साहित्य संमेलनाचा झगमगाट मोठा नसेल, पण माध्यमांनी दखल घ्यावी असं ते पद होतं आणि त्याचा उपयोग दलित साहित्याविषयीची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्याची ती संधी होती, हे ते ओळखून होते.
पानतावणे सर हट्टी होते, तसेच ते अत्यंत निर्व्यसनी होते. ते शिस्तबद्ध जगणारे, आयुष्याचं मोल ओळखणारे गृहस्थ होते. म्हणूनच ते कधी आजारी पडले नाहीत. अखेर अपघातानंच त्यांच्यावर आजारीपण लादलं. मृत्यू आणि जीवन जगण्याची जिद्द या संघर्षात काळालासुद्धा अपघात घडवून आणून त्यांचा पराभव करावा लागला. हा खरं तर काळालाही लाजवणारा प्रसंग आहे. यश, सन्मानांचे प्रसंग, प्रतिष्ठेचे क्षण अशा अनेक गोष्टी हातातोंडाशी आलेल्या असताना निसटून जाव्या याला काय म्हणावं?
महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद देण्यात यावं असा निर्णय झाला. तशी बातमीही ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली. पण त्या काळात उफाळलेल्या एका साहित्यिक वादामुळे त्यांना ते अध्यक्षपद मिळू शकलं नाही.
चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं म्हणून ते स्वत:हून पूढे आले नव्हते. निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या लक्ष्मी कॉलनीतल्या निवासस्थानी बाबा आमटे यांचे दूत आले होते. सरांच्या घरी भोजनाचा आनंद घ्यावा म्हणून त्याच दिवशी मीही त्यांच्या घरीच उपस्थित होतो. सर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आणि फार थोड्या फरकानं पराभूत झाले. खरं तर अशा पराभवांची मीमांसा करण्याऐवजी दुर्लक्ष करणं हेच व्यावहारिकदृष्ट्या अधिक सोयीचं असतं. पण त्यांच्या स्वभावात गप्प बसणं नव्हतं. उपरोक्त दोन्ही घटनांची पराभव मीमांसा करणारे लेख त्यांनी लिहिले आणि ‘बुडत्याचे पाय खोलात’ अशा अवस्थेला त्यांना सामोरं जावं लागलं.
माणूस जिद्दी, कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी असला की नकळतपणे त्याच्या अवतीभवती क्षुद्र स्वार्थ असणारे होयबा गर्दी करू लागतात. पानतावणे सरही याला अपवाद नव्हते. त्यांच्यासमोर असणाऱ्या पेचांची सम्यकपणे उकल करण्यासाठी कुणीही फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त भूमिकांची उकल करणारं कुणी लेखन केलं नाही. सदर वाद त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाशी निगडित नव्हते. जे वाद होते ते सार्वजनिक वैचारिक भूमिकांचे होते. म्हणून आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीनं थोडी बहुत उकल करणारं लेखन यायला हवं होतं. ते मात्र तसंच राहून गेलं. चंद्रपूर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अवघ्या आठ-नऊ मतांनी हुकलं, त्यावेळी पानतावणे सरांनी पराभव मीमांसा करणारा एक अत्यंत स्फोटक लेख लिहिला होता आणि तो खूप गाजला होता. ‘ब्राह्मणी मनोवृत्तीच्या साहित्यिक मतदारांमुळे हा पराभव झाला’ असं त्या लेखाचं सूत्र होतं. मतदारांनी जो परस्परात प्रचार केला, त्याचे अत्यंत जहरी स्वरूपाचे लेखी पुरावेच त्यांना उपलब्ध झाले होते. त्यातील काही नमुने त्यांनी त्या लेखात छापले. त्यामुळे तो लेख खूपच गाजला. अर्थात पानतावणे सरांचा पराभव याच एका मनोवृत्तीमुळे झाला, असं मला मात्र तेव्हाही वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नाही.
सर्वसामान्य माणसाच्या मनातला एक कोपरा जन्माविषयीच्या तिरस्कृत संवेदनेनं व्यापलेला असतो, हे कटू वास्तव नाकारता येणं शक्य नाही. बाबासाहेबांच्या हयातीत तर ही मनोवृत्ती अधिकच टोकदार होती. संविधानाच्या रचनेबद्दल अत्यंत समाधान व्यक्त करणाऱ्या एका जगदगुरू शंकराचार्यानं ‘गंगा कितीही निर्मल आणि पवित्र असली तर ती गटाराच्या मुखातून प्रकट झाली आहे’ अशा शब्दांत नाशिक मुक्कामी आपला अभिप्राय व्यक्त करून डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबदल जो गलिच्छ अभिप्राय व्यक्त केला होता, तो विसरायचा कसा? असं असलं तरी मंद स्वरूपात जे बदल चालू आहेत, त्यातून आपणास कोणते संकेत मिळतात? याकडे आपण दुर्लक्ष करायचं कसं?
पानतावणे सरांनी अध्यपदासाठी उभं राहावं ही विनंती बाबा आमटे यांनी केली होती. ते जन्मानं दलित नव्हते. जन्मानं दलित असलेल्यांचे पाच मतदारदेखील या निवडणुकीत सहभागी नव्हते. जे मतदार होते, त्यात सुमारे ८० ते ९० टक्के मतदार उच्चवर्णीयच होते. त्यामुळे विजयी उमेदवाराला मतं पडली, ती जशी सवर्णांची होती, तशीच पराभूत उमेदवाराला मतं पडली तीही सवर्णांचीच होती. प्रत्यक्ष संमेलनात आयोजकांनी अध्यक्षांच्या बरोबरीनं गंगाधर पानतावणे यांचा सत्कार आयोजित केला होता, ते आयोजकही जन्मानं सवर्णच होते. त्यावेळचे विजयी उमेदवार होते वामनराव चोरघडे. ते संघवादी लेखक नव्हते. ते कट्टर गांधीवादी म्हणून ओळखले जायचे. ते वयानंसुद्धा खूप ज्येष्ठ होते. संमेलन चंद्रपूरला होतं आणि वामनराव चोरघडे यांना विदर्भातला मतदार अधिक अनुकूल होता. शिवाय या संमेलनात नामांतरामुळे सवर्ण-दलितांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता, त्याचाही संदर्भ होताच. मतदारांचीही काही वैचारिक भूमिका असतेच. त्यात नाही म्हटलं तरी मराठी साहित्यात आणि त्यातही संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत डावे-उजवे अनेक मतदार होते. मतदार डाव्या विचाराचा असो की उजव्या विचाराचा, काही मतदार साहित्य-निर्मितीचा दर्जाही लक्षात घेणारे असू शकतात. त्यामुळे पानतावणे सर यांची ‘पराभव मीमांसा’ स्वीकारार्ह वाटत नाही. इतक्या सगळ्या बाबींचा विचार केला म्हणजे पानतावणे सरांचा तो लेख काहीसा पक्षपातीच वाटणार हे उघड आहे. त्यानंतरच्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या याच लेखाचेही पूर्वग्रह अडसर ठरले होते, असं माझं निरीक्षण आहे.
खरं तर पानतावणे सरांचं विवेचन बॅलेन्स्ड असतं, अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विद्यार्थीही तसेच सांगतात. मग इथंच त्यांचं विवेचन काहीसं पक्षपाती आहे, असं का? त्यांना हे जाणवलं नसावं का? माझा स्वत:चा तर्क असा, की त्यांना याची मनातून जाणीवही असावी. पण दलित साहित्याच्या चळवळीसाठी मध्यवर्ती साहित्याच्या प्रवाहात जी स्पेस निर्माण व्हावा असं त्यांना ठामपणे वाटत होतं. आपण वादग्रसत ठरू हे गृहीत धरून त्यांनी तो लेख लिहिला असावा असं मला वाटतं. साहित्य चळवळीच्या स्पेस निर्मितीसाठी त्यांनी संमेलनाध्यपदाचे तीन वेळचे पराभव स्वीकारले आणि केवळ त्याच उद्देशानं त्यांनी विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही स्वीकारले असावं, असा माझा तर्क आहे.
समरसता मंचाचं महाराष्ट्र पातळीवर पुण्यात संमेलन झालं, त्यावेळी पानतावणे सर समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून या संमेलनास उपस्थित होते. त्यांची ही उपस्थिती आंबेडकरवादी मंडळींना खूपच खटकली. त्यांनी वारंवार, तिथं काय बोललो हे लक्षात घ्या, असं सांगून पाहिले. मात्र कर्त्या लेखकांना चोख उत्तरंही दिली. पण त्यांच्याबद्दलचा हा गैरसमज मात्र म्हणावा तेवढा दूर झाला नाही. ‘आपला महाराष्ट्र’ या नियतकालिकात मुलाखत देताना तर आपण तिथं उपस्थित राहिलो, ही चूकच झाली असाही खुलासा त्यांनी केला.
मी स्वत: नांदेड पातळीवर समरसता मंचाच्या सदस्यांच्या मेळाव्यात उपस्थित होतो. तिथं मी मंचाबद्दलचे मतभेद व्यक्त करणारं भाषणही दिलं होतं. डॉ. प्र.ई. सोनकांबळे औरंगाबादमध्ये झालेल्या समरसता मंचाच्या साहित्य संमेलनात पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा पानतावणे सरांनी अगदी माझ्या आणि प्र.ई. सोनकांबळे यांच्या नावाचा उल्लेख करून ‘टीकाकार फक्त मलाच लक्ष्य करतात’ अशीही तक्रार केली. पण त्यांच्या समरसता मंचाच्या उपस्थितीचं प्रतिकूल सावट त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कायम राहिलं ते राहिलंच. ‘आपला महाराष्ट्र’मधील मुलाखतीनंतर सरांनी आता असा खेद व्यक्त करणं थांबवावं, असा लेख लिहून मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
.............................................................................................................................................
लेखक दत्ता भगत प्रख्यात नाटककार आणि दलित रंगभूमीचे एक अध्वर्यू आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment